तिचं बेधडक वागणं, मनसोक्त हसणं… मनाला वाटेल तसं बोलणं… नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’मध्ये रिंकू राजगुरू हिचा हा भन्नाट अवतार लोकांनी अनुभवला. मराठी चित्रपटांमध्ये अशी बेधडक वागणारी (किमान सिनेमात) अभिनेत्री फारशी आठवणीत नाही. म्हणून प्रेक्षकांना रिंकूचा हा बिनधास्तपणा भलताच आवडला. ‘सैराट’ २०१६ साली आला होता… तरी तिला अजूनही लोक आर्ची म्हणूनच ओळखतात. मात्र, ती सातत्याने वेगवेगळ्या भूमिका साकारत असते. मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट आणि वेबसिरीजमध्ये तिच्या अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा प्रेक्षकांनी पाहिल्या आणि अनुभवल्या आहेत. आता ती एका वेगळ्याच रूपात प्रेक्षकांसमोर येते आहे. ‘आठवा रंग प्रेमाचा’ या सिनेमात रिंकू एका अॅसिड व्हिक्टिमची म्हणजे अॅसिड हल्ल्यात विद्रूप झालेल्या तरुणीची भूमिका साकारतेय.
माणसाच्या बाह्यरूपापेक्षा आंतरिक रूपावर प्रेम करायला हवं हा विचार मांडणारा, एका प्रेमकहाणीवर आधारलेला हा चित्रपट १७ जूनला प्रदर्शित होतोय. यात प्रथमच रिंकूने प्रोस्थेटिक मेकअप केलाय. या सिनेमाच्या चित्रिकरणाच्या वेळी ज्येष्ठ अभिनेते मकरंद देशपांडे यांना रिंकूच्या लोकप्रियतेचा अनुभव आला. ते म्हणाले, या सिनेमाचे शूटिंग सुरू असताना मी तिला गमतीने म्हणायचो, तू फार भाव खाऊ नकोस, सैराट प्रदर्शित होऊन सहा वर्षं झालीत, तुझं ग्लॅमर लोक विसरले आहेत…, पण एकदा एका निर्जन स्थळी या सिनेमाचं शूटिंग करत असताना, अचानक लोकांचा आवाज ऐकू येऊ लागला. आम्ही चमकलो. आवाज फार वाढला म्हणून आम्ही बाहेर येऊन पाहिलं तर, अनेक लोक आम्हाला रिंकूला पहायचंय, भेटायचं आहे, असा आरडा-ओरडा करत होते.’
रिंकू या सिनेमाविषयी बोलताना म्हणाली, मी कोणत्याही सेटवर कोर्या कागदासारखी जाते, दिग्दर्शक जे सांगेल तसं काम करण्याचा प्रयत्न करते. या सिनेमात मी साकारलेली ‘कृतिका’ ही भूमिका खूप चॅलेंजिंग होती. या सिनेमातून मनोरंजनासोबत दिलेला सामाजिक संदेश प्रेक्षकांना आवडेल याची मला खात्री आहे.’ अ टॉप अँगल प्रॉडक्शनच्या समीर कर्णिक यांनी ‘आठवा रंग प्रेमाचा’ या चित्रपटाची निर्मिती केली असून आदिनाथ पिक्चर्सच्या आशिष भालेराव, राकेश राऊत प्रॉडक्शन्स यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. चित्रपटाची कथा, दिग्दर्शन खुशबू सिन्हा यांचे असून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटाची पटकथा, संवाद समीर कर्णिक यांनी लिहिले आहेत. क्यूँ हो गया ना, यमला पगला दिवाना अशा गाजलेल्या हिंदी सिनेमांचे ते दिग्दर्शक आहेत. मकरंद देशपांडे, रिंकू यांच्यासोबतच विशाल आनंद हा नवा अभिनेता या चित्रपटातून पदार्पण करतोय. १७ जून रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होतो आहे.