□ काँग्रेसने महाराष्ट्रातून उत्तर प्रदेश आणि बिहारसाठी मजुरांनी भरलेल्या ट्रेन पाठवल्यामुळेच देशात कोरोना पसरला : पंतप्रधान नरेंद्र मोदी
■ रेल्वे खाते केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे की राज्य सरकारच्या? आणि हे घडले तेव्हा आम्ही कसे मजुरांचे हितकर्ते आहोत, असे बॅनर आपल्या प्रसिद्धीलोलुप पक्षाने झळकवली होती ती कशासाठी? लोकांना मूर्ख बनवण्याच्या हातोटीलाही मर्यादा असतात मोदीजी!
□ धर्मसंसदेतील वक्तव्यांचा हिंदुत्वाशी संबंध नाही : सरसंघचालक मोहन भागवत
■ मग मोदींना सांगून भडकावू भाषणं करणार्यांना जेरबंद करा, अद्दल घडवा!
□ मोदींची भाषा पंतप्रधानपदाला शोभणारी नाही : बाळासाहेब थोरात यांची टीका
■ ते संसदेतही देशाचे पंतप्रधान कमी आणि पक्षाचे स्टार प्रचारक जास्त असतात!
□ आता पाकिटाऐवजी मोबाइलमध्ये ठेवा पैसे, पुढच्या वर्षी येणार डिजिटल रुपया!
■ या सरकारचा एकंदर आर्थिक कारभार पाहता, डिजिटल पैसे तयार होण्याआधी डिजिटल पाकीटमार तयार झालेले असतील!
□ गंगेत किती मृतदेह सापडले, सरकारकडे आकडेवारी नाही.
■ देशात गरीब किती, किती असंघटित मजूर मेले, किती शेतकरी मेले, यांच्याकडे कसलीच आकडेवारी नसते म्हणून या सरकारला नो डेटा अॅव्हेलेबल (एनडीए) सरकार म्हणतात.
□ ये पब्लिक है, ये सब जानती है, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील यांची किरीट सोमय्या यांच्यावर टीका
■ कधी कधी पब्लिकचा राग अनावर कसा होतो, तेही सोमय्या यांना कळलं आहे आता…
□ रामदास आठवले यांनी दलित पँथरची काळजी करू नये, एवढ्या मोठ्या पदावर पोहोचल्यावर त्यांना पँथर का आठवते आहे? : मल्लिका ढसाळ यांचा सवाल
■ देशातले वारे फिरायला लागले, वातकुक्कुटही फिरणारच ना!
□ पंतप्रधान राज्यांमध्ये द्वेष का पसरवत आहेत? सुप्रिया सुळे यांचा प्रश्न
■ त्याशिवाय त्यांना केंद्रात राज्य कसे करता येणार?
□ पीएम केअर्स फंडात जमा झाले १० हजार कोटींपेक्षा अधिक, खर्च झाले चार हजार कोटींपेक्षा कमी, ६४ टक्के निधीचा वापरच नाही
■ लोक ऑक्सिजनअभावी तडफडून मरत होते, तेव्हा पंतप्रधानांची काळजी फंडात निपचीत पडून होती, याची नोंद इतिहास घेईलच.
□ महाराष्ट्रात राज्यपालांची लहर म्हणून खासगी सचिवपदी निवृत्त अधिकारी
■ राजभवनाचे ‘लोक’भवन बनवले ते हे असे.
□ …तर कितीतरी मजूर भुकेने मेले असते, कोरोनाकाळात मजुरांना गावी नेण्यासाठी पुढाकार घेणारा अभिनेता सोनू सूद याचा पंतप्रधानांच्या विधानावर हल्लाबोल
■ सामान्यजन मेले, शेतकरी-मजूर मेले तर त्याचं काय एवढं कौतुक! ते काय सेलिब्रिटी आहेत का आपल्या पंतप्रधानांनी दखल घ्यायला?
□ २०४७मध्ये भारत जगातला सर्वात विकसित देश असणार : अर्थमंत्री निर्मला सीतारामन
■ हे एकतर १९४७मध्ये तरी अडकलेले असतात नाहीतर २०४७च्या लोणकढ्या तरी मारत असतात- अरे आज काय करताय ते बोला! तुमचा तेवढाच संबंध आहे.
□ वर्षभरात मसाले ७१ टक्क्यांनी महाग
■ सगळा ‘मसाला’ मोदी आणि त्यांचे सहकारी पचपचीत कारभाराला ‘चव’ आणण्यासाठी वापरतायत, आपल्याला महागच मिळणार!