डॉ. मनमोहन सिंग
आतापर्यंत गप्प होतो
आता मात्र राहवत नाही
देश चालला अधोगतीला
उघड्या डोळ्याने पाहवत नाही
कसली यांची विदेश नीती
गळाभेट नि मस्त बिर्याणी
चीन सीमेवर चालला घुसत
दिसत असून हे अडाणी
नेहरूंना जिम्मेदार धरून
तुमची पापे लपत नाहीत
रामनामाचे ढोंग करून
लोकही मते देत नाहीत
अमित शहा
आपल्याच बांधवांचे घोटाळे
बुडाखाली झाकून ठेवून
त्याचे काम करतो सोपे
जातात गुपचूप विदेशी पळून
विजय मल्ल्या सोडला तर
बाकी सत्तावीस गुजराती भाई
दहा ट्रिलियन लुटून नेले
देश लुटण्याची होती घाई
गुजरातला का करता बदनाम
फाफडा खात बसा गुपचूप
महाराष्ट्राने आणला कोरोना
शोध मोदींचा त्यात काय चूक?
किरीट सोमय्या
नाव माझे किरीट सोमय्या
रोज करतो ता ता थैय्या
बोंबलून बोंबलून घसा बसला
कधी तोंडातून येते अय्या
इडीने धरला मला हाताशी
सोडतात कुठेही घेण्यास चावा
गळ्यात पट्टा घालून सोन्याचा
दिल्लीवाल्यांचा हा तर कावा
मी सोयीस्कर घेतो चावे
राणे-घोटाळा दाबून ठेवतो
तेव्हा काढली अंडीपिल्ली
आता फक्त उबवत बसतो
अमृता फडणवीस
ट्विटरवर मी नेहमीच असते
माणसाने चर्चेत असायलाच हवे
वडाची शेंडी पिंपळाला लावून
वादविवादही रंगतात नवे
मी आहे उत्तम सुगरण
बर्याचजणांना ठाऊक नाही
केले वडे नि आले पहिली
चॅनलवाल्यांना झाली घाई
घरी केलेल्या पुरणपोळ्या
पतीराज खातात निमुटपणे
एकावेळेला पस्तीस रिचवतात
उभी असते घेऊन लाटणे
राज्यपाल कोश्यारी
करायचे ते करून झाले
सध्या मी तर शांत असतो
हिरवळीवर मोर नाचतात
त्यांचे पिसारे पहात बसतो
भाजप नेते रोज येतात
हवापाण्याच्या गप्पा करतात
काळजी घ्या, सांगून मला
नवीन बातम्या विचारून जातात
मुदत संपत येत चालली
याची आठवण करून देतात
`असे राज्यपाल झाले नाही’
पुस्तक लिहिण्याची शपथ घेतात