विव्हिअनचा चेहरा पाहताच क्षणी काळ्या दगडात कोरलेल्या शिल्पासारखा वाटतो. त्याच्या चेहर्याचे काठिण्य व खडबडीत परिणाम साधण्यासाठी खरखरीत पोत असलेला हॅन्डमेड पेपर घेऊन त्यावर काळी पेस्टल व सिक्स-बी पेन्सिल वापरून ईप्सित परिणाम साधण्यात प्रयत्न केला. अर्कचित्र साकारताना निरीक्षण महत्वाचे. मनुष्यप्राण्याचा एखादा विशिष्ट अवयव हेरून त्याचे अतिशयोक्तीपूर्ण चित्रण करून, हास्यरसाची फोडणी देऊन केलेले चित्रांकन आणि इतर अवयवांच्या एकमेकांशी असलेल्या नात्यामध्ये योग्य फेरफार करून अर्कचित्राचा पाया रचावा लागतो.
– – –
पहिलटकरणीच्या शरीराला नवजात बाळाच्या फुलाच्या पाकळीसारख्या इवल्याश्या नाजूक ओठांचा प्रथम स्पर्श झाल्यानंतर तिच्या वात्सल्याचा सर्वांगातून फुटलेला अमृताचा पान्हा… प्रेयसीच्या पहिल्या स्पर्शाने अंग-प्रत्यंगातून वीज चमकल्याची अनुभूती… पावसाच्या पहिल्या थेंबाने नवयौवनेच्या केशकलापातून दरवाळणार्या सुगंधासारखी मोहरून गेलेली धरती… आगीच्या ज्वाळांसारख्या सूर्यकिरणांनी करपलेल्या अवनीवर पाण्यासाठी भटकणार्या युवतीच्या नजरेच्या टप्प्यात अचानक ओंजळभर पाणी यावं आणि तिच्या चेहर्यावर जलधारांच्या वर्षावाचा आभास व्हावा… आनंदाच्या डोहात तिचे पावसाचे गाणे… थिरकणारे पाय…
अशाच आनंदाच्या लहरींवर मी काही क्षण विहरत होतो… माझे पहिले बक्षीस… राष्ट्रीय पातळीवर माझ्या अर्कचित्राला (कॅरिकेचर) मिळालेले पहिले पारितोषिक… ट्रेड फेअर ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांनी १९८६ साली उभरत्या कलाकारांसाठी आयोजित केलेल्या व्यंगचित्र आणि अर्कचित्र स्पर्धेत मला उत्तेजनार्थ बक्षीस जाहीर झाल्याची गोड बातमी पत्राने दिली.
रेडिफ्युजन अॅडव्हर्टायझिंग या जाहिरात संस्थेत इलस्ट्रेटर म्हणून माझी रुजवात झालेली. भारतातल्या पहिल्या पाच बलाढ्य जाहिरात संस्थांमध्ये रेडिफ्युजनला मानाचे पान ठेवले होते. त्या काळी सृजनशीलतेसाठी रेडिफ्युजनने भारतातल्या संपूर्ण जाहिरातविश्वात गारूड निर्माण केले होते… जाहिरातीसाठी अपेक्षित जागा संपूर्णपणे न भरता जाहिरातीतील प्रत्येक घटकाला स्वतंत्र स्पेस दिलेली असायची. मुख्य, सृजनशील चित्र वा फोटो, त्याला साजेसे कमीत कमी शब्दांचे घोषवाक्य, उदाहरणार्थ ‘व्हेनेव्हर यू सी कलर्स थिंक ऑफ अस… जॉन्सन अॅण्ड निकोल्सन’ उत्पादनाचे गुणधर्म वा माहिती सांगणारी तीन-चार ओळींची लहानसा फॉन्ट वापरलेली सब-कॉपी. शेवटी त्या उद्योगाचे बोधचिन्ह आणि बेसलाइन. तीसुद्धा त्या संपूर्ण रचनेची आकर्षकता द्विगुणित करणारी. त्या जाहिरातीची अंदाजे ५० ते ७५ टक्के जागा कलात्मकरित्या रिकामी ठेवली जायची. वर्तमानपत्रात ती विशिष्ट जाहिरात छापली जायची तेव्हा साहजिकच वाचकाचे लक्ष सहज कुतूहलाने वेधून घ्यायची. अशा प्रकारची कोणाचीही जाहिरात प्रसिद्ध व्हायची. त्यावेळी आपसूक तिला ‘रेडिफ्युजन स्टाइल’ असे लेबल लावले जायचे.
जाहिरातीची रचना आकार घ्यायची त्यामध्ये लुडबुड करायचा अधिकार क्लायंटला नसायचा. जाहिरातीचे उत्पादकाला ‘प्रेझेंटेशन’ करताना दोन कल्पना तयार केल्या जायच्या, एक- जाहिरातसंस्थेला पाहिजे असलेलीच गुणवत्तापूर्ण कलात्मक रचना आणि दुसरी कमी गुणवत्ता असलेली, केवळ क्लायंटच्या समाधानासाठी केलेली रचना. म्हणजे सुंदर मुलगी अधिक सुंदर दिसण्यासाठी कुरूप मुलगी बाजूला उभी करण्यातलाच प्रकार. हे तत्त्व अनेक वर्षे अंगीकारले गेले. हाच अलिखित नियम ज्या क्लायंटला मान्य असेल, त्यांनाच सर्व्हिस द्यायची वा स्वीकारायचे.
त्यावेळी स्कूल ऑफ आर्टमधून बाहेर पडणारे होतकरू चित्रकार, जाहिरातक्षेत्रात विहार करण्यास तत्पर असणारे किंवा थोडासा विहार केलेले सृजनशील उमेदवार यांच्या मनात रिडीफबद्दलच्या भावना एवढ्या पराकोटीच्या असायच्या की मला रेडिफ्युजनमध्ये एन्ट्री मिळाली पाहिजे, तिथे मला झाडू मारायला सांगितले तरीही ते काम मी करेन… आनंदाने,’ असे ते म्हणायचे. म्हणूनच तर धंद्यामध्ये अत्युच्च स्थानावर असलेल्या लिंटाससारख्या अग्रगण्य जाहिरात संस्थेमध्ये काम करण्याची संधी हाती आली असतानाही मी रेडिफ्युजनच्या कुशीत सामावलो.
रेडिफ्युजनच्या स्टुडिओत एका कोपर्यात माझे ड्रॉईंग टेबल होते. फावल्या वेळात ऑफिसमधल्या लोकांची त्यांच्या परोक्ष अर्क-चित्रे काढण्याचा छंद मला लागला. त्याच सुमारास अर्कचित्र व व्यंगचित्रांच्या स्पर्धेची जाहिरात वाचनात आली. कॅरिकेचर चितारण्याची आवड आणि बर्याचजणांनी केलेल्या कौतुकामुळे मी या स्पर्धेत भाग घ्यायचे नक्की केले. त्या वेळचा क्रिकेट किंग म्हणजे वेस्ट इंडीजचा विव्हियन रिचर्ड्स. खणखणीत बॅटमधून चौकार-षटकारांची आतषबाजी करणारा, धिप्पाड, उंचपुरा, बलदंड, डोक्यावर बारीक कुरळे केस… अंगकांती काळी असल्याने हसताना त्याचे पांढरेशुभ्र दात विशेष नजरेत भरायचे. स्टंपसमोर असताना गोलंदाजांना तो एखाद्या पर्वतासारखा भासायचा. भारतीय क्रिकेटपटूंसमोर तो म्हणजे ‘गलिव्हर्स ट्रॅव्हल्स’ कथेमधला गलिव्हर वाटायचा. ही सर्व वैशिष्ट्ये विव्हिअनचे अर्कचित्र चितारण्यासाठी आव्हानात्मक वाटल्याने त्याचे अर्कचित्र करण्याचा निर्णय घेतला.
विव्हिअनचा चेहरा पाहताच क्षणी काळ्या दगडात कोरलेल्या शिल्पासारखा वाटतो. त्याच्या चेहर्याचे काठिण्य व खडबडीत परिणाम साधण्यासाठी खरखरीत पोत असलेला हॅन्डमेड पेपर घेऊन त्यावर काळी पेस्टल व सिक्स-बी पेन्सिल वापरून ईप्सित परिणाम साधण्यात प्रयत्न केला. अर्कचित्र साकारताना निरीक्षण महत्वाचे. मनुष्यप्राण्याचा एखादा विशिष्ट अवयव हेरून त्याचे अतिशयोक्तीपूर्ण चित्रण करून, हास्यरसाची फोडणी देऊन केलेले चित्रांकन आणि इतर अवयवांच्या एकमेकांशी असलेल्या नात्यामध्ये योग्य फेरफार करून अर्कचित्राचा पाया रचावा लागतो. विरूपीकरण करणे हेसुद्धा अर्कचित्र वरच्या पातळीवर नेऊन ठेवते. अर्कचित्रामध्ये माणसाचा हूबेहूबपणा असणे आवश्यकच. म्हणजेच विशिष्ट अर्कचित्र कोणाचे आहे हे पाहताच क्षणी ओळखता आले पाहिजे, त्यावर व्यक्तीचे नाव लिहावे लागणे म्हणजे त्या व्यंगचित्रकाराच्या पराभवच.
सुरुवातीलाच उल्लेख केल्याप्रमाणे मला बक्षीस मिळाले ही बातमी कानोकानी होऊन संपूर्ण कार्यालयात पसरली. आमचे एक व्हाइस प्रेसिडेंट, अशोक बिजापूरकर स्टुडिओत येऊन मी दिल्लीला जाऊन ते बक्षीस का स्वीकारावे, हे माझ्या गळी उतरवीत होते. आजही आठवतात त्यांचे शब्द, ’अरे, उत्तेजनार्थ बक्षीस असले म्हणून काय झाले, बक्षीस हे बक्षीस असते, पहिले वा दुसरे नसले म्हणून काय झाले?… तू दिल्लीला जा… मी साहेबांशी बोलतो.’ साहेब म्हणजे आमचे मालक, चेअरमन अरूण नंदा. दुसरे भागीदार अजित बालकृष्णन (मॅनॅजिंग डायरेक्टर). दोघांचे दुसरे अपत्य- रेडिफ्युजन डॉट कॉम.
थोड्याच वेळात साहेबांचे बोलावणे आले. मी घाबरत, नर्व्हस अवस्थेत त्यांच्या समोर उभा. त्यांनी अत्यानंदाने माझे अभिनंदन केले. माझ्याबद्दल इतर माहिती जाणून घेतली. एवढेच बोलले, ‘यू मस्ट गो टू दिल्ली’ आपल्या सेक्रेटरीला बोलावून घेऊन माझी दिल्लीला विमानाने जाण्याची व हॉटेल बुकिंगची व्यवस्था करण्याची सूचना केली. मी चक्रावलो… आनंदलो… विमानातून पहिला प्रवास… डोक्यात घुसा-घुशी करण्यासाठी प्रश्नचिन्ह आणि उद्गारचिन्हं यांची चढाओढ लागली… माझ्या दिल्लीतील वास्तव्यासंदर्भात रिडीफच्या दिल्ली शाखेला कळविण्यात आले.
‘साहेब वाईरकरला बक्षीस घेण्यासाठी विमानाने दिल्लीला पाठवत आहेत,’ ही हेडलाईन झाली ऑफिसमध्ये. माझ्याकडे पाहण्याचा इतरांचा दृष्टिकोन बदलू लागला… त्यानंतर वाढदिवस, कोणी निवृत्त होत असेल तर किंवा ऑफिसला भेट देणार्या महनीय व्यक्तींना भेट म्हणून देण्यासाठी मोठाल्या आकाराचे, माझ्या कल्पनेतून साकारलेले रंगीत अर्कचित्र देण्याची एक प्रथाच रूढ झाली. अशाच प्रसंगी साहेबांनी हॉटेल ताजमध्ये सिंगापूरच्या पंतपधानांची भेट घडवून आणली होती. वर उल्लेख केलेल्या माझ्या दोन्ही वरिष्ठांनी व इतर कर्मचार्यांनी जे सहकार्य व प्रोत्साहन दिले, त्यामुळेच मी व्यंगचित्रकार म्हणून उभा आहे. माझ्या व्यंगचित्रकलेचा वरिष्ठांना एवढा अभिमान होता की कोणीही महनीय आली की स्टुडिओत आणून त्यांना माझी ओळख करून द्यायचे. कायम नोकरीतील कर्मचारी असूनही वर्तमानपत्रे व इतर प्रकाशनांसाठी व्यंगचित्रे आणि चित्रांवर स्वतःची सही करणारा जाहिरातक्षेत्रातला मी एकच असेन. ही पाठबळाची किमया…
लालबाग ते सांताक्रूझ विमानतळापर्यंत टॅक्सीने प्रवास सुरू झाला. बोर्डिंग पास कसा काढावा, सीटबेल्ट कसा लावावा, एअरहोस्टेसशी कसे बोलावे इत्यादींचा धडा मित्रांनी शिकविल्याप्रमाणे गिरविण्यात मेंदूचे भजे झाले. प्रथमच विमानातून प्रवास करणार्यांची जी अवस्था होते तशीच अवस्था माझी झाली. सीटबेल्ट लावता येईना. शेजार्याला विचारले तर आपल्या अज्ञानाला तो हसेल हा न्यूनगंड दुसर्याशी बोलायला परवानगी देत नव्हता. मग डाव्या डोळ्यांनी सहप्रवासाच्या कृतीकडे चोरून पाहून एकदाचा सीटबेल्ट लावला. सहप्रवासी कशी कृती करतात त्याचीच पुनरावृत्ती करण्यातच सर्व प्रवास गेला.
दिल्लीच्या भूमीवर पाय ठेवताच लगोलग आमच्या दिल्ली शाखेने पाठवलेल्या अँबेसेडरमधून एका छान हॉटेलमध्ये माझी राहण्याची सोय करण्यात आली. ‘आपके लिये ये गड्डी है, आप वापस बम्बई जाने तक आपक साथ ये गड्डी रहेगी,’’ इति गाडीचा चालक. माझाच मी चक्रावलो, मी सेलेब्रिटी???!!!
ट्रेड फेअर अॅथॉरिटी ऑफ इंडिया आयोजित औद्योगिक उत्पादनांचे भव्य-दिव्य प्रदर्शन प्रगती मैदान येथे मांडण्यात आले. दुसर्या दिवशी ठरल्याप्रमाणे संध्याकाळी त्याच प्रदर्शनात बक्षीस समारंभ आयोजित केला गेला. आमंत्रित व्यंगचित्रकारासहित अनेक नामवंत व्यक्ती लक्ष वेधून घेत होत्या. त्यावेळचे, गोरे गोमटे, काश्मिरीयत ल्यालेले मंत्री महोदय महंमद युनूस यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. महनीय व्यंगचित्रकारांना मी याची देही याचि डोळा औत्सुक्याने न्याहाळत होतो. जागतिक कीर्तीचे सुधीर धर, अबू अब्राहम, पी. के. एस. कुट्टी, एन. के. रंगा. इत्यादी. कृतार्थ झाल्यासारखे वाटत होते. मला माझे उत्तेजनार्थ बक्षीस अधिक वजनदार वाटते, कारण वरील चारही जागतिक व्यंगचित्रकार या स्पर्धेला परीक्षक म्हणून लाभले होते. १५ पारितोषिक विजेत्यांमध्ये अनिंद्य बसू, पंजू गांगुली, हरिणी, इरफान हुसेन, आशा राय, वेंकट राघवन ‘केशव‘, धीरेंद्र कुमार, जयदेव बाबू इत्यादी होते. यांच्यातल्या काहीजणांबरोबर मैत्रीचे जे सूर जुळले ते आजपर्यंत. यातील काही व्यंगचित्रकारांनी भारतीय व्यंगचित्र कलेचा झेंडा सातासमुद्रापलीकडेही फडकावला.
व्यंगचित्रांचे प्रदर्शन सुयोग्य पद्धतीने मांडले होते. रसिकांचा प्रेमाचा वर्षाव सतत होत होता. सुधीर धर यांनी आम्हा नवोदित व्यंगचित्रकारांबरोबर व्यंगचित्रकलेसंदर्भात महत्वाच्या सूचना/ सल्ला देऊन संवाद साधला. प्रदर्शनात अत्याधुनिक औद्योगिक उपकरणाचीही निर्मिती करण्यात भारताचे पुढचे पाऊल पाहून आणि सर्व व्यंगचित्रकाराना बाय-बाय करीत पावले
हॉटेलकडे वळली.
सकाळीच लवकर उठून न्हाणं आणि पोटपूजा करून हॉटेलच्या बाल्कनीत दिल्लीची सोनेरी सूर्य किरणे झेलत जागी झालेली नवी दिल्ली न्याहाळू लागलो… गाडीचा हॉर्न वाजताक्षणी चेक आऊट करून माझी वाट पाहत असलेल्या गाडीत सामानासहित जाऊन बसलो. ठरल्याप्रमाणे संध्याकाळी सहापर्यंत जेवढी दिल्ली डोळ्यात साठवता येईल तेवढी साठवावी असे ठरवून चालकालाच वाटाड्या करीत दिल्लीचे रस्ते मागे टाकत राहिलो. सोबतचा कॅमेरा ऐतिहासिक आणि आधुनिकतेचा मळवट भरलेल्या इमारतींच्या प्रतिमा साठवू लागला. ऐतिहसिक लाल किल्ला. कुतुबमिनार– इंडो- इस्लामिक पद्धतीचे बांधकाम, अचंबित करणारे कौशल्य, विजयाचा स्तंभ. जंतरमंतर– जयपूरचे महाराज जयसिंग यांनी बांधले. खगोलशास्त्रीय संशोधन करणे आणि ग्रहतारे यांच्या हालचालींची निरीक्षणे करणे यासाठी. इंडिया गेटची सुडौल दगडी शिल्पाकृती इमारत. समोरून लांबलचक रस्ता, त्यावर वसलेले राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालयाची वास्तू. संसद भवन,ज्यावर संपूर्ण भारत उभा आहे, अनेक सरकारी इमारती ब्रिटिशांची आठवण करून देणार्या, भक्तिभावाने आपोआप हात जोडले जाणारे बिर्ला मंदिर, मुंबईच्या भेंडी बाजाराची आठवण करून देणारा चांदणी चौक, आखीव-रेखीव नवी दिल्ली पाहून आपलीही मुंबई अशी रेखीव होऊ शकते का, असा विचार करता-करता दोन-तीन दिवस माझ्या सेवेला असलेली गाडी दमून-भागून पालम विमानतळाच्या मुख्य द्वारात येऊन विसावली. चालकाचे आभार मानीत मीही दिल्लीचा निरोप घ्यायला तयार झालो…
एक अर्कचित्र… छोटेसे बक्षीस… प्रामाणिकपणा आणि कलेप्रति समर्पित भाव यांची मशाल करून अंधार्या रात्रीही कोणीतरी कलंदर हळूहळू पावले पुढे टाकत असतो आणि अचानक ‘तथास्तु‘चा ध्वनी अवकाशात घुमत राहतो… कलंदराच्या मार्गावर पडलेल्या फुलांच्या सड्यातून त्याचे प्राक्तन अचानक बदलून जाते… भविष्याचा मार्ग नदीसारखा प्रशस्त होत जातो… काठावरील सळसळणार्या हिरवाईत यशस्वीतेचा नाद घुमत राहतो…