किरीट प्रगट झाल्यावर कावळ्या सकाळी सकाळीच पेढे घेऊन आला. म्हणाला, बरं झालं प्रगट झाला तो. नाहीतर माझी खैर नव्हती. मी जरी ईडीच्या कार्यालयात काम करीत असलो तरी आमचीही काही जबाबदारी असतेच ना. त्यात हे किरीटजी सदासर्वदा कार्यालयात ठिय्या मारूनच असतात. दिवसातून किती वेळा तिथे टपकतील याचा पत्ता नसतो. त्यामुळे आम्हाला नेहमीच अॅलर्ट राहावं लागतं. तसा काल त्यांचा मला फोन आला होता. त्यांना मी त्यांच्याशी खूप प्रामाणिक वाटतो. त्यांच्या बर्याच आतल्या गोष्टी मला माहीत असल्याचे त्यांना ठाऊक असल्यामुळे तसे मला वचकूनच असतात. त्यामुळे त्यांची दादागिरी ऑफिसात इतर अधिकार्यांवर जशी चालते तशी माझ्यावर चालत नाही. त्यामुळे मी कधीही कुठेही कितीही वेळ राहू शकतो. किरीटजींच्या नावावर काय वाटेल त्या थापा मारून गुल होऊ शकतो. म्हणूनच किरीटजी गायब झाल्यावर मला त्यांचा ठावठिकाणा नक्की माहीत असणार याची खात्री इतर ईडीवाल्यांना होती. अनेकांनी कुणाला सांगणार नाही असे शपथेवर सांगून मला त्यांचा ठावठिकाणा विचारला. पण मला तर तो ठाऊकच नव्हता तर मी तरी कुठून सांगणार! शेवटी किरीटजींच्या प्रगटदिनाच्या आदल्या दिवशी त्यांचा त्यांच्या खास बोबडकांदा बोलीत फोन आला आणि माझा जीव भांड्यात पडला.
काय बोलले ते फोनवर, असं मी विचारल्यावर कावळ्या सुरू झाला. म्हणाला, ते खूप टेन्शनमध्ये होते. मला म्हणाले, कावळेदादा, कुणाला सांगू नकोस. पण मी खूप टेन्शनमध्ये आहे. पोलिसांनी नोटीस बजावल्यामुळे उद्या प्रगट होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मी कुठेही मुंबईबाहेर गेलो नाही. माझा घाटकोपरचा मित्र ढोलकिया याच्या घरी होतो. असे काही आरोप होतील याची मला अजिबात कल्पना नव्हती. मी ती जमवलेली रक्कम विसरूनही गेलो होतो. कारण आपले खेळते भांडवलच इतके आहे की त्याच्या किती खेळपट्ट्यांचा व्यवहार मी लक्षात ठेवणार? त्यात हा विक्रांत घोटाळा तर एखाद्या शत्रूसारखा मानगुटीवर बसला. त्यातून सहीसलामत बाहेर पडताना खरोखरच माझी वाट लागणार आहे. माझा मित्र ढोलकिया सुद्धा मला म्हणाला की किरीट, तू या पैसे जमवण्याच्या भानगडीत पडायला नको होतं. आता ढोलकियाला राजकारणातलं काय समजतं? पण एक मात्र खरं, यामागे आमच्याच पक्षातल्या कुणातरी बड्या नेत्याचा हात आहे. ज्यांना मला पक्षात संपवायचं आहे असा महाराष्ट्रातील पक्षाचा एक नेता नक्की माझी असलेली नसलेली लफडी आणि त्यांची साग्रसंगीत माहिती आता माझ्या चमकोगिरीवर उठलेल्यांना पुरवत असतो. त्याशिवाय इतक्या वर्षांनी काळाच्या उदरात गडप झालेल्या विक्रांतसाठी जमवलेल्या निधीच्या घोटाळ्याची माहिती एकदम चव्हाट्यावर आलीच कशी? मला राजकीय जीवनातून संपवण्याचा हा महाराष्ट्रातील एका भाजपच्या बड्या नेत्याचा डाव आहे. माझी राजकीय जीवनातील पातळी खालावण्यात याच नेत्याचा हात होता. हे जसे माझ्या दिल्लीतील लाडक्या नेत्यांच्या लक्षात आले तसे त्यांनी माझी ती पातळी उंचावण्यासाठी मला ईडीत प्रतिष्ठेचे स्थान दिले. मोदी-शहांनी माझ्या डोक्यावर वरदहस्त ठेवला आणि मला महाराष्ट्रात मोकाट सुटण्यास ईडीचे मोकळे रान दिले. आज ते नसते तर या महाराष्ट्रातल्या त्या नेत्याने मला पार संपवून टाकला असता. आज मला सगळ्या पक्षातील कितीतरी मोठे नेते टरकून असतात, ते मोदी शहांनी केलेल्या माझ्यावरील कृपेमुळे. त्यामुळे पक्षातील जो तो माझ्याशी अदबीने वागतो, मला सलाम करतो. पूर्वी जे मला पाण्यात पाहायचे ते मला पाहिल्यावर माना खाली झुकवतात. याला कारण केवळ माझ्याकडे असलेली ईडीची पॉवर. कावळेजी, तुम्हाला माहीत आहे की राजकारणात असल्यावर काही घोटाळे करण्याशिवाय पर्याय नसतो. शेवटी पैसा बोलता है. तरीही आपले ठेवावे झाकून, दुसर्याचे पाहावे वाकून हे करावेच लागते. आता तुम्ही म्हणाल, मी लपून राहून काय करत होतो. तर तसे मी काहीच करत नव्हतो. पण तरीही शेवटी हा घोटाळा कसा लपवावा याबाबत नवे नवे पर्याय शोधण्याचा अभ्यास करत होतो.
परवा ढोलकिया म्हणाला, किरीटजी कोर्टात तुमच्यावरील आरोप सिद्ध झाले तर तुम्हाला जेलमध्ये जावे लागेल का? गेलात तर आमचेसुद्धा कमावण्याचे वांदेच होतील की. आज तुमच्यामुळेच आम्हाला घरबसल्या कमावण्याचे नवनवीन मार्ग बघायला मिळाले. हरामाची कमाई का असेना, पण आज बक्कळ पैसा जमा झाला आहे. तसे तुम्ही तुमच्या प्रत्येक मित्राचे भले केलेय. ढोलकियाच्या या बोलण्यामुळे माझा कंठ दाटून आला, पण या विक्रांत निधीच्या लफड्यामुळे आधीच खरवडल्यासारखा झालेला घसा अधिकच बसत चालला आहे. तरीही कावळेजी तुम्हाला सांगतो, खोटे बोला पण रेटून बोला हे तंत्र वापरले ना तर आपण बाजी मारू शकतो. मी या तंत्राचा खूप खोलात जाऊन अभ्यास केला आहे. हिटलर-गोबेल्सपासून आमच्यातील काही फेकाड्या नेत्यांपर्यंत प्रत्येकाची थापा मारण्याची आणि खोट्याचे खरे असल्याचे बढाई मारून सांगण्याची शैली मी आत्मसात केली आहे. या बाबतीत गोबेल्स हा माझा आदर्श आहे. पण आता बाजी माझ्यावरच उलटल्यावर माझी आवाजीच बंद झाली आहे. ती हळूहळू उघडावी लागणार आहे.
ईडीपुढे गेल्यावर प्रत्येकजण कसे आपण निर्दोष असल्याचे सांगतो, तशीच पाळी दैवाने आता माझ्यावर आणलीय. पण मी घाबरत नाही. कर नाही त्याला डर कशाला, असं मी म्हणणार नाही. कारण मला तर आता दरदरून घाम फुटला आहे. जनतेला शेंड्या लावणे सोपे असते, पण माझ्या वैयक्तिक विरोधकांना तोंड देणे किती कठीण असते हे मला मी प्रगट झाल्यावर अनुभवायला मिळणार आहे. कोर्टानेही अगदी बिनशर्त जामीन दिलेला नाही. कुठेतरी माझ्याभोवती संशयाची सुई तरंगत ठेवली आहे. त्याचीच मला भीती वाटते. आता लोक माझ्याकडे संशयाने पाहतील. मी निर्दोष आहे हे सांगण्याचा आटोकाट प्रयत्न केला तरी कुणी विश्वास ठेवणार नाही. तरीही आत्मविश्वास ढळू देता कामा नये. विक्रांत निधी घोटाळ्यावरून जनतेचे लक्ष उडवण्यासाठी आता काहीतरी नवीन फंडा शोधून काढण्याची गरज आहे. असो. प्रगट झाल्यावर ईडीच्या ऑफिसात भेटूच… किरीटजींनी फोन ठेवल्यावर मला मात्र त्यांचा घाबरलेला चेहरा बराच वेळ डोळ्यांसमोर दिसत होता.