सोनी मनोरंजन वाहिनीवर सध्या ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ ही मालिका सुरू आहे. यात अहिल्याबाई होळकरांचा प्रवास साकारण्यात आला आहे. अहिल्याबाईंना प्राणी खूप आवडत असत. त्या त्यांची खूप काळजी घेत. अहिल्याबाईंच्या स्वभावातील ज्या गोष्टी आतापर्यंत समोर आलेल्या नाहीत त्यावर प्रकाश टाकण्याचा या मालिकेचा उद्देश आहे. विशेष म्हणजे अहिल्याबाई होळकरांचे बालपणाचे पात्र साकारणारी अदिती जलतरे हीदेखील प्राणीप्रेमी आहे.
चित्रीकरणाच्या दरम्यानही अदिती सेटवरील प्राण्यांसोबत खेळत असते. आपल्या घरून आणलेले अन्न ती प्राण्यांना खाऊ घालत असते. प्राण्यांवरील प्रेमाबद्दल बोलताना अदिती म्हणाली, अहिल्याबाईंना प्राण्यांची खूप आवड होती, हे कळल्यावर मला खूप आनंद झाला. कारण मलाही प्राण्यांची आवड आहे. त्यामुळे त्यांचे व माझे नाते घट्ट असल्यासारखे वाटले. त्यांच्या या आवडीसोबत माझी आवड खूप मिळतीजुळती आहे. माझ्या आईने तर अहिल्याबाई आणि माझ्यामधील समान असलेल्या आणखी काही गोष्टी दाखवल्या. मी त्यांच्याबद्दल खूप प्रश्न विचारत असते, त्यांच्यासारखंच शिकण्याची माझी इच्छा आहे. त्यामुळे त्यांचे चरित्र पडद्यावर साकारणे हा खरोखरच माझ्यासाठी सन्मान आहे, असेही ती सांगते.