संज्या छाया हे एक आशयसंपन्न नाटक घेऊन लेखक प्रशांत दळवी आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी ही मराठी रंगभूमीवरची यशस्वी जोडी पुन्हा प्रेक्षकांसमोर आलेली आहे. या नाटकाची निर्मिती, जिगिषा आणि अष्टविनायक यांची असून, नेपथ्य प्रदीप मुळे व पार्श्वसंगीत पुरुषोत्तम बेर्डे यांनी केले आहे. प्रमुख भूमिकेत निर्मिती सावंत आणि वैभव मांगले हे आहेत.
दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी म्हणाले, ‘प्रशांत दळवी लागोपाठ नाटकांचा रतिब घालत नाही. त्याच्या डोक्यात एखादं कथानक असेल तर त्याचं पूर्णपणे मनन-चिंतन झाल्याशिवाय तो ते कागदावर उतरवत नाही. नाटकाच्या रचनेचा, आकृतिबंधाचा त्याचा अभ्यास आहे आणि त्याचा-माझा एकत्र नाट्यप्रवास आहे. त्याने लिहिलेली सगळी नाटकं मी दिग्दर्शित केली आहेत. तो काळाबरोबर-वयाबरोबर वाढत जाणारी, जाण आणि भान नाटकांमधून नोंदवतो, हे त्याचं वैशिष्ट्य. आपण वैयक्तिक, कौटुंबिक अडचणी, स्वतःचं वय, शारीरिक वैगुण्य यांच्यात गुंतून जीवनाची समरसता हरवून बसतो. गेले ते दिन गेले असं म्हणून चाकोरीबद्ध, निराश आयुष्य जगत असतो. तुम्ही नवीन विचार करून, नवा प्रयोग केलात आयुष्यात तर तुम्हीही सुखी होता आणि तुमच्यातल्या या सकारात्मक बदलाने आजूबाजूच्या माणसांचंही आयुष्य बदलतं. त्यांच्यात होणारा चांगला बदल पाहून तुम्हाला जगण्याचा उद्देश मिळू शकतो, हे या नाटकाचं सूत्र आहे. ‘आपल्या जगण्याचा नेमका हेतू काय’ हा प्रश्न हे नाटक विचारतंय. या नाटकात काम करणार्या प्रत्येकाची स्वतंत्र ओळख आहे आणि प्रेक्षकांमध्ये त्यांच्या कामाविषयी प्रेम, आपुलकी आणि विश्वासार्हता आहे. या सगळ्याची बेरीज आणि गुणाकार व्हावा ही अपेक्षा आहे.
कुलकर्णी म्हणाले, या नाटकातल्या एका पात्राचं एक वाक्य आहे, ‘मी आयुष्यातून हे शिकलो की काहीतरी चागलं होण्यासाठी वाईट झालं पाहिजे ही भावना मनातून काढून टाकली पाहिजे.’ प्रत्येक वेळेला मोठा झटका बसल्यावर सुधारण्यापेक्षा थोडं आधीच समजून उमजून गोष्टी बदलायला हव्यात. व्यक्तीपुरता विचार न करणारी एक सामाजिक जाणीव या नाटकातून चांगल्या पद्धतीनं मांडलेली आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांना यातील कोणतं ना कोणतं पात्र आपलं वाटणारं आहे, त्याला भिडणारं आहे. हे नाटक पाहिल्यावर घरी जाताना प्रेक्षक या नाटकातून काही ना काहीतरी पॉझिटिव्ह विचार घेऊन जाणार आहे.
या नाटकाचे निर्माते दिलीप जाधव व श्रीपाद पद्माकर म्हणाले की हे नाटक कोविडमुळे दोन वर्षं उशिराच तुमच्यासमोर आणत आहोत, ५० टक्के प्रेक्षकसंख्येच्या मर्यादेमुळे खरं तर उत्पन्न घटलं आहे. प्रत्येक प्रयोग हाऊसफुल्ल होईलच अशी खात्री कोणत्याही नाटकाची देता येत नाही. पण हे नाटक वाचल्यावर ते खूप आवडलं व ते आपणच करायचं असं ठरवलं होतं. आमच्या नाट्यसंस्थेने उत्तम निर्मितीमूल्यं असलेल्या अनेक नाटकांचे प्रयोग सातत्याने केले आहेत. केवळ मुंबई पुणे नाशिक या पट्ट्यात नाटक न करता, संपूर्ण महाराष्ट्रात फिरून आम्ही प्रयोग करत असतो. तब्बल आठ वर्षांनी चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रशांत दळवी हे दोघं एकत्र येत आहेत. या दोघांची कलाकृती पाहायला रसिक प्रेक्षक नक्कीच गर्दी करतील याचा विश्वास वाटतो.
अभिनेते आणि ‘मार्मिक’च्या ‘नया है वह’चे स्टार वैभव मांगले म्हणाले, या नाटकातून तरुण मुलांसाठी आम्ही त्यांच्या भविष्याचं ताट वाढून आणणार आहोत तर ज्येष्ठांसाठी वर्तमान. माणसाच्या जगण्यातील पॉझिटिव्हिटी दाखवताना, आपल्या आयुष्यात फक्त पैसा महत्वाचा नसून माणसंही महत्वाची असतात, ही गोष्ट हे नाटक उलगडून दाखवतं. ‘हॅपी गो लकी’ व्यक्तिमत्व असलेली व्यक्तिरेखा मी या नाटकात साकारत आहे. मी कधीही हिरोटाईप भूमिकांच्या मागे लागलो नाही. माझ्यासाठी नाटकाची कथा जास्त महत्वाची असते, वाडा चिरेबंदीमधील व्यक्तिरेखा असेल किंवा ‘अलबत्या गलबत्या’मधील चेटकीण असेल, मी नेहमीच वेगळ्या प्रकारच्या भूमिकांना प्राधान्य दिलं आहे. या नाटकात मी आणि निर्मिती सावंत पहिल्यांदाच रंगमंचावर एकत्र काम करतोय.
निर्मिती सावंत म्हणाल्या, मी ही भूमिका या नाटकाच्या लेखनामुळे स्वीकारली. या नाटकाचा आशय, त्याचे संवाद, त्यातून प्रेक्षकांना दिला जाणारा संदेश हे खूप आवडलं आणि हे सगळं आपण अभिनयातून लोकांपर्यत पोहचवू शकतो, याचं माध्यम होऊ शकतो, म्हणून मी हे नाटक स्वीकारलं. दोन पिढ्यांना आवडेल असा एक वेगळा विचार हे नाटक देऊन जाईल. नाटक स्वीकारताना कोणताही कलाकार भूमिका पाहतो. हे नाटक मात्र लोकांना आवडेल अशी खात्री पटल्यामुळे स्वीकारले आहे. माझी भूमिका केवळ विनोदी नाही तर मनोरंजनासोबत एक विचार मांडणारी आहे, अनेक दिवसांनी अशी आव्हानात्मक भूमिका माझ्या वाट्याला आली आहे.