अनेक मान्यवरांचा सहवास लाभलेले लेखक, पत्रकार, मुलाखतकार शशी भालेकर यांच्या निवडक लेखनाचा ‘ऋणानुबंध’ संग्रह डिंपल प्रकाशनाने नुकताच प्रसिद्ध केला आहे… त्यातील दिवंगत श्रेष्ठ फलंदाज, समालोचक आणि दानशूर उद्योगपती विजय मर्चंट यांच्या सहवासात एक दिवस व्यतीत करून त्यांनी रेखाटलेले विजयभाईंचे हे रसरशीत शब्दचित्र…
– – –
१९७९ सालातील गोष्ट आहे. ‘प्रियंवदा’ मासिकाच्या संपादिका उषा प्रियंवदा मला म्हणाल्या, ‘या वर्षी दिवाळी विशेषांकात सुप्रसिद्ध क्रिकेटपटू विजय मर्चंट यांची मुलाखत असावी अशी माझी इच्छा आहे आणि ही मुलाखत तुम्ही घ्यावी.’ त्यांनी मला विजय मर्चंट यांचा दूरध्वनी क्रमांकही दिला.
विजय मर्चंट हे सर्वार्थाने प्रचंड व्यक्तिमत्त्व होतं. ते ज्या काळात उत्तम क्रिकेटपटू म्हणून गाजत होते तेव्हा मी शालेय विद्यार्थी होतो. ब्रेबॉर्न स्टेडियमवर जाऊन त्यांचा खेळ पाहण्याची शक्यता नव्हती. क्रिकेट मॅच चालू असताना एखादा सिनेमा पाहायला गेलं तर मुख्य चित्रपट सुरू होण्यापूर्वी फिल्म डिव्हिजनतर्फे ‘इंडियन न्यूज’ दाखविल्या जायच्या. त्यात काही सेकंद विजय मर्चंट यांचा खेळ पाहिला जाई. क्रिकेट खेळामधून निवृत्त झाल्यानंतर ते उत्तम कॉमेंटेटर होते. त्यांचं उत्तम इंग्लिश, अमोघ वक्तृत्व, खेळांतील प्रावीण्यामुळे त्यांनी केलेलं विश्लेषण या सर्व गोष्टी दर्जेदार असायच्या.
त्या काळात मुंबईत लहानमोठ्या सुमारे १५० कापडगिरण्या होत्या. त्यातील ठाकरसी ग्रूपच्या ज्या हिंदुस्थान मिल्स आदी गिरण्या होत्या, त्या विजय मर्चंट यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या होत्या. ते या उद्योग व्यवसायाचे मॅनेजिंग डायरेक्टर होते. आणखी एका गोष्टीविषयी मला विजय मर्चंट या व्यक्तिमत्त्वाविषयी कुतूहल होतं. ते शारीरिकदृष्ट्या अपंग तसेच अंध, कर्णबधीर अशांना खूप मदत करतात याविषयी मी वाचलं, ऐकलं होतं. सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेने समाजात वावरणार्या या क्रिकेटपटू उद्योगपतीस भेटायला मी उत्सुक होतो.
मी त्यांना फोन केला. सुदैवाने त्यांनीच तो उचलला. मी घेऊ इच्छित असलेल्या त्यांच्या मुलाखतीविषयी त्यांना सांगितलं. त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. मला वाटलं, ते मुलाखत द्यायला तयार होतील. पण फर्ड्या इंग्लिशमध्ये ते म्हणाले, ‘वेल मि. भालेकर, आय अॅम अ व्हेरी बिझी पर्सन. आय डोन्ट हॅव टाइम फॉर इंटरव्ह्यू.’ मी काही बोलण्यापूर्वी ते पुढे म्हणाले, ‘हाऊएव्हर, आय डोन्ट विश टू डिस्करेज यू. आपण एखादा दिवस नक्की करू. त्या दिवशी तू सकाळी आठ वाजता माझ्या ऑफिसमध्ये ये. माझी खूप धावपळ असते. तू दिवसभर माझ्याबरोबर राहा. मी माझी कामं करीन. मोकळा वेळ मिळेल तेव्हा तू तुझे प्रश्न विचार, मी उत्तर देईन. म्हणजे तुझंही काम होईल आणि हो, चहा, लंच तू माझ्याबरोबरच घेणार आहेस. त्या तयारीने ये.
विजय मर्चंट मुलाखत द्यायला तयार झाले याचा मला खूप आनंद झाला. मुलाखतीचा हा प्रकार अजब होता. पण दिवसभर त्यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तीबरोबर राहायचं याचं मनावर खूप दडपण आलं. तरीही दोन दिवसांनी मी त्यांना फोन केला व भेटीचा दिवस नक्की केला. ठरलेल्या दिवशी सकाळी आठ वाजता मी मर्चंट यांच्या ऑफिसमध्ये हजर झालो. हे ऑफिस फोर्ट भागात अपोलो स्ट्रीटवर स्टेट बँकेची जुनी दगडी इमारत होती, तिच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये होतं. माझ्यापूर्वीच ते ऑफिसमध्ये हजर झाले होते. ‘वेलकम मिस्टर भालेकर’ असं म्हणून त्यांनी माझं स्वागत केलं. मला समोर बसायला सांगितलं आणि म्हणाले, ‘मी दिवसभराच्या कामाचं प्लॅनिंग करतोय. तोपर्यंत तू ब्रेकफास्ट आणि चहा घे.’
सुमारे २०/२५ मिनिटांनंतर आम्ही खाली येऊन मर्चंट साहेबाच्या गाडीत बसलो. त्यांनी मला शेजारी बसायला सांगितलं. सकाळी आठ ते सायंकाळी सात असा दिवसभर मी त्यांच्या सहवासात होतो. तेव्हा जाणवलं की ते वयाच्या ७०व्या वर्षीसुद्धा कमालीचं गतिमान जीवन जगत होते. त्यांचं बोलणं, चालणं सारंच अत्यंत वेगवान होतं. त्यांच्या गतिमान चालण्याबरोबर जमणं मला कठीण होत होतं. त्यांचं सारं बोलणं मी टेप करीत होतो. त्यामुळे बोलण्यातील कोणताही भाग चुकण्याची शक्यता नव्हती.
सुरुवातीला मला मर्चंट साहेब मुंबईतील जेकब सर्कल भागात घेऊन गेले. तेथे सात रस्ता परिसरात त्यांच्या मालकीची ‘हिंदुस्थान मिल्स’ ही कापड गिरणी होती. आत शिरताच उजव्या बाजूला असलेल्या इमारतीत आम्ही गेलो. तेथे ‘हेल्थ केअर सेंटर’ अशी पाटी होती. आत बरेच पेशंट बसले होते. तेथील डॉ. पिठावाला नावाच्या गृहस्थाशी मर्चंट साहेबांनी माझी ओळख करून दिली. अस्थिरोग आणि त्यामुळे कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी अशा आजारावर मसाज तसंच आयुर्वेदिक औषधं इथे विनामूल्य दिली जातात. डॉ. पिठावाला त्यातील तज्ज्ञ होते. त्यानंतर मर्चंट साहेब आणखी एका दालनात घेऊन गेले. तेथे काही अपंग, अंध, कर्णबधिर, मंदबुद्धी माणसं होती. मर्चंट साहेब त्यांना भेटले. प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेतलं. यांना मर्चंट काही ना काही उद्योग व्यवसाय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. टेलिफोन बूथ, छोटे व्यापार करायला आर्थिक मदत करतात असे त्यांचे एक सहकारी म्हणाले.
त्यानंतर मी मर्चंट साहेबांबरोबर त्यांच्या एल्फिन्स्टन रोड परिसरात असलेल्या दुसर्या गिरणीत गेलो. येथेही त्यांना भेटायला काही अपंग, अंध आले होते. या गिरणीतील कॅन्टीनमध्ये आम्ही जेवण घेतलं. विजय मर्चंट सर्व कामगार बंधूंबरोबर जेवायला बसले. कॅन्टीनमध्ये कामगारांना जे जेवण दिलं होतं तेच मर्चंट साहेबही घेत होते.
तेथून आम्ही माटुंगा (पश्चिम) येथील सर ससून डेव्हिड स्कूलमध्ये गेलो. येथे बालगुन्हेगार मुलांचं पुनर्वसन करण्यासाठी त्यांना आवश्यक शिक्षण दिलं जातं. नियमित अभ्यासाबरोबर या मुलांना तांत्रिक विषयाचं शिक्षणही दिलं जातं. बालवयात चोर्या, गुंडगिरी केल्यामुळे शिक्षा झालेली मुलं इथे होती. इतकंच काय, काही विद्यार्थी खुनी हल्ले किंवा खून केलेलेही होते. या विद्यार्थ्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन देऊन त्यांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न केला जातो. बालगुन्हेगारांचं समाजात पुनर्वसन व्हावं आणि सर्वसामान्य नागरिकासारखं समाजजीवन त्यांनी जगावं याकरिता प्रयत्न केले जातात.
या संस्थेला आम्ही भेट दिली तेव्हा तेथे जोशी नावाचे सुपरिन्टेडेंट होते. ते म्हणाले, ‘विजय मर्चंट हे एकमेव उद्योजक आहेत जे बालगुन्हेगारांनाही सकारात्मक विचारसरणीने आपल्या गिरण्यांतून नोकर्या देतात. त्यांना अन्यत्र नोकर्या मिळाव्यात म्हणून उद्योगक्षेत्रात मित्रांकडेही शिफारस करतात.’
दादर (पूर्व) येथील दादासाहेब फाळके रोडवर असलेल्या अंध मुलांच्या एका शाळेलाही आम्ही भेट दिली. तसेच मानखुर्दला मंदबुद्धी विद्यार्थ्यांची एक शाळा होती. तेथेही मर्चंट साहेब मला घेऊन गेले. दिवस संपला होता. विजय मर्चंट या संस्थांना आर्थिक सहाय्य करीत होते. याशिवाय कर्णबधिर मुलांच्याही काही शाळा होत्या. या सर्वच संस्थांचे ते आधारस्तंभ होते.
त्यांच्या गाडीतून प्रवास करीत असताना किंवा गिरण्यांच्या आणि संस्थांच्या कचेरीत बसल्यानंतर मी त्यांना प्रश्न विचारीत होतो आणि जराही न कंटाळता ते उत्साहाने उत्तर देत होते. त्यांचं बोलणं, चालणं, काम करणं या सार्याचा वेग मला अचंबित करीत होता. स्पोर्ट्समन असल्याने आणि अत्यंत शिस्तबद्ध जीवन जगत असल्यामुळे ते निरोगी आणि धडधाकट होते. त्यांच्याबरोबर मी जवळजवळ पूर्ण दिवस होतो. त्यातला एक क्षणही त्यांनी आरामात घालवला नव्हता.
हिंदुस्थान मिल्सच्या ऑफिसमध्ये बसलो असताना तेथील एका फलकाने माझं लक्ष वेधून घेतलं. त्यावर ठाकरसी ग्रूपच्या संचालकांची नावं होती. त्यावर बहुसंख्य संचालकांच्या नावापुढे ठाकरसी हे आडनाव लावलं होतं आणि त्यातच विजय मर्चंट हे नाव होतं. मी विजयभाईंना विचारलं, ‘हे सर्व ठाकरसी कोण आहेत?’
विजयभाई म्हणाले, ‘या ठाकरसींपैकी काही माझे सख्खेच भाऊ आहेत तर काही चुलत बंधू आहेत.’
मी आश्चर्यचकित होऊन विचारलं, ‘मग हे सगळे ठाकरसी आणि तुमचं आडनाव मर्चंट कसं?’
दिलखुलासपणे हसत विजयभाई म्हणाले, ‘तो मोठा मजेशीर भाग आहे. आता मर्चंट हेही माझं आडनाव नाही. तसंच ठाकरसी हे सुद्धा आमचं आडनाव नाही. गुजरातमध्ये आमची अशी एक जमात आहे की त्यांना आडनावच नसतं. विशेष म्हणजे आमच्या ज्ञातीतील बहुसंख्य मंडळी ही कापड गिरण्यांच्या व्यवसायात आहेत. उदाहरणार्थ, मफतलाल, साराभाई, मोरारजी, खटाव! पण ही त्यांची आडनावं नाहीत. पण ज्यांनी व्यवसाय सुरू केले त्यांची विशेषनामे पुढील पिढ्या आडनावासारखी वापरू लागले. अरविंद मफतलाल, विजय साराभाई, सुनील खटाव वगैरे. आता माझंही नाव विजय ठाकरसी असायला हवं होतं. पण झालं काय, मी पाच वर्षांचा असताना माझे वडील मला भर्डा हायस्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेऊन गेले. या शाळेची मॅनेजमेंट पारसी धर्माच्या मंडळीची होती आणि त्या काळी सुद्धा प्रवेश देण्यापूर्वी मुलांचे इंटरव्ह्यू घेतले जात. मला एकट्यालाच प्रिन्सिपॉल रुममध्ये पाठविण्यात आलं. प्रिन्सिपॉल वयोवृद्ध पारसी गृहस्थ होते. त्यांनी मला विचारलं, ‘व्हॉट इज युवर नेम?’ मी म्हटलं, ‘माय नेम इज विजय.’ ते म्हणाले, ‘व्हेरी गुड, नाऊ व्हाट इज युवर सरनेम?’ पण त्याही वयात मी त्यांना सांगितलं, ‘सर, वुई डोन्ट हॅव सरनेम.’ मी असं उत्तर दिलेलं त्यांना उद्धटपणाचं वाटलं असावं. बाहेर बरीच मुलं इंटरव्ह्यूकरिता थांबली होती. त्यामुळे त्यांचा वेळही महत्त्वाचा होता. ते रागावले. थोड्या वरच्या आवाजात मला म्हणाले, ‘हाऊ कॅन इट बी? यू मस्ट हॅव सरनेम.’ काही क्षणांनंतर ते मला म्हणाले, ‘व्हॉट इज युवर फादर? व्हॉट इज ही डुईंग?’ मी झटकन म्हणालो, ‘सर, वुई आर मर्चंटस्.’ आणि दुसर्याच क्षणी आपल्या हातातील टाकाच्या फटकार्याने त्यांनी माझ्या विजय या नावापुढे मर्चंट असं लिहिलं. कारण पारसी असल्याने त्यांना व्यवसायासंबंधीची नावं माहीत होती. उदाहरणार्थ, बाटलीवाला, दारूवाला, बंदूकवाला… मर्चंट हे नाव मला आडनाव म्हणून चिकटलं आणि तेच कायम झालं. माझे सख्खे भाऊ ठाकरसी हे नाव लावतात आणि मी मात्र मर्चंट लावतो.’
कापड गिरणी व्यवसाय ज्यांनी सुरू केला ते ठाकरसी विजय मर्चंट यांचे पणजोबा तर एस.एन.डी.टी. या महिला विद्यापीठाला ज्यांचं नाव दिलं गेलं त्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी या त्यांच्या आजी!
विजय मर्चंटनी वयाच्या आठव्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यांच्या आईला क्रिकेटची खूप आवड होती. सुदैवाने ज्या भर्डा हायस्कूलमध्ये ते शिकले त्या शाळेत क्रिकेटचं खूप प्रस्थ होतं. शाळेत एक गेममास्टर असायचा. ‘ए’, ‘बी’ आणि ‘सी’ अशा तीन नेटमध्ये विद्यार्थ्यांची विभागणी असायची. सुरुवातीला ‘सी’ नेटमध्ये असलेले विजय मर्चंट त्यांच्या प्रावीण्यामुळे ‘ए’ नेटमध्ये गेले. मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर विजयभाईंनी सिडनॅहम कॉलेजमध्ये कॉमर्स शाखेत प्रवेश घेतला. कॉलेजच्या क्रिकेट टीमचे ते कॅप्टन झाले. आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा त्यांनी तीन वर्षं गाजवली. १९३२ साली विजयभाई बीकॉम उत्तीर्ण झाले. क्रिकेटचं वेड सुटणं शक्यच नव्हतं. १९३४ साली त्यांची रणजी ट्रॉफीसाठी निवड झाली. १९५१पर्यंत ते रणजी ट्रॉफीसाठी खेळले. त्यातली त्यांची एकूण धावसंख्या ३५०० इतकी झाली. धावसंख्या वाढविणारा खात्रीचा खेळाडू अशी त्यांची ख्याती झाली. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघात त्यांची नियुक्ती झाली. भारतीय क्रिकेट संघात ते कर्णधार झाले. एकूण क्रिकेट जीवनात विजय मर्चंट यांनी ४३ शतकं काढली आणि त्यांच्या एकूण धावांची संख्या १२,००० इतकी झाली. क्रिकेट क्षेत्रात एवढा प्रचंड प्रवास केलेले विजयभाई म्हणाले, ‘आमच्या वेळी आम्ही क्रिकेट खेळत होतो तो ‘गेम’ होता. आता तो ‘बिझनेस’ झाला आहे. आमच्या वेळी मी, विजय हजारे, विनू मंकड, बापू नाडकर्णी, विजय मांजरेकर स्वत:चे उद्योगव्यवसाय किंवा नोकर्या सांभाळून क्रिकेट मॅचेस खेळत असू. आज क्रिकेटपटूंना जे लाखो किंवा करोडो रुपयांचं मानधन मिळतं ते पाहून माझ्यासारख्या उद्योजकांना आश्चर्याचा धक्का बसतो. त्यांना राहण्याची, ब्रेकफास्ट आणि जेवणाची उत्तम व्यवस्था असते. त्याचे वेगळे पैसे मिळतात. ज्या गावात ते खेळत असतील तेथील बडे लोक त्यांना पार्ट्या देतात. मोठमोठ्या भेटवस्तू देतात. हे सारं पाहिलं की वाटतं क्रिकेट आता खेळ राहिला नसून धंदा झाला आहे आणि जेव्हा खेळाचा धंदा होतो तेव्हा त्यातील ‘गम्मत’ निघून जाते.’
उत्तम खेळाडू असलेले आणि दीर्घकाल कर्णधारपद भूषविलेले विजय मर्चंट वयाच्या चाळिसाव्या वर्षी क्रिकेटच्या खेळातून निवृत्त झाले. या निवृत्तीविषयी विजयभाई म्हणाले, ‘कोणत्याही क्षेत्रात माणसाने अशावेळी निवृत्त व्हावं की लोकांनी विचारायला हवं, एवढ्या लवकर का निवृत्त झालात? अजून निवृत्त का होत नाही, असं लोकांनी विचारण्याची वेळ येऊ नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं.’ ते पुढे म्हणाले, ‘खरं तर मला कापड गिरण्यांच्या व्यवसायातूनही निवृत्त व्हायचं आहे. पण मी तरुणपणी क्रिकेटमध्ये एवढा गुंतलो होतो की मी योग्यवेळी लग्नही करू शकलो नाही. माझं लग्न वयाच्या ३९व्या वर्षी झालं. त्यानंतर मला मुलगी झाली, नंतर मुलगा. त्यामुळे माझा मुलगा माझ्यापेक्षा ४७ वर्षांनी लहान आहे. तो यंदा
बीकॉम पास झाला. अधिक शिक्षण घेऊन तो व्यवसाय करण्यायोग्य झाला की मी या व्यवसायातूनही निवृत्त होईन.’
आपल्या व्यापक समाजकार्याविषयी बोलताना ते म्हणाले, ‘क्रिकेटने मला बर्याच गोष्टी शिकविल्या. त्यातून मी जीवनाचं तत्त्वज्ञान बनवलं आहे. क्रिकेटमध्ये चांगला फलंदाज सोबतच्या कच्चा फलंदाजाला नेहमी सावरून घ्यायचा प्रयत्न करतो, कारण त्याच्या सहाय्याने आपल्याला संघाचा ‘स्कोअर’ काढवायचा असतो. सुदैवाने मी तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलो. घरच्या श्रीमंतीमुळे मला कशाची वाण पडली नाही. म्हणून समाजात जे गरीब आहेत, कमकुवत आहेत, जन्मत:च जे आंधळे, बहिरे, मुके म्हणून जन्मले त्यांना यथाशक्ती मदत करणं मला महत्त्वाचं वाटलं. त्यांच्या कल्याणासाठी मी माझे पैसे देत होतोच. पण उद्योगपती म्हणून माझा लौकिक असल्याने अन्य उद्योगपतींकडूनही मी आर्थिक मदत मिळविण्याचा सातत्याने प्रयत्न केला.’
‘सोसायटी फॉर रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी, रिहॅबिलिटेशन अॅन्ड रिसर्च’ नावाची संस्था महारोग्यांच्या औषधोपचारासाठी मदत करते. या संस्थेच्या मदतीकरिता आणि प्रचाराकरिता विजय मर्चंट यांनी त्या काळात आकाशवाणीवर एक कार्यक्रम सुरू केला. विजयभाईंच्या बंधूंनी आर्थिक मदत केलीच. पण विजयभाईंनी मफतलाल, टाटा, खटाव अशा धनिकांकडूनही देणग्या मिळविल्या. प्रत्येक रविवारी ५० मिनिटे हा कार्यक्रम असायचा. त्यात क्रिकेटवर चर्चा, लोकप्रिय क्रिकेटपटूंच्या मुलाखती असा रंजक भाग असे. या कार्यक्रमात विजय मर्चंट हे महारोगी, त्यांच्या आजारावर होत असलेली उपाययोजना, समाजाकडून त्यांना अपेक्षित असलेली सहानुभूती आणि आर्थिक मदत याविषयी आत्मीयतेने आवाहन करीत. त्यामुळे महारोगी आणि त्यांच्यासाठी कार्यरत असणार्या संस्थांना भरपूर मदत झाली.
विजय मर्चंट क्रिकेट खेळातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी स्वत:ला सामाजिक कार्यात झोकून दिलं. त्यांच्या समाजकार्याचा व्याप प्रचंड वाढला होता. व्यावसायिक क्षेत्राप्रमाणेच सरकारदरबारीही त्यांचा आदरपूर्वक मानसन्मान होत असे. त्याचा फायदा त्यांनी दीनदुबळ्यांच्या कल्याणासाठी केला. ते म्हणाले, ‘मला या समाजकार्यात फार मोठं समाधान मिळतं. परमेश्वराने मला सर्व काही दिलं आहे. पैसा, प्रसिद्धी, सुख, ऐश्वर्य! देवाकडे मागण्यासारखं काही उरलं नाही. उलट मीच देवाचं खूप काही देणं लागतो. मी कधी देवळात जात नाही. देवळांत जाणारे स्वत:करिता प्रार्थना करीत असतात. काही ना काही मागत असतात. माझा देव देवळात नसतो. दीनदुबळ्यांच्या अंत:करणात तो असतो. त्यांच्या आयुष्यात सुख, आनंद, समाधान मिळालं, तर देवाने माझ्यावर केलेल्या उपकाराची परतफेड केल्याचं समाधान मला मिळतं.’
महारोगी, अंध, बहिरे, मुके अशांना सहाय्यभूत असणारे विजय मर्चंट बालगुन्हेगारांकडे सहानुभूतीने पाहतात. याविषयी ते म्हणाले, ‘आपल्या कुटुंबात नाही का एखादा माणूस गैर वागतो. आपण अशा माणसाला समजून घेण्याचा प्रयत्न करतोच ना? प्रत्येक वर्षी सुमारे ७०/७५ गुन्हेगारांना आम्ही कुठे ना कुठे नोकर्या देतो. त्यामुळे ते पुढे नॉर्मल आयुष्य जगू लागतात.’
गर्भश्रीमंती अनेकांकडे असते. अनेकजण स्वत:च्या कर्तृत्वावर अमाप पैसा कमावतात आणि संपन्न आणि सुखासीन जीवन जगत असतात. पण आपण सुखात जगत असताना समाजातील दीनदुबळ्यांचा आणि उपेक्षितांचा विचार करून त्यांना आस्थेने आणि सहानुभूतीने सर्वार्थाने साहाय्य करणारे विजय मर्चंट म्हणजे परमेश्वराचे प्रेषित वाटतात.