तुम्ही किचन कल्लाकारमध्ये कल्ला केलात एकदम… तुमच्या हातचा कोणता पदार्थ जगात भारी बनतो, असं तुम्हाला वाटतं?
– सरोज खोपडे, बदलापूर
बोलाचीच कढी अन बोलाचाच भात!
प्रेमविवाह चांगला की कांदे पोहे विवाह?
– अशोक परशुराम परब, ठाणे
जे लग्न टिकतं ते चांगलं.
हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा आहे, असे विधान अभिनेता अजय देवगण याने केले आहे. देशात एकच एक राष्ट्रभाषा नाही, अनेक भाषांना समान दर्जा आहे, हिंदी ही त्यापैकी एक भाषा आहे, हे त्याला माहिती नसेल का?
– विनया रांजणे, खडकलाट
सगळं माहीत असतं, पण कुणाची तरी तळी उचलून धरायची असते फायद्यासाठी.
आरआरआर आणि केजीएफ २ या सिनेमांची हवा निर्माण करण्यासाठी हे सिनेमे बनवणार्यांनीच कोट्यवधी रुपयांची तिकीटे बुक करून शो हाऊसफुल्ल असल्याचा बनाव रचल्याचा आरोप केला जातो आहे. मग या सिनेमांचं यश खरं तरी कसं मानायचं?
– सुदेश मोरे, तांबडी कोंड
सगळंच गौडबंगाल आहे. अलीकडे कुणाचं काही कळेनासंच झालाय खरं… पण आपण शांत राहून विवेकाने विचार करावा.
भालप्रदेश जेवढा भव्य तेवढा माणूस विचारशील आहे, असं म्हणतात. म्हणजे टक्कल पडलेल्या माणसाला विचारवंतच म्हणायचे का?
– रेश्मा कारखानीस, आकुर्डी
माझं टक्कल नैसर्गिक नाही, ते केलेलं आहे… त्यामुळे खरंच ज्यांचे केस गेलेत त्यांचा अनुभव घ्या.
तुम्हाला उद्या तुरुंगात जायची वेळ आली तर तिथे काय काय पदार्थ, पेयं हवीत, याचं मेन्यू कार्ड लिहून सोबत न्याल का? म्हणजे पोलिसांना तुमचा पाहुणचार करणं सोयीचं जाईल ना?
– रामकृष्ण पाटील, बेळगाव
हो… कदाचित. अरे हो, पण मी तुरुंगात का जाईन??
देशात याच्यावर बंदी घाला, त्याच्यावर बंदी घाला, असे राजकीय भोंगे सतत वाजत असतात; आपल्याकडे सगळीकडे लोक पचापच थुंकत फिरतात, ते पाहून गुटखा, पान, सुपारी वगैरे सगळ्याच मुखशुद्धीवर बंदी घालायला हवी, असं नाही वाटत तुम्हाला?
– नीलेश रामफळे, सोनापूर
अहो रस्त्यावर थुंकणे यावर काही राजकारण नाही ना होऊ शकत… त्यामुळे या सगळ्यावर बंदी येणार नाही… बंदी आणली तर यांना कर कसा मिळेल?… जे फायद्याचं आहे त्याचं नाही राजकारण करत हे लोक.
कलावंतांनी राजकारणात यावे का?
– अल्पना काळे, गायवाडी
अजिबात नाही
निखळ मनोरंजक नाटक आणि सामाजिक संदेश देणारं नाटक अशी दोन नाटकं तुम्हाला ऑफर झाली तर त्यांंच्यापैकी कोणतं नाटक तुम्ही निवडाल?
– पैगंबर शेख, रहिमतपूर
निखळ मनोरंजक नाटक निवडेन… पण सामाजिक संदेश निखळ मनोरंजनातूनही दिला जाऊ शकतो… उदा. आमचं ‘संज्या छाया’ नाटक.
बायकांच्या तोंडात तीळ भिजत नाही असं म्हणतात. पण, अनेक पुरुषही काही गुपित ठेवू शकत नाहीत. मग बायकांनाच दोष का?
– राधा सोनटक्के, सांगवी
जास्तीची मेजॉरिटी… म्हणून बायकांना ही म्हण आहे.
तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू मोत्याच्या माळा… अरे, मग मोत्याला राग नाही का येणार त्याच्या माळा पळवल्यावर?
– यशवंत माने, कोपरगाव
येईल ना… आला विचारायला तर त्याला तुमचं नाव सांगतो…
हल्ली बायोपिकचं पीक आलंय. तुमची संगीताची जाण लक्षात घेता, संगीतक्षेत्रातल्या कोणत्या कलावंताच्या बायोपिकमध्ये तुम्हाला घेतलं तर ते योग्य कास्टिंग ठरेल?
– रूमाव अल्फ्रेडो, सांखळी
नाही… मी कुठल्याही गायक-संगीतकारसारखा दिसत नाही.