भारतातला विद्वेषांधळा, जातपातग्रस्त आणि मतिभ्रष्ट श्रीमंत आणि मध्यमवर्ग कोणत्याही जातधर्माच्या शोषितांच्या पाठिशी उभा राहणार नाही, याची खात्री भाजपाला आहे, म्हणूनच त्यांची ही हिंमत होते. गोदी मीडियाचा भाग असलेली टाइम्स नाऊची वृत्तनिवेदिका नाविका कुमारी ‘अचानक बुलडोझरांची मागणी का वाढली आहे बै’ असं शेफारलेलं, गलिच्छ ट्वीट करते, तेव्हा त्यांचे व्यवस्थापन तिच्यावर कारवाई करत नाही, तिला भाजपेयी ट्रोलांचा सहर्ष प्रतिसाद मिळतो, हे एका किडलेल्या समाजाचं दर्शन घडवणारं रूप आहे. एका निद्रिस्त ज्वालामुखीच्या तोंडावर आपण उभे आहोत, हे त्यांच्या लक्षात येईल, तेव्हा फार उशीर झाला असेल.
– – –
तारीख होती १६ एप्रिल २०२२… दिल्लीच्या जहांगीरपुरीतून हनुमान जयंतीच्या एकूण तीन मिरवणुका निघाल्या आणि तिसर्या मिरवणुकीच्या वेळी तिथे दंगल झाली. हल्ली या मिरवणुकांना भाजपावाले आणि मराठी भय्ये ‘शोभायात्रा’ म्हणतात. हा हिंदी शब्द. तिथे बरोबर. पण मराठीत शोभा होणे याचा अर्थ फार वेगळा, उलटाच आहे. सरळसोपा मिरवणूक हा शब्द वापरण्याच्या ऐवजी शोभायात्रा हा उलटा शब्द वापरला की आपण संस्कृतप्रचुर होतो आणि तसं झालं की अधिक भारतीय बनतो, अशी काहीतरी गैरसमजूत बळावली आहे सध्या. पण, दिल्लीत आणि इतरत्र भाजपने मिरवणुकांचं जे हिणकस राजकारण सुरू केलेलं आहे, ते पाहता त्यांना ‘शोभायात्रा’च म्हटलं पाहिजे… कारण या विद्वेषभडकाऊ मिरवणुकांमधून सनातन हिंदू धर्माची महती गाजण्याऐवजी या महान धर्माची ‘शोभा’च अधिक केली जाते आहे. महाराष्ट्रातील वारी असेल, गणेशविसर्जन असेल, शिवजयंती असेल किंवा खेडोपाडी निघणारी ग्रामदेवतांची मिरवणूक असेल- त्यांत परंपरागत वाद्यांचा म्हणजेच टाळ, मृदंग, ढोल, ताशे, लेझीम यांचा वापर करत भजन गात, पारंपारिक नृत्ये करत चालणारे शिस्तबद्ध आणि भक्तिरसात उत्साहाने डुंबणारे जनसमुदाय खऱ्या र्थाने सनातन संस्कृतीचे दर्शन घडवत असतात. प्रचंड हाय डेसिबलचे डीजे वाजवत, अचकट विचकट हावभाव करून नाचत, हातात हत्यारं घेऊन प्रक्षोभक घोषणा देत मुस्लिमबहुल भागांमधून दहशत माजवत निघणारी शोभायात्रा धार्मिक असते का? जहांगीरपुरीत जो दंगा झाला त्याला इफ्तारी नमाजाच्या वेळी मशिदीसमोरून जाताना डिवचणारी शोभायात्रा कारण ठरली, असे दिसते. अर्थात, प्रत्येक दंग्यात दोन बाजू असतात. तशा इथेही आहेतच. दोन्ही बाजूंनी अशा प्रकारे बातम्या दिल्या जातात की समोरची बाजूच अस्तित्त्वात नाही. काही बातम्यांनुसार संध्याकाळी सहाच्या सुमारास कुशल रोडवरील मशिदीजवळ ही मिरवणूक आली, तिच्यात प्रचंड मोठ्या आवाजात संगीत वाजवले जात होते. घोषणाबाजी सुरू होती. काही जणांनी मशिदीवर ‘जय श्रीराम’ लिहिलेले भगवे झेंडे लावायचा देखील प्रयत्न केला. दुसर्या बाजूच्या बातम्यांनुसार मशिदीच्या आतील लोकांनी आणि शेजारील मुस्लिम रहिवाशांनी या मिरवणुकीवर दगडांनी हल्ला केला आणि त्यांच्यातीलच कोणीतरी गोळीबार करून एका पोलीसाला जखमी केले. यापैकी नेमकी ठिणगी कुठे पडली, डिवचणारे कोण होते, हे निष्पक्ष तपासणीत समोर येऊ शकते. तशी चौकशी भाजपाच्या राज्यात चुकूनही होणार नाही. या प्रकरणी अटक झालेला अन्सार नावाचा एक आरोपी भाजपाच्या स्थानिक नेत्या संगीता बजाज यांच्याशी संबंधित आहे, असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे तर तो आपचाच कार्यकर्ता आहे असे भाजपाचे म्हणणे आहे. या प्रकरणी आतापर्यंत वीस जणांना अटक झाली असून दोन किशोरवयीन मुले देखील रिमांडमध्ये आहेत असे समजते. दंगा सुरू झाल्यावर दोन्ही गटांनी दगड, विटा आणि काचेच्या बाटल्यांचा मारा केला. गोळीबारही करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ पोलिस कर्मचारी आणि एक नागरिक जखमी झाले आहेत. एका उपनिरीक्षकाला गोळी लागली. कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
डीजे वाजवत मशिदीसमोरून हनुमान जयंतीची शोभायात्रा नेमकी नमाजाच्या वेळीच का नेली जात असेल? तशी परवानगी देण्यात कशी काय आली? यात भाजपा सरकारच्या अखत्यारीतील पोलीस आणि प्रशासन यांचा हेतू आणि भूमिका काय असू शकते? मिरवणुकीला परवानगीच दिली नव्हती, असे आता सांगितले जाते आहे. मग इतक्या मोठ्या बेकायदा मिरवणुकीला पोलीसांनी थोपवणे गरजेचे नव्हते का? तिला पोलीस बंदोबस्त कसा देण्यात आला होता? जहांगीरपुरीमधून सकाळी आणि दुपारी गेल्या पोलीस परवानगीने निघालेल्या मिरवणुका कोणतीही अनुचित घटना न घडता पार पडल्या. तिसरी बेकायदा मिरवणूक ‘शोभायात्रा’ ठरली, हा योगायोग निश्चित नसावा. तिचे आयोजक कोण होते हेही केंद्रीय गृहखात्याच्या अखत्यारीत असलेल्या पोलिस खात्याला शोधून का काढता आलेले नाही? दिल्लीत मशिदीसमोर प्रक्षोभक घोषणांची आणि महाराष्ट्रात हनुमान चालिसाची भोंगेबाजी करणारे एकाच जातकुळीतले, एकाच गोत्रातले आहेत. भिन्नधर्मीय प्रार्थनास्थळाजवळून मुद्दाम मिरवणूक नेणे, डीजेबाजी करणे, झेंडे लावण्याचा प्रयत्न करणे, ही धार्मिक कृत्ये नाहीत, कोणताही सच्चा धार्मिक आपल्या धर्माइतकाच परधर्माचाही आदर करतो, याचे स्ार्वोच्च उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने आपल्याकडेच होऊन गेले आहे. जाणीवपूर्वक दुसर्या धर्माला खिजवायला जाणारे धार्मिक नसतात तर गुण्यागोविंदाने राहणार्या समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा हेतू बाळगणारे समाजकंटक असतात आणि ते बहुतेक वेळा कोणाच्या तरी राजकीय स्वार्थापोटी खेळवले जात असतात, याचा आपल्या भाबड्या जनतेला सतत कसा विसर पडतो? यात शेवटी नुकसान हे सर्वसामान्यांचेच होते. चिथावण्या देणार्यांची मुले परदेशांत शिकतात, पाकिस्तानी भागीदारांबरोबर व्यवसाय करतात आणि अरब शेखांच्या गळाभेटी घेतात, हे विसरतात कसे सामान्य लोक?
मशिदीसमोर भोंगेबाजी करणार्यांनी सनातन धर्म आणि त्याचे प्रतीक असलेला भगवा संकुचित करू नये. त्यांनी कधीतरी अजमेरच्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्तींच्या दर्ग्याला आवर्जून भेट द्यावी. तिथे बरेच सुफी खिदमतगार भगवी वस्त्रे घालून खिदमत करताना दिसतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच भगव्या रंगाची चादर त्या दर्ग्यावर चढवली आणि त्यावरल कोणताच विवाद झालेला नाही. उलट या देशाच्या पंतप्रधानाने चढवलेली चादर कोणत्याही रंगाची असली तरी तिचा आदर ठेवला गेला पाहिजे हे तत्व तिथे पाळले गेले. भाजपाने ही घटना इतक्यातच विसरावी? नवरात्रीतील देवीला आवर्जून हिरवा शालू नेसवला जातो की! लग्नात बायका हिरवा शालू नेसतातच. मराठी माणसाचे हिंदुत्व व्यापक आणि वैविध्यपूर्ण आहे. ते ज्योतिबाचे, जेजुरीच्या खंडेरायाचे, एकविरा आईचा जयजयकार करणारे आहे. हनुमान चालिसा हे महाराष्ट्राच्या भाविकांचे स्तोत्र नाही कारण इथे भीमरूपी महारूद्रा वङ्काहनुमान मारुती.. म्हणत लोक लहानाचे मोठे झाले आहेत आणि हेच मारूतीरायाची वंदना करायचे मराठी माणसाचे स्तोत्र आहे. धर्म आणि त्याचे आचरण व रक्षा करणे इथल्या हिंदूंना व्यवस्थित कळते. त्यासाठी भाडोत्री राजकीय भोंग्यांच्या बाटगा फोर्सची (हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांनी वापरलेला चपखल शब्द) गरज नाही.
कोणत्याही जातीय दंग्यानंतर तिथले वातावरण पूर्ण निवळू देणे, जातीय सलोखा निर्माण करणे हेच प्रशासन आणि पोलिस यांचे संविधानिक कर्तव्य आहे. दंगलीनंतर वातावरण प्रक्षोभक करणार्या कोणत्याच गोष्टींना पोलीस परवानगी देत नाहीत. धार्मिक दंगे बघता बघता देशभर पसरू शकतात, हे या देशाने आजवर अनुभवलेले आहे. पण केंद्रसत्तेचा तोच कुहेतू असेल तर? जहांगीरपुरी दंगलीनंतर निव्वळ चार दिवसांत जिथे दंगल झाली त्या रस्त्यांवरच्या बहुश: मुस्लिम समाजाच्या गरीब दुकानदारांवर बुलडोझर कारवाई केली गेली. हा उत्तर प्रदेशाचे बाहुबली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून आलेला बुलडोझर पॅटर्न आहे. सब का साथ, सब का विकास म्हणता म्हणता कुछ का विकास, बाकी भकास करण्यासाठी आदित्यनाथ बेकायदा बुलडोझरबाजी करतात. त्यांच्या पक्षाचे चिन्ह कमळ आहे की बुलडोझर हे कळू नये, अशा प्रकारे त्यांनी गेल्या निवडणुकांमध्ये बुलडोझर प्रचारात वापरले होते. गोरगरिबांची घरे, दुकाने उद्ध्वस्त करणारे एक राक्षसी यंत्र या पक्षाला मिरवावेसे वाटते आहे, ही भविष्याची अनिष्टसूचक नांदी आहे.
या रहिवाशांवर दंगलींमध्ये भाग घेतल्याचा परस्पर आरोप ठेवून त्यांना कायद्याच्या कक्षेबाहेर जाऊन ‘शिक्षा’ देण्यासाठी हे बुलडोझर कांड घडवण्यात आले. असल्या कारवाया करण्याआधी नोटीस द्यायला लागते, परवानग्या घ्याव्या लागतात, अतिक्रमणविरोधी कारवाई असल्याचा बनाव रचून आकसाने बुलडोझर चालवण्याची घाई तिथल्या महानगरपालिकेला का झाली? पोलीसांनी याला परवानगी का दिली? या कारवाईतून धार्मिक ध्रुवीकरण करून महानगरपालिका निवडणुकीत मताची पुरणपोळी कोणाला भाजायची होती? या प्रकरणी जमियत उलमा ए हिंद या संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने या कारवाईला स्थगिती दिली. कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात यांनी प्रशासनाला आदेशाची प्रत दाखवल्यानंतरही उद्दाम प्रशासनाने पुढील दीड तास कारवाई करून काही दुकानं उद्ध्वस्त केली. ही क्रूर, अमानुष हिंमत कुठून येते? हा भाजपाचा न्यायपालिकेला आव्हान देण्याचा, लोकशाहीचा तो स्तंभ ढासळवण्याचा प्रयत्न आहे. कारण, अलाहाबाद हायकोर्टाचा स्थगिती आदेश आल्यावर देखील गेल्या वर्षी मे महिन्यात उत्तर प्रदेशातील बाराबांकीमधील मशिद पाडली गेली. कर्नाटकातील कोलारमध्ये स्थगिती आदेश झुगारून फेब्रुवारी २०२२ला येशू ख्रिस्ताचा पुतळा पाडला गेला. जहांगीरपुरीत तर थेट सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली गेली. महाराष्ट्रात केंद्रीय मंत्र्याच्या अलिशान घरावर, नटव्या नटीच्या ऑफिसवर टाच आली तर हळहळणारे हे धर्मांध जीव गरीबांचे हाल पाहून कसे द्रवत नाहीत?
भारतातला विद्वेषांधळा, जातपातग्रस्त आणि मतिभ्रष्ट श्रीमंत आणि मध्यमवर्ग कोणत्याही जातधर्माच्या शोषितांच्या पाठिशी उभा राहणार नाही, याची खात्री भाजपाला आहे, म्हणूनच त्यांची ही हिंमत होते. गोदी मीडियाचा भाग असलेली टाइम्स नाऊची वृत्तनिवेदिका नाविका कुमारी ‘अचानक बुलडोझरांची मागणी का वाढली आहे बै’ असं शेफारलेलं, गलिच्छ ट्वीट करते, तेव्हा त्यांचे व्यवस्थापन तिच्यावर कारवाई करत नाही, तिला भाजपेयी ट्रोलांचा सहर्ष प्रतिसाद मिळतो, हे एका किडलेल्या समाजाचं दर्शन घडवणारं रूप आहे. एका निद्रिस्त ज्वालामुखीच्या तोंडावर आपण उभे आहोत, हे त्यांच्या लक्षात येईल, तेव्हा फार उशीर झाला असेल.
जहांगीरपुरीतले इतके लहान सहान स्टॉल हटवायला बुलडोझर का नेला असा खडा सवाल सर्वोच्च केला आहे. वृंदा करात जहांगीरपुरीत बुलडोझरसमोर उभ्या ठाकल्या, त्याची सोशल मिडियात चर्चा झाली आणि मग गोदी मिडियालाही ते नाईलाजाने का होईना पुढे आणावे लागले. लोकसभेत तीनशेपार नव्हे सर्व खासदार भाजपाचे आले तरी सुप्रीम कोर्टाचा आदर राखणे त्यांचे संविधानिक कर्तव्य आहे. इथे एक फुटकळ महानगरपालिका सर्वोच्च न्यायालयाला जुमानत नाही, हे काय आहे? भाजपाच्या दिल्लीपासून गल्लीबोळापर्यंतच्या सोम्यागोम्यांना आजकाल सत्तेचा आणि बहुमताचा अहंकार आलेला आहे. कायद्याला आणि पोलिसांच्या वर्दीला देखील ते जुमानत नाहीत. बेकायदा कृत्यांसाठी जामीनावर हिंडणार्या सोम्यागोम्यांना वाय सुरक्षा आणि चीनची सीमा मात्र सुरक्षेविना हा भाजपाचा खरा चेहरा आहे.
‘आपण कितीही कायदे मोड़ले तरी भाई आपल्याला सोडवेल,’ अशा अर्थाची वाक्ये पूर्वी हिंदी चित्रपटातील स्मगलरांच्या बगलबच्च्यांच्या तोंडात असायची. आज ती यांच्या तोंडी आहे. यांनी स्वतःसोबत देशाला देखील रसातळाला न्यायची जय्यत तयारी केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर चालणारा बुलडोझर निव्वळ गरीब दुकानदार आणि टपरीवाल्यांवर चालवला जात नसतो, तर तो महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या उत्तुंग आणि अभेद्य इमारतीवर चालवला जात असतो. तो एका हुकूमशहाने लोकशाहीवर चालवलेला बुलडोझर असतो, धनदांडग्यांनी गरीबांवर आणि धर्मांधांनी भारताच्या धार्मिक एकात्मतेवर चालवलेला बुलडोझर असतो. बुलडोझर वापरून विकासाचा हमरस्ता बनवण्याची यांची योग्यता नाही, बुलडोझर वापरून महागाईचा डोंगर देखील फोडता येत नाही; येते ती विरोधकांवर बुलडोझर चालवणार्या दडपशाहीची आणि हुकूमशाहीची भाषा.
दिल्लीतील २४ टक्के भागालाच सर्व नागरी सुविधा मिळतात. तब्बल ७६ टक्के दिल्लीकर १७०० हून अधिक बेकायदा कॉलन्यांमधून राहतात. इथे कोणत्याच पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. आज या कॉलन्यांना अधिकृत करण्यासाठी प्रधानमंत्री उदय योजना नावाची नामुष्की आणणारी योजना आणावी लागली आहे. दिल्लीतील तब्बल ६४ खाजगी शाळांमध्ये अनधिकृत बांधकामे आहेत. दिल्लीतील धनदांडग्यांच्या बंगल्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम केले गेले आहे. तिथे यांचा बुलडोझर चालत नाही. आम्ही वाटेल तो नंगानाच केला तरी तुम्ही तो सहन करायचा, ‘अरे ला का रे’ कराल तर घरादारावर नांगर फिरवू, असाच या बुलडोझरबाजीचा स्पष्ट अर्थ आहे. आता जनतेने बुलडोझर चालवून भारतभूच्या छातीवर उभारलेले हे हिडीस बेकायदा बांधकाम आणि भारताच्या एकात्मतेवरचे, सलोख्यावरचे हे अतिक्रमण पाडून टाकले पाहिजे.