गोळीबंद शैली आणि भाषासौष्ठव
श्रीलंकेतील परिस्थितीवरील आल्हाद गोडबोले यांचा लेख वाचला आणि आवडला. इंडियन एक्स्प्रेस आणि इतर ठिकाणी आलेले लेख वाचले होते, पण गोडबोले यांचा लेख थेट विषयाला भिडणारा, भाषासौष्ठव आणि गोळीबंद शैलीचे दर्शन घडवणारा असल्याने अधिक भावला. बर्याच वर्षापूर्वी ‘सकाळ’मध्ये विजय साळुंखे परदेशातून कॉलम लिहीत असत. विषयातील गुंतागुंत कळली नाही तर साळुंखे यांचा लेख वाचायचा आणि विषय समजून घ्यायचा अनेक वाचकांचा परिपाठ होता. हा लेख वाचताना साळुंखे यांची आठवण झाली.
– अनिल डोंगरे, अहमदाबाद
भाजीच्या धंद्याची छान माहिती मिळाली
‘धंदा म्हणजे काय रे भाऊ’ या कॉलममध्ये छापून आलेला, ‘वाहतो ही भाज्यांची जुडी’ हा लेख आवडला.
डबघाईला आलेल्या कंपन्या आणि सरकारी नोकर्यामध्ये खाजगीकरण तसेच वाढत चाललेला बेकारी यावर दिलेला लाखमोलाचा, स्वानुभवाचा व्यवसायाचा सल्ला नोकरीच्या मागे लागलेल्या तरूण पिढीला प्रेरणादायी आहे. या लेखात, सगळं जग झोपलेलं असताना मध्यरात्रीपासून चालणार्या भाजी व्यवसायाबद्दल नवीन माहिती मिळाली. सहज सोप्या भाषेत आणि ओघवता लेख लिहिला असल्यामुळे एकदा वाचन चालू केल्यावर लेख सलग वाचला जातो.
– मंदार खोत, प्रभादेवी