लोकांच्या सेवेसाठी अहोरात्र झटणारे हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर, कडवे शिवसैनिक धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर सिनेमा या विचारानेच थरारून जायला होतं… त्या काळात माझ्यासारखे असंख्य पोरसवदा तरुण दिघेसाहेबांकडे ओढले गेले होते. राजकारण वगैरे कळण्याचं ते वय नव्हतं, पण हा माणूस मराठी माणसांसाठी जीव तोडून काम करतोय हेच ठाऊक होतं. ते काम आम्ही पाहात होतो.
त्यांच्या पश्चात दिघे साहेबांच्या नजरेतील ती जरब, चेहर्यावरचे ते तेजस्वी आणि कणखर भाव, त्यांची देहबोली पुन्हा पाहायला मिळेल, असं वाटत नसताना अभिनेता प्रसाद ओक याला दिघेसाहेबांच्या वेशभूषेत प्रत्यक्ष पाहिले आणि सुन्नच झालो. या सिनेमाच्या ध्वनीफितींच्या प्रकाशन सोहळ्यात प्रसादला त्या रुपात पाहिले आणि माझ्या लहानपणचा तो काळ सर्रकन डोळ्यांपुढून गेला. साक्षात दिघे साहेबच अवतरल्याचा भास झाला. अर्थात काहीच दिवसांपूर्वी दिघेसाहेबांवरील या सिनेमाचा ट्रेलर समाजमाध्यमांवर पाहिला होता, तेव्हाही अवाक झालो होतो.
‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा सिनेमा १३ मे रोजी प्रदर्शित होतोय. मंगेश देसाई यांनी ‘साहिल मोशन आर्ट’ या बॅनरद्वारे सिनेनिर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवताना पहिलाच सिनेमा दिघेसाहेबांवर बनवला आहे. प्रवीण विठ्ठल तरडे यांनी तो दिग्दर्शित केला आहे. दिघे यांना गुरुच नव्हे तर देव मानणारे आणि सावलीसारखे त्यांच्यासोबत असणारे एकनाथ शिंदे म्युझिक रिलीज सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते. सिनेमात त्यांची व्यक्तिरेखा अभिनेता क्षितिज दाते साकारतोय. प्रसाद ओक यांच्याप्रमाणेच क्षितिज दातेचाही लुकही हुबेहुब जुळून आला आहे. ज्येष्ठ रंगभूषाकार विद्याधर भट्टे यांनी या चित्रपटातील हे सर्व लुक डिझाइन केले आहेत.
प्रसाद ओक म्हणाला, ‘आपण या चित्रपटाच्या टीझरमधून एक फार सुंदर वाक्य ऐकलं, सर्वच राजकारणी सारखे नसतात, काही आनंद दिघे असतात…’ लोकमान्य टिळकांनी ज्या भावनेने गणेशोत्सव सुरू केला त्याच भावनेने मंगेश देसाई यांनी हा आनंदोत्सव केला. त्यांनी आनंदमूर्तीची स्थापना करण्याचा घाट घातला, त्या मूर्तीला सुरेख रूप दिलं आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा केली. मी दिघे साहेबांबद्दल खूप वाचलं, ऐकलं होतं. त्यांनी अनेकांच्या जीवनाला वळण दिलं. आज ते हयात नसतानाही माझ्या करीयरलाही वळण मिळण्यासाठी तेच कारणीभूत ठरले. कारण ९५ चित्रपटानंतर मला शीर्षकभूमिका करण्याची संधी मिळाली.’
एकनाथ शिंदे यांनीही दिघे यांच्या आठवणींना उजळा दिला. ते म्हणाले, ‘आनंद दिघे हे शिवसेनेसाठी आधारस्तंभ होते. त्यांचे विचार चित्रपटांच्या माध्यमातून संपूर्ण जगभरात पसरावे हाच आमचा मुख्य हेतू आहे. मी घातलेला घाट मंगेश देसाई यांनी पूर्ण केला आहे. प्रवीण तरडे आता या चित्रपटाला पुढे नेण्याचे काम करीत आहेत. आजच्या तरुणवर्गासमोर दिघे साहेबांचा आदर्श समोर ठेवणे गरजेचे आहे. कारण त्यांनी राजकारण कधीच केलं नाही. समाजकारण केलं. ते सगळ्यांसाठीच स्फूर्तिदायक होते.’
अभिनेते, निर्माते मंगेश देसाई म्हणाले, ‘कोणत्याही चित्रपटात नेहमी काळ वेळ आणि प्रारब्ध हे अतिशय महत्त्वाचा घटक असतो. मला कधीही वाटलं नव्हतं की मी निर्माता होईन, परंतु, आज माझं भाग्य आहे की दिघे साहेबांच्या जीवनावर चित्रपट बनवण्याची संधी मला मिळाली.’ लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले, ‘मी वेगवेगळे विषय असणारे चित्रपट बनवले. शेतकरी, आध्यात्म, इतिहास या विषयांचे चित्रपट बनवल्यानंतर जीवनपट बनवण्याचा विचार होता, पण कोणाच्या जीवनावर बनवायचा हा प्रश्न होता. मंगेश देसाईंनी दिघेसाहेबांवर काहीतरी करायचे आहे असे म्हटले आणि मला मार्ग सापडला. आर्ट फिल्म वगैरे मी मानत नाही. लोकांचे मनोरंजन झाले पाहिजे हे माझे मत आहे. मनोरंजनातून प्रबोधन करता आले तर ठीकच आहे. हा सिनेमा पाहतानाही ती कुठेही डॉक्युमेंट्री होणार नाही हे मी आधी पाहिले आहे. झी स्टुडिओजमार्फत हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार, म्हणजे तो चित्रपट जगभरात जाणार याचा मला आनंद होतोय.’
‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटात एकूण पाच गाणी आहेत. यातील ‘गुरुपौर्णिमा’ आणि ‘धर्मवीर’ ही गाणी अविनाश-विश्वजीत या जोडीने संगीतबद्ध केली आहेत, तर ‘गोकुळाष्टमी’ गाणं आणि ‘आनंद हरपला’ हे मंगेश कांगणे यांनी लिहिलेलं गीत ही दोन गाणी चिनार-महेश यांनी संगीतबद्ध केली आहेत. या चित्रपटात एक दमदार पोवाडा असून तो शाहीर नंदेश उमप यांनी संगीतबद्ध केला असून त्यांनीच गायला आहे. आता हा सिनेमा प्रदर्शित व्हायची वाट पाहावीच लागणार आहे.