सकाळी पाच वाजता भाजी व्यवसाय, दुपारी टॅक्सी धंदा आणि रंगकामाचं कॉन्ट्रॅक्ट अशी तिन्ही कामं वयाची साठी उलटल्यावर करताना तुमची धावपळ उडत नाही का, असा प्रश्न मी त्यांना विचारला, तेव्हा ते म्हणाले, ‘माणसाने नेहमी काम करत राहायला हवं, वय झालंय म्हणून थांबलात तर दुखणी पाठीशी लागतात, अनेक परप्रांतीय माणसांच्या दुकानात/ पेढीवर नव्वद वर्षाचे मालक गल्ल्यावर बसलेले दिसतात. तुम्हाला सांगतो, धंद्यातून जोवर ‘एम व्हिटॅमिन‘ मिळत आहे तोवर तब्बेत अगदी फिट असते.‘
– – –
‘टायमिंग, या एका शब्दात भाजी या धंद्याचं सार दडलं आहे,’ राजेंद्र गुजर मला दादर मंडईत लिंबांची घाऊक खरेदी करताना सांगत होते. मुंबईतील मोठ्या कंपनी कॅन्टीन्सना भाजी पुरवण्याचा व्यवसाय ते करतात. हा व्यवसाय करणार्या माणसाला नऊ ते सहा या ऑफिस टायमिंगमधे भेटून चालणार नव्हते, म्हणूनच ‘भाजीचा धंदा म्हणजे काय रे भाऊ‘ हे समजून घेण्यासाठी मी पहाटे पाच वाजता दादरच्या होलसेल मार्केटमध्ये त्यांना भेटलो. ते म्हणाले, ‘कंपनीत भाजी पुरवठा टेंडर भरताना, प्रत्येक भाजीचा संपूर्ण वर्षासाठी एक दर लिहावा लागतो. भाजीच्या दरात वेगवेगळ्या कारणांनी नेहमी खूप चढउतार होत असतात, हे लक्षात घ्या. गेल्या वर्षी एका लिंबाचा दर कुणी दोन रुपये भरला असेल तरी आज त्याला आठ रुपये दराने लिंबू विकत घेऊन दोन रुपयांना कॅन्टीनला विकावे लागेल. उन्हाळ्यात भाजीची आवक कमी होऊन दर वाढतात, तर पावसाळ्यात आवक वाढल्याने दर कमी होतात… पुन्हा श्रावणात वाढतात, थंडीत कमी होतात. हा धंदा तीन महिने फायदा आणि तीन महिने नुकसान या गणितात बसवावा लागतो, ज्याला हे गणित जमलं तोच इथे टिकतो.‘
भाजीचा हा प्रवास, शेतकरी- ट्रान्सपोर्टवाले- मंडईतील व्यापारी (आडते)- मोठे व्यापारी, छोटे व्यापारी- किरकोळ विक्रेते- ग्राहक असा होत असतो. नाशिक आणि इतर ठिकाणाहून भाजी घेऊन निघालेले ट्रक साधारणतः रात्री दोन वाजता मुंबईत पोहचायला सुरुवात होते. विकलेल्या मालावर आठ टक्के कमिशन घेणारे मंडईतील व्यापारी (आडते) दर ठरवतात. मोठ्या व्यापार्यांनी आदल्या रात्री नोंदवलेली ऑर्डर, आदल्या दिवशीचा दर आणि त्या दिवशी किती माल विकला जाईल याचा अंदाज, यावरून भाजीचा भाव ठरतो. समजा मुंबईत एका दिवसाला एका भाजीची मागणी एक हजार किलो आहे आणि विक्रीला दीड हजार किलो माल आला की त्या भाजीचे भाव कोसळतात. मागणीपेक्षा पुरवठा वाढला की शेतकर्यांचे नुकसान होतं. ‘जसजसा घड्याळाचा काटा पुढे सरकत जातो तसतसा नाशवंत भाजीचा भाव उतरत जातो. कित्येकदा तर माल पोहचवणार्या ट्रकचे भाडे देखील शेतकर्यांना खिशातून भरावे लागते.
भाज्यांच्या निरनिराळ्या जातीनुसार भाव ठरत असतो. उदा. बोरिवली या नावाने विकले जाणारे टोमॅटो जाड सालीचे, चांगल्या चवीचे, तीन चार दिवस टिकणारे असतात तर नागपाडा जातीचे टोमॅटो, पातळ सालीचे आणि लवकर खराब होणारे असतात. त्यामुळे भाजी विक्रेत्याला फक्त स्वस्त आहेत म्हणून विकत न घेता आपल्या ग्राहकाला कशी क्वॉलिटी हवी आहे याचा विचार करून खरेदी करावी लागते. मुंबईत विकल्या जाणार्या सर्व पालेभाज्या रेल्वे ट्रॅकवर पिकवल्या जातात, असा एक अपप्रचार केला जातो, त्यात फारसे तथ्य नाही. कारण, मुंबईत पालेभाज्यांची मागणी इतकी आहे की ती पूर्ण करायला मुंबई ते दिल्ली एवढ्या अंतरावरील रेल्वे ट्रॅकवर भाजी लावावी लागेल. घाऊक बाजारात पालेभाजी साधारण दहा रुपये मोठी जुडी या दरात विकली जाते. किरकोळ विक्रेते त्या जुडीचे दोन भाग करून वीस रुपयांना एक या दरात विकतात. श्रावणात भाज्यांची मागणी वाढते तेव्हा भाज्यांचे दर गगनाला भिडलेले असतात. दोन पैसे शेतकर्याच्या खिशात जाऊदे या विचाराने ग्राहक देखील विक्रेत्याशी भावात घासाघीस करत नाही. रोजचे होलसेल आणि किरकोळ विक्री दर कळतील असं कोणतेही माध्यम आजच्या डिजिटल युगात देखील नाही. यामुळेच शेतकरी आणि ग्राहक यांचे नुकसान होऊन मधले व्यापारी मात्र श्रीमंत होतात. एकाच होलसेल मार्केटमधून एकाच किमतीत खरेदी केलेली भाजी विकताना मात्र एरियानुसार महाग होत जाते. ग्राहकाला भाजी विकत घेताना मोजावी लागणारी किंमत ही भाजी तुम्ही कुठे विकत घेताय यावर ठरते. माटुंगा रोडला साठ रुपये किलो मिळणारी भाजी पेडर रोडला साठ रुपये पाव या दरात मिळू शकते. उच्चभ्रू भागात रस्त्यावर भाजी विकणार्या काही विक्रेत्यांनी त्याच भागात घर-दुकान विकत घेतले आहे…‘ भाजीच्या प्रवासाची कहाणी सांगत असताना दुसर्या बाजूला राजेंद्र गुजर यांची भाजीखरेदीही सुरु होती. २० किलो कैरी घेताना त्यांनी चार ठिकाणी भाव विचारला, चांगली क्वालिटी आणि कमी भाव यांचा सुवर्णमध्य गाठत त्यांनी एका दुकानातून ७० रुपये किलो या दराने कैरी विकत घेतली. आम्ही बोलत असताना त्यांचा मुलगा जय येऊन म्हणाला, ‘बाबा बाहेर ट्रॅफिक पोलीस आपली टॅक्सी बाजूला काढायला सांगत आहेत‘. त्यांनी विकत घेतलेली भाजी घेऊन आम्ही लगबगीने बाहेर आलो. सर्व भाजीविक्रेते मार्केटमधून भाजी नेण्यासाठी टॅक्सी भाड्याने फिक्स करतात, पण राजेंद्र यांची स्वतःची टॅक्सी पाहून मला आश्चर्य वाटलं. तुम्ही भाजीविक्रेते आहात की टॅक्सी चालक? असा प्रश्न विचारल्यावर भाजीची पोती टॅक्सीत भरत ते म्हणाले, ‘आधी माझ्या जीवनात टॅक्सी आली आणि नंतर भाजी व्यवसाय.‘ त्यांनी टॅक्सी सुरु केली आणि आता शिवडीच्या दिशेने प्रवास सुरू झाला.
राजेंद्र म्हणाले, ‘मी, माझे तीन भाऊ आणि बहीण चुनाभट्टीमधील एका लहानशा खोलीत लहानाचे मोठे झालो. माझे वडील प्रीमियर कार कंपनीत नोकरी करून रंग मारायचे कॉन्ट्रॅक्ट घेत असत. १९७८ साली भारत गिअर कंपनीत अमेरिकन सरकारचे प्रतिनिधी भेट देण्यासाठी येणार होते, या पाहुण्यांच्या स्वागताला दिल्लीहून रंगरंगोटीचे फर्मान निघालं. ६२ गिअर मशिन्स आणि ७ फर्नेस (लोखंड वितळवणार्या भट्ट्या) रंगवण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. त्याच दरम्यान माझी मॅट्रिक परीक्षा पार पडली. अभ्यासात फार रुची नव्हती, कंटाळवाण्या पुस्तकी शिक्षणाला राम राम करून वडिलांच्या हाताखाली अर्थार्जनाचा श्रीगणेश केला. कामगारांकडून काम करून घेणे, देखरेख ठेवणे हे काम होते. ते संपल्यावर पुन्हा नोकरीचा शोध सुरू केला. वडिलांकडून कळलं की प्रीमियर कंपनीत भरती सुरू आहे. कुर्ला कारखान्यात स्प्रे पेंटर म्हणून लागलो.
नोकरी मिळाली की दोनाचे चार हात करायला हवेत, असं त्या काळात ‘शास्त्र‘ होतं. आमच्या घरात माझ्या लग्नाची तयारी सुरू झाली. आईच्या पसंतीने ६ मे १९८५ला हरिहरेश्वर गावातील प्रतिभा धामणस्कर ही मुलगी बायको बनून आयुष्यात आली. लग्नाला सहा महिने होत नाहीत तोच कामावर ब्रेक मिळाला. नवीन नोकरीच्या शोधात असताना दीड महिन्यांनी पुन्हा प्रीमियर कंपनीतून कॉल आला. पण यावेळी घरापासून लांब असलेल्या कल्याण कारखान्यात भरती सुरू होती. हेच काम आधी केलेलं असल्यामुळे नोकरी मिळायला काही अडचण आली नाही. कंपनीत आठ तासांच्या शिफ्टमधे मी रोज पन्नास गाड्या स्प्रे पेंटिंगने पेंट करत होतो. नव्याकोर्या गाड्यांना रंग दिल्यावर त्यांच्यात होणारा बदल डोळ्यांना सुखावून जायचा. सुरुवातीला मला पंधराशे रुपये पगार मिळायचा, थोडा थोडा वाढत जाऊन बेचाळीसशे झाला. प्रीमियर कंपनीच्या गाड्या तुफ्फान विकल्या जात होत्या, पण त्यातील नफा कंपनी कामगारांना द्यायला द्यायला तयार नव्हती. त्यासाठी कंपनीत पहिला संप झाला, त्यांनतर पगारात भरघोस वाढ होऊन तो बारा हजार मिळू लागला. छान चाललं होतं पण युनियनने पुन्हा संप पुकारला… तो लांबला… त्याच वेळेला देशभरात मारुती कंपनीच्या गाड्यांनी आकर्षक डिझाईन, मायलेज आणि कमी किंमत यामुळे चांगला जम बसवला होता. संपामुळे प्रीमियरचे ग्राहक तुटत होते. कोणत्याही ग्राहकाला सहा महिने थांबा असं सांगितलं की तो दुसरा पर्याय शोधू लागतो. प्रीमियरच्या गाड्या मार्केटमध्ये उपलब्ध नाहीत हे पाहिल्यावर लोक इतर कंपनींच्या गाड्या विकत घेऊ लागले. संप मिटेस्तोवर प्रीमियरची मार्वेâटमधील डिमांड कमी झाली होती. या आणि इतर कारणांमुळे एकोणीसशे सत्याण्णव साली प्रीमियर कंपनीला टाळं लागलं. हजारो कामगार बेरोजगार झाले, त्यात माझाही नंबर लागला. तेरा वर्षे इमाने इतबारे नोकरी केल्यावर आपल्यावर बेकारीची कुर्हाड कोसळेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. कुटुंबाची जबाबदारी… लहान मुलांचं शिक्षण… पुढे कसं होणार… असे अनेक प्रश्न आ वासून उभे राहिले. काम शोधण्याची वणवण सुरू होती, पण मोठ्या फॅक्टरीत एकाच प्रकारचे काम करणार्या कोणत्याही माणसाला या वयात नोकरी मिळणं कठीण असतं.
मला कार स्प्रे पेंटिंगचा अनुभव होता, अनेक छोट्या मोठ्या कार गॅरेजमधे काम मिळतंय का हे पाहायला गेल्यावर, तुम्हाला एकाच प्रकारचं काम येतं, आम्हाला कामात ‘ऑल राऊंडर’ माणूस लागतो, असं सांगून नकार मिळायचा. आता काय करायचं, याचा विचार सुरू असताना वडापाव विक्री करणार्या गाड्यांना पामतेल पुरविण्याचे काम मिळालं. पंधरा किलो तेलाचा डबा होलसेल भावात तेव्हा सातशे रुपयांना विकत घेऊन आठशे पन्नास रुपयांना विकायचो. सुरुवातीला हा धंदा चांगला चालला, पण मला मिळणारा प्रतिसाद पाहून इतर अनेकांनी हा व्यवसाय सुरू केला आणि माझे ग्राहक कमी झाले. आता पुन्हा नोकरीसाठी शोधाशोध सुरू झाली…‘
आमची टॅक्सी शिवडीला एका कंपनीच्या भव्य आवारात येऊन पोहोचली. आजूबाजूला काही तुरळक गाड्या उभ्या होत्या. ऑफिस टाइम सुरु व्हायला अजून वेळ असल्याने परिसर अगदी निवांत होता. राजेंद्र यांनी कॅन्टीनच्या ऑर्डरनुसार भाजी सॉर्ट केली आणि त्यांचा मुलगा जय डिलीव्हरी देऊन आला. आम्ही शिवडीहून वाडीबंदरच्या दिशेने जाताना त्यांनी एक शॉर्टकट घेतला. हा रस्ता तर मला माहीतच नव्हता, असं मी म्हणताच ते म्हणाले, ‘अरे टॅक्सी चालवणार्या माणसाला मुंबईचे सर्व रस्ते तोंडपाठ असतात. मला टॅक्सीधंद्यात आणण्याचं क्रेडिट माझ्या वडिलांचं; त्यांनी नोकरी आणि रंगाच्या कामातून पैसे जमवून तीन टॅक्सी विकत घेतल्या आणि आम्हा भावंडाना चागलं शिक्षण देत असतानाच, दूरदर्शीपणा दाखवून त्यांनी आमचे ड्रायव्हिंग लायसन्स आणि टॅक्सी बॅज काढून ठेवले (तेव्हा टॅक्सी बॅज इतर ड्रायव्हरला भाड्याने देऊन त्याचे उत्पन्न मिळायचे). अधून मधून गाडीवर हात साफ करत होतो, पण कधी पॅसेंजर घेऊन टॅक्सी चालवली नव्हती. मनासारखी नवीन नोकरी मिळत नव्हती तेव्हा आजवर नोकरी केलीस आता घरची टॅक्सी चालव असा सल्ला वडिलांनी दिला. दुसर्या दिवसापासून टॅक्सीसोबत धंद्यातील प्रवास सुरू झाला. या धंद्यात दुसर्याची टॅक्सी चालवताना, सकाळी आठ ते संध्याकाळी सात आणि रात्री आठ ते सकाळी सात, अशा दोन शिफ्ट असतात. ड्रायव्हर एका शिफ्टचं दोनशे रुपये भाडं मालकांना देत असे. घरची टॅक्सी आहे तर तू दोनशे रुपये मला देऊ नकोस, असं वडिलांनी सांगितलं. नंतर दोन महिन्यांनी वडील म्हणाले, ‘‘आता धंदा तुला कळला आहे, मला दोनशे रुपये द्यायला सुरुवात कर.‘‘ मला थोडं वाईट वाटलं. वडील आपल्याकडून पैसे कसे घेऊ शकतात? पण काहीही न बोलता त्यांनी मी रोज टॅक्सीचं भाडं नेऊन देत होतो. दोन महिन्यांनी वडिलांनी पुन्हा बोलावलं आणि सांगितलं, ‘‘तू मला रोज भाड्याचे पैसे आणून देत आहेस याचा अर्थ तू स्वतःची टॅक्सी विकत घेतलीस तर बँकेचा हप्ता देखील सहज फेडू शकतोस.‘‘ त्यांनी दोन महिन्यात जमा झालेले बारा हजार रुपये परत केले. मी स्वतःच्या पायावर उभं राहावं यासाठी त्यांनी हे सर्व केलं होतं हे तेव्हा लक्षात आलं आणि पुढच्याच महिन्यात पतपेढीतून कर्ज घेऊन पंचाहत्तर हजार रुपयांना नवीन टॅक्सी विकत घेतली.
सुरुवातीला उन्हातान्हात गाडी फिरवताना त्रास व्हायचा. पण नोकरीच्या तुलनेत जास्त आणि रोजच्या रोज मिळणारे रोख पैसे सुखद गारवा द्यायचे. टॅक्सीत प्रत्येक मीटरसोबत एक नवा पॅसेंजर गाडीत बसत असतो, रोज माणसांचे नाना तर्हेचे स्वभाव दिसतात; काही माणसं टॅक्सी विकत घेतल्यासारखी अरेरावी करतात तर काही कोणाचा तरी राग टॅक्सीच्या बिचार्या दारावर काढतात. पण शांत स्वभाव, गोड वाणी असलेल्या ड्रायव्हरसोबत, काही अपवाद वगळता, सर्व ग्राहक चांगले वागतात. एकदा एका पॅसेंजरला सोडून पुढे निघालो असता, गाडीत मोबाइल वाजल्याचा आवाज आला. मागे वळून पाहिलं तर त्या प्रवाशाची बॅग राहिली होती. गाडी बाजूला घेऊन फोन घेतला, त्याला बॅग नेऊन दिली. पॅसेंजरने आधी बॅग चेक केली आणि म्हणाला, तू प्रामाणिक माणूस आहेस, या बॅगेत पन्नास हजार रुपये होते. तो काही बक्षीस देऊ करत होता. मेहनतीचं भाडं मला मिळालेलं असल्याने मी त्यांना नम्रपणे नकार देत टॅक्सी सुरु केली. मेहनतीला पर्याय नाही, चुकीच्या मार्गाने मिळवलेले क्षणिक लाभाचे पैसे टिकत नाहीत यावर माझा ठाम विश्वास आहे.
टॅक्सी धंद्यात सकाळची पहिली भवानी खूप महत्वाची असते. बायकोशी भांडण करून आलेला पॅसेंजर त्याला जो पहिला माणूस भेटेल त्याच्यावर राग काढतो असा अनुभव आहे. टॅक्सीचालक हे तर अगदी सॉफ्ट टार्गेट असतं. दिवसाची सुरुवात भांडणाने होऊ नये अशी अपेक्षा असते. अशा वेळी जर पहिलं भाडं फिक्स मासिक तत्वावर मिळालं तर उर्वरित दिवस चांगला जातो. एकदा, सकाळी सहा वाजता दादरला प्लाझा सिनेमाकडे टॅक्सी चालवत असताना, एकाने हात केला (हाच हात मला माझा पुढील व्यवसायाचा मार्ग दाखवणारा होता). त्यांनी विचारलं, शिवडीला येणार का? मी हो म्हटलं, त्यांनी टॅक्सीत भाजी भरली. भाजी भरायला थोडा वेळ गेला, पण मी काहीही न बोलता थांबलो होतो. त्यांना एचपी पेट्रोल कंपनीच्या दारात सोडल्यावर, तू रोज सहा वाजता हे सेम भाडे घेणार का असं त्यांनी विचारलं? सकाळची फिक्स सवारी मिळणार होती, त्यामुळे मी लगेच त्यांना होकार दिला. दोन वर्षे रोज हेच काम केल्यावर जी. एस. गुप्ता साहेबांचा माझ्यावर विश्वास बसला. नंतर क्वचित कधी तरी ते मलाच फोन करून भाजीची यादी सांगत आणि मी दुसर्या दिवशी सकाळी भाजी विकत घेऊन कॅन्टीनला पोहोचवत असे. यामुळे अनेक भाजीविक्रेत्यांसोबत माझी ओळख झाली. हा धंदा हळूहळू लक्षात येत होता, पण भाज्यांचे दर कधी जमिनीवर असतात आणि कधी गगनाला भिडतात, याचा अंदाज येत नव्हता. गुप्ताजी सांगतील त्याप्रमाणे खरेदी करत होतो. मी रोज सकाळी भाजीखरेदी करायला जातो हे काही नातेवाईकांना माहीत होतं. मावसभाऊ सलील वळंजू भारत पेट्रोलियममध्ये कामाला होता. त्याचा एक दिवस फोन आला, ‘तू आमच्या कंपनीत भाजी सप्लाय करू शकशील का?‘ त्यांच्या कंपनीत नवीन टेंडर निघणार होतं. मी कंपनीतून टेंडर फॉर्म घेऊन आलो. मला भाजी धंदा माहीत होता, पण टेंडर कसं भरतात याबद्दल काहीच कल्पना नव्हती. गुप्ताजींना फोन केला, ते म्हणाले, ‘काळजी करू नकोस, टेंडरचे दर मी तुला लिहून देईन.‘ माझं टेंडर पास झालं आणि मी माझ्या नावाने भाजी पोहोचवायला लागलो. २००५ साली पहिल्यांदा भाजीचे टेंडर भरताना ई.एम.डी. (अर्नेस्ट मनी डिपॉझिट) भरावं लागलं, तेव्हा इतके पैसे माझ्याकडे नव्हते, मेहुणी प्रीती हिने एक लाख रुपयांची मदत केली आणि व्यवसायासाठी बँकेकडून अधिक कर्ज काढताना तिची मैत्रीण सायली जामीनदार राहिली.
बायको प्रतिभा आणि जय-विजय ही जुळी मुले व्यवसायाचा गाडा सुरळीत सुरू राहावा याकरिता कष्ट घेतात. भारत पेट्रोलियममध्ये मी २००५ ते २०१३ या काळात भाज्या पुरवल्या आणि नंतर मे २०१३ला मला भारत पेट्रोलियमच्याच वाडीबंदर शाखेतील टेंडर लागलं.
हे काम करत असतानाच ज्यांच्याकडून धंदा शिकलो त्या जी. एस. गुप्ता यांनी मला पार्टनर बनवून काही हॉटेल्सना भाजी पुरवण्याचं काम दिलं. या नवीन कामात चांगलेवाईट दोन्ही अनुभव आले. तिकडे बिल टू बिल असा हिशेब असतो, सकाळी माल दिल्यावर दुसर्या दिवशी संध्याकाळी पैसे देताना, काही किलो माल खराब होता असं सांगून काही हॉटेलचालक पैसे कमी द्यायचे, तर काही जण उधारी वाढवून पळून जायचे. लहान हॉटेलला भाजी सप्लाय करताना मालाचे पैसे वसूल करण्यासाठी ‘वेगळं कसब‘ लागतं. मला मात्र हॉटेलचालकांशी रोज वाद घालणं योग्य वाटलं नाही म्हणून मी थोडं नुकसान सोसून तो धंदा थोड्या काळातच बंद केला.
मला धंद्यातील छक्के पंजे जमत नाहीत, नोकरी सुटली म्हणून मी व्यवसाय करायला लागलो. इतकी वर्षे चांगली सर्व्हिस दिल्यावर आज अनेक नवीन ग्राहक समोरून कॉन्टॅक्ट करतात. मेहनत आणि प्रामाणिकपणा हेच आमच्या यशाचं गमक आहे. २०१३साली वडील गेले, तेव्हा त्यांच्या पेंटिंगच्या व्यवसायाची जबाबदारी सर्व भावांच्या संमतीने माझ्याकडे आली. वडिलांचा कष्टकरी वारसा मी पुढे चालवीत आहे. भाजीच्या धंद्यात दोन्ही मुलं त्यांचं काम सांभाळून मदत करतात. काही वर्षांनी हा व्यवसाय ते पुढे घेऊन जातील असा विश्वास आहे. पोटाला अन्न, ही माणसाची पहिली गरज असल्याने भाजी या व्यवसायाला कधीही मंदी येणार नाही. पूर्वी भाजी व्यवसायात शंभर टक्के मराठी माणसं होती. परंतु त्यांच्या पुढील पिढीने तो व्यवसाय इतर लोकांना भाड्याने दिला किंवा विकला. कमी भांडवलात सुरु होणार्या आणि ३६५ दिवस मागणी असणार्या या व्यवसायात मराठी मुलांनी पुन्हा अस्तित्व निर्माण करायला हवं…‘
राजेंद्र पोटतिडकीने बोलत होते, इतक्यात आमची टॅक्सी वाडीबंदर कॅन्टीन आवारात पोहोचली. तेथील माल दिल्यावर मुलाखत संपवून त्यांचा निरोप घेत असताना, राजेंद्र यांनी नुकतीच साठी पूर्ण केल्याचं जयने सांगितलं. सकाळी पाच वाजता भाजी व्यवसाय, दुपारी टॅक्सी धंदा आणि रंगकामाचं कॉन्ट्रॅक्ट अशी तिन्ही कामं वयाची साठी उलटल्यावर करताना तुमची धावपळ उडत नाही का, असा प्रश्न मी त्यांना विचारला, तेव्हा ते म्हणाले, ‘माणसाने नेहमी काम करत राहायला हवं, वय झालंय म्हणून थांबलात तर दुखणी पाठीशी लागतात, अनेक परप्रांतीय माणसांच्या दुकानात/ पेढीवर नव्वद वर्षाचे मालक गल्ल्यावर बसलेले दिसतात. तुम्हाला सांगतो, धंद्यातून जोवर ‘एम व्हिटॅमिन‘ मिळत आहे तोवर तब्बेत अगदी फिट असते.‘
असं म्हणतात की मराठी माणसात इमाने इतबारे नोकरी करण्याचे गुण जास्त चांगले आहेत, ते बॉसचे आदेश फॉलो करतात. कोणताही धंदा करायला रिस्क घ्यावी लागते, दिवस रात्र काम करावं लागतं आणि तिथेच मराठी माणूस कमी पडतो, असा एक सार्वत्रिक समज आहे. पण प्रत्येक वेळी मोठी रिस्क न घेता, कामाचा ताण न घेता, कुटुंबाला वेळ देऊनही व्यवसाय करता येऊ शकतो, हे राजेंद्र यांचा जीवनप्रवास पाहिल्यावर कळतं. धंदा म्हटलं म्हणजे सदासर्वकाळ रिस्क घ्यायलाच हवी असा काही नियम नाही. लोकलमधून प्लॅटफॉर्मवर उतरताना, सर्वात आधी उतरणारी दारावरची आणि सर्वात शेवटी उतरणारी माणसं रिस्क घेणारी असतात. पण मध्ये उभी राहिलेली, सेफ झोनमधील माणसं बिलकुल रिस्क न घेता अलगद उतरतात. प्रत्येक व्यवसायात असे अनेक सेफ झोन असतात, फक्त ते ओळखता यायला हवे.