रसिक प्रेक्षकांसाठी बदाम राजा प्रॉडक्शनचं ‘खरं खरं सांग..!’ हे नवं कोरं नाटक नुकतंच रंगभूमीवर आलं आहे. शंभरहून अधिक नाटकं दिग्दर्शित केलेले, ‘मराठी रंगभूमीवरील सर्वात बिझी‘ दिग्दर्शक विजय केंकरे हे या नाटकाचं दिग्दर्शन करत आहेत, तर लेखन निलेश शिरवईकर याने केलं आहे. सिनेमा, मालिका आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांत स्वतःचं स्थान निर्माण करणारी ऋतुजा देशमुख, यू ट्यूब प्रेक्षकांच्या ‘दिल के करीब‘ असलेली अभिनेत्री सुलेखा तळवलकर, हॅण्डसम अभिनेता राहुल मेहंदळे आणि रंगभूमीवर मनोरंजनाचा ठसा उमटवीत हास्यआनंद वाटणारा अभिनेता आनंद इंगळे अशा कलाकारांची मैफल या नाटकात अनुभवता येईल. संगीत अजित परब, नेपथ्य प्रदीप मुळे आणि प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची असून वेशभूषा मंगल केंकरे यांनी केली आहे, दीपक जोशी आणि नितीन नाईक हे सूत्रधार असून निर्मिती माधुरी गवांदे आणि निनाद कर्पे यांनी केली आहे.
निर्माते निनाद कर्पे म्हणाले की हे आमच्या नाट्यसंस्थेचे तिसरे नाटक आहे. महाबली, परफेक्ट मर्डर ही आमची नाटके ‘थ्रिलर‘ जॉनरची होती. संस्थेवर थ्रिलर नाटक करणारी संस्था असा शिक्का बसू नये यासाठी आम्ही वेगळ्या जॉनरच्या शोधात होतो. वेगवेगळ्या विषयांवरील अनेक नाटके वाचल्यावर या नाटकाच्या लेखनातील ‘खरेपणा‘ जाणवला. या नाटकात मनोरंजनाबरोबर एक संदेशही आहे. पन्नास टक्के निर्बंध होते, तेव्हा नुकसान सोसून आम्ही शो मस्ट गो ऑन म्हणून प्रयोग केले. आता निर्बंध उठल्यावर प्रेक्षक हे नाटक पाहायला गर्दी करतील अशी आशा आहे.
आनंद इंगळे म्हणाले, आधारित असलेल्या या नाटकात एक वेगळा अँगल देऊन विनोदी पद्धतीने स्त्री पुरुष नातेसबंधांकडे बघण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे. या टीमसोबत काम करताना धमाल येतेय. कोरोनानंतर आता प्रेक्षकांनी रंगभूमीवरील प्रेमासाठी नाटक पाहायला यावं ही जशी त्यांची जबाबदारी आहे. तशी चांगलं काम करण्याची जबाबदारी आम्हा कलाकारांवर आहे, आणि आम्ही जास्तीत जास्त चांगलं काम करण्याच्या प्रयत्न करतोय. आताच्या काळात पैसेवसूल नाटक हवं असं म्हणतात. माझ्या मते त्यांचा वेळ वसूल व्हायला हवा आणि तो वसूल होईल, असं हे नाटक आहे.
सुलेखा तळवलकर म्हणाल्या, दोन वर्षापूर्वी दिग्दर्शक विजय केंकरे यांनी हे नाटक वाचायला दिलं होतं. ते वाचतानाच मी गडाबडा लोळले होते आणि हे नाटक करायलाच हवं असं वाटलं होतं. हे नाटक स्टार्ट टू फिनिश एन्जॉय करण्यासारखं आहे. माझ्या डॉक्टर इरा या भूमिकेतून प्रेक्षकांचे टेन्शन घालवून मी त्यांना हास्याचे डोस देणार आहे. अनेक वर्षं एकत्र काम करणारे मित्रच सहकलाकार असल्याने जाहिरातीत आणि स्टेजवरही आमची केमिस्ट्री दिसून येतेय.
ऋतुजा देशमुख म्हणाल्या, या नाटकात मी साकारते आहे ती उर्मिला अतिशय संयमी आणि हुशार आहे. लेखकाने हे नाटक खूप छान गुंफलं आहे. या नाटकात खर्याखोट्याची गंमत आहे. आम्हा चौघांचं ट्यूनिंग पहिल्या दिवसापासून इतकं छान जमलं आहे की हे नाटक पाहताना प्रेक्षकांच्या चेहर्यावर नक्कीच हसू उमटेल. हे दोन हजार टक्के धमाल नाटक आहे.
राहुल मेहंदळे म्हणाला, माझ्या व्यक्तिरेखेचे नाव आहे रजत. हा एक मध्यमवयीन उच्चशिक्षित स्मार्ट माणूस आहे. आयुष्यातल्या काही गोष्टी त्याला पटत नाहीत. तो डिस्टर्ब आहे पण तो ते चेहर्यावर दाखवत नाही. तो नेहमी खरं बोलतो असा त्याचा समज आहे. खर्या खोट्याच्या गेममध्ये काय खरं, काय खोटं हे सांगणारं हे महत्त्वाचं पात्र आहे.
दिग्दर्शक विजय केंकरे म्हणाले, हे नाटक फ्लोरियन झेलर या फ्रेंच नाटककाराच्या ‘दि ट्रुथ’ नाटकाचे रूपांतर आहे.याचे मराठी रूपांतर निलेश शिरवईकरने खूप सुंदर प्रकारे केलं आहे. हे नाटक टिपिकल फार्स नाही तर ही एक ‘मॉरल कॉमेडी’ आहे. ज्याबद्दल आपण उघडपणे बोलत नाही अशा बर्याचशा गोष्टी नाटकात बोलल्या जातात. स्त्री पुरुष नातेसंबधामधे तुम्ही खरं बोललात तरी गोंधळ होतो आणि खोटं बोललात तरी होतो, त्यामुळे बर्याचदा काय बोलावं हे कळत नाही. मग वेळ मारून नेली जाते. जोडीदाराला खरं खरं सांग असं सांगणारं हे नाटक आहे. नाटकाचा विषय वैश्विक आहे आणि तो गंभीर असला तरी प्रासंगिक विनोदातून नाटक खुलत जातं. नाटकात कलाकार, तंत्रज्ञ यांची भट्टी चांगली जमून आली आहे. प्रेक्षकांनी हे नाटक एन्जॉय करावं आणि थोडासा विचार करावा असं मी म्हणेन.