हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांनी हे मार्मिक व्यंगचित्र रेखाटलं तेव्हा भारतीय क्रिकेटपटूंना थोडी फार प्रसिद्धी मिळू लागली होती, ग्लॅमर मिळू लागलं होतं, पण क्रिकेटमधून फार मोठी कमाई नव्हती, जेमतेम उच्च मध्यमवर्गीय बनण्यापर्यंतच त्यांची मजल होती- अर्थात तीही त्यावेळी एखादा खेळ खेळणार्यांसाठी फार मोठी गोष्ट होती. टीव्हीच्या आगमनानंतर क्रिकेटच्या रेडिओवरच्या कॉमेंटरीची जागा प्रत्यक्ष लाइव्ह प्रक्षेपणाने घेतली आणि क्रिकेटपटूंचं भाग्य फळफळलं. त्यांना खेळण्याबरोबरच जाहिराती, समालोचन, क्रिकेटवरचे स्तंभलेखन अशा अनेक मार्गांनी पैसे मिळू लागले… काही क्रिकेटपटू परदेशी करार करू लागले, काही देखण्या क्रिकेटपटूंना सिनेमाच्या ऑफर यायला लागल्या… खेळाचा आनंद दुय्यम ठरू लागला… एकीकडे क्रिकेटरसिकांना खेळाच्या आनंदाचा विरस होऊ नये म्हणून मॅचच्या काळात पाऊस पडू नये, अशी करूणा भाकावीशी वाटत होती, तेव्हा क्रिकेटपटूही देवापाशी तीच प्रार्थना करत होते… पण कारणं किती भिन्न! बाळासाहेब हे हाडाचे क्रिकेटप्रेमी, भारताबरोबरच पाकिस्तानातले क्रिकेटपटूही त्यांच्यावर फिदा असायचे. आज आयपीएलच्या नावाखाली चालणारी क्रिकेटची सर्कस पाहून त्यांनी या बाजारू वृत्तीला कुंचल्याचे कसे फटकारे मारले असते, याची कल्पना या व्यंगचित्रावरून करता येईल.