एखादा माणूस एका ऑफिसात अनेक वर्ष काम करत राहिला तर हळूहळू तो सीनियर होतो. त्याच्या कामाऐवजी त्याचं तिथे अनेक वर्ष असणं ज्येष्ठता मिळवून देतं. आपल्या निव्वळ असण्यापेक्षा कामातून असण्याची दखल घेतली जावी असं त्याला मनोमन वाटत असतं. कधी त्याचं काम मनाजोगतं होत नाही, कधी तो काम करतो, श्रेय भलताच घेऊन जातो. अनेकदा तो काम करतो, पण त्याच्या कामाला यशाचा टिळा माथी लागत नाही. आपण कामासाठी आहोत की असण्यासाठी हा भुंगा त्याच्या मनाला पोखरू लागतो. आपलं काम आणि असणं दोन्ही ठसठशीत कळेल असं काहीतरी हाती लागावं असं त्याला वाटतं. आयपीएल पदार्पणात जेतेपदाची कमाई करणार्या गुजरात टायटन्स संघाचा न-नायक डेव्हिड मिलरची ही कहाणी. दशकभरापेक्षा जास्त काळ आयपीएल खेळल्यानंतर मिलरच्या असण्याला जेतेपदाची झालर लाभली आहे. आणि या खेपेस त्याचं काम ठाशीवपणे समोर आलंय. हार्दिक पंड्याची चर्चा होतेय, देशी वळणाचा कोच आशिष नेहराची चर्चा होतेय, फिरकीचा जादूगार रशीद खान महत्त्वाचा आहे. गुजरात टायटन्सची दंतकथासदृश वाटचाल सोशल मीडियावर ट्रेन्डिंग आहे. इथेही मिलरचं नाव मागेच आहे. रूढ नायकांचं मोठेपण टिपत असतानाच मिलर नावाच्या किमयागाराचं योगदान समजून घेणं अत्यावश्यक आहे.
दक्षिण आफ्रिका म्हटलं की आपलं मन हॅन्सी क्रोनिएपाशी जातं. हर्षेल गिब्स आठवतो. गॅरी कर्स्टन, शॉन पोलॉक स्मरतात. अष्टपैलूत्वाची व्याख्या ज्याच्या खेळाकडे पाहून लिहिली गेली तो जॅक कॅलिस समोर उभा राहतो. मिस्टर ३६० एबीडी अर्थात एबी डीव्हिलियर्सचे भारतात हजारो चाहते आहेत. कठीण नावाच्या फॅफ डू प्लेसिसचा स्वतंत्र चाहतावर्ग आहे. हशीम अमलाची दाढी स्टाईल स्टेटमेंट झाली आहे. डेल स्टेन, मॉर्ने मॉर्केल यांचे प्रतिस्पर्ध्यांची भंबेरी उडवणारे स्पेल डोळ्यासमोर तरळतात. डोनाल्ड आणि क्लुसनरला तर आपण विसरूच शकत नाही. या सगळ्या आठवणींच्या गोतावळ्यातून मिलर निसटतो. गेली अनेक वर्ष दक्षिण आफ्रिका आणि आयपीएल संघांचा तो नियमितपणे भाग आहे. चांगलं खेळतोही पण स्टारडमच्या बाबतीत तो पिछाडीवर राहतो. मिलरचा स्वतंत्रपणे फोटो दाखवला तर जगात कुठेही चित्रपटाचा नायक म्हणून सहज खपून जाईल पण मैदानावरच्या या नायकाला त्याचं म्हणावं असं क्रेडिट मिळालेलंच नाही.
गुजरात टायटन्सच्या अद्भुत अशा पहिल्यावहिल्या जेतेपदात मिलरचा सिंहाचा वाटा आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. पण या प्रवासाची सुरुवात इतकी आटपाट नगरी पद्धतीची झाली नव्हती. दहा वर्ष आयपीएल खेळण्याचा अनुभव असूनही मिलरला लिलावात पहिल्या दिवशी कुठल्याही संघाने विकत घेतलं नाही. दुसर्या दिवशी अनसोल्ड खेळाडूंची नावं पुन्हा पुकारण्यात आली. यावेळी गुजरात टायटन्स या नव्या संघाने मिलरसाठी तीन कोटी रुपये खर्च केले आणि त्याला ताफ्यात घेतलं. हा व्यवहार मिलर आणि टायटन्सला किती फलदायी ठरणार आहे याची कल्पना कोणालाच नव्हती.
ट्वेन्टी-२० प्रकारात फिनिशर ही भूमिका मुळातच कठीण कारण सगळ्या मिळून २०च ओव्हर असतात. ५, ६, ७ क्रमांकावर खेळायला येणार्या माणसाला खेळपट्टीवर आल्यापासून चेंडूला पिटाळायचं असतं. कमीत कमी चेंडूत जास्तीत जास्त धावा असं समीकरण. कधी मोठी धावसंख्या उभारण्याचं लक्ष्य असतं तर कधी मोठी धावसंख्या गाठण्याचं लक्ष्य असतं. वेळ कमी, चेंडू कमी आणि धावा मात्र खूप करायच्या अशी सगळी कसरत. मिलर गेली अनेक वर्ष हे काम दक्षिण आफ्रिका आणि आयपीएल संघांसाठी करतोय. गुजरातने मिलरला पाचवा क्रमांक दिला. तू आमचा फिनिशर हे सांगण्यात आलं. तू अपयशी ठरलास तरी वगळणार नाही याची हमी मिळाली. मिलरने हा विश्वास सार्थ ठरत यंदाच्या हंगामात ४८१ धावा कुटून काढल्या. गुजरातने धावांचा पाठलाग करताना जे सामने जिंकले त्यापैकी सहामध्ये मिलर नाबाद होता. सोप्या शब्दात सांगायचं तर मिलरनेच टायटन्सची नाव विजयाच्या पैलतीरी नेली. चेन्नईविरुद्धची ९४ धावांची खेळी खास अशी होती. मिलर एकटा खेळला नाही तर राहुल टेवाटिया या हरयाणाच्या शिलेदाराशी गट्टी करत भागीदारी रचत गेला. हे दोघं एकत्र आले म्हणजे मॅच गेली असंच प्रतिस्पर्धी संघांना वाटू लागायचं.
मिलर बॅटरुपी दांडपट्टा चालवतो पण त्यातही एक नजाकत आहे. डावखुरे फलंदाजांच्या खेळात काहीतरी वेगळं असं म्हणतात. मिलर त्याच परंपरेतला. चेंडू पडल्यानंतर क्षणार्धात त्याला बॅटने उचलून मागच्या बाजूला न बघता प्रेक्षकांमध्ये भिरकावून देण्याची मिलरची स्टाईल जबरा अशी आहे. इंग्रजीत नो लुक शॉट वगैरे म्हणतात. डोळे, पाय, मनगट यांच्या सुरेख मिलाफातून हा फटका जन्माला येतो. ‘इफ इट्स इन दी आर्क, इट्स आऊट ऑफ दी पार्क’ असं मिलरच्या बाबतीत म्हटलं जातं. एखाद्या मोठ्या प्राण्याने बारक्या प्राण्याची शिकार करावी तसं मिलर खातो चेंडूला. काऊ कॉर्नर अर्थात डीप मिडविकेट पट्ट्यात मारायला चेंडू मिळाला तर मिलरला पाहणं खास अनुभव असतो. त्याचे निळसर झाक असलेले डोळे चमकतात. मागचा पाय आणखी मागे जातो. पाय पूर्ण रोवून मिलरची बॅट चेंडूवर असा प्रहार करते की गोलंदाजाच्या डोळ्यांपुढे तारेच चमकतात.
फक्त फटकेबाजी एवढीच मिलरची खासियत नाही. कंटाळा येईपर्यंत एकेरी-दुहेरी धावांचा रतीब घालतो. महत्त्वाचं म्हणजे साथीदारासाठीही तितक्याच तडफेने पळतो. वेगवान गोलंदाजांना जितक्या आत्मविश्वासाने सामोरा जातो तितक्याच सहजपणे फिरकीपटूंना खेळतो. मिलरच्या भात्यात सगळे फटके आहेत. परिस्थितीनुरुप तो फटक्यांची पोतडी उघडतो. चांगल्या गोलंदाजाचा सन्मानही करतो.
मिलरच्या या गुणवैशिष्ट्यांची अनुभूती ६ मे २०१३ रोजीच आली होती. यादिवशी मोहालीत आयपीएलमधल्या बंगळुरू-पंजाब संघांमध्ये सामना रंगला होता. बंगळुरूने १९० धावा केल्या. या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबची अवस्था ६४/४ अशी होती. त्यानंतर मिलर जे खेळलाय ते आजही क्रिकेटचाहत्यांच्या लख्ख स्मरणात आहे. मिलरने ३८ चेंडूंमध्ये ८ चौकार आणि ७ षटकारांसह नाबाद १०१ धावांची अविश्वसनीय खेळी केली होती. या खेळीमुळेच त्याला किलर मिलर असं नाव मिळालं. आयपीएलमधल्या सार्वकालीन अफलातून खेळींमध्ये या इनिंग्जची नोंद होते. युट्यूबवर ही खेळी पाहिलीत तर मिलर काय करू शकतो याचा प्रत्यय येईल. दुर्देवाने ज्या खेळीने मिलरला ओळख मिळवून दिली ती खेळीच त्याची बेडी ठरली. या खेळीला पूरक ठरेल असं दणकट मिलरच्या हातून घडलं नाही. तो खेळत होता. चांगलं खेळल्यामुळे पंजाबचं कर्णधारपदही त्याला मिळालं, पण कामगिरी समाधानकारक नसल्याने त्याला हंगामाच्या मध्येच कर्णधारपदावरून बाजूला करण्यात आलं. मिलर आणि पंजाब हे समीकरण अनेक वर्ष फिट्ट होतं, पण कामगिरीत सातत्य न राहिल्याने पंजाबने मिलरला डच्चू दिला.
राजस्थानने मिलरला घेतलं खरं पण त्याचं काय करायचं हे त्यांना कळलंच नाही. मिलरसारखा खेळाडू बेंचवरच बसून राहिला. खेळायची संधीच न मिळाल्याने मिलरची आयपीएल कारकीर्द ओहोटीला लागली. लिलावातही नशीब रुसलेलं होतं. गुजरात टायटन्सला या हिर्याची चमक कळली आणि तिथून सुरू झाला एक झळाळता प्रवास. हा हंगाम जितका हार्दिकचा आहे, रशीदचा आहे तितकाच मिलरचा आहे.
बाऊंड्री लाईनवर कशी फिल्डिंग करावी याचं चालतंबोलतं उदाहरण म्हणजे डेव्हिड मिलर. झेल टिपताना शरीर कुठल्या स्थितीत असावं, हातांची रचना कशी असावी, रिले कॅच घ्यायचा असेल तर केव्हा उडी मारावी, डाईव्ह कधी मारावी, कधी मारू नये, थ्रो कसा करावा हे समजून घ्यायचं असेल तर मिलरला फिल्डिंग करताना पाहावं. मिलर याबाबतीत रेडीमेड गाइड आहे. मिलरच्या दिशेने चेंडू हवेत उडाला की फलंदाज पॅव्हेलियनच्या दिशेने निघतात. कृत्रिम प्रकाशात झेल टिपणं कठीण असतं. अनेकदा तो प्रकाश डोळ्यात जातो आणि झेल टिपता येत नाही. मिलरचं असं होत नाही. फक्त फिल्डिंगच्या बळावर अंतिम अकरात असू शकतो असे खेळाडू अतिदुर्मीळ. मिलर त्यापैकी एक आहे. दहा वर्ष खेळल्यानंतरही मिलरचा फिटनेस तसाच आहे. गुजरातच्या यशात मिलरच्या फिल्डिंगचाही अतिशय महत्त्वाचा वाटा आहे.
मिलर आप्रिâकेसाठी एक तप खेळतोय. नोंद घ्याव्यात, आवर्जून पाहाव्यात अशा अनेक इनिंग्ज त्याच्या नावावर आहेत. तो ज्या क्रमांकावर खेळतो त्या स्थानावरच्या खेळाडूंची शतकं होणं कठीण असतं. पण ३५ चेंडूत ६०, ६० चेंडूत ८५ अशा असंख्य खेळी त्याच्या नावावर आहेत. मिलरचं वय आहे ३२. दक्षिण आप्रिâकेसाठी १४३ वनडे आणि ९५ ट्वेन्टी-२० खेळलाय. इतक्या वर्षानंतरही मिलर कसोटी संघात का नाही हे एक कोडं आहे. दक्षिण आप्रिâकेच्या क्रिकेटमधली कोटा व्यवस्था हे अनेक कारणांपैकी एक कारण. खरंतर कसोटीत सहावा क्रमांक मिलरसाठी अगदी आदर्श आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. दक्षिण आप्रिâकेला अद्यापही त्यांनी काय गमावलं आहे त्याची कल्पना नाही.
वनडेत मिलर ९ कर्णधारांच्या नेतृत्वात खेळलाय. स्वत: सीनिअर असूनही मिलरने अन्य कुणाच्या नेतृत्वात खेळणं कमीपणा मानलं नाही. मिलर नियमित गोलंदाजी करत नाही. संघाला संतुलित करण्यासाठी हल्ली खूप सारे अष्टपैलू खेळवले जातात. त्यापैकी अनेकांची एक ना धड भाराभार चिंध्या अशी अवस्था असते. पण या सगळं काही करता येणार्यांच्या यादीत नसल्याचा फटका मिलरला बसतो.
आपल्या कामाइतकंच त्याचं विपणन हल्ली महत्त्वाचं मानलं जातं. मिलर उत्तम खेळतो पण त्या खेळाचा डिडिंम पिटण्यात तो मागे असतो. वादविवादांमध्येही नसतो. त्यामुळे नाव होत नाही. गुजरात टायटन्सच्या जेतेपदाने मिलरच्या नावावर पहिल्यांदा जेतेपदाची नोंद झाली आहे. कर्णधार हार्दिक पंड्याने मिलरच्या योगदानाची भरभरून तारीफ केली आहे.
सोशल मीडियावर अल्गोरिदम लावलेले असतात. यामुळे आपल्याला झापडबंद दिसतं. प्रत्यक्ष जगतानाही आपली नजर मोठं नाव असलेल्या गोष्टींवरच खिळते. आपलं बघणं व्यापक नसतं. मिलरसारखी मंडळी तिथे निसटतात. त्यांचं निसटणं हे आपलं नुकसान. गुजरात टायटन्सच्या यशाचं मोठेपण यातच की त्यांनी मिलरला निसटू दिलेलं नाही. त्यामुळे आपलं बघणं अर्थपूर्ण झालंय.