• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

गड्डी-गोदाम टीम झिंदाबाद!!

- यशोधरा काटकर (व्हायरल)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
March 10, 2022
in व्हायरल
0

‘झुंड’ या नागराज मंजुळे निर्मित-दिग्दर्शित चित्रपटाने सध्या महाराष्ट्रात एकच धमाल उडवली आहे. अमिताभची प्रमुख भूमिका, ‘सैराट’मधल्या परशा, आर्चीचं पुनरागमन आणि चित्रपटातील वास्तव सामाजिक प्रतिबिंबाचे जनमानसात आणि प्रसारमाध्यमात उमटलेले नाना तर्‍हेचे प्रतिसाद यातून या चित्रपटाचे वेगळेपण अधोरेखित झाले आहे. महाराष्ट्राचे सामाजिक मन ढवळून काढणार्‍या या सिनेमाच्या माध्यमातून नागराज यांनी हिंदीत दमदार पाऊल रोवले आहे. समाजाच्या एका दुर्लक्षित वर्गाला ‘झुंड’ म्हणून हिणवू नका, टीम म्हणा, हे ठणकावून सांगणार्‍या या सिनेमाची एवढी चर्चा व्हावी असे त्यात काय आहे याचा हा सांगोपांग आढावा!

ज्या ठिकाणी अमिताभ्सारखा महानायक, फुटबॉल टीम आणि नागराज मंजुळे एकत्र येतात, त्या ठिकाणी कथानकाचा विषय, आशय, अवकाश आणि शेवट हे प्रेडिक्टेबल होऊन जाते. ज्यांनी नागराजचे ‘पिस्तुल्या’, ‘फॅन्ड्री’ आणि ‘सैराट’ पाहिलेत त्यांना त्याला अभिप्रेत असणारे राजकीय-सामाजिक स्टेटमेंट चांगल्याच परिचयाचे आहे. ते सगळे घटक ‘झुंड’मध्ये ठसठशीतपणे एकत्र येत पुनःपुन्हा दर्शवले गेले आहेत.
मग या चित्रपटात मला काय वेगळे दिसले? तर ‘फॅन्ड्री’ आणि ‘सैराट’मधल्या केंद्रीय व्यक्तिरेखा सामाजिक बदलाच्या दिशेने निघाल्या, पण त्यांनी निकराचा लढा देऊनही प्रस्थापित व्यवस्थेच्या कोंडीतून बाहेर पडता आले नाही, त्यांना पडू दिले गेले नाही. पण ‘झुंड’मधले डॉन, एंजल, जेरी, बाबा, मोनिका, रजिया हे सारे शोषित-वंचितांचे प्रतिनिधी त्या बंदिवासातून, गुलामगिरीच्या मानसिकतेतून संघर्ष करून, लढा देऊन प्रयत्नपूर्वक निसटतात, त्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेत स्थिरावलेल्या बोराडे सरांचा मदतीचा हात त्यांना मिळतो आणि एकमेकांच्या साथीने सगळेच विजयाच्या दिशेने, स्वातंत्र्याचा, मुक्तीचा श्वास देणार्‍या जगाच्या दिशेने निघतात. मला वाटते नागराजच्या आधीच्या चित्रपटांच्या मानाने ‘झुंड’चे हे महत्वाचे वेगळेपण आहे. या सकारात्मकतेसाठी ब्राव्हो, नागराज!
यातली बोराडे सरांची भूमिका बिग बीसाठी अगदी टेलर-मेड असल्याने ते ती चोख निभावतात. पण खरे हीरो आहेत ती ‘झुंड’मधली टपोरी पोरं. डॉन, एंजल, जेरी, बाबा, रजिया… असे एकाहून एक अस्सल नग नागराजने कुठून शोधले कुणास ठाऊक, पण कालपर्यंत कुणीच नसणारी ही पोरं अमिताभसमोर ज्या आत्मविश्वासानं खडी ठाकलीत ते थोरच आहे. यातल्या प्रत्येकाची व्यक्तिरेखा ठळक वेगळ्या पार्श्वभूमीची, त्यांच्या कलर्ड हेयरकट्स, टीशर्ट्स-बर्म्युडा, गळ्या-हातातल्या चेन्सपर्यंत वेगळी आहे, त्यांच्या तोंडी असणारी भाषा बंबईया वाटली तरी त्यांच्या त्यांच्या बोलीभाषेतले संस्कार घेऊन येत या व्यक्तिरेखेचे वेगळेपण ठळक करते. कचरा वेचणार्‍यांचे, रेल्वे वॅगनमधून कोळसा चोरणार्‍यांचे, साखळ्या खेचणार्‍यांचे, मोबाइल उडवणार्‍यांचे, दुकाने तोडत दंगा करणार्‍यांचे, गर्द-गांजा ओढत महानगरीच्या अंडरबेलीत जगणार्‍यांचे हे दचकवणारे जग आहे. नागराजचे यांच्यावर मनापासून प्रेम आहे. त्याने या प्रत्येक व्यक्तिरेखेत आपला जीव कसा ओतला आहे ते दिसत राहते. यातलं दोन फूट उंचीचं, सोनेरी जुल्फे डोळ्यांवर घेऊन प्रत्येक कामात पुढे असणारं ते लेकरू थोरच आहे. सात फूट उंचीच्या महानायकापुढे ते दोन फूट उंच फाटकं लेकरू कस्स्ल्या जिगरनं खडं ठाकतं, बिंधास डायलॉग टाकतं, इट्स मॅजिक… ते धन्य आहे. आणि यातला डॉन… ओहोहो…
बहिणींनो, मराठी चित्रपटात अजिबातच नसलेल्या टॉल, डार्क, हँडसम हीरोचा तुमचा फुकाचा शोध आता संपला आहे. ‘झुंड’मधल्या डॉनचा सावळा रंग, रेखीव चेहरा, उंची, देहबोलीतला आत्मविश्वास आणि पराकोटीचा स्वॅग हे रसायन तुफान भन्नाट आहे. तेव्हा निदान त्याच्या बोलक्या डोळ्यांसाठी तरी चित्रपट बघायला लवकर पळा. छाया कदम आणि किशोर कदम यांना इथे फारसा वाव नाही. किशोर तेवढ्या अवकाशातही त्याचे काम चोख करून जातो पण छायाताईंसारखी क्षमता असणारी अभिनेत्री इथे काय करते? या व्यक्तिरेखेचे नाव काय? तिचे या घरातले नेमके स्थान कोणते सगळेच अधांतरी आहे, त्यामुळे या व्यक्तिरेखेवर आणि छायाताईंवर अन्यायच झाला आहे असे मला वाटते. तसेच आकाश ठोसर नेमका कोण आहे? तो या मुलांच्या मागे का आहे? या मागे त्याच्या डीएनएमध्ये पिढ्यानपिढ्या रुजलेला जातीधर्माचा अहंकार आहे की या मुलांनी तोडलेल्या दुकानाचा तो मालक असल्याने बदला घेऊ पाहतोय? काहीच स्पष्ट होत नाही. अशा अनेक त्रुटी इथे खूप ठळकपणे जाणवतात.
या बाजू असल्या तरी यातल्या शॉट सिलेक्शनला आणि हॉलिवुडी कलर पॅलेटला दाद द्यायला हवी. चित्रपट तीन तास अवधीचा, मध्ये काही क्षण डलनेस भासतो, पटकथेतल्या काही गोष्टी पटतात, काही पटत नाहीत तरी यातल्या गड्डी-गोदाम टीममधल्या व्यक्तिरेखांचा आलेख आणि दृश्यात्मकता खिळवून ठेवते. ही टीम पुढे जिंकली की हरली हा प्रश्न इथे उरत नाही. एके काळी बहिष्कृत असणार्‍या या मुलांनी हिंसेचा मार्ग सोडला, चोर्‍या-लूट सोडली, व्यसने सोडली, ती एका व्यवस्थेत प्रवेश करती झाली, त्यांना त्यांचे स्वत्व गवसले आणि मुलामुलींची टीम बनून ती सामूहिक विजयाच्या दिशेने निघाली इथेच त्यांनी सगळे जिंकलेले असते.
तेव्हा नक्की बघा, नागराज पोपटराव मंजुळे यांचा ‘झुंड’!

– यशोधरा काटकर

Previous Post

ही आगळीक किती काळ सहन करायची?

Next Post

व्यापक वैश्विक, सामाजिक विधान!

Next Post

व्यापक वैश्विक, सामाजिक विधान!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.