माझे दोन प्रश्न आहेत…
१. चाय पे चर्चा होते, परीक्षा पे चर्चा होते, मग महागाई पे चर्चा कधी होणार?
२. आपला देश आनंदी का नाही?
– अशोक परशुराम परब, ठाणे
१. परीक्षेचा शीण चहा पिऊन घालवल्यावर..
२. अहो, कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका, असं सांगितल्यावर आनंद कुठून मिळणार हो…
ईडीचा अधिकारी कसा दिसतो, हे पाहण्याची माझी फार इच्छा आहे. ते माझ्या घरी यावेत, यासाठी काय करावे?
– सीताराम कांबळे, बारामती
आ बैल मुझे मार… वा… ज्यांच्या घरी ईडी पोचलंय त्यांना विचारा…
उन्हाळ्याच्या काहिलीने त्रस्त झालो आहे. बियर परवडत नाही. थंडाव्यासाठी काय करू?
– अनिकेत मुळ्ये, बदलापूर
बिअरच्या बाटलीत कोकम सरबत भरून प्रिâजमध्ये ठेवा… पाहा तोच आनंद मिळेल.
बायको सतत माहेरी जाण्याची धमकी देते, पण जात कधीच नाही. अशी सारखी आशा लावून अपेक्षाभंग करणं योग्य आहे का?
– प्रद्युम्न काकतकर, बेळगाव
फसवणुकीचा खटला भरा… मी येतो साक्षीदार म्हणून!
जीवनात यशस्वी होण्यासाठी माणसात जो असायलाच हवा असा एक गुण कोणता?
– मंदार शारंगपाणी, दादर
निर्लज्जपणा
माझ्या भाच्याला नाटक-सिनेमा-टीव्हीच्या ग्लॅमरने वेडे केले आहे, पण त्याला त्यासाठी काय गुण असावे लागतात, काय मेहनत घ्यावी लागते, याची कल्पना नाही. त्याला ताळ्यावर आणण्यासाठी काय करू?
– नमिता झरेकर, सांगली
जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे… काहीही उपयोग नाही… कितीही काहीही करा… तो त्याच मार्गाने जाणार…
अडाणी माणसाला सरसकट गावंढळ म्हटलं जातं, असं हिणवायला शहरी माणसं सरसकट हुशार असतात का हो?
– इम्रान शेख, हातकणंगले
छे हो… हुशार कसली, सुविधांनी बरबटलेली आगाऊ मात्र असतात.
मला काही केल्या सकाळी जाग येत नाही. माझा दिवस दुपारी १२ला सुरू होतो. पण, मला आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे. मी काय करू?
– विलास नाचणे, सोलापूर
काम काय करता यावर किती वाजता उठता हे अवलंबून आहे… दुधाचा धंदा असेल तर पहाटे ४ वाजताच उठावं लागेल ना..??
मराठी नाटकाने मनोरंजन करायचे म्हणजे फक्त विनोदी नाटकेच रंगभूमीवर आणायची का? गंभीर नाटकांचा प्रेक्षक हरवला आहे का?
– प्रीती खानोलकर, तळेगाव
असं नाहीयेय… काय दर्जाचं नाटक करता यावर अवलंबून आहे… सगळीच विनोदी नाटकं चालली पाहिजेत मग…
खेकड्यासारखी तिरकस चाल असं आपण म्हणतो.खेकड्याला त्याची चाल सरळ आणि माणसाची चाल तिरकी वाटत नसेल का?
– सुनंदन नेने, मुगभाट, गिरगाव
पण त्यांचा असा वाक्प्रचार नाहीयेय ना ‘अमुक अमुक खेकड्याची चाल माणसासारखी सरळ आहे हं.’
‘पिंजरा’ सिनेमाला ५० वर्षं पूर्ण झाली नुकतीच. त्यातल्या संध्याबाई तमासगीर वाटल्या का हो तुम्हाला? त्यांच्या नृत्याबद्दल तुमचं मत काय? या सिनेमाच्या रिमेकमध्ये तुम्हाला मास्तर बनवलं तर तमासगीर बाईंच्या भूमिकेत कोण शोभेल?
– अल्पना पल्लेवार, सोलापूर
पहिला प्रश्न असा विचारावासा वाटला यातच तुमचं उत्तरही दडलेलं आहे… दुसरा प्रश्न- अमृता खानविलकर
शहाण्याला शब्दाचा मार असं म्हणतात, पण जगात शहाण्यांची संख्या खूपच कमी आहे. हे पाहता तुम्ही दीडशहाण्यांना कशाचा मार द्याल?
– नरेंद्र राणे, बेलापूर
छडीचा… किंवा शिव्यांचा
माझी राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा आहे. कोणत्या वयात राजकारणात उतरणे योग्य राहील?
– गौरीशंकर टाचले
ताबडतोब… वयाचा विचार करू नको… ते वाढेल हळूहळू