पण एका क्षणी असे वाटले की आपण किती काळ नोकरी करत राहायचे, आपले स्वतःचे काहीतरी करायला हवे, छोटा का होईना पण आपला व्यवसाय हवा, डोक्यात या विचाराने घर केले होते. आपल्याला कोणता व्यवसाय करता येऊ शकेल, याचा अभ्यास सुरु केला. आपण असा व्यवसाय करायचा की त्यामध्ये आव्हाने असतील, कागदपत्रांचे ज्ञान असणे आवश्यक असेल, अशा गोष्टींचा त्यामध्ये समावेश असेल. कमीतकमी गुंतवणूक असेल आणि त्यामध्ये बर्यापैकी रिटर्न मिळतील, असा व्यवसाय करण्याचे निश्चित करत असताना रिअल इस्टेट ब्रोकरचा व्यवसाय सापडला.
– – –
आपण उत्तम शिक्षक व्हावे, मुलांना घडवावे, या क्षेत्रात नवनवीन संशोधन करावे, अशी एक नाही तर अनेक स्वप्ने पहिली होती. शिक्षकी पेशा स्वीकारण्यासाठी आवश्यक असणारे शिक्षण पण पुण्यासारख्या शहरात येऊन जिद्दीने पूर्ण केले, त्यानंतर शिक्षकाची नोकरी मिळवण्याचा खूप प्रयत्न केला खरा, पण मनासारखे झाले नाही. कदाचित नियतीला ते मान्य नसावे. आता काय करायचे हा विचार डोक्यात आला तेव्हा, आपण जोखीम असणारा जरा हटके व्यवसाय करायचा निश्चय केला, त्याचा थोडा अनुभव एका ठिकाणी नोकरी करताना आला होता. त्यामुळे २२ मार्च २०१७ रोजी डेक्कन जिमखाना, भांडारकर रोड या पुण्यातल्या पॉश भागात जुन्या-नव्या घरांची खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय करण्यासाठी फिनिक्स प्रॉपर्टीज नावाची फर्म सुरु करत व्यवसायाच्या क्षेत्रात पहिले पाऊल टाकले. नोकरापेक्षा व्यवसाय करणे किती चॅलेंजिग असते याचा अनुभव घेता घेता पाच वर्ष उलटून गेली. शिक्षण घेताना असे काही घडू शकेल याचा विचारही मी केला नव्हता. ध्यानीमनी नसताना सुरु झालेला हा व्यवसाय आज चांगला नावारूपाला आला आहे.
शिक्षक व्हायचे स्वप्न…
अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यामधील भानगावमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केले, त्यानंतर श्रीगोंद्यातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयातून बी.ए (इंग्रजी)चे शिक्षण २०१०मध्ये पूर्ण केले, तेव्हा शिक्षकच व्हायचे ठरवले होते. माझ्या आईची पण हीच इच्छा होती, म्हणून पुढचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी एज्युकेशन हब असणार्या पुण्यात माझा मोर्चा दाखल झाला. अरण्येश्वरच्या अध्यापक महाविद्यालयातून बी.एडचे शिक्षण पूर्ण केले, तेव्हा शिक्षक म्हणून नोकरी करण्यासाठी टी.ई.टी. परीक्षा पात्र असण्याचा निकष सरकारने बंधनकारक केला होता. ती परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर राज्यातील सरकार बदलले. नव्या सरकारने शिक्षक होण्यासाठी अभियोग्यता चाचणीची अट निश्चित केली. ती यशस्वीपणे पूर्ण केली. त्यानंतर पुणे, श्रीगोंदा या भागातील काही खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये नोकरीच्या ऑफर येत होत्या. पण तिथे किती पैसे मिळणार, उदरनिर्वाह कसा चालणार, असे अनेक प्रश्न समोर अगदी आ वासून उभे होते. त्यामुळे थोडे फ्रस्ट्रेशन देखील आले होते. २०१३मध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली खरी. पण आर्थिक घडी पूर्णपणे बिनसलेली होती. आई अंगणवाडी सेविका म्हणून काम करत होती, तिच्याकडून मिळणार्या पैशावर मला पुण्यात राहणे शक्य नव्हते. पुण्यात सदाशिव पेठेत भाड्याने राहात असताना महिन्याला पाच ते सहा हजार रुपये खर्चासाठी लागत असत.
आर्थिक परिस्थिती कठीण असल्यामुळे स्पर्धा परीक्षेचा उपक्रम सोडून द्यावा लागला आणि खासगी ठिकाणी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. बांधकाम क्षेत्राशी संबधित फर्ममध्ये नोकरी सुरु केली. तिथे सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होतो, त्यामुळे बाहेर भरपूर भ्रमंती व्हायची, लोकांना भेटायला मिळायचे. त्यातून नवीन अनुभव मिळायचे. त्या फर्ममध्ये दोन वर्षे काम करत असताना प्रमोशन मिळाले. कामाचा आनंद मिळाला. पण एका क्षणी असे वाटले की आपण किती काळ नोकरी करत राहायचे? आपले स्वतःचे काहीतरी करायला हवे, छोटा का होईना पण आपला व्यवसाय हवा.
डोक्यात या विचाराने घर केले होते. कोणता व्यवसाय करता येऊ शकेल, याचा अभ्यास सुरु केला. आपण असा व्यवसाय करायचा की त्यामध्ये आव्हाने असतील, कागदपत्रांचे ज्ञान असणे आवश्यक असेल, अशा गोष्टींचा त्यामध्ये समावेश असेल. कमीत कमी गुंतवणूक असेल आणि त्यामध्ये बर्यापैकी रिटर्न मिळतील, असा व्यवसाय करण्याचे निश्चित करत असताना रिअल इस्टेट ब्रोकरचा व्यवसाय सापडला.
भाड्याच्या जागेत सुरु झाला व्यवसाय
२२ मार्च २०१७ रोजी प्रभात रोडवरील नवव्या गल्लीत भाड्याच्या जागेत या व्यवसायाची सुरुवात झाली. आपण फक्त डेक्कन जिमखाना, भांडारकर रोड, प्रभात रोड, लॉ कॉलेज रोड, या भागातील नव्या जुन्या घरांची खरेदी विक्री, भाड्याने देणे-घेणे करण्याचे ठरवले. व्यवहार पूर्ण होईपर्यंत आपण ग्राहकांच्या बरोबर राहायचे, काही अडचणी आल्या तर त्या स्वतः सोडवायच्या, हे तत्व व्यवसायाच्या पहिल्या दिवशी पक्के केले होते. त्यामुळे अगदी थोड्या काळात अनेक लोक आमच्याशी जोडले गेले. काही कटू अनुभव देखील आले. धमक्यांना तोंड द्यावे लागले. पण काहीही झाले तरी गांधीवादी विचारानेच काम करायचे हे तत्व पक्के केले होते. त्यामुळे असे प्रसंग अनेकदा आले, पण त्याचा व्यवसायावर काही परिणाम झाला नाही. आतापर्यंतच्या प्रवासामध्ये चांगले लोकही खूप भेटले. सरकारी अधिकारी, डॉक्टर, व्यावसायिक, प्राध्यापक, शिक्षक, उद्योगपती, अशी कितीतरी नावे सांगता येतील. घर किती महत्त्वाचं असतं हे लक्षात घेऊन काही ठिकाणी मी व्यवहार बाजूला ठेवून त्यांना मदत केली, अशा मंडळींचे आशीर्वाद मिळाल्यामुळेच व्यवसाय उभा राहण्यास मदत मिळत गेली.
असा एक प्रसंग
एकदा ऑफिसात बसलेलो असताना ७०-७५ वय असणारे गृहस्थ आले. मला तुमच्याकडे काही काम मिळू शकेल का? मी खूप अडचणीत आहे, असं म्हणाले. त्यांची मन:स्थिती पाहून त्याना काम दिले. ग्राहकांना घर, ऑफिस दाखवण्याचे काम त्या गृहस्थांनी अगदी आनंदाने केले. मी शिक्षक असतो, तर अशा गरजू व्यक्तींना मदत करण्याची संधी मिळाली नसती, ती या व्यवसायामुळे मिळाली.
घरातून होता विरोध… पण
मुलाने शिक्षकी पेशा निवडला आहे, त्यामुळे तीच सरकारी नोकरी करावी, अशी आईची पहिल्यापासून भूमिका होती. त्यामुळे मी घरातून व्यवसाय सुरु केला तेव्हा घरातून विरोध होता. पण व्यवसाय केला नाही तर आपली सुधारणा, विकास होणार नाही, यावर माझा ठाम विश्वास होता. शैक्षणिक पात्रता असताना देखील मनासारखी नोकरी मिळत नाही, यावर चर्चा करत बसण्यापेक्षा दोन पावले पुढे टाकून घेतलेला व्यवसाय करण्याचा निर्णय हा फायदेशीर ठरला आहे.
व्यवसायाची तत्त्वे
हातात येणारी प्रॉपर्टीची कागदपत्रे क्लिअर आहेत की नाहीत, याची खातरजमा होत नाही, तोपर्यंत ती प्रॉपर्टी कोणाही क्लाएन्टला दाखवायची नाही. व्यवहार करत असताना आपल्याला दोन पैसे कमी मिळाले तरी चालेल पण कुणाला फसवायचे नाही. घराची विक्री करणारे आणि घर खरेदी करणारे यांच्यामधील व्यवहार निश्चित करणे, या दोघांबरोबर समोरासमोर बसून चर्चा करणे, त्यामुळे प्रत्येक व्यवहार हा पारदर्शीपणे होतो, याचा या दोघांना फायदा होतो. आमच्या याच तत्वामुळे आमच्या व्यवसायाची माऊथ टू माऊथ प्रसिद्धी झाली आहे, त्या माध्यमातून चांगले ग्राहक आमच्याकडे जोडले गेलेले आहेत.
१०० व्यवसायांचा अभ्यास
रियल इस्टेटच्या व्यवसायात उतरण्याआधी सुमारे १०० वेगवेगळ्या व्यवसायांचा अभ्यास मी केला होता. त्यामध्ये बंद बाटलीतून होणार्या पाण्याच्या विक्रीपासून ते फिश फार्मिंग, कुक्कुटपालन, डेअरी फार्मिंग अशा व्यवसायांचा समावेश होता. महिनाभर मी हा सारा अभ्यास करत होतो. अखेरीस या व्यवसायाची निवड केली. सध्या यामध्ये देखील खूप स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा आधार घेत आम्ही व्यवसायात बदल केले आहेत. पोर्टलच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपर्यात पोचलो आहोत. विदेशात असणार्या कुणाला जुने-नवे घर खरेदी करायचे असेल तर ते आमच्याशी संपर्क साधतात. खासकरून अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुबई, सिंगापूर, व्हिएतनाम या भागातील मंडळींनी संपर्क केलेला आहे.
शब्दांकन – सुधीर साबळे