सर्वांगसुंदर आणि संग्राह्य लतादीदी विशेष ‘मार्मिक’
‘मार्मिक’चा दि. १२ फेब्रुवारी २०२२चा अंक संग्राह्य झाला असून त्यातील लता मंगेशकर यांच्यावरील एकेक लेख फारच वाचनीय असे आहेत. विशेषत: हेमंत कोठीकर यांनी विविध पुस्तकांतून नेमकी माहिती निवडून लतादीदींच्या ९२ अनोख्या गोष्टी फारच उत्तम रीतीने सादर केल्या आहे. त्यांचे खास अभिनंदन!
लतादीदींचे पूर्वीचे ‘हेमा हर्डीकर’ हे नाव, १९४२मधील पहिली मंगळागौर यात गायलेले पहिले गाणे, गावस्कर-सचिन हे त्यांचे आवडते क्रिकेटपटू, १९६० साली प्रभूकुंज येथे राहायला येणे, २१०० हिंदी चित्रपटांतील गायन, १७५ संगीतकारांकडे गायलेली गाणी सारीच माहिती संग्राह्य आहे. २५० गीतकारांची गीते त्यांनी गायली. दीदींनी ३६ भारतीय भाषांत गाणी गायली. तसेच डच, फिजिएन, रशियन, स्वाहिली व इंग्रजीतही त्यांनी गाणी गायली. इ. एकेक नेमकी माहिती कोठीकर यांच्या लेखाद्वारे मिळते. ९० गीतकार, ९० संगीतकार, ९० अभिनेत्री नि एकच आवाज हा पं. युधामन्यू गद्रे यांचा लेखही वाचनीय आहे. ‘आनंदघन’ या नावाने दीदींनी संगीत दिल्याचा पं. हृदयनाथ मंगेशकरांचा लेख छान झालाय. प्रभाकर वाईरकर यांनी रेखाटलेले उत्तम चित्र, तसेच मुखपृष्ठावरील दीदींचे तंबोरा घेतलेले चित्र गौरव सर्जेराव यांनीही छान पेश करून हा अंक सजवला आहे. ‘देव नाही देव्हार्यात’ या नेमक्या शीर्षकाने सजलेला वैâ. रमेश देव यांच्यावरील पुरुषोत्तम बेर्डे यांचाही लेख छान झालाय.
‘हे मृत्यो तू हरलास’ हे संपादकीयही छान! एकूणच, हा साराच अंक जपून संग्रही ठेवावा असाच सजला आहे. आकर्षक छपाई, शुभ्र पाने नि विविध लेखांनी नटलेले ‘मार्मिक’चे गुरुवारचे अंक दोन दिवसांतच हातोहात संपतात ही तुमची जादू आहे.
‘मार्मिक’मध्ये १९७३ ते १९८३पर्यंत माझ्याही कविता, वात्रटिका सातत्याने प्रसिद्ध झाल्या आहेत. बाळासाहेबांनी माझ्या पाठीवर थाप मारून शाबासकीही दिली आहे.
– भालचंद्र केशव गन्द्रे, ठाणे
अभिनंदन गौरव सर्जेराव
मार्मिकचे मुखपृष्ठ रेखाटणारे व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव यांनी एसटी महामंडळाच्या संपाच्या संदर्भात काढलेले मुखपृष्ठ समयसूचक होते आणि मनाला स्पर्शून गेले. त्यांचे खास अभिनंदन.
– सुरेश आ. लाड, परळ
सॅबी परेरांनी हसवले…
मार्मिकतेला कुठेही ठेच न लावता मानवी मनाच्या मर्मभावनेला मिश्कीलपणे मांडून, मनातल्या मनात लहानथोरांना हसायला भाग पाडणारा ‘ती सध्या काय करते?’ हा सॅबी परेरा यांचा लेख खूप हसवून गेला. ती सध्या त्यांचेच आडनाव लावून मिरवते याचे समाधानही वाटले.
– आशा गोन्सालवीस
हम आपके हैं कौन
ती सध्या काय करते? ही ओळ व्हॅलेंंटाईन डेच्या दिवशी अनेकांना आठवणारी, आठवणीतील ओळ. जीवनातील एखादी घालमेल झालेली व्यक्ती तशीच दुःखीच असणार. पण आपला लेख ती सध्या काय करते ऐवजी ‘हम आपके हैं कौन’ असे सांगून जाते.
प्रेमी प्रेमिकांचा संदर्भ देताना वासू-सपना या जोडगोळीमुळे हा जागतिक स्तरावर साजरा होणारा उत्सव थेट गल्लीत थडकतो आणि आपसूक सामान्य वाचकास ती सध्या काय करत असेल असा भास उत्पन्न करण्यास प्रवृत्त करतो.
पूर्वी ब्रेकअपनंतर मद्याच्या आहारी जाणारा देवदास आता न राहता, तो आता थेट लग्नमंडपात ढेकर येईपर्यंत भरपेट जेवतो हे एकदम फिट बसते. दोन गायकांच्या गाण्यातून तुलना करत लेखाला दिलेली दर्दभरी फोडणी लज्जतदार आहे. नकार देताना मोबाईल रेंजचे कारण तर मार्मिकपणे दिले आहे.
शेवटी खरोखरीच क्रश असणारी दुर्लक्ष करते असे जरी आभासी वाटत असले तरी तिच्याही कोपर्यात ‘हम आपके दिल में रहते हैं’ अशी अवस्था या दिवसांत होत असतेच.
– संदीप रॉड्रिक्स
अप्रतिम लेख
व्हॅलेंटाईन डेवर बेतलेला सॅबी परेरा यांचा लेख अप्रतिम होता. लेखकांना आणि मार्मिकला खूप खूप धन्यवाद.
– व्हरजिना मोट