लहान बाळाच्या बोबड्या बोलांमध्ये मिसळून जायचं हे प्रत्येक आईचं आवडतं काम… त्यात त्या खरोखर हरवून जातात. त्यातच अभिनेत्री प्रियंका बर्वे ही तर गायिकाही असल्यामुळे आपल्या चिमुकल्याच्या बोबड्या शब्दांत ती तान आणि लय शोधत असते. सोशल मिडियावर तशी ती बऱ्यापैकी अॅक्टीव्ह असते. यावर ती अनेकदा तिच्या आगामी प्रोजेक्टबाबतचे अपडेट्स चाहत्यांशी शेअर करत असते. आता नुकताच तिने आपल्या गोडुल्या लेकासोबतचा एक गोड व्हिडियो चाहत्यांशी शेअर केला आहे. यामध्ये प्रियंका गाणे म्हणते आहे. तिच्या मांडीवरच बसलेला छोटुकला लेक युवान हाही तिच्या सुरात सूर मिसळताना दिसतो आहे.
गेल्याच वर्षी ऑगस्टमध्ये प्रियंका बर्वे हिने आपण आई झाल्याची बातमी सोशल मिडीयावरच दिली होती. आपल्या आत्ताच्या व्हिडीओला तिने ‘वर्क इन प्रोग्रेस’ असे कॅप्शन दिले आहे. प्रियंका बर्वेने यापूर्वी ‘आनंदी गोपाळ’, ‘रमा-माधव’ आणि ‘पानिपत’ या चित्रपटांत गायलेली गाणी प्रेक्षकांना खूपच आवडली आहेत. इन्स्टाग्रामवर तिच्या या व्हिडीओवर अनेक सेलिब्रेटीही कौतुकाचा वर्षाव करत आहेत.