प्रेक्षकांना नेमके कोणते चित्रपट आवडतात?… ऐतिहासिक, रहस्यमय, कौटुंबिक की विनोदी चित्रपट…? याबाबत काही नेमकं सांगता येत नसलं तरी विनोदी आणि निखळ मनोरंजक चित्रपट सतत येतच असतात. दोन घटका प्रेक्षकांचं मनोरंजन व्हावं हा या चित्रपटांचा एकच उद्देश असतो. १७ जून रोजी अनुप जगदाळे यांचे दिग्दर्शन असलेला ‘भिरकीट’ हा विनोदी मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या सिनेमामध्ये विनोदाचे एकाहून एक सरस बादशाह एकवटले असल्यामुळे यात हास्याचे फवारे उडतील यात शंका नाही.
‘भिरकीट’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटात नेमके काय पाहायला मिळणार आहे याची कल्पना प्रेक्षकांना आली आहे. या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, हृषिकेश जोशी, कुशल बद्रिके, सागर कारंडे, मोनालिसा बागल, तानाजी गालगुंडे, कैलास वाघमारे, उषा नाईक, याकूब सय्यद, श्रीकांत यादव, मीनल बाळ, शिल्पा ठाकरे, दीप्ती धोत्रे, आर्या घारे, सेवा मोरे, रोहित चव्हाण, बाळकृष्ण शिंदे, नामदेव मिरकुटे, राधा सागर, अश्विनी बागल असे सगळेच कलाकार धमाल विनोदी शैलीने चित्रपटगृहात हास्यकल्लोळ करणार आहेत. ही धमाल पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक असतीलच.
या चित्रपटात गिरीश कुलकर्णी हे एका आगळ्यावेगळ्या तात्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. जो नेहमीच सर्वांच्या मदतीला धावून जाणारा आहे. गावातील प्रत्येक स्त्री तिची व्यथा घेऊन ‘तात्या’कडे सोडवायला जाते. असा हा सदैव सेवेसाठी तत्पर असणारा ‘तात्या’ प्रेक्षकांना पोट दुखेपर्यंत हसवणार आहे. तर सागर कारंडे एक धमाल राजकारण करताना दिसणार आहे. तो ‘बंटी दादा’ ही भूमिका साकारत आहे. याव्यतिरिक्त हृषिकेश जोशी, कुशल बद्रिके, तानाजी गालगुंडेही आपल्या अनोख्या अंदाजाने प्रेक्षकांना लोटपोट हसवणार आहेत.
दिग्दर्शक अनुप जगदाळे म्हणाले, ‘या चित्रपटातील प्रत्येक विनोदवीराची अनोखी विनोदशैली आहे. प्रत्येकाचे हसवण्याचे आपापले वेगळे टायमिंग आहे आणि हे असे वेगवेगळे विनोदवीर एकत्र ‘भिरकीट’मध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे हास्याचे जबरदस्त पॅकेज आम्ही घेऊन येत आहोत. प्रेक्षकांना विरंगुळा म्हणून निव्वळ मनोरंजन हवे असते, ‘भिरकीट’ त्यांच्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करेल याची मला खात्री आहे.’