हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुंचल्यातून उतरलेलं हे जिवंत चैतन्याने सळसळणारं व्यंगचित्र पाहून अनेकांना नुकत्याच झालेल्या एका सभेची आठवण आली असेल… मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची आहे, असे ‘स्लिप ऑफ टंग’ होऊन पोटातलं ओठात आल्यावर केलेली सारवासारव सभा होती ती… त्या सभेत महाराष्ट्राच्या भूमीवर, महाराष्ट्राच्या राजधानीत, महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेत्याने मारुतीस्तोत्राऐवजी हनुमान चालिसा म्हणून बजरंग बलींना वंदन केलं आणि त्यांच्या गळ्यात उत्तर भारतीय गमछा होता… हा महाराष्ट्र सर्वसमावेशक आहे आणि मुंबईने कायमच दोन्ही बाहू पसरून सर्व भारतवासीयांचं स्वागत केलं आहे… पण ती मराठी माणसाची आहे, याचा एवढा विसर पडावा? महाराष्ट्राविषयी ममत्व असलेल्या कोणत्याही जातधर्मभाषेच्या माणसाला मराठी माणसाने, शिवसेनेने कधी उपरे मानले नाही… पण ज्यांना महाराष्ट्राविषयी आत्मीयता नाही, ते उपरेच… त्यांचं लांगूलचालन करणार्या आणि मुंबईवरचा मराठी ठसा पुसून तिला महाराष्ट्रात ठेवून महाराष्ट्रापासून तोडण्याचं कारस्थान करणार्यांना आता मुंबईकरांनी इथे दाखवलाय तसाच ‘मतांचा कचका’ दाखवायलाच हवा!