माझा मानलेला परममित्र पोक्या आणि त्याच्या होणार्या पत्नीने म्हणजे पाकळीने विवाहपूर्व विदेशी दौर्यावरून मोठ्या प्रेमाने माझ्यासाठी गिफ्ट म्हणून अस्सल मराठी शिव्यांची बरसात करणारा लेडी रोबोट आणला. मी तो विनम्रपणे नाकारला. तेव्हा त्यांनी तो जेलमध्ये असलेल्या कमी वयात अकलेची बेसुमार वाढ झालेल्या विकृत दुय्यम नटीला देण्याचे ठरवले होते. परंतु तिची सुटका न झाल्याने त्यांचा प्लान अजूनपर्यंत यशस्वी झाला नाही. दोघेही तिच्या सुटकेची वाट पाहात आहेत. तिच्या घरी भेट घेऊन सन्मानपूर्वक तिला तो लेडी रोबोट ते प्रदान करणार आहेत. त्यातून तिच्या ज्ञानात, कानात आणि ट्विटर खजिन्यात मोलाची भर पडेल. कारण योग्य वस्तू योग्य माणसाकडे गेली तर तिचा उपयोग झाल्याचे सार्थक होते. मला त्या उभयतांचा निर्णय आवडला आणि मी त्यांना बेस्ट लकही म्हटले.
– घरात बसून कंटाळा आल्याने मी नाक्यावर जिथे आमच्या एरियातील सभ्य भाषेत मद्यपींचा म्हणजे दारूड्यांचा अड्डा गप्पा मारायला बसतो तिथे आडोशाला एका मोठ्या दगडावर बसलो आणि त्यांच्या गप्पा ऐकून चाटच झालो. ते नेहमीच दारूच्या किमती अवाच्या सवा वाढवल्याबद्दल सरकारच्या नावाने खडे फोडत बाटल्यांची बुचेही फटाफट फोडत असतात. याचा अर्थ दारू पिण्यासाठी ते कसेही पैसे गोळा करतात आणि कधी महागाईवर कधी राजकारणावर चर्चा करत असतात. पण यावेळी मी पाहिलं तर ते सुसंस्कृतांच्या भाषेत ज्याला आविष्कारस्वातंत्र्य म्हणतात त्या विषयावर चर्चा करत होते हे पाहून मला धक्काच बसला आणि मी कान टवकारले.
– मध्या, सध्या आपण ज्या बातम्या टीव्हीवर पाहतो त्यातून आविष्कार स्वातंत्र्याचा गळा दाबला जात आहे, असं नाही वाटत तुला? मला अभिमान आहे की जेवढं आविष्कार स्वातंत्र्य आम्हा दारूड्यांना आहे तेवढं जगात कुणालाही नाही. आपण कुठल्याही विषयावर कुणाबद्दल काहीही बोलू शकतो. रशियाच्या आणि चीनच्या पंतप्रधानांपासून आपल्या पंतप्रधानांपर्यंतच नव्हे तर आपल्या गल्लीतल्या दादाबद्दलही. आपल्या वाटेला जायची हिंमत नाय कुनाची.
– आविष्कार स्वातंत्र्य याचा अर्थ काय तर आपल्या मनाच्या गॅस सिलिंडरमध्ये जो विचारांचा कोंडलेला गॅस असतो ना त्याला बाहेर सोडून देणे.
– अरे मग स्फोट होऊन आग लागेल ना.
– अरे, मी कवी असल्यामुळे कवितेच्या भाषेत सिग्नेचर ट्यूनमध्ये समजूतदारपणे बोललो.
– पण आज कोणीही उठतो आणि आविष्कार स्वातंत्र्याच्या नावाने कुणाबद्दल काहीही बीभत्स बोलतो. आपण दारूडे असूनही आयुष्यात आपल्या तोंडून कधी वंगाळ शब्द निघत नाय. हायवर्ड प्यायलो तरी तेच बोलणार आणि आरसी प्यायलो तरी तेच बोलणार. पण हे भाजपचे नेते तर आपल्यापेक्षा वंगाळ बोलतात. कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळतात. बोलायचं स्वातंत्र्य दिलं म्हणजे चॅनेलवर इतकं बोंबलायचं का?
– तू म्हणतोस ते खरे आहे कवड्या. अरे, त्या देवेंद्र फडणवीससारखा गोरागोमटा नेता उठसूठ अशी बिनबुडाची चिखलफेक करतो की कधी कधी मला वेगळाच संशय येतो.
– आपल्या पातळीतला नाय तो. लय सभ्य मानूस हाय. पन किती लांबलचक आवाज करील त्या विदर्भ एक्सप्रेससारखा. मला तर त्येंचा बॅलन्सच गेल्यासारखा वाटतो.
– त्येंचं ते एका रात्रीचं आणि दोन दिवसाचं सीएम पद गेलं ना तेव्हापासून ते येड्यावानी बोलतात. आगा ना पिछा. सगळीकडे लोच्या.
– पन अशा गोष्टींना कुठेतरी बूच लागलंच पाहिजे. सारखा आपला व्हिस्कीत सोडा ओतत राहिलं तर ती फसफसणारच. टीव्हीवर बोलण्याला तरी काय नियम पाहिजेत ना? मग टीव्हीवाले कोणी वंगाळ बोललं तर ते शब्द पुसट करून दाखवतात.
– पत्रकार पण झुंडीने त्यांच्या मागे प्रतिक्रिया घेण्यासाठी लागतात. जसं काय ती मिळाली नाही तर मालक जीव घेणाराय यांचा. ते प्रवीण दरेकर बघ. कोण कुत्रं विचारत नव्हतं त्यांना टीव्हीवर. आणि आता आपली कुलंगडी झाकण्यासाठी भाजपात प्रवेश केल्यावर सर्वज्ञ असल्यासारखे कोणत्याही विषयावर प्रतिक्रिया देतात.
– ते किरीट सोमय्या. त्यांनी तर धिंगाणा घातलाय सोशल मीडियावर. आविष्कार स्वातंत्र्याचा सर्वात जास्त दुरुपयोग करणारा माणूस म्हणून त्याची इतिहासात नोंद होईल.
– अरे भाजप प्रदेश अध्यक्षच अकलेचे काय तारे तोडतात बघा. चंद्रकांत दादा पाटील. कोल्हापूरचा गडी असून अक्कडबाज मिशी ठेवायला मागत नाय. टोचते म्हनतो. कुणाला कुठे टोचते त्यानाच म्हाईत. त्यांचं त्वांड म्हणजे नक्की काय हाय हेच समजेनासं झालंय. पावसाळ्यात नदी, नाले, गटारे तुडुंब भरून वाहात असतात. त्यातलाच हा प्रकार वाटतो. निदान बायकांबद्दल कोणत्या भाषेत बोलावे हे तरी त्यांना कळायला हवे होते. खासदार सुप्रिया सुळे बाईंबद्दल सार्या स्त्रीजातीचा अपमान होईल इतके असभ्य, असंस्कृत विकृतीचे प्रदर्शन त्यांनी केलंय. अरे, जे आम्हा दारूड्यांना समजते तर तुमच्यासारख्या स्वत:ला सुसंस्कृत, संस्कारक्षम म्हणवणार्या पक्षाच्या धुरीणाला समजू नये? संसदेतील उत्तम कामाबद्दल संसदेचा दोनवेळा मानाचा पुरस्कार घेणार्या सुप्रियाबाईंना ‘घरी जाऊन स्वयंपाक करायचं काम करा’ असं हा तोंडफाटका नेता तोंड वेंगाडून कसं काय बोलू शकतो? ‘कोणत्याही माहितीसाठी तुम्ही केंद्रात जावा नाहीतर मसणात जावा’ ही काय बोलायची पद्धत झाली? हेच आहे का भाजपाचे आविष्कार स्वातंत्र्य?
– हे खरं आहे. दारूड्यांचेही काही नियम असतात. ते आपण काटेकोरपणे पाळतो. कोणी आविष्कार स्वातंत्र्याच्या नावाखाली काय वाटेल ते बडबडू लागला तर आम्ही कोपच्यात घेऊन एक लाफा मारून गप्प बसवतो. पण ही भाजपची राज्यातील एकाहून एक ताळतंत्र सोडलेली पात्रे कशाचाही विधिनिषेध न बाळगता काहीही बडबडत असतात. ते दानवे, मुनगंटीवार, शेलारमामा, गुळवणी यांची तोंडाची पट्टी माईकसमोर नॉनस्टॉप सुरू असते. शिवसेना आणि महाआघाडी द्वेषाचा त्यांना सुटलेला कंड शमवायचा असेल तर आमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. तुमच्या भंपक नेत्यांना सलाम!
मला खरोखरच या दारूबाजांचे कौतुक वाटले. जे त्यांना समजतं ते या नेत्यांना समजत नाही याचं वाईट वाटलं.