□ भाजप ही हिटलरच्या पावलावर पाऊल टाकणारी पार्टी आहे- शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
■ हिटलरकडे अपप्रचारासाठी एकच गोबेल्स होता, यांचे गोबेल्स आता सोशल मीडियावर शेणातल्या किड्यांसारखे पसरले आहेत.
□ राजभवनात ओडिशातील एका बदनाम संस्थेच्या वतीने देण्यात येणार्या बोगस डॉक्टरेटचे वाटप
■ आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही त्यात सध्याच्या महामहीमांच्या कारकीर्दीत.
□ ज्येष्ठ नागरिकांची रेल्वे तिकिटातील सवलत रद्द, रेल्वेमंत्र्यांचे संसदेत तारांकित प्रश्नांना उत्तर
■ मोदींचे गुणगान गाताना यांची बोळकी थकत नाहीत… आता बसली ना थोतरीत. तरी देशहितासाठी सोसतील ते.
□ राज्यात १५० बालविवाह रोखले. महिला तक्रार निवारण समित्या सक्रीय. बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती
■ काही विवाहित पुरुष म्हणतील, बालविवाहच का, एकंदरच विवाह रोखले पाहिजेत.
□ भाजप गुजरातमधील काँग्रेस आमदार फोडण्याच्या प्रयत्नात
■ निवडणुका आल्या, तयारी सुरू झाली… दुसरं येतंय काय!
□ अफगाणिस्तानच्या माजी मंत्र्यावर अमेरिकेत टॅक्सी चालवून पोट भरण्याची वेळ
■ स्वाभिमानाने काम करून जगतो आहे, हे महत्त्वाचं.
□ फडणवीस यांनी दिलेल्या पेनड्राइव्हवर महाआघाडीने खुलासा केल्यावर आणखी एक- दोन नव्हे तर तब्बल चार पेन ड्राइव्ह देऊ- रावसाहेब दानवे
■ दाजी, पेनड्राइव्हची फॅक्टरी टाकली की होलसेलमधून घेतले एखाद्या बनियाकडून?
□ काम करा अन्यथा मंत्रिपद जाणार. पंजाबच्या नवनियुक्त मंत्र्यांना केजरीवाल यांचा इशारा
■ स्वतंत्र बुद्धीने काम करू द्याल ना पण!
□ इंधन आयात करणारा नव्हे तर निर्यात करणारा देश बनवायचाय- नितीन गडकरी
■ ओ बाता लंबिया लंबिया रे…
□ रोजच्या गरजेच्या वस्तू १५ टक्क्यांनी महागणार? कच्च्या मालाचे दर वाढल्याने फटका
■ काही बिघडत नाही, विद्वेषाची हौस भागते आहे ना, त्यासाठी कष्ट सोसायला तयार आहेत भक्तगण
□ ३६ टक्के कुटुंबे कर्जबाजारी. लॉकडाऊनचा परिणाम
■ ही तर फक्त सुरुवात आहे… चुकीच्या निर्णयांची फळं एका नव्हे, अनेक पिढ्यांना भोगायला लागणार आहेत.
□ मोदी सरकारच्या काळात `ईडी’चे छापे वाढले : केंद्रीय वित्त राज्यमंत्र्यांची लोकसभेत कबुली
■ त्यातून निष्पन्न काही झालं नाही, याची कबुली दिली का पण?
□ `तृणमूल’चे खासदार अभिषेक बॅनर्जीनी `ईडी’ला सुप्रीम कोर्टात खेचले
■ भले शाब्बास, पंजाब, बंगाल आणि महाराष्ट्रच या विंचवांना जागेवर ठेचू शकतो.
□ सलमानचचे काळवीट प्रकरण राजस्थान हायकोर्टात
■ वीट यावा इतका काळ गेला, तरी प्रकरण चालूच आहे का?
□ उत्तर प्रदेश हे गरीब राज्य. नीती आयोगाच्या एम.पी.आय. निर्देशांकात उघड
■ पोटं भरायला इतर राज्यांत पळायचं आणि आपल्या राज्यात धर्म जात खेळायचं, तर दुसरं काय होणार?
□ फुकट्या प्रवाशांमुळे माय रेल्वे मालामाल
■ कमाईच्या नादात प्रामाणिक प्रवाशांना तिकीट, पास काढणं अवघड करू नका म्हणजे झालं…
□ हरभजन `आप’कडून राज्यसभेवर
■ भज्जी संसदेत पहिला प्रश्न विचारणार की ‘दूसरा’!
□ बाबा रामदेव आता भांडवली बाजारातही!
■ सरकारी बाबा आहेत, चंद्रावरही जातील.
□ `पतंजली’ समर्थित रुची सोयाची समभाग विक्री सुरू
■ स्वघोषित स्वच्छ पक्षाच्या कारकीर्दीत एखादा महाघोटाळा सुद्धा पचतो तो असा.
□ डिझेलच्या घाऊक दरात २५ रुपयांची वाढ
■ ये तो सिर्फ झाँकी है, पेट्रोल अभी बाकी है…
□ पुतिन यांना वाटतेय विषप्रयोगाची भीती धोबी, आचार्यासह हटवले १,००० कर्मचारी
■ इतक्या जहरी माणसावर विषाचा काय परिणाम होईल?
□ तुटवड्यामुळे आला गाढवांनाही सोन्याचा भाव. पाथर्डीतील मढी येथील बाजारात काठेवाडी गाढवांची जोडी ५० हजार रुपयांना
■ गाढवांना भाव येण्याचाच काळ आहे हा. चार पायाच्यांनी काय घोडं मारलंय?
□ महिलांपेक्षा पुरुष अधिक भावनाप्रधान असतात. अमेरिकेत झालेल्या संशोधनात उघड
■ आमच्याकडचे छप्पन इंचांच्या बाता मारून घटके घटकेला डोळ्यांतून नाटकी आसवंसुद्धा काढून दाखवतात.