सुटकेचा नि:श्वास आणि धोक्याचा इशाराही!
उत्तर कोल्हापूरने-शाहू नगरीने महाविकास आघाडीला विजय मिळवून दिला. पण भाजपला ७८ हजार मते मिळाली हा पुरोगामी महाराष्ट्राला धोक्याचा इशारा आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण विभागात अनेक उदयनराजे तयार होत आहेत. ठिकठिकाणी नकली संभाजीराजे तसेच सदाभाऊ खोत तयार होत आहेत, संभाजी ब्रिगेडच्या रूपाने अनेक झाडे उगवत आहेत. अशा घटकांना घरवापसीसंबंधी साद घालण्याची, प्रबोधनाची नितांत आवश्यकता आहे. भाजप, आरएसएस या विचारधारांशी आपण सरळ-सरळ लढू़ शाहू, आंबेडकर, फुले, छत्रपती शिवाजी महाराज ही आपली विचारांची शिदोरी आहेच. पण शिदोरीत सावध राहून चालणार नाही आहे. काठावरचे मतदार दुर्लक्षून चालणार नाही. अनेक ठिकाणी दबा धरून बसलले छुपे लोक शोधले पाहिजेत. त्यांना सुनावले पाहिजे. त्यांचे मतपरिवर्तन घडविले पाहिजे. मुख्य म्हणजे महाविकास आघाडीने एकदिलाने विधानसभेच्या निवडणुका लढल्या पाहिजेत.
माझी हात जोडून विनंती आहे इंडियन नॅशनल काँग्रेस या प्राणप्रिय पक्षाला, बाबांनो सैतान दारात उभा आहे. आता आपण धाकट्या भावाची भूमिका घेऊया. भाजपचा पराभव महत्वाचा आहे.
– कृष्णा ब्रीद, प्रभादेवी
जीएसटी कलेक्शन वाढल्याची कौतुके कशाला?
वस्तू आणि सेवा महाग झाल्या की त्यावरचा जीएसटी वाढतो. म्हणजे दोन वर्षांपूर्वी १०० रुपयांना मिळणारी वस्तू आता १५० रुपयांना मिळायला लागली की त्यावर असणारा पाच टक्के जीएसटी ५ रुपयांवरून ७.५० रुपये होतो.
त्यात कराचा दर बदलून १० टक्के झाला तर तो १५ रुपये होतो. वस्तू खरेदी करणार्याची क्रयशक्ती तीच राहते किंवा कमी होते. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे रोजगारनिर्मितीवर परिणाम होतो. हे सांगण्याचं कारण एवढंच की कुणी जीएसटीचं कलेक्शन मागच्या महिन्यात १००००० कोटी होतं. आता १२०००० कोटी झालं म्हणजे अर्थव्यवस्था सुधारली असं स्वतःच्या टिर्या बडवत आलं तर आधी हातात पायतान घ्या…
– प्रसाद झावरे
महाविकास आघाडीने चांगली कामे केलीत… लबाडेंद्र काही म्हणोत!
महाविकास आघाडी सरकारने इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१ आणले. ठाण्यात कर्करोग रुग्णालय स्थापण्याचा निर्णय घेतला. राज्यभरात एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली लागू केली. खारघरला फुटबॉल उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन केले. मुंबई-गोवा चार पदरी सागरी काँक्रीट मार्ग उभारण्याचा निर्णय घेतला. ग्रीनफिल्ड कोकण द्रुतगती महामार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला. भाऊचा धक्का ते मांडवा या रो पॅक्स फेरीसेवेची सुरुवात झाली. मुंबईत शिक्षणासाठी येणार्या मुलामुलींसाठी होस्टेल बांधण्यात येणार आहे. कामाठीपुरा पुनर्विकास प्रक्रिया सुरू झाली आहे. दीनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय झाला. एशियाटिकमधील दुर्मिळ ग्रंथांचे डिजिटायझेशन सुरू. कौशल्य विद्यापीठाची मुंबई स्थापना झाली आहे. राज्याचे बीच शॅक धोरण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणावर आकर्षित होतील. आदरातिथ्य उद्योग सुरू करण्यासाठी एक खिडकी योजना सुरू झाली. कॅराव्हॅन पर्यटन धोरण राबवण्यास मान्यता मिळाली आहे.
शासकीय जमिनीवरील १०२०सेक्टर कांदळवन क्षेत्र राखीव वन म्हणून घोषित झाले आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान विकास विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प आराखडा तयार झाला आहे. मराठी भाषा भवनाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी खात्यात अनेक सुधारणा करून, जमीन खरेदी-विक्री व्यवहार, नोंदणी यात सुलभता आणली आहे. अनेक तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यात येत आहे. कोविडचे संकट असूनही आणि केंद्र सरकारचा विशेष मदतीचा हात नसूनही, अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था तगून जाईल, अशाप्रकारचे अर्थसंकल्प सादर केले.
महाविकास आघाडी सरकारने काहीही केलेले नाही आणि विकास कशाशी खातात, हे केवळ मलाच कळते, असे गर्विष्ठ नेत्याने कितीही सांगितले, तरी ते काही खरे नाही! मनमोहन सरकार हे भ्रष्टाचारी आहे, असे समीकरण तयार करून भाजपने केंद्रात सत्ता मिळवली. तोच फॉर्म्युला महाराष्ट्रात वापरला जात आहे. राज्यात भ्रष्टाचाराशिवाय दुसरे काही विधायक घडतच नाही आहे, हे दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे.
फडणवीस सरकारमध्येही भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे झाली. परंतु तेव्हाच्या विरोधकांनी त्याचा नीट पाठपुरावा केला नाही. अर्थात केंद्रात मोदी सरकार असल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दिमतीला तपास यंत्रणा नव्हत्या, हाही भाग आहे. परंतु ‘देवेंद्र सरकार स्वच्छ आणि बाकी सगळे गलिच्छ!’ असे बिलकुल म्हणता येणार नाही. पण लोकांच्या मनावर हाच प्रचार बिंबवण्यात आला. परंतु दुसरी बाजूही जनतेपुढे ठेवली गेली पाहिजे. ढोंगी, लबाड आणि भ्रष्ट बुवाबाजांचा पक्ष कोणता आहे, हे जनतेला पुन्हा पुन्हा सांगितले पाहिजे. महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेक दोषही आहेत. पण त्यांनी देखील काही चांगली कामे केली आहेत. तेव्हा लबाडेंद्रांनी कितीही बोगस नॅरेटिव्ह लोकांपुढे ठेवले, तरी जनतेने याबाबत नीट विचार केला पाहिजे.
– हेमंत देसाई