वैभवजी, यंदा सरासरीएवढा पाऊस पडेल, सरासरीपेक्षा कमी पडेल की सरासरीपेक्षा जास्त पडेल… तुमचा काय अंदाज?
– लहानू बारकू टेमले, विक्रमगड
मला वाटतं सरासरी सरीवर सरी पडतील…
पावसात डोकं भिजलं तर जास्त त्रास कोणाला होतो? केशवानाला की टक्कलवंताला?
– बाबूराव पाटील, सांगोला
केसवाल्यांना… पाणी अडकून राहातं!
नाटकाच्या थिएटरमधल्या अव्यवस्थेबद्दल हल्ली बरेच कलाकार आवाज उठवत असतात, तुमचा अनुभव काय?
– रेवती कारखानीस, वाशीम
सगळ्याच सार्वजनिक सरकारी ठिकाणांचं आपण बकालीकरण करतो…
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय… तुम्हाला कशाची भीती अधिक वाटते, कोरोनाची की टाळेबंदीची?
– इरफान हाजी, पौड रोड, पुणे
टाळेबंदीची
जीवन के सफर में राही, मिलते हैं बिछड जाने को… हेच खरं असेल, तर मग माणसं भेटतात तरी कशाला एकमेकांना?
– नम्रता गोळे, विरार
आयुष्य काय आहे हे कळायला.
स्टेजवर आवेशात गेलात आणि संवाद विसरलात, असं कधी तुमच्या बाबतीत झालं आहे का? काय करता अशावेळी?
– राधिका टिपणीस, सिंदखेड राजा
असं होऊ नये म्हणूनच तालीम करायची… आणि संवाद विसरल्यावर काय करायचं हेही तालमीतच शिकतो आपण.
पाऊस पडला की काहींना गरमागरम भजी आठवते, काहींना गरमागरम (आतून करणारी) रम… तुम्हाला काय आठवतं?
– भावेश दरेकर, महाड
दोन्ही एकत्र आलं तर स्वर्गसुख मिळतं
पावसात उजाड बोडक्या माळरानावरही हिरवाई फुलते, तशी कोरड्या मनातून पण कविता उमलते, असं म्हणतात… तुम्हाला सुचते का हो कविता पावसात?
– कविता सोनकांबळे, जेजुरी
हो खूप… पण त्या मीच पुन्हा वाचल्यावर फाडून टाकतो…
कशासाठी उतरावे तंबू ठोकून, कोण मेले कुणासाठी रक्त ओकून?
– प्रभाकर दातार, चेंदणी, ठाणे
याचा अर्थ तुम्हाला कळला, तर मला कळवा…
‘रानबाजार’ या ओटीटीवरील वेबसीरिजमध्ये तुमची भूमिका आवडली. या माध्यमात काम करताना इतर माध्यमांपेक्षा काय फरक जाणवतो?
– अनिल पडवळ, अंधेरी
काहीही नाही… फक्त शिव्या द्यायला मज्जा आली…
हनुमानजन्माचा वाद सोडवण्यासाठी सर्व पक्षांच्या हातात गदा दिल्या तर ते सर्वांसाठी उपयोगाचे ठरेल असे वाटते. तुमचे मत काय?
– राजेश गोडबोले, सातारा
त्यापेक्षा हनुमान चालिसा तोंडपाठ करायला सांगा सगळ्यांना… इथेच प्रश्न संपेल.
काही लोकांसाठी तरी टकमक टोकावरून कडेलोटाच्या शिक्षेला परवानगी मिळावी, असं मला वाटतं… तुम्हाला वाटतं का कुणाला तेलाच्या कढईत लोटावं किंवा हत्तीच्या पायी द्यावं असं?
– जयराम काशीकर, पिंपळगाव बसवंत
माफ करावं… त्यांच्या कर्माचे फळ मिळेल त्यांना.
मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या नावावर सध्या जो अमर्याद राजकीय नंगानाच सुरू आहे, तो पाहून प्रभू रामचंद्रांच्या मनात काय विचार आला असेल?
– प्रवीण वनमाळी, नागपूर
ते म्हणतील… हेच ते कलियुग.
टवाळा आवडे विनोद… तर मग मवाळा आवडे काय?
– दिनेश कुडची, सोलापूर
टवाळ आणि मवाळ हेच जुळत नाहीयेय मुळात… पण तुम्हाला वाटलं तर जुळवा काहीही…
अलीकडे एखादा कलाकार, लेखक किंवा कोणीही नामवंत माणूस मरण पावला की सोशल मीडियावर, कोणैत हे? असतील कोणी मोठे, पण आम्हाला माहिती नाही, अशा पिचकार्या टाकण्यात अनेकांना आनंद मिळतो. ही काय वृत्ती आहे? अशांना काय उत्तर द्यावं?
– रमाकांत चिंदरकर, भांडूप
भिक्कार मनोवृत्ती. असहिष्णुता.