एक छोटीशी कथा आहे…
एक खोटारडा थापाड्या माणूस एकदा देवाकडे गेला आणि म्हणाला, देवा, लोक मला फार हसतात. माझी टर उडवतात. त्यांना माझा आदर वाटेल, असा मला वर दे.
देव म्हणाला, माझ्याकडे कोणालाही आयते वर मिळतात, असे तुला कोणी सांगितले? तुझी वृत्ती सतत खोटे बोलण्याची आहे, मग तुला लोक हसतात यात नवल काय? आधी वृत्ती बदल, मग माझ्याकडे ये.
खोटारडा माणूस म्हणाला, देवा, उगाच तुझ्याशी खोटं कशाला बोलू? थापा मारणं हाच माझा सहजस्वभाव आहे. मला मोठी कामं करता येत नाहीत, तो माझा वकूब नाही. मग मी मोठमोठ्या थापा मारतो. मला ही वृत्ती विसरायला सांगणं म्हणजे विंचवाला दंश आणि डासाला गुणगुण विसरायला सांगण्यासारखं आहे. ही अडचण लक्षात घेऊन मला मार्ग सांग.
देवाने विचार करून सांगितलं, तुझ्याकडे एकच मार्ग आहे. तू थापा रेटून मार. सतत खोटं बोल, ते इतक्या वेळा बोल की समोरचा माणूस भ्रमित झाला पाहिजे. त्याला खरं काय आणि खोटं काय यांच्यातला फरकच कळेनासा झाला पाहिजे. कालांतराने माणसं थापाच सत्य आहेत, असं मानून तुझा उदोउदो करू लागतील.
संतुष्ट मनाने तो माणूस पृथ्वीतलावर परतला… त्याने उरलेलं आयुष्य थापा मारण्यातच व्यतीत केलं…
त्याचे वंशज पृथ्वीतलावर आजतागायत पाहायला मिळतात… गेल्या शतकात ते जर्मनीमध्ये नाझी प्रचारतंत्र चालवणार्या गोबेल्सच्या रूपाने पाहायला मिळत होते, या शतकात त्यांनी आपल्याकडे एका अख्ख्या पक्षाच्या रूपाने पुनर्जन्म घेतलेला आहे… खोटे बोला पण रेटून बोला, हाच यांच्या यशाचा पासवर्ड आहे.
…गेल्या दोन आठवड्यांमधील घटना आठवून पाहा… दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या निधनाभोवतीचे तथाकथित गूढ उकलण्याचा दावा करणारा ‘ताश्कंद फाइल्स’ हा भ्रममूलक चित्रपट दिग्दर्शित करणार्या आणि बेबंद केंद्रसत्तेच्या विरोधकांना सरसकट ‘अर्बन नक्षलवादी’ म्हणून हेटाळण्याची व्यवस्था करून देणार्या विवेक अग्निहोत्री या दिग्दर्शकाचा ‘दि काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. कारस्थानकथांवर विश्वास ठेवणार्या मोजक्या प्रेक्षकवर्गाचा प्रतिसाद ताश्कंद फाइल्सला लाभला होता. ‘काश्मीर फाइल्स’ हा अधिक स्फोटक विषय. त्यामुळे त्यावरच्या सिनेमाला लोकांचा अधिक प्रतिसाद लाभेल आणि दिग्दर्शकाने कितीही एकांगी मांडणी केलेली असली तरी काही शहाणेसुर्ते प्रेक्षक, समीक्षक या सिनेमाच्या निमित्ताने काश्मीरमधील पंडितांच्या पलायनाचा सिनेमात ‘दडपलेला’ इतिहास उकरून काढतील आणि आजच्या केंद्र सरकारला आपल्या पूर्वसुरींनी केलेल्या पापांची जबाबदारी घ्यावी लागेल, हे सरकारच्या धुरीणांच्या आणि समर्थकांच्या लक्षात आलं. या सिनेमातल्या तथ्यांची उलटतपासणी सुरू झाली असती तर विद्यमान सत्ताधार्यांनी ३७० कलम हटवून जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा दिल्यानंतर तिथे काय बदललं, काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाची चिन्हे का दिसत नाहीत, तिथे निवडणुका का होत नाहीत, इंटरनेटसारखी सुविधा अजूनही का सुरू नाही, याचीही चर्चा सुरू झाली असती. त्यात उत्तर प्रदेशातली फुगवून फुगवून महाविजय बनवलेली यशोगाथा झाकोळली गेली असती आणि आगामी गुजरात निवडणुकांवर नकारात्मक प्रभाव पडला असता. हे लक्षात घेऊन हा सिनेमा प्रदर्शित होताच भावविव्हळतेची एक लाट निर्माण केली गेली. हजारोंच्या संख्येने सोशल मीडियावर पोस्ट पाडल्या गेल्या. कसे आपण हेलावून गेलो, आजवर कसे काश्मिरी पंडितांवरचे अत्याचार दडवले गेले, कसे विवेक अग्निहोत्रीने ३० वर्षे दडवलेले सत्य बाहेर आणले, हा सिनेमा पाहून लोक रडतायत, जेवणावरची वासना उडाली आहे याच्या तिखटमीठ लावलेल्या कहाण्या प्रसृत व्हायला लागल्या. काश्मीरमध्ये पंडितांना पलायन करायला लागलं, तेव्हा जणू काँग्रेसचंच सरकार होतं, अशा थाटातली सिनेमातली मांडणी पुढे वाढीव खेचून मांडली जाऊ लागली. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘दडपलेलं सत्य बाहेर आलं’ अशी वक्तव्यं केली. या सगळ्यामुळे आज या सिनेमाची अवस्था भारतीय जनता पक्षाचा प्रचारपट अशी होऊन बसली आहे. फुकट तिकीटं वाटणे, सरकारी सुट्या देणे, सिनेमा करमुक्त करणे असं करून हा सिनेमा गाजवला आणि चालवला जात आहे. त्यातून देशात हिंदू-मुस्लिम दुफळी माजवायची आणि गुजरातच्या सत्तेची पोळी भाजायची, पुढची कायमस्वरूपी व्यवस्था करून ठेवायची, असा हा बेत आहे.
अर्थात, तो संपूर्णपणे सफल होणं आजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात शक्य नाही. ज्या क्षणी या सिनेमाचं असं विद्वेषपटात रूपांतर झालं त्याच क्षणी एक वेगळी प्रक्रियाही सुरू झाली… त्या काळात सत्ता कोणाची होती, पाठिंबा कोणाचा होता, तो काढला का गेला नाही, पंडितांना पलायन करायला भाग पाडणार्या जगमोहन यांना नंतर सरकारमध्ये मंत्री का बनवले गेले, गेल्या ३० वर्षांत १५ वर्षे भाजपची सत्ता असून आणि आता कलम ३७० रद्द झाल्यानंतरही पंडितांचं पुनर्वसन कसं झालेलं नाही, हे प्रश्नही विचारले जाऊ लागलेच. त्यात खुद्द विस्थापित पंडितांनीही सांगितलं की या अर्धवट इतिहास सांगणार्या सिनेमामुळे आमची घरवापसीच धोक्यात आली आहे.
…आता येऊ या आपल्या मूळ कथेकडे…
…देवाने जेव्हा खोटारड्या, थापेबाज माणसाला रेटून खोटं बोल, तुझ्यावर लोक विश्वास ठेवतील असं सांगितलं होतं, तेव्हा हेही सांगितलं होतं की लोक काही काळच विश्वास ठेवतील. जेव्हा लोकांना सत्य कळेल तेव्हा खोट्याच्या कपाळी गोटा, ही म्हण सत्यात येईल…
खोटारड्याने हा भाग नीट ऐकला असावा, असे वाटत नाही.