पोलिसांच्या अथक श्रमाला यश आले आणि मंजुनाथ पोलिसांच्या तावडीत सापडला. तो कुठल्या हॉटेलचा मालक नव्हता, तर डान्सबारमध्ये एक वेटर होता. लवकरच डान्सबार सुरू होतील या आशेवर सध्या एका इडली डोसा सेंटरमध्ये काम करत होता. त्याच्या हातावरचे गोंदण एका खबर्याच्या नजरेला पडले. सहज केलेल्या चौकशीत त्याचे नाव मंजुनाथ असल्याचे समजले आणि खबरीने लगेच पोलिसांना वर्दी दिली.
– – –
नाल्याभोवती जमलेल्या प्रचंड गर्दीला बाजूला करत इन्स्पेक्टर राजन आत शिरला. त्याच्या पथकातले काही हवालदार गर्दीवर नियंत्रण मिळवायचे काम करत होते, काही आजूबाजूचा शोध घेत होते; तर सब इन्स्पेक्टर मुरली नाल्याच्या कडेला पडलेल्या पोत्याचे निरीक्षण करण्यात गुंतला होता. बहुदा कुत्र्यांनी केलेल्या ओढाताणीत पोते फाटले होते आणि त्या फाटलेल्या, रक्त लागलेल्या पोत्यातून एक हात बाहेर डोकावत होता. हातातल्या बांगड्यांवरून तो हात स्त्रीचा आहे हे तर स्पष्ट दिसत होते. हातात ग्लोव्ह्ज चढवत राजन पुढे झाला आणि तपासाच्या कामाला खरा वेग आला.
‘काय वाटतंय डॉक्टर?’ समोरच्या भीषण दृश्याकडे पाहत राजनने विचारले. मुंडकेच गायब असलेले प्रेत बघायची ही त्याची पहिली वेळ नसली, तरी देखील ते प्रेत पाहताना त्याला उगाचच विचित्र वाटत होते.
‘एका घावात मान धडावेगळी करण्यात आली असावी. मयताला प्रतिकाराची काही संधीच मिळाली नसेल. रादर आपला खून होणार आहे ह्याचा देखील तिला अंदाज नसावा. मुंडके सापडले तर ठीकच, नाहीतर असेच प्रेत घेऊन जातो आणि मग सगळ्या तपासण्या झाल्यावर व्यवस्थित रिपोर्ट पाठवतो,’ दाढी कुरवाळत डॉक्टर बेग म्हणाले आणि राजनने मान डोलवली.
प्रेत हलवण्यात आले, पण भोवतालची गर्दी काही कमी होण्याची चिन्हे नव्हती. राजन आणि त्याच्या टीमने आजूबाजूचा सारा भाग धुंडाळून पाहिला. कचरा आणि राबीटच्या त्या ढिगात पुरावा शोधणे; म्हणजे गवतात सुई शोधण्यासारखे होते. अखेर बरेच प्रयत्न करूनही प्रेताचे मुंडके काही मिळाले नाही आणि कुठला पुरावा देखील हाताला लागला नाही. श्वानपथक बोलावण्यात आले, मात्र त्यातील श्वान नाल्यापासून रस्त्यापर्यंत आले आणि तिथेच घुटमळत राहिले. शेवटी रिकाम्या हातानेच पोलीस टीम परत गेली.
—-
`काय मुरली काय म्हणतो पोस्टमार्टम रिपोर्ट?’
‘मयत स्त्रीचे वय ३० ते ३२ असावे. शरीरावर मारहाण झाल्याचा किंवा जबरदस्ती केल्याच्या कोणत्याही खुणा नाहीत.’
‘म्हणजे बलात्कार झालेला नाही..’
‘नो सर!’
‘इतक्या निर्दयपणे खून करण्यात आला आहे; म्हणजे खुन्याच्या डोक्यात प्रचंड राग भरलेला असणार आहे. रागाच्या भरात देखील गुन्हा केल्यावर त्याने पुरावे नष्ट करण्याचा देखील पूर्ण प्रयत्न केला आहे. एका निर्दयी पण सावध गुन्हेगाराशी आपली गाठ आहे मुरली.’
‘सर, प्रेताची ओळख पटेल असे फारसे काही मिळालेले नाही. मात्र प्रेताच्या उजव्या हातावर गोंदण आहे आणि ड्रेसच्या मागे ’सलोनी टेलर्स’चे लेबल आहे. बस येवढेच..’
‘कसले गोंदण आहे ते?’
‘तेच समजत नाहीये सर.’ एक फोटो राजनपुढे टाकत मुरली म्हणाला. पंचनाम्याच्या फोटोत प्रेताचे देखील फोटो घेण्यात आले होते; त्यातल्या एका फोटोत हा गोंदणाचा फोटो देखील होता. गोंदण अगदी नवे नवे काढलेले दिसत होते. त्रिकोणी आकारात तीन टिंबं होती आणि त्यांच्या बोटभर खाली एक आडवी रेषा मारलेली होती.
‘हे काय आहे?’
‘तोच विचार करतोय सर. असे गोंदण ह्यापूर्वी कधीच पाहिलेले नाही.’
‘आणि त्या ’सलोनी टेलर्स’च्या लेबलबद्दल?’
‘त्याचाही आम्ही शोध घेतला सर, ’पनवेल नाला’ परिसरात एकूण तीन सलोनी टेलर्स आम्हाला सापडले. त्यातल्या एकाचे दुकान गेले वर्षभर बंद आहे. एक आजकाल फक्त रफू, अल्टर करतो, तर एका दुकानाच्या मालकिणीने तिचे दाखवलेले लेबल आणि आपल्याला मिळालेले लेबल ह्यात प्रचंड फरक आहे.’
‘अर्थात, तपासाचा एकही मार्ग सध्या समोर दिसत नाही. प्रेताला मुंडके नसल्याने ओळख पटवणे देखील अवघड आहे. मुरली एक काम कर, आजूबाजूच्या पोलीस स्टेशनला कुठे ३० ते ३२ वयाची स्त्री हरवली असल्याच्या तक्रारीची नोंद झाली आहे का ते बघ. किंवा नाल्याच्या आजूबाजूला राहणारी एखादी स्त्री अचानक गायब झाली आहे का, त्याची देखील चौकशी कर. नाल्याकडे येणारे दोन रस्ते आहेत. दोन्ही रस्त्याला मिळणार्या रस्त्यांवरचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्या. त्यात काही संशयास्पद आढळते का ते बघा.’
मुरली मान डोलवून बाहेर पडला आणि राजन समोर पसरलेले पंचनाम्याचे फोटो बघण्यात गढून गेला.
‘साहेब चाय…’ चहावाला राजू त्याला तंद्रीतून जागा करत म्हणाला आणि राजन भानावर आला.
‘भर.. जरा कडक चहा पिऊन काही कडक आयडिया डोक्यात येते का बघतो…’
राजूने चहा भरला आणि तो परत जायला वळला. काही पावले पुढे जाऊन तो परत मागे फिरला आणि राजनच्या टेबलावरच्या फोटोंकडे बघायला लागला.
‘काय रे काय बघतो?’
‘साहेब कोणाचे फोटो आहेत हे?’
‘का रे?’
‘साहेब हा फोटो बघू का जरा?’ त्याने गोंदणाच्या फोटोकडे आहात इशारा केला आणि राजन तरारला. त्याने पटकन तो फोटो राजूच्या हातात दिला आणि आशेने त्याच्याकडे पाहू लागला.
‘काय आहे माहिती आहे का हे?’
‘तीन मातेचा नवस आहे साहेब..’
‘म्हणजे रे?’
‘आमच्या इकडे कर्नाटक बॉर्डरवर एक छोटे गाव आहे साहेब. ’मातापूर’ म्हणतात त्याला साहेब. तिथे एकाच दगडात देवीच्या तीन रूपाच्या स्वयंभू मूर्ती आहेत साहेब. हुबळी, धारवाड, बेळगाव इथून खूप लोक इथे दर्शनाला येतात. ही देवी नवसाला पावणारी आहे ना. इथे बोललेला नवस पूर्ण झाला, तर बायका आणि पुरुष तीन देवींचे चेहरे म्हणून हे तीन गोल आणि खाली गाभार्याचा उंबरा असे गोंदवून घेतात साहेब.’ राजूने दिलेली माहिती राजन शांतपणे आणि एकाग्रतेने ऐकत होता. राजूची माहिती संपली आणि राजनने त्याच्या हातावर एक शंभराची नोट टेकवली.
‘खूप मोठे काम केलेस तू राजू.’ राजू लाजत लाजत शंभराची नोट घेऊन बाहेर पळाला.
—-
‘बॅड लक सर! हुबळी, धारवाड कुठेच एखादी ३० ते ३२ वयाची स्त्री बेपत्ता असल्याची नवी नोंद नाही. ज्या नोंदी होत्या, त्यातल्या बायका मिळून आल्या आहेत किंवा प्रेत तरी सापडले आहे.’
‘मुरली, कर्नाटक बॉर्डरवरची बाई इथे पनवेलमध्ये काय करत होती? डान्सबार पण सध्या कोरोनामुळे पूर्ण बंद आहेत!’
‘तेच तर कळत नाहीये सर. मी डान्सबारच्या मालकांशी, इथेच राहणार्या काही बारगर्लशी बोललो, पण असे गोंदण असलेली कोणीच स्त्री डान्सबारमध्ये कामाला नव्हती.’
‘आपले खबरी काय म्हणतात?’
‘त्या आघाडीवर देखील शांतता आहे. मी ’रेड लाइट’मधल्या खबरींना देखील अलर्ट केले आहे, पण तिथून देखील काही प्रतिसाद नाही.’
‘जर डान्सबार, वेश्यावस्ती हा अँगल नसेल, तर ही एकटी स्त्री इथे नक्की काय करत होती? ही एकटी असेल असे वाटत नाही. तुम्ही आजूबाजूला चौकशी केलीत?’
‘सगळीकडे चौकशी केली साहेब, पण कोणतीच माहिती हाताला लागली नाही. त्यात कोरोनामुळे अनेक लोक आपापल्या गावी गेले होते, ते अजून परत आलेले नाहीत. त्यामुळे देखील तपासात अडथळे येत आहेत.’
‘सीसीटीव्हीची काही मदत?’
‘तिथेही बॅडलक. नाल्याच्या पुढं डेडएंड आहे आणि नाल्याकडे येणार्या रस्त्यापैकी फक्त एका दुकानातला सीसीटीव्ही बाहेरचा थोडाफार रस्ता कव्हर करतो, पण तो देखील इतका अंधूक आहे की, विचारू नका.’
‘मग चला, एकदा ह्या तीन मातेचे दर्शन तरी घेऊन येऊ.. बघू माता आशीर्वाद देते का ते!’
सगळी तयारी करून पोलीस पथक रात्रीच बाहेर पडले आणि सकाळच्या सुमारास ’मातापूर’जवळ पोहोचले. स्थानिक पोलिसांना आधीच कल्पना दिलेली असल्याने, त्यांचे दोन हवालदार राजन आणि टीमच्या मदतीसाठी सकाळीच हायवेला येऊन पोहोचले होते. त्या दोघांनी आपापली ओळख दिली आणि आपल्या दुचाकीच्या मागे गाडी घेण्याचा इशारा केला. अर्ध्या एक तासाच्या प्रवासानंतर साध्या वेषातील पोलीस पथक ’मातापुरा’त पोहचले. काही वेळ गावात फिरून झाल्यावर पोलीस टीमने आता ’तीन माता गडा’कडे मोर्चा वळवला. गड छोटा असला, तरी पायर्या चांगल्या रुंद आणि उंच होत्या. भाविकांना चांगल्याच दमवणार्या होत्या. पायर्यांच्या दोन्ही बाजूला अंगारा, हळदीकुंकू, बुक्का, ताईत, बांगड्या, देवीचे फोटो विकणारे विक्रेते दुतर्फा बसले होते. त्यांच्या जोडीलाच थंडगार ताक, निंबू पानीवाले देखील होते. मात्र राजनची नजर काही वेगळेच शोधत होती. त्याला जे हवे होते, ते लवकरच त्याच्या नजरेला पडले. मंदिर जिथे सुरू होते, त्या पहिल्या पायरीपासून खालच्या तीनही पायर्यांपर्यंत गोंदवून देणारे बसले होते. त्यात बायकांचा भरणा अधिक होता. भराभर बायकांचे हात चालत होते आणि समोरच्याच्या हातावर ’तीन माता’ साकारल्या जात होत्या.
‘बसा साहेब.. फक्त तीस रुपये’ त्यातली एक बाई कुतूहलाने बघणार्या राजनला म्हणाली. राजनने हसूनच मानेने नकार दिला.
‘फर्स्ट टैम आले का तुम्ही?’ त्याची एकूण वेषभूषा बघत त्या बाईने विचारले आणि तिच्या इंग्रजीचे राजनला कौतुक वाटले.
‘आमची सासू यायची पूर्वी. ती गेली मागच्या आठवड्यात, तिची इच्छा होती यायची कधीपासून, पण पूर्ण नाही झाली. म्हणून मग आम्ही आलोय आता..’ राजनने एक ’लोणकढी’ चढवून दिली. पण ही ’लोणकढी’ त्याला किती फायद्याची ठरणार आहे त्याची त्याला कल्पना नव्हती.
‘गुणाचे हायसा साहेब.. आजकाल कोण इचारतो माय बापाला? तुम्ही तर सासूसाठी आलात..’ म्हातारीने राजन आणि त्याच्या बाजूलाच साध्या वेषात उभ्या असलेल्या सब इन्स्पेक्टर राधाकडे बघत हात ओवाळले अन डोक्यावर बोटे मोडली. बहुदा त्यांना नवरा बायको समजून म्हातारीने दृष्ट काढून टाकली.
‘अहो सासू म्हणजे दुसरी आईच की!’ राधा म्हणाली.
‘तुम्हा लोकांना हे सगळे कळते हो.. नाहीतर आमची सून बघा.. काय कमी केले तिचे? नवरा तर दिवसरात्र रिक्षा चालवून सगळी हौस भागवायचा. मी पण तिला कधी काही काम लावले नाही. पण गेली पळून दुसर्याचा हात धरून. आता तिच्या मागं आमचा दीड शहाणा लेक पण गेलाय.. त्याचा पण पत्ता नाही. माय मेली का जगली इचारले नाही चार दिवसात. ताई, तुम्हाला सांगते, पोराच्या रिक्षासाठी कर्ज मिळावे म्हणून नवस केला होता. कर्ज मंजूर पण झाले. आदल्या रात्री नवसाचे गोंदण मी स्वत:च्या हाताने तिच्या हातावर काढले आणि दुसर्या दिवशी घर सोडून पळाली बघा सटवी… तीन माता कधी माफ करायची नाही तिला!!’ म्हातारीनं हवेत बघत शाप दिला.
म्हातारीचे बोलणे ऐकून पोलीस टीम चांगलीच तरारली होती. ’बहुदा आपल्याला सापडलेले प्रेत हे म्हातारीच्या सुनेचे तर नाही ना?’ हाच प्रश्न सगळ्यांच्या मनात रुंजी घालत होता.
‘आजी पण लेक गेलाय त्ारी कुठे?’ राजनने विचारले.
‘मुंबईला जातो म्हणून गेलाय..’
‘मुंबईत कुठे?’
‘ते काय माहीत नाही बाबा.’ बहुदा म्हातारीला मुंबई म्हणजे फार तर ’मातापूर’च्या दुप्पट मोठे गाव असावे असे वाटत होते.
‘त्याचा काही नंबर वगैरे आहे का?’
‘तुला रे का बाबा इतक्या चौकश्या?’
‘अहो आजी मी मुंबईत पोलिसांना चांगले ओळखतो. त्यांना सांगून पोराला आणि सुनेला धाडतो लगेच गावाकडे. पण त्यांना ओळखायचे कसे? काही फोटो वगैरे आहे का?’ राजन सहजपणे म्हणाला, पण निरागस म्हातारीला असे खोटे सांगताना त्याला फार अपराधी वाटत होते.
‘आजी, कोणाबरोबर पळाली हो तुमची सून? त्या माणसाला पण तुरुंगात डांबायला सांगते मी,’ राधा आता मध्ये बोलती झाली.
‘अहो येवढा चांगला संसार मोडून, त्या हॉटेलवाल्या मंजुनाथबरोबर पळाली..’
‘मुंबईत आहे का त्याचे हॉटेल?
‘हा तिथेच आहे.’
म्हातारीला बरोबर घेत, तिला आश्वस्त करत सर्वांनी देवीचे दर्शन घेतले आणि ते गड उतरले. म्हातारीचा थोडाफार पाहुणचार घेऊन आणि म्हातारीची सून संध्या अन मुलगा अर्जुनचा फोटो घेऊन ते बाहेर पडले. बाहेर पडता पडता राजनची नजर सहज समोरच्या गल्लीवर पडली आणि तो थबकला. एका पत्र्याच्या दुकानावर ’सलोनी टेलर्स’चा बोर्ड लटकत होता.
‘मुरली, ती स्त्री संध्याच असावी ह्यात आता मला काही शंका वाटत नाही. आता पनवेलमध्ये मंजुनाथ नावाच्या
हॉटेल मालकाचा आणि अर्जुनचा शोध घेणे हे सर्वात महत्त्वाचे असणार आहे. तुम्ही ताबडतोब हे मंजुनाथ प्रकरण आणि अर्जुन, संध्याचा फोटो आसपासच्या सर्व पोलीस स्टेशनला आणि खबर्यांना पाठवून द्या. आता उशीर करण्यात अर्थ नाही!’
पोलिसांच्या अथक श्रमाला यश आले आणि मंजुनाथ पोलिसांच्या तावडीत सापडला. तो कुठल्या हॉटेलचा मालक नव्हता, तर डान्सबारमध्ये एक वेटर होता. लवकरच डान्सबार सुरू होतील या आशेवर सध्या एका इडली डोसा सेंटरमध्ये काम करत होता. त्याच्या हातावरचे गोंदण एका खबर्याच्या नजरेला पडले. सहज केलेल्या चौकशीत त्याचे नाव मंजुनाथ असल्याचे समजले आणि खबरीने लगेच पोलिसांना वर्दी दिली.
‘संध्या कुठे आहे?’ राजनने कडक आवाजात थेट मुद्द्यालाच हाय घातला.
‘माहिती नाही साहेब..’
‘माहिती नाही म्हणजे? तू पळवून घेऊन आलेलास ना तिला?’
‘पळवली नाही साहेब. ती स्वत:च्या मर्जीने आली होती.’
‘मग गेली कुठे?’
‘खरेच माहिती नाही साहेब. मी पण कधीपासून शोधतोय तिला.’
‘मग पोलिसात तक्रार का नाही दिलीस?’
‘साहेब, मला कळले की, मी कामावर असताना एक रिक्षावाला आला होता आणि संध्या त्यात बसून निघून गेली. मला वाटले तिचा नवरा आला आणि घेऊन गेला.’
‘हा अर्जुन ५०० ते ६०० किलोमीटर रिक्षा चालवत इकडे आला होता? आणि तू इतक्या सहजी तिचे जाणे विसरून गेलास? काही माहिती काढली नाहीस?’
पोलिसांना अर्जुनची देखील माहिती आहे, हे बघून मंजुनाथ जरा सटपटला.
‘साहेब, खरे सांगू का? ती गेली त्याचे मला बरेच वाटले. मला वाटले होते त्यापेक्षा ती वेगळीच निघाली. फार डोके खायची साहेब, जीव नकोसा करायची पार..’
‘म्हणजे?’
‘कोरोनाच्या वेळी आम्ही सगळे गावाकडेच होतो साहेब काही दिवस. माझे गाव ’मातापूर’च्या जवळच आहे. गावाकडे नियम जरा कमी झाले आणि आम्ही मित्र आतल्या रस्त्याने रोजच ’माता गडा’वर जायला लागलो. तिथेच माझी अन संध्याची पहिली ओळख झाली. मी तिला माझे हॉटेल आहे म्हणून सांगितले. एक दोनदा चोरून मी तिला तालुक्याला पण नेले होते आणि खूप खरेदी पण करून दिली होती. पनवेलला परत आलो, तरी दर आठवड्याला मी न चुकता तिला भेटायला जातच होतो. तशी पण ती नवर्यापासून खूश नव्हतीच. मला म्हणाली ’मला पण घेऊन चल..’ मी विचार केला, हिला न्यावे बरोबर. बार चालू झाला की हिला पण तिथे कामाला लावता येईल आणि पैशाची चांगली सोय होऊन जाईल.’
‘मग इथे आल्यावर असे काय झाले की, तुला एकदम नकोशी झाली ती?’
‘लै खर्च करायची साहेब.. हातात पैसाच टिकायचा नाही तिच्या. सतत ’हे हवे ते हवे.. तू दारू का पिलास? सिनेमाला कधी जायचे? साडी आणायला कधी जायचे?’ येवढेच डोक्यात असायचे तिच्या. त्यात बार चालू झाल्यावर तिथे जायला ती सरळ ’नाही’ म्हणाली आणि आमच्यात वाद चालू झाले.’
‘साहेब अर्जुनची रिक्षा ’लोकेट’ झालीये.’ हवालदार जाधव हळूच राजनच्या कानात पुटपुटले अन राजन तातडीने बाहेर पडला. पुण्याच्या दत्तवाडी झोपडपट्टी एरियात अर्जुन पोलिसांच्या तावडीत सापडला. त्याने खूप दिवसांनी मोबाइल सुरू केला अन अलगद पोलिसांच्या तावडीत सापडला.
‘ती मरायलाच पाहिजे होती साहेब! सगळ्या समजात छी:थू झाली आमची. माझी माय तर आत्महत्या करायला गेली होती विहिरीवर. गावातल्या लोकांच्या नजरा, भावकीतले टोमणे सगळे सगळे असह्य झाले होते साहेब. शेवटी एकदाचा मला मंजुनाथचा पत्ता कळला आणि मी पनवेलला धावलो. आईची बांगडी विकून रिक्षात तेल घालत घालत गेलो साहेब. रागाच्या भरात बरोबर आणलेला कोयता घेऊन मी मंजुनाथच्या घरात शिरलो, तर ही हडळ माझ्या गळ्यातच पडली. ’मी चुकले, माफ करा. मंजुनाथ खोटारडा आहे, दारू पितो, मारतो..’ असले रडगाणे गायला लागली. माझे डोके अजूनच सटकले तिच्यावर. तिला घेऊन तिथून बाहेर पडलो आणि नाल्याजवळच्या आमच्या गावाकडच्या ाfमत्राकडे गेलो. पण तो नेमका आदल्या रात्रीच गावाकडे परतला. त्याच्याकडे जाताना मला तो सुनसान ओढा दिसला होता आणि त्याचे महत्त्व देखील लक्षात आले होते. मी महत्त्वाचे बोलण्याचा बहाणा करून नाल्याच्या कडेला रिक्षा थांबवली अन संध्याला घेऊन तिथल्या झाडीत शिरलो. ती बडबड करत पुढे जात असतानाच मी मागून कोयता काढला अन… तिथेच पडलेल्या एका पोत्यात..’
अर्जुनने पुण्याकडे जाताना घाटात फेकलेले मुंडके, त्याचे रक्ताळलेले कपडे आणि कोयता पोलिसांनी जप्त केला आणि पुढील कारवाईला सुरुवात केली. एका गोंदणाच्या मदतीने इतका गंभीर आणि गुंतागुंतीचा गुन्हा सोडवणार्या इन्स्पेक्टर राजन आणि टीमला विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले.