□ फुकट्या रेल्वेप्रवाशांची संख्या वाढली. नऊ महिन्यांत १.७८ लाख लोकांना विनातिकीट पकडले.
■ मग न पकडले गेलेले किती असतील? लसीचे दोन डोस झालेल्यांना प्रवास करता येणार, याचा वेगळाच अर्थ घेतलेला दिसतोय यांनी.
□ माझी आई शहिदाची पत्नी आहे. तिच्याबद्दल असे बोलणे शोभत नाही. : प्रियंका गांधी यांचा भाजपवर हल्लाबोल
■ अहो, त्यांना मनाची कधी नव्हतीच, सत्ता हातात आल्यापासून जनाचीही सोडलेली आहे.
□ चीनच्या शाळांमध्ये आता राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या विचारांचे धडे. त्यासाठी शाळांत राजकीय आयुक्तांची नेमणूक.
■ नाहीतरी बाकीचं सगळं शिकून उपयोग काय देशात? सकाळ दुपार संध्याकाळ वा जिनपिंग जी वा, काय मास्टरस्ट्रोक मारला आहात, हेच तर म्हणायचं आहे ना?
□ लालूप्रसाद यादव पाच वर्षे जेलयात्रेवर
■ चारापुरुष ठरले बिचारे… अर्थात ते कशाची शिक्षा भोगत आहेत, हे देशातला बच्चा बच्चा जाणतो.
□ पाकिस्तान बेहाल, भुकेकंगाल, मात्र सैन्य अधिकारी, नेते मालामाल. स्विस बँकेतील ६०० खात्यांचा पर्दाफाश
■ शेजारी राष्ट्राचा द्वेष यावरच उभारलेल्या धर्मांध राष्ट्राचं काय होतं, याचं ते जिवंत उदाहरण आहे. आपण काही शिकलो त्यांना पाहून, तरच अर्थ.
□ बँकांनी ग्राहकाभिमुख बनावे – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आवाहन
■ तुम्ही कधी लोकाभिमुख बनणार आणि त्यांची लूट थांबवणार? महागाई, बेरोजगारीतून त्यांची सुटका कधी करणार? लोकां सांगे… सोपं आहे…
□ सुडाचे राजकारण म्हणजे हिंदुत्व नाही – शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
■ भारतीय जनता पक्षाला सुडाशिवाय दुसरं काही माहिती नाही, त्यांचं भोंदुत्व हळुहळू उघडे पडते आहे.
□ हाँगकाँगमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक. रुग्णालये हाऊसफुल्ल
■ अरे देवा, कोणीतरी किंगकाँगला बोलावून या विषाणूला तिथेच थांबवा.
□ विरारमध्ये गुजराती समाजातर्पेâ आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमात गुजराती गायिकेवर पैसे उधळणार्या जमसमुदायाचा व्हिडीओ व्हायरल
■ आता उधळण्याइतके पैसे त्यांच्याकडेच राहिले आहेत…
□ मानवतेचे जातीवरून विभाजन नको – राष्ट्रपती रामनाथ कोविंद
■ धर्मावरून चालेल का कोविंदजी? आणि पक्षावरून?
□ १३ ते १५ वर्षांच्या मुलांमध्ये तंबाखूसेवन वाढले…
■ चुकीच्या गोष्टी सगळेच लवकर शिकतात. काय उपयोग होतो कॅन्सरच्या जाहिराती दाखवून?
□ घटस्फोट घेतल्यानंतर माघार घेता येणार नाही – हायकोर्टाचा निर्वाळा
■ बरोबर, भातुकलीचा खेळ आहे का तो?
□ ट्रम्पमुळे पसरलेला कोरोना कसा विसराल?- भाई जगताप यांचा सवाल
■ अहो तो बुद्धीने भाऊ लागतो यांचा. त्याला कसं नाव ठेवता?
□ बदनामी थांबवा, नाहीतर आम्हालाही जिवाचे बरेवाईट करावे लागेल – दिशा सालियनच्या आईचा टाहो. दिशाची हत्या झाल्याचा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला होता आरोप
■ सत्तातुराणां न भयम् ना लज्जा…
□ निवडणुकीनंतर नितीशकुमार एनडीएतून बाहेर पडण्याचा विचार करत आहेत…
■ कोणा गुरुजींनी मुहूर्त दिला आहे का? शुभकार्यात उशीर कशाला?
□ हक्काचं घर विकून मुंबई सोडून जाऊ नका! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मुंबईकरांना आवाहन
■ जीवनाचा संघर्ष सर्वसामान्यांच्या आटोक्याबाहेर जाऊ लागला आहे साहेब, नाहीतर मुंबा आईला सोडून कोण आनंदाने जाईल हो!
□ बुद्धिबळ स्पर्धेत जगज्जेता कार्लसनला हरवले म्हणजे मी असामान्य खेळाडू ठरत नाही. – मोठ्या यशानंतरही १६ वर्षीय प्रज्ञानंदचे पाय जमिनीवरच
■ त्याच्याइतकी अक्कल आपल्या काही पुढार्यांमध्ये असती, तर देशही जगज्जेता ठरला असता.
□ पूर्वसुरींनी शास्त्रीय संगीत अवघड करून ठेवले आहे. त्यातील नको असलेले शास्त्र काढून काळानुरूप बदलले पाहिजे – किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे मत
■ या मताचे स्वागत. काळानुरूप बदलते, तेच टिकते.
□ भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याविरुद्ध भाजपमध्ये कुरबुरी. दोन गट अस्वस्थ. मराठी मतदारांची सहानुभूती गमावण्याची भीती
■ भीती?… कधीच गमावलीत ती. शिवसेनेमुळे तुम्हाला किंमत होती. महापालिका निवडणुकीत मराठी माणसं कशी दशा करुन ठेवतात बघा तुम्ही.
□ बलात्कारी ‘डेरा’ प्रमुखाला झेड प्लस सुरक्षा देण्याबाबत अहवाल. अट्टल गुन्हेगार नसल्याचा हरयाणा सरकारचा दावा
■ नाहीतर काय हो! बलात्कार, खून हे काय कुणाला तुरुंगात ठेवण्यायोग्य अपराध आहेत का?
□ वानखेडे यांची याचिका तातडीने आलीच कशी? उच्च न्यायालयाचा संताप. व्यवस्था प्रभावी व्यक्तींसाठी आहे का? आज सुनावणी घेतली नाही तर आकाश कोसळणार आहे का?
■ अहो, ते सगळे आकाशातून पडलेले आहेत, याची तुम्हाला कल्पना नाही का?
□ भाजप सर्वांनाच नकोसा झाल्याने पक्ष एकत्र आहे – नाना पटोले
■ तो जनतेलाही नकोसा झाला आहे… विरोधकांनी अवसानघात केला नाही तर कमळ मूळ जागी पोहोचवणार देशाची जनता.
□ आयपीएल लिलाव प्रक्रिया ही जनावरासारखी वाटते – क्रिकेटपटू रॉबिन उत्थप्पा
■ यावेळी बोली लागली नाही का रे दादा तुझ्यावर?