इंटरनेटच्या शोधामुळे आता जगात कोणत्याही भौगोलिक सीमा राहिलेल्या नाहीत, कुणी जगाच्या पाठीवर कुठेही राहत असला तरी विचारांपासून पैशापर्यंतची सगळी देवाणघेवाण अगदी सहजपणे होत आहे. या जगात अनोळखी, बिनचेहर्याच्या व्यक्तींशी आपण संपर्क करत असतो. त्यामुळे अनेकदा इंटरनेटवर काहीजण चुकीच्या ठिकाणी विश्वास ठेवतात आणि फसतात. याला काही पर्याय नाही का, या प्रश्नाला उत्तर म्हणून अलीकडच्या काळात ‘ब्लॉक चेन’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. हे तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय तर ब्लॉक म्हणजे ठोकळा आणि चेन म्हणजे साखळी… ठोकळे एकमेकांना जोडून ठेवण्याचे तंत्रज्ञान म्हणजे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. या तंत्रज्ञानामुळे व्यवहारामध्ये विश्वास, पारदर्शकता, सुरक्षितपणा, अचूकता निर्माण होते. या तंत्रज्ञानातील काही संकल्पना, काही शब्द यांचे अर्थ समजून घेणे भविष्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे.
ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर…
हे तंत्रज्ञान कसे काम करते, ते एका उदाहरणाच्या माध्यमातून पाहूयात… समजा तुम्ही आजारी पडलात… उपचारासाठी
हॉस्पिटलमध्ये गेलात तर तिथे तुम्हाला तुमच्या आधीच्या आजारांची माहिती ब्लॉक चेनच्या माध्यमातून मिळू शकते. सध्या तुमच्यावर उपचार करणारे डॉक्टर कुठे शिकलेले आहेत, त्यांचे अभ्यासाचे विषय काय होते, त्यांचा अनुभव काय आहे, इथपासून ते तुम्हाला इंजेक्शन देण्यात येणार असेल तर ते कुठे तयार झालेले आहे, त्याबाबत काही तक्रार आहे का, न्यायालयात काही दावा सुरु आहे का, त्यावर कुठे संशोधन झालेले आहे, इथपर्यंतची सगळी माहिती या माध्यमातून तुम्हाला समजू शकते..
आणखी एक उदाहरण पाहूया, तुम्हाला नवी गाडी खरेदी करायची असेल, तर ती गाडी कोणी, कधी तयार केली आहे, तिच्यात वापरलेले महत्वाचे भाग कोठून आलेले आहेत, कारखान्यातून ती कधी बाहेर पडली, तेव्हा वितरण व्यवस्था काय होती, इत्यादी सर्व माहिती या ब्लॉक चेनच्या माध्यमातून अगदी सहजपणे उपलब्ध होते.
‘ब्लॉक चेन’ हे तंत्रज्ञानाचे नाव असून त्यावर आधारित क्रिप्टोकरन्सी म्हणजे बिटकॉइन आहे. ब्लॉक चेन तंत्रज्ञान अनेक ठिकाणी वापरले जाते, तसे क्रिप्टोकरन्सीसाठी सुद्धा वापरले जाते. काही जण बिटकॉइन म्हणजेच ब्लॉक असे समजतात, पण ते चुकीचे आहे.
‘ब्लॉक’ या तंत्रज्ञानामध्ये ब्लॉक कशाला, म्हणतात? जर समजा आनंदने रवीला १०० रुपये दिले असतील तर त्याला आपण नोंद किंवा ट्रान्झॅक्शन असे म्हणू, या नोंदीलाच ब्लॉक असे म्हणतात. ही नोंद तयार झाली की त्यात बदल करता येता कामा नये. ज्या क्रमाने त्या व्यवहाराची नोंद झालेली आहे, त्याच क्रमाने ती राहायला हवी. त्यात तारीख, वेळ, ठिकाण याची देखील नोंद असणे आवश्यक आहे. ही नोंद कोणी केली हे सांगता यायला हवे. यासाठी त्या ब्लॉकमध्ये क्रिप्टोग्राफिक हॅशचा वापर करण्यात येतो. म्हणजे, आनंदने रवीला १०० रुपये दिले हा झाला डेटा. गणिती सूत्र वापरून त्याचे कोडिंग झाले म्हणजे तो कोणीही वाचू शकणार नाही. थोडक्यात काय तर हा डेटा कुणालाही डिक्रीप्ट केल्याखेरीज वाचता येणार नाही. याला म्हणतात इस्क्रीप्शन. प्रत्येक नोंद सांकेतिक भाषेत रूपांतरित करून ती पेटीत बंद करायची. त्याला खासगी आणि सार्वजनिक चावीने ‘हॅश’चे कुलूप लावण्यात येते. हा डेटा इन्क्रिप्ट केल्यानंतर त्याची एक किंमत काढली जाते, त्याला ‘क्रिप्टोग्राफिक हॅश’ असे म्हटले जाते. याचा फायदा असा असतो की त्यामुळे मूळ नोंद केलेल्या मजकुरात कोणताही बदल करता येत नाही. थोडक्यात काय तर ‘ध’चा ‘मा’ करता येत नाही. जर कुणी १०० रुपयांच्या ऐवजी त्यावर एक शून्य टाकले आणि ती रक्कम १००० रुपये केली तर त्याची ‘हॅश व्हॅल्यू’ बदलते, त्यात कोणीतरी बदल केलेला आहे, हे चटकन लक्षात येते. किंमत ‘हॅश व्हॅल्यू’प्रमाणे आहे हे दिसले तर त्यात कुणीही बदल केलेला नाही हे लगेच समजते.
ब्लॉक चेनच्या तंत्रज्ञानात ‘कॉन्सेन्सस मेकॅनिझम’चा वापर करण्यात येतो. हे नाव समजायला जरी किचकट असले तरी त्याचा अर्थ सोपा आहे. बँकेच्या पासबुकावर असलेली नोंद अधिकृत असल्याचे बँक सांगते. आपण पासबुक प्रिंट केले आणि ते बँकेला दाखवले तर ती नोंद अधिकृत धरली जाणार नाही. बँक म्हणेल, आमच्या सर्व्हरवर जी नोंद आहे तीच अधिकृत.
ब्लॉक चेनच्या तंत्रज्ञानात अशा प्रकारचा केंद्रीय सर्व्हर कुठेच नसतो. एकाच ठिकाणी नोंद होत नाही. एका ठिकाणी नोंद असण्याचे काही फायदे आणि काही तोटे आहेत. उदाहरणार्थ माझ्या बँकेच्या सर्व्हरमध्ये कोणी अनधिकृत प्रवेश करून माझ्या खात्यामधील पैशांच्या नोंदीमध्ये काही बदल केला. पासबुकात हा बदल दिसला, त्याची तक्रार बँकेकडे केली तर बँक म्हणेल आमच्या सर्व्हरला असणारीच नोंद खरी आहे. हे चुकीचे झाले ना? असे प्रकार टाळण्यासाठी ब्लॉकचेनच्या तंत्रज्ञानात ‘डिस्ट्रीब्युटेड लेजर’चा वापर करण्यात येतो. त्यात प्रत्येक नोंद अनेक संगणकांवर घेतलेली असते. त्यामुळे त्यात पारदर्शकता असते. हॅकरला देखील एक संगणक हॅक करून त्यात बदल करण्याचा कोणताही फायदा होत नाही. एकावेळी हजारो संगणक हॅक करणे ही गोष्ट तशी खूपच अवघड आहे. प्रत्येक ब्लॉक नोंद ही खरी आहे, अधिकृत आहे, हे कोण आणि कसे ठरवणार? या प्रश्नाचे खरे उत्तर आहे ते म्हणजे ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा गाभा.
एकदा नोंद ब्लॉक तयार झाला की तो तपासण्यासाठी, त्याला व्हॅलिडेट करण्यासाठी कोणाकडे पाठवायचा? तो ब्लॉक कोण आणि कसा तपासणार? यासाठी काही पद्धतींचा वापर केला जातो. त्याला कॉन्सेन्सस मॉडेल असे म्हणतात. त्यामध्ये मुख्यत: प्रूफ ऑफ वर्क आणि प्रूफ ऑफ स्टेक ही मुख्य मॉडेल्स आहेत. त्यामध्ये प्रूफ ऑफ बेनिफिट हे महत्वाचे मॉडेल आहे.
एक ब्लॉक तयार झालेला आहे, त्यामध्ये संजयने विजयला १०० रुपये दिल्याची नोंद तपासण्यासाठी संजयकडे १०० रुपये हवे आहेत. एकदा त्याने १०० रुपये दिले की संजयच्या खात्यातून १०० रुपये कमी होऊन ते विजयच्या खात्यामध्ये जमा झालेले असले पाहिजेत, या नोंदी दोघांनी नाकारल्या नाही तरच त्याची अधिकृत नोंद होईल. ही नोंद तयार झाल्यावर ती अधिकृत करण्यासाठी कुणाकडे पाठवायची हे ठरवणारे बिटकॉइनचे मॉडेल आहे, त्याला ‘प्रूफ ऑफ वर्क’ असे म्हणतात. क्रिप्टोकरन्सी, बिटकॉइनचे व्यवहार तपासले जातात त्याला ‘मायनिंग’ असे देखील संबोधले जाते. कारण जो कोणी हे तपासले त्याला त्याचा मोबदला म्हणून काही बिटकॉइन दिले जातात. यामध्ये प्रूफ ऑफ वर्क करून बिटकॉइन मिळवता येतात. या मॉडेलमध्ये एक गणिती कोडे टाकले जाते, जो कोणी हे कोडे सोडवेल त्याला ब्लॉक तपासून तो खरा आहे, हे सांगण्याचा अधिकार मिळतो. एकदा असा अधिकार मिळाला की बिटकॉइन मिळवण्यासाठी स्पर्धा सुरु होते. प्रत्येकाकडे संगणक आहे, म्हणजे गणिती कोडे सोडवणे सोपे. पण स्पर्धा असल्यामुळे ज्या संगणकाची प्रोसेसिंग पॉवर अधिक आहे तो कमी वेळात कोडे सोडवणार. थोडक्यात तो अधिक ऊर्जा खर्च करून प्रोसेसिंग पॉवर वापरणार त्याला प्रूफ ऑफ वर्क करायची संधी मिळणार. यामध्ये विजेचा वापर अधिक होतो. त्यामुळे आजच्या घटकेला हे मॉडेल आदर्श समजले जात नाही.
ब्लॉक चेनचे फायदे…
या तंत्रज्ञानाचा प्रमुख फायदा आहे तो म्हणजे अचूकता…
ब्लॉकमधील नोंदीची तपासणी अनेकजणांकडून केली जाते, त्याला नोड्स असे म्हणतात. त्यात चुका होत नाहीत. एकाच मशीनवर काम करत असताना त्यात तांत्रिक चुका होऊ शकतात. पण एक नोंद हजार जणांकडून तपासली जाणार असेल तर तिच्यात चुका होण्याचे प्रमाण अगदी अत्यल्प राहते. या तंत्रज्ञानामुळे पारदर्शकता ठेवण्याचा फायदा होतो. बर्याचदा सरकारी कार्यालयातल्या नोंदी आपल्याला समजत नाहीत. कित्येक कॉलेजेस, विद्यापीठे या ठिकाणी बोगस सर्टिफिकेट केल्याचे प्रकार होतात, पण त्याची नोंद कुणी केली हे कुणालाच माहित होत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी पारदर्शकता आणण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते.
या तंत्रज्ञानाचा तिसरा फायदा म्हणजे ब्लॉक चेनमधील सर्व रेकॉर्ड हे विकेंद्रित असल्यामुळे कोणाही एकाची त्यावर मालकी नाही. एकाकडे डेटाची मालकी असली की मग दादागिरी सुरु होते, मी तो देणार नाही, कुणालाही दाखवणार नाही, वगैरे, वगैरे. ब्लॉक चेनमधला डेटामध्ये सर्व्हर हे विकेंद्रित असतात, त्यामुळे जर एखाद्या ठिकाणी हॅकरने अटॅक केला तरी डेटा नष्ट होत नाही. अनेक ठिकाणी हा डेटा सुरक्षित असतो. ब्लॉक चेनवर हॅकर हमला करू शकत नाही, ते तितके सहजशक्य होणारे काम नाही. त्यामुळे त्यामध्ये सुरक्षितता अधिक आहे. विशेष करून विद्यापीठे, महाविद्यालय, सरकारी कार्यालये, निवडणुकीच्या दरम्यान राबवण्यात येणारी मतदान प्रक्रिया यासाठी हे तंत्रज्ञान खूप उपयुक्त ठरू शकते. अलीकडच्या काळात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणार्या काही कंपन्यांनी या तंत्राचा वापर करण्यास सुरवात केली आहे. काळ बदलत जाईल तसतसे सरकारी कार्यालयांत त्याचा वापर मोठ्या प्रमाणात सुरु होईल. ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचे मुख्यतः दोन प्रकार आहेत, एक म्हणजे पब्लिक ब्लॉक चेन आणि दुसरे म्हणजे प्रायव्हेट ब्लॉक चेन.
ब्लॉक चेन तंत्रज्ञानाच्या संदर्भात जर एखादा गुन्हा घडला तर तपासासाठी तो अवघड आहे, असा एक समज आहे. मात्र, तो तितकासा खरा नाही. ब्लॉकचेनबाबतचे गुन्हे तपासत असताना आयपी अॅड्रेस, नोडस्, ब्लॉक ट्रॅकिंग, नेटवर्क ट्रॅफिक, प्रायव्हेट की लोकेशन, वॉलेट, सर्विस प्रोव्हायडर, अससेट्स सीझर, ओपन सोर्स, डार्क नेट, फॉरेन्सिक, यावर लक्ष केंद्रित करावे लागते. ब्लॉक चेनचा डेटा विकेंद्रित स्वरूपाचा असल्यामुळे त्याचे नियमन करणे ही सर्वात कठीण गोष्ट आहे. सध्याच्या परिस्थितीत या तंत्रज्ञानाच्या वापराचा वेग हा तुलनात्मकदृष्ट्या कमी असला तरी त्याचा परिणाम सेवा देण्यावर होत नाही, त्याचा सध्याचा वेग चांगला आहे.