माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या याने ती अश्लील बोलणारी रोबोट पाहिल्यापासून अक्षरश: तो वेडा झालाय. आपण ती स्त्री रोबोट कुणाला तरी गिफ्ट म्हणून देणार आहोत याची आठवण अनेकदा करून देऊनसुद्धा तो त्याच्या घरी मोठ्या जिव्हाळ्याने एखादी पोथी ऐकावी तशी ती रोबोट ऑन करून दिवस रात्र तिच्या शिव्या ऐकत बसतो, अशी तक्रार त्याची होणारी पत्नी पाकळी हिने माझ्याकडे येऊन रडत रडत केली, तेव्हा त्याच्या या नव्या छंदाचा मला इतका राग आला की तो समोर आल्यावर त्याला सणसणीत चार शिव्या हासडाव्या हे मी नक्की केलं. पाकळीची मी समजूत घातली, लवकरच ज्याची भेट त्याला पोच झाली की तुमचा प्रॉब्लेम सुटेल. तरीही मी तिला विचारलं, तुला दम देता आला नाही त्याला? होणारा नवरा आहे तो तुझा. आतापासून त्याला मुठीत ठेवायला शिक, नाहीतर डोक्यावर मिर्या वाटेल तुझ्या. विदेशातून एक आगळी वेगळी रोबोटी आणली हे ठीक. पण ती सध्या घरात आहे म्हणून तिचा असा गैरवापर करणे हा शुद्ध चावटपणा आहे. तिला माणसासारख्या भावना नसल्या तरी शेवटी स्त्रियांचा मान राखणे ही आपली संस्कृती आहे. त्यावर पाकळी म्हणाली, तो म्हणतो, तिच्या तोंडचा शिव्यांच्या खजिना म्हणजे एक मोठा संशोधनाचा विषय आहे. त्यावर मी स्वत: दोन-दोन पीएचड्या करून त्याची पुस्तकं छापेन. तीही इंग्रजीसह सर्व भारतीय भाषांमध्ये. वर्ल्ड फेमस होईन आणि गिनीज बुकात जाईन. तेव्हा मी रागाने म्हणाले, तू गिनीज बुकात जा नाहीतर मसणात जा, तू असा वागलास तर मी तुझ्याशी लग्नच करणार नाही. नंतर त्याची क्षमा मागून मी माझा `मसणात’ हा शब्द मागे घेतला आणि प्रतीकात्मक रूपाने चंद्रकांतदादांच्या दिशेने अर्पण केला. मग म्हणाले, तू जर त्या रोबोटीचे ऐकणं बंद केलं नाहीस तर मी तिची किल्ली पिरगाळून हातोड्याने तिचा खून पाडीन. एवढं बोलल्यावर तो नरम झाला आणि म्हणाला, पाकळी, यापुढे मी तिचा एक शब्दही ऐकणार नाही. पण तू असं काही करू नकोस. पण एक लक्षात ठेव. योग्यवेळी योग्य त्या शिव्या तोंडातून बाहेर पडल्याच पाहिजेत. मोठमोठी माणसे शिव्या देतात. आपण तर त्यांच्या मानाने काहीच नाही. शिव्या म्हणजे अविष्कार स्वातंत्र्याचा अर्क आहे. पुराणकालाचं उत्खनन केलं ना त्या भाजपवाल्यांसारखं तर भलभलतं काही सापडलं तर काय म्हणशील तू? शेवटी, माणूस आणि पशु-पक्षी, प्राणी जगतात कशासाठी? मी काही तुला सारं विस्कटून सांगायची गरज नाही. जग चालतं कशावर? ज्या गोष्टी आपण वाईट समजतो आणि त्याकडे तोंड फिरवतो, त्यातूनच आलेले ते उत्स्फूर्त शब्द आहेत… त्यावर मी काहीच बोलू शकले नाही. तरी त्याचं ब्रेनवॉशिंग करणं सुरू होतं.
यात त्याला त्याच दिवशीच्या पेपरात पहिल्या पानावर आलेली ठळक बातमी सापडली. तो पेपर माझ्यापुढे फडकवत तो म्हणाला, आपले सुप्रीम कोर्ट तर शहाणे आहे ना. त्यांनी वेश्याव्यवसाय करणे हा गुन्हा नाही असा ठामपणे निकाल दिला आहे. एखादी स्त्री पैशासाठी शरीरविक्रय करत असेल तर ती जगण्यासाठी तिची गरज आहे. तिला आपण गुन्हेगार ठरवू शकत नाही. प्राचीन काळापासून प्रत्येक राजवटीत गणिकांच्या वस्त्या होत्या. समाज त्यांच्याकडे उपेक्षेने पाहात असला तरी त्यांनाही जगण्यासाठी दुसरा पर्याय नसल्यामुळे तो त्यांचा हक्क असल्याचे सुप्रीम कोर्टाने मान्य केले आहे. त्या स्त्रिया हौस म्हणून हा व्यवसाय करत नाहीत. त्यांचीही मुलं असतात, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणार्या सामाजिक संस्था, संघटना आहेत. त्या नरकातून त्यांना बाहेर पडण्याची कितीही इच्छा असली तरी त्या पडू शकत नाहीत. रेड लाइट एरिया म्हणून या वस्त्या ओळखल्या जातात. प्रत्येक शहरात हा व्यवसाय चालतो. देहविक्रय पोटासाठी करणारी स्त्री आणि केवळ शरीराच्या आणि सौंदर्याच्या जोरावर स्वत:च्या शरीराची उच्चभ्रू वस्तीत, डान्स बारमध्ये जास्तीत जास्त किंमत वसूल करून महिन्याला लाखो रुपये कमावून धंदा करणारी स्त्री यात फरक आहे. ही दोन्ही जगे वेगळी आहेत. डान्स बारमध्ये चालणारा वेश्याव्यवसाय, त्यावर अधून मधून पडणार्या धाडीची नाटकं हे सारं थोतांड असतं.
-पण हे वेश्यापुरण तू मला काय सांगतोयस? माझा विषय तो घाणेरड्या शिव्या देणार्या लेडीज रोबोट पुरता मर्यादित आहे.
-तेच तर म्हणतोय मी. समाजात शिव्या देणं असभ्यपणाचं लक्षण समजलं जातं तसंच वेश्याव्यवसायाकडेही समाज नाक मुरडतच पाहतो. तरीही शिव्याही अस्तित्वात आहेत आणि वेश्याव्यवसायही. कारण दोन्हीही समाजाच्या काही विशिष्ट घटकांच्या गरजा आहेत. शिव्यांमधूनच डोक्यातील विकृत कल्पनांचा जन्म होतो. डोके रिकामी असले आणि डोक्याचा खोका झाला असला की त्यात अशा विकृत कल्पनांची भुतं थयथयाट करत राहतात. सोशल मीडिया तर या थुंक्या झेलण्यास तत्परच असतो. त्यातून आपण टीव्हीवर दिसणार, प्रसिद्धी मिळणार, आपलं नाव होणार याची क्रेझ मनात घोळू लागली की अशी वाचाळवीरांना मोठा कंठ फुटतो. सध्या चॅनेल, ट्विटर, इन्स्टाग्राम, मोबाइलवर जो क्रियाप्रतिक्रियांचा धुमाकुळ सुरू असतो त्यातूनच वातावरण दूषित होतं. वेश्याव्यवसायापेक्षा या सोशल मीडियाला आता समाजात तुच्छतेच्या भावनेने बघितलं जातं. म्हणूनच सुप्रीम कोर्टाने वेश्याव्यवसायाला परवानगी देऊन एक सन्मान बहाल केला आहे तर सोशल मीडियाच्या अविष्कार स्वातंत्र्यावर सगळीकडे ताशेरे ओढले जात आहेत. हे दोन विषय वेगळे वाटले तरी ती समाजाची दोन लक्षणीय अंगे आहेत.
-मग तुम्ही शिव्या आणि वेश्याव्यवसाय या विषयावर एक जाडजूड ग्रंथ लिहा आणि त्यात तुमच डोक्यातील तुमचं सगळं ज्ञान उतरवून त्या पुस्तकाचं प्रकाशन तुमच्या आवडत्या बोल्ड अभिनेत्रीच्या हस्ते करा, म्हणजे सर्व सोशल किड्यांच्या आत्म्याला शांती मिळेल.
पाकळीने सांगितलेला हा सगळा वृत्तांत ऐकून नेमकं काय करावं हे मला कळेना. मी तिची समजूत घातली. म्हटलं, पाकळी वहिनी, पोक्या हुशार आहे. त्याला ती लेडीज रोबोट कितीही आवडली तरी तिच्यापासून तुला धोका नाही. एकदा तिची योग्य ठिकाणी पाठवणी झाली की तो तुझ्याशिवाय कसलाच विचार करणार नाही. शेवटी त्याच्यावर काही संस्कार आहेत. ना तो शिव्यांच्या नादाला लागणार ना वेश्यांच्या. त्यातून एक नवा विचार तो समाजाला देईल. कारण आज दुसरे आहेतच कोण किरीट सोमय्या आणि चंद्रकांत पाटलांशिवाय समाजाला नवा विचार देणारे नेते?