कॉर्पोरेट कंपन्यांना गाड्या भाड्याने देण्याच्या व्यवसाय करताना तुषारने प्रसंगी ओला, उबर अशा मोठ्या कंपन्यांनाही यशस्वी टक्कर दिली… यशाच्या मार्गावरून स्वयंपाकाच्या उपजत आवडीची साद ऐकून त्याने आयुष्याची गाडी वळवून थेट खाऊ गल्लीत नेली आणि आज तो यू ट्यूबवरून अनेक प्रेक्षकांना रुचकर मेजवानी देतो आहे.
– – –
१२ मार्च १९९३, शुक्रवार… वेळ दुपारची… सौ. प्रीती देशमुख, जिंदाल कंपनीच्या कॅन्टीनमधील काम आटोपून महालक्ष्मी येथून बसने दादरला घरी चालल्या होत्या. दुपारची वेळ असल्यामुळे रस्त्यावर व बसमध्ये फारशी गर्दी नव्हती, पण त्यांच्या मनात मात्र कडू गोड भावनांची गर्दी झाली होती. पुण्यात खस्ता खाऊन केलेला संसार… मुलाची प्रिमॅच्युअर डिलिव्हरी… नवर्याचे व्यवसायातील अपयश… पुणे ते मुंबई स्थलांतर… कठीण काळात बहिणीच्या कॅन्टीनमध्ये मिळालेली मॅनेजरची नोकरी… बहीण काही दिवसात हे कॅन्टीन आपल्याला देणार आहे ही आनंदाची बातमी… आता दुःखाचे दिवस जाऊन सुखाचे क्षण येणार याचा आनंद… एक दिवस दादरमधे स्वतःचे हॉटेल घेण्याची इच्छा… १३ वर्षांच्या तुषारला मोठं करायचं स्वप्न…
…बस वरळी नाका, दूरदर्शन, करत साधारण २.४५च्या सुमारास सेंच्युरी बाजाराला पोहोचली, तेव्हा कानठळ्या बसवणार्या स्फोटाने बस हादरली… बसपुढील टॅक्सीत आरडीएक्स बॉम्बस्फोट झाला होता. ११३ माणसे जागीच गतप्राण झाली… प्रीतीताईंचा त्या बसमधील प्रवास कधी संपलाच नाही… दुसर्या दिवशी लहानग्या तुषारला आई दिसली ती गुंडाळलेल्या पांढर्या चादरीत… महाकाय स्फोटात मानवी शरीराचे जे काही झाले होते, त्यामुळे तुषारला आईचं शेवटचं दर्शनदेखील घेता आलं नाही…
…काळ कोणासाठी थांबत नसतो. आईच्या वर्षश्राद्धाला आपले वडील दुसरं लग्न करणार आहेत ही माहिती एका नातेवाईकांकडून तुषारला कळली. सावत्र आई कधीच तुषारची आई होऊ शकली नाही. कशीबशी त्याची दहावी पार पडली. अकरावीला प्रवेशाच्या रांगेत एका मुलाने फॉर्म भरायला त्याची मदत मागितली, योगायोगाने या दोघांना एकाच वर्गात प्रवेश मिळाला. तुषार सांगतो, ‘योगेशबरोबरची मैत्री सहज वाढत गेली.. घट्ट झाली. त्याच्या घरी येणं जाणं वाढलं. माझ्या मनात काय सुरू आहे ते योगेशला कधी सांगावं लागलं नाही. घरात वाद सुरूच होते. आता तर शिक्षण बंद करून नोकरीला लाग, चार पैसे कमावून आण, असा तगादा घरून सुरू झाला होता. बारावीच्या परीक्षेला एक महिना राहिला होता. रोजच्या भांडणामुळे जिवाचं काही बरंवाईट करून घ्यावं, घरी जाऊच नये असं वाटायचं. माझी ही कुचंबणा योगेशला जाणवत होती. त्यांचा वसईला एक फ्लॅट होता. तिथे मी, योगेश आणि त्याचा एक मित्र अमोल असे तिघेजण परीक्षेचा अभ्यास करायला जाऊन राहिलो. तिघांनाही बारावीला चांगले मार्क मिळाले. एफवायला प्रवेश घेतला. मला शाळेपासून नृत्य, वक्तृत्व, नाटक या सगळ्याची आवड होती. कॉलेजमधेही मी बर्यापैकी फेमस असल्यामुळे जनरल सेक्रेटरी आणि कल्चरल सेक्रेटरीची माळ माझ्या गळ्यात पडली. अभ्यास आणि कॉलेजच्या कामात स्वतःला गुंतवून घेतलं. रात्री कॉलेज कॅन्टीनमध्येच झोपायचो. घरच्यांना वाटलं, बरं झालं कटकट गेली. एफ वाय संपताना, आमच्या हितशत्रूंनी अशा काही घटना घडवल्या की आम्हा दोघांना कॉलेज सोडावं लागलं. या घटनेने शिक्षणव्यवस्थेबद्दल चीड निर्माण झाली. आता ठरवलं बास झालं शिक्षण, पण आपण नोकरी करायची नाही तर धंदाच करायचा.’
आईचं छत्र लहानपणी हरवलेला, घरच्यांचा यत्किंचितही सपोर्ट नसलेला मुलगा व्यवसायात उतरायचं धाडस कसा करतो, या प्रश्नाचे उत्तर देताना तुषार म्हणाला, ‘मला आठवतंय मी पाचवीला होतो, दिवाळीची सुट्टी पडली होती. चाळीतील मोठी मुलं मस्जिद बंदरला इसाभाईकडे होलसेल भावात फटाके विकत आणायला जात होती. मीही त्यांच्यासोबत गेलो. रस्ता लक्षात ठेवला. पुढील दिवाळीत आजीकडून थोडे पैसे घेतले आणि एकट्याने जाऊन इसाभाईकडून थोडे फटाके विकत आणले. ते आजूबाजूच्या चाळीत नेऊन विकले. शाळा शिकत असताना मी अगरबत्ती विक, कॅलेंडर विक असे उद्योग करत होतोच. दहावीची परीक्षा दिल्यावर ‘टेक्निक इंडिया’ या कंपनीत काम केलं, पहिला पगार १२०० रुपये हातात पडला. त्या पैशात दादर स्टेशनजवळच्या, ‘गोडबोले स्टोअर्स’मधून लोणची, पापड, कुरडया विकत घेतल्या आणि घरोघरी जाऊन विकल्या. अशा अनेक किडूकमिडूक धंद्यांचा अनुभव गाठीशी बांधत होतो. पण आता काहीतरी मोठं करावं असा विचार सुरू असतानाच योगेशच्या काकांची भेट झाली. काकांचा केमिकल व्यवसाय होता आणि दिवाळीच्या दिवसात त्याच्या ग्राहकांना भेटवस्तू देण्यासाठी ते एक महिना कार भाड्याने घ्यायचे. या गाडीधंद्यात चांगली कमाई आहे असं वाटून गाडी भाड्याने लावणे हाच व्यवसाय करायचा हे आम्ही ठरवलं. मी, योगेश आणि त्याचे दोन मित्र पंकज आणि अमोल अशा चौघांनी मिळून एक लाख रुपयात १९९९ साली, ‘११८ एन ई’ ही सेकंडहॅण्ड कार विकत घेतली. माझ्याकडे पैसे नव्हते, तेव्हा योगेशच्या ओळखीने मी बँकेतून पंचवीस हजार रुपये पर्सनल लोन काढलं.
आम्हा चौघांचे वय तेव्हा अठरा-एकोणीस होतं. या धंद्यात पडताना रिसर्च केला, तेव्हा कळलं दादरमधे दोन फेमस कार
ऑपरेटर्स आहेत, अमेय ट्रॅव्हल्स आणि के बी कॅब. यांच्याकडे मुंबई महानगरपालिका व सिमेन्स कंपनीला गाडी पुरवण्याचं कॉन्ट्रॅक्ट होतं. त्यांच्या स्वतःच्या गाड्या होत्या, पण जेव्हा अधिक मागणी असायची तेव्हा ते आमची कार ड्युटीला पाठवायचे. आम्ही गाडीला ड्रायव्हर शोधला… कामाचा पहिला दिवस होता. ड्युटी संपल्यावर संध्याकाळी परत येणे अपेक्षित असलेला ड्रायव्हर रात्री बारा वाजले तरी कार घेऊन आलाच नाही. चारही पार्टनर्स रस्त्यावर उभे राहून वाट पाहत थांबलो. ड्रायव्हर आपली कार घेऊन पळून तर गेला नसेल ना, कारचा अॅक्सिडेंट तर झाला नसेल ना, असे आमच्या मनात एक ना हजार प्रश्न येत होते. शेवटी दोन वाजता कार घेऊन ड्रायव्हर परतला, ‘क्लायंटची पार्टी उशिरा संपली’ असं म्हणाला. ‘इतका उशीर झाला तेव्हा मी उद्या कामावर येणार नाही’ असं सांगून तो निघूनही गेला. मग काय दुसर्या दिवशी नुकताच मालक बनलेला योगेश ड्रायव्हर बनून ड्युटीवर गेला. दोन दिवसात धंदा म्हणजे काय असतं हे कळायला लागलं.
अनुभवातून शिकत होतो, गाडीचं एका दिवसाचं भाडं ९०० रुपये मिळायचं, डे नाइट चालवल्यावर भत्ता धरून दोन हजार ते बावीसशे मिळायचे. पहिल्या महिन्यात वीस दिवस गाडी ड्युटीवर गेली, पुढील महिन्यात एक ग्राहक मोठं काम घेऊन आला. एका मोठ्या कंपनीला पाच दिवसांसाठी ५० गाड्या हव्या आहेत, त्या तुम्ही अरेंज करून द्या, तुम्हाला प्रत्येक गाडीमागे १०० रुपये कमिशन मिळेल असं सांगितले. पाच दिवसात पंचवीस हजार मिळणार होते. ही सुवर्णसंधी स्वीकारायचं ठरवलं. ट्रॅव्हल्स धंद्यात अनेकजण ओळखीचे झाले होते. सगळ्यांना फोन करून ५० गाड्या भाड्याने लावल्या. पाच दिवस काम केल्यावर काम देणारा माणूस गायब झाला. पंचवीस हजार कमवायच्या नादात तब्बल साडे सहा लाख रुपये नुकसान डोक्यावर घेऊन बसलो. पन्नास गाडीवाले त्यांचे पैसे मागायला दारावर आले. योगेशचे बाबा बँक ऑफ इंडियामध्ये कामाला होते. ते म्हणाले, तुम्ही धंदा सोडून नोकरी करणार असाल तर मी कर्ज काढून तुमचे पैसे फेडतो. पण धंदाच करणार असाल तर मात्र तुमचं तुम्ही निस्तरा. काही दिवसांनी माझ्या घरी ही बातमी कळली, खूप वाद झाले. एक मे २००० रोजी, मी आईचा फोटो व माझे कपडे सोबत घेतले आणि वडिलांचे नाव मागे ठेवून, तुषार ‘प्रीती’ देशमुख बनून घराबाहेर पडलो ते पुन्हा कधीच परत न जाण्यासाठी. योगेशच्या आई बाबांना हे कळलं, तेव्हा ते म्हणाले, ‘आजपासून तू आमचा मुलगा आहेस, तू आमच्या घरी राहायचं.’ आईविना पोराला मायेचा हात काकीच्या रूपाने मिळाला.
डोक्यावर मायेचं छत्र मिळालं पण बाहेर देणेकरी पैशांसाठी तगादा लावत होते. या कठीण परिस्थितीत चार पार्टनर्सपैकी दोघांनी धंद्यातून माघार घेतली. पैसे फेडायला मी आणि योगेशच उरलो होतो. धंद्यात फटका बसला होता, पण माघार घ्यावी असं वाटत नव्हतं. अनोळखी माणसावर विश्वास टाकल्याने फसवलो गेलो होतो. चुकांमधून शिकत होतो, गाड्यांचा धंदा कळला होता, त्यामुळे हे कर्ज आपण फेडू शकू हा आत्मविश्वास होता. ओळखीने एका सहकारी बँकेतून गाडी घेण्यासाठी साडे सात लाख रुपयांचं लोन काढलं. पाच लाख आधीचं कर्ज फेडलं तर उरलेल्या अडीच लाखात सेकंड हॅण्ड मारुती एस्टीम गाडी विकत घेतली. ऑपरेटरला गाड्या भाड्याने देताना तो त्याच्या गरजेनुसार काम देतो व अधिकचे कमिशन घेतो हे कळत होतं. आता धंदा वाढवायचा असेल तर आपणच स्वतः कंत्राटं घेतली पाहिजेत असं वाटू लागलं. त्यानुसारच हातपाय मारायला सुरुवात केली. शापुरजी पालनजी यांच्या अॅडमिन डिपार्टमेंटमध्ये एकाने ओळख करून दिली. काम मिळवण्यासाठी कंपनीचं प्रोफाइल बनवून जमा करायचं असतं. ते कसं करतात हे आम्हाला माहीत नव्हतं, मग तेही शिकून घेतलं. शापुरजीमधून काम मिळायला लागलं.
२००२ साली वर्तमानपत्रात ‘एनपीसीएल’ या शासकीय कंपनीचं टेंडर निघालं होतं. टेंडरबद्दल तांत्रिक माहिती देण्यासाठी कंपनीने सर्व गाडीमालकांची मीटिंग बोलावली होती. तिथे कंपनीचे देशपांडे साहेब सगळ्यांना भेटत आमच्याकडे आले आणि त्यांनी विचारलं, ‘तुमचे बाबा कुठे आहेत? आले नाहीत? बरं हा तुमचा हा पिढीजात धंदा आहे का?’ एकवीस वर्षांची दोन मराठी पोरं स्वबळावर इतक्या मोठ्या कंपनीचे टेंडर भरत आहेत यावर त्यांचा आधी विश्वासच बसला नाही. पण नंतर त्यांना आमच्याबद्दल आत्मीयता निर्माण झाली आणि त्यांनी आम्हाला टेंडरची सर्व टेक्निकल माहिती दिली. एकही रुपया लाच न देता ‘माया ऑटो रेंटल’ या आमच्या कंपनीला हे काम मिळालं. एनपीसीएल कंपनीने एकूण किती गाड्या लागणार आहेत हे जरी कॉन्ट्रॅक्टमधे नमूद केलं नसलं तरी त्यांची गाड्यांची मागणी वाढू लागली होती. मिळालेलं टेंडर बँकेत दाखवलं की नवीन गाडीचं लोन लगेच पास होत असे. २००५ सालापर्यंत आमच्या चाळीस गाड्या रस्त्यावर धावत होत्या. काही नवीन कंपन्यांचं काम मिळालं.
‘प्राइस वॉटर हाऊस कुपर’ या मोठ्या कॉर्पोरेट कंपनीला त्यांच्या विदेशी बॉससाठी पस्तीस लाख रुपयांची होंडा अॅकॉर्ड गाडी हवी होती. कॉन्ट्रॅक्ट करून गाडी कंपनीला लावली, पण त्या बॉसला भारतीय हवामान पचनी पडलं नाही आणि तो मायदेशी परतला. हे कॉन्ट्रॅक्ट रद्द झाल्यामुळे या गाडीचा इतका मोठा हप्ता भरायचा कसा या विवंचनेत होतो. ही गाडी लावायला सगळीकडे प्रयत्न करत होतो, शेवटी दोन महिन्यांनी जिंदाल कंपनीत अॅकॉर्ड गाडीला ग्राहक मिळाला. धंद्यात चढउतार येतच असतात, तेव्हा खचून चालत नाही, टिकाव धरेल तोच टिकेल हा आमच्या धंद्यातील नियम आहे. २००७ साली माया ऑटो रेंटलला दादर इथे स्वतःचं ऑफिस मिळालं.
२००७ ते २०१२ हा आमच्या धंद्यातील गोल्डन पिरियड होता. एका गाडीपासून, सत्तर गाड्यांपर्यंतचा स्वप्नवत प्रवास सुरू होता. परंतु ज्या एका गोष्टीवर ट्रॅव्हल्स इंडस्ट्रीचा डोलारा उभा असतो, त्या पेट्रोलच्या किमतीत २०१२ साली लक्षणीय वाढ झाली, जुन्या रेटने गाड्या पुरवायला परवडत नव्हतं. तेव्हाच एनपीसीएल कंपनीने रेट वाढवून न देता कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलं. इतरही अनेक कंपन्या आमच्याकडे होत्या, पण पन्नास टक्के व्यवसाय हा या एका कंपनीकडून यायचा. हा आमच्या धंद्याला बसलेला हा मोठा सेटबॅक होता. लगेचच डॅमेज कंट्रोल करायला सुरुवात केली. सत्तरपैकी चाळीस गाड्या एका झटक्यात विकून टाकल्या आणि पुढे होणारं मोठं नुकसान टाळलं.
एव्हाना आमच्या धंद्यातील छोटे मोठे मासे गिळायला दोन महाकाय देवमासे मुंबईच्या रस्त्यावर अवतरले होते… ओला २०१० तर उबर २०१४ला मुबईत सुरू झाली. यांनी आधी कार चालवणारे ड्रायव्हर्स चारपट पगार देऊन पळवले. काळया पिवळ्या टॅक्सीच्या निम्म्या पैशात ते ‘एसी’ गाडीतून लोकांना प्रवास घडवीत होते. त्यांनी आम्हाला देखील ऑफर दिली, पण आम्ही ती नाकारली. २०१२ ते २०१६ हा काळ आमच्यासाठी फारच कठीण होता. या कालावधीत आमचे अनेक ग्राहक निघून गेले. कसेबसे तग धरून उभे होतो. २०१७ला धंद्यातील उतरण एकदाची थांबली आणि थोडे बरे दिवस आले. आमचे जुने ग्राहक परत कसे आले, त्याचा एक किस्सा सांगतो. एका मोठ्या कॉर्पोरेट क्लायंटचा रात्री दोन वाजता एअरपोर्ट ड्रॉप होता. त्यांना १५ गाड्या हव्या होत्या. आम्हाला विचारलं, तुम्ही त्या तमुक कंपनीच्या रेटने गाड्या देणार का? आम्ही नकार दिला. त्यांनी त्या कंपनीकडे ऑर्डर नोंदवली. त्यांना घ्यायला रात्री दोन वाजता पंधरापैकी फक्त सहा गाड्या आल्या, बाकीच्या ड्रायव्हर्सनी राइड कॅन्सल केल्या. कंपनी डेलिगेट्सना त्या रात्री टॅक्सी देखील मिळाली नाही, त्यांची फ्लाइट मिस झाली. दुसर्या दिवशी त्या कॉर्पोरेट कंपनीत हंगामा झाला आणि कंपनी परत आमच्याकडे आली. आम्ही सर्व्हिस देतो तेव्हा आमच्या ड्रायव्हरने फोन उचलला नाही तर माझा आणि योगेशचा फोन चोवीस तास उपलब्ध असतो. काहीही अडचण उद्भवली तरी दुसरी गाडी पाठवायची जबाबदारी आमचीच असते. आज इतके उन्हाळे पावसाळे पाहिल्यावरही आमचा धंदा अजून टिकून आहे, वाढतो आहे याला आमची चांगली सर्व्हिस हेच मुख्य कारण आहे.
आणि गाडीने ट्रॅक बदलला…
खर्या गाड्यांच्या मिररमधून मागे पाहताना आज लहानपणीच्या खेळण्यातील गाड्यांचे दिवस आठवतात. लहानपणी आईच्या पदराला धरून वावरणारा तुषार आईला सावलीसारखा सोबत करायचा. मावशीच्या कॅन्टीनसाठी साडे तीनशे पोळ्या लाटायला रोज पहाटे चार वाजता उठणारी आई त्याला आजही आठवते. तिच्या डबे बनवून देण्याच्या व्यवसायात जमेल तशी तो मदत करायचा, सुगरण आईच्या हातचे रंगरूप बदलणारे पदार्थ पाहून तुषारला स्वयंपाकघर हे जादुई घर वाटायला लागलं. आई गेल्यावर एक वर्ष त्याने आजीच्या जोडीने डब्याचा व्यवसाय सांभाळला होता. नंतर घर सोडल्यावर योगेशच्या घरी राहताना मित्र घरी आल्यावर ते तुषारला वेगवेगळे पदार्थ बनवायला आग्रह करायचे, मग तोही मित्रांना तब्येतशीर खिलवायचा, त्याच मित्रांनी जेवणाच्या ऑर्डर्स द्यायला सुरुवात केली.
तुषार म्हणाला, कोणतीही बाई एकवेळ तिचं घर शेअर करेल पण किचन शेअर करणार नाही, काकूंनी हे माझ्यासाठी केलं यासाठी मी त्यांचा शतश: ऋणी आहे. ऑगस्ट २०११ साली मला ‘आम्ही सारे खवय्ये’ या कार्यक्रमात काकूंसोबत फॅमिली एपिसोडमध्ये पदार्थ बनविण्याची संधी मिळाली. प्रशांत दामले यांनी होस्ट केलेला तो एपिसोड सॉलिड हिट झाला आणि मला पुन्हा एकदा ‘खवय्ये’मध्ये एक एपिसोड मिळाला. तेव्हा होम कुक स्पर्धेत दहा स्पर्धकांना मागे टाकत मी विजेता ठरलो. यानंतर अनेक ठिकाणी मला बोलावणं येऊ लागलं. २०१४ साली साम टीव्हीवर दहा एपिसोड मिळाले. माझी इच्छा होती की मला माझ्या नावाचा एक शो मिळावा, जिथे मी माझं पाककौशल्य दाखवू शकेन. दीड वर्ष सातत्याने प्रयत्न केल्यावर साम टीव्हीने मला २०१६ साली ‘सुगरण’ हा शो होस्ट करायला दिला. माझ्या अनोख्या परंतु बनवायला सोप्या रेसिपीज लोकप्रिय झाल्या. अल्पावधीच मी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलो. तुमचा चेहरा रोज टीव्हीवर दिसायला लागला की लोक ओळखायला लागतात. एका हौशी बल्लवाचे रूपांतर सेलिब्रिटी शेफमध्ये झाले होते.
ही प्रसिद्धी अनुभवत असताना आईचं स्वप्न लक्षात होतं- दादरमध्ये स्वतःचं रेस्टॉरंट. योगेश सोबत होताच. कॅन्टीनचा अनुभव असणार्या मावशीला विचारलं तर ती म्हणाली, तू जयेशला सोबत घे. जयेश हा तिचा मुलगा, लंडनहून हॉटेल मॅनेजमेंट करून आला होता. एक कुणीतरी वयाने मोठा व आर्थिकदृष्ट्या सक्षम माणूस हवा होता. माझा मामा अतुल कुलकर्णी हा चौथा पार्टनर झाला. पोर्तुगीज चर्चसमोरील दोन गाळे भाड्याने घेतले. अनेक जण म्हणत होते, सुरुवातीला एक गाळा घे मग धंदा जमला की दुसरा घे. पण मला हॉटेल सुरू करायचं होतं, सँडविच स्टॉल नाही. त्यामुळे जागा थोडी मोठी लागणारच होती. जागेचं अॅग्रीमेंट करण्याआधी रिसर्च केला होता. दादरमध्ये मासे, मालवणी चिकन देणारी हॉटेल्स खूप होती. ‘पहिलं हॉटेल मासे विकणारं टाकू नकोस’ असा सल्ला विठ्ठल कामत यांनी दिला. कारण मासे लवकर खराब होतात आणि एकदा ग्राहकांनी निगेटिव्ह पब्लिसिटी केली ही पुन्हा नाव कमावणं कठीण असतं.
मराठमोळी भाजी पोळी देणारी नामांकित हॉटेल्स दादरमध्ये खूप होती. त्यांच्यासोबत कॉम्पिटिशन करणं अवघड होतं. आमच्या जागेच्या आजूबाजूला मराठी आणि ख्रिश्चन लोकवस्ती होती, त्यामुळे व्हेज-नॉनव्हेज असे दोन्ही ऑप्शन्स ठेवले. खाद्यपदार्थांचे दर ठरवण्यासाठी दादर, अंधेरी, ठाणे येथील मेन्यू कार्ड्स आणून त्याचा अभ्यास केला. मेन्यू निवडताना लहान मुलांच्या आवडीचे चायनीज, तरुणांना आवडणारे तंदूर आणि मोठ्यांना आवडणारे पंजाबी फूड असे तीन प्रकार सुरू केले. तिन्ही पिढ्यांना आवडणारे कुझिन देणारं ‘फ्लेवर्स हॉटेल’ १९ नोव्हेंबर २०१३ रोजी सुरू केलं.
सुरुवातीचे दिवस
मी गल्ल्यावर बसलोय… आतून वेटर सांगत येतो, ‘शेठ, आपला मोरीवाला पळाला.’ हॉटेल इंडस्ट्रीत कोणताही माणूस न सांगता, न कळवता कधीही काम सोडून जाऊ शकतो. अशा अडचणीच्या वेळी किचनमधील भांडी घासायला, शेफ, हेल्पर कुणीही तयार होत नाही. कारण ते त्यांचं काम नाही. मग मी बाह्या सरसावून भांडी घासायला लागतो. हे पाहून सगळा स्टाफ धावत येऊन मला सांगतो, ‘काय शेठ! हे काम तुम्हाला शोभत नाही, तुम्ही बाहेर जा, हे काम आम्ही करतो.’ आपला मालक कोणतंही काम करायला लाजत नाही हे एकदा का स्टाफला कळलं की अडीअडचणीच्या प्रसंगी कोणतंही काम करायला स्टाफ लाजत नाही. हॉटेल सुरू केल्यावर सुरुवातीचे सहा महिने फारच अल्प प्रमाणात प्रतिसाद मिळाला. एक वर्ष लॉसमध्ये काढलं पण मागे हटलो नाही. हीच खरी कसोटीची वेळ असते. माऊथ पब्लिसिटी व्हायला वेळ लागतो, आपला मराठी माणूस या सुरुवातीच्या दिवसात नुकसान झालं म्हणून कच खाऊन माघार घेतो. आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत ग्राहकांची वाट पाहिली, पुढील तीन वर्षांत ना लॉस-ना प्रॉफिट धंदा झाला, पण नंतर दोन वर्षात धंदा तुफान चालला. मागील सर्व वर्षांचा बॅकलॉग भरून निघाला, आता चारही पार्टनर खुश होतो. पण कोविड लाटेत सगळं ठप्प झालं. हॉटेल इंडस्ट्रीत तीन खर्च प्रमुख असतात. एक : कमर्शियल लाईट बिल, दोन : जागेचे भाडे आणि तीन : कामगारांचा पगार. त्या मानाने जेवण बनवण्याचा खर्च फार थोडा असतो. लॉकडाऊनमध्ये लाइट बिल येतच होतं, माणसांना पगार देत होतो. नशिबाने आमच्या जागामालकाने हॉटेल बंद असतानाचं भाडं माफ केलं. कोरोनाच्या दुसर्या लाटेत मी पॉजिटिव्ह झालो. मरणाच्या दारात जाऊन परत आलो. दोन महिने हॉस्पिटलला होतो. आता पुन:श्च हरिओम केला आहे. धंदा हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
तुषार काही उच्चशिक्षित शेफ नाही की त्याच्याकडे कोणतीही हॉटेल मॅनेजमेंट डिग्री नाही. पण निरीक्षणाने, अनेक वर्षांच्या अनुभवाने, तो इथवर पोहोचला आहे. अनेक कुकरी शो होस्ट केल्यावर आपलंही एक यू ट्यूब चॅनल असावं अशी त्याची मनीषा होती. २०१८ साली यावर रिसर्च देखील सुरू केला होता. पण दर्जेदार शो करायला भरपूर आर्थिक पाठबळ आणि टेक्निकल माहिती असलेली मोठी टीम लागते. तेव्हा काही कारणांनी ते शक्य झालं नाही. इथे प्रोग्राम बनवताना तुम्ही हौशी आहात की व्यावसायिक हे आधी ठरवायला लागतं. जसं सहज अभिनय करायला जास्त मेहनत लागते तसंच युट्यूबवर नॅचरल दिसायला जास्त पैसे खर्च करावे लागतात. तुषार सांगतो, काही वर्षांपूर्वी युट्यूबवर प्रसिद्ध होणे तुलनेनं सोपं होतं. पण आज हे तितकं सोपं नाही. एका मिनिटाला इथे तीनशे तासांचे व्हिडिओज अपलोड होतात. मी युट्यूबवर पदार्पण करताना एक सक्षम चॅनलच्या शोधात होतो. प्रसिद्ध शेफ अर्चना आर्ते ताईंनी माझे नाव ‘रुचकर मेजवानी’ टीमला सुचवलं, पाककला चॅनलच्या भाऊगर्दीत हे चॅनल आज दहा लाख सबक्रायबर्स मिळवून आहेत. नुकतीच नवीन इनिंग्ज मी इथे सुरू केली आहे. त्यालाही चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळतोय.
माया ऑटो रेंटल आता स्थिरस्थावर झालंय, फ्लेवर्स हॉटेल दादरकरांची पसंती मिळवून उत्तम व्यवसाय करतंय, पाककलेत निपुण झालेला तुषार, लोप पावत असलेले पारंपरिक पदार्थ शिकायला व शिकवायला नेहमीच उत्सुक असतो. तुषार प्रीती देशमुख या हसतमुख माणसाला पाहताना, त्याचा अवघड वाटेवरचा प्रवास, वैयक्तिक आयुष्यातील हानी, धंद्यातील यश-अपयश, हे कधी जाणवत नाही. बॉम्बस्फोटात आई गमावलेला हा मुलगा, मनात कटुता न बाळगता दुसर्यांच्या आयुष्यात गोडवा निर्माण करतोय…
शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद
२०११ साली आम्हाला ‘उद्योग श्री’ पुरस्कार मिळाला, यानिमित्ताने हिंदुहृदयसम्राट श्री. बाळासाहेब ठाकरे यांची भेट झाली. माझी कहाणी ऐकून ते गहिवरले, एका मित्राला स्वतःच्या घरी राहायला नेलं, याबद्दल साहेबांनी योगेशचं खास कौतुक केलं. मराठी तरूण मुलांनी स्वबळावर धंदा उभारायला हवा, थोड्याशा यशाने ‘उतू नका मातू नका’ मोठी झेप घ्या, असा वडीलकीचा सल्ला त्यांनी मला दिला.