५२-५३ सालापासून ते थेट ८०च्या दशकापर्यंत हिंदी, मराठीच नाही तर गुजराथी, पंजाबी, बंगाली, आसामी, उडिया, उर्दू, भोजपुरी, छत्तीसगढी, कानडी, गुरुमुखी अशा एकूण १३ भाषांमध्ये अनेक प्रकारची गाणी गाऊन सुमन कल्याणपूर यांनी आपलं सुरेल अस्तित्व रसिकांच्या मनात आजही दरळवत ठेवलं आहे.
लहानपणी रेडियोवर त्यांची मराठी-हिंदी भावगीतं, भक्तिगीतं बर्याचदा ऐकायला मिळत असत, मात्र काही गाणी अशीही आहेत जी फारच कमी ऐकली जातात किंवा लोकांना माहितही नाहीत, अशी वेगवेगळ्या ढंगातली गाणी, इतर भाषिक गाणी आणि त्यासंदर्भात घडलेले अनोखे किस्से यावर आधारित ‘दिल की आवाज है तू’ हा कार्यक्रम दर शुक्रवारी रात्री ९ वाजता ऑनलाईन सादर होतो. या कार्यक्रमाचे सादरकर्ते अतुल अरुण दाते सांगतात, लता मंगेशकर, आशा भोसले या ज्येष्ठ गायिकांप्रमाणेच रसिक सुमन कल्याणपूर यांनी गायलेली गाणीही आवर्जून ऐकतात. त्यांचाही एक वेगळा चाहता वर्ग आहे. सुमनताईंची बरीच गाणी लोकप्रिय असली तरी काही गाणी फारच कमी लोकांना माहीत आहेत, ती गाणी लोकांपर्यंत विशेषत: तरुण पिढीपर्यंत पोहोचावीत, तरुण रसिकांपर्यंतही त्यांच्या रसिल्या गाण्यांची जादू पोहोचावी, या विचाराने त्यांच्या गाण्यांवर आधारित कार्यक्रम सुरू केला. अरुण दाते कला अकादमीतर्फे घेण्यात आलेल्या भावगीत गायन स्पर्धेत प्रथम निवडून आलेल्या औरंगाबादच्या गायिका वर्षा जोशी यांची कार्यक्रमाच्या सादरीकरणाकरिता आम्ही निवड केली आहे.
त्या म्हणाल्या, लहानपणापासून सुमनताईंची गाणी रेडियोवर ऐकत होते, पण कार्यक्रमाच्या निमित्ताने विशेष अभ्यास करण्याची संधी मिळाली. त्यांच्या गाण्यांचे संगीतकार, गीतकार कोण आहेत? कोणती गाणी मला गाण्याकरिता झेपतील यावर विचार, चर्चा, अभ्यास करून गाण्यांची निवड आम्ही केली असून यामध्ये त्यांनी गायलेले सोलो, ड्युएट गाणी, गझल, चित्रपटगीतं असे सगळ्या गीतप्रकारांसह आम्ही २५ गाण्यांची निवड केली आहे. मी गायलेल्या गाण्यातून त्यांच्या चाहत्या वर्गाला सांगीतिकदृष्ट्या धक्का लागणार नाही, त्यांच्या गाण्याचा अवमान होणार नाही, अशा पद्धतीने गाण्याचा प्रयत्न केला आहे.
कलाकार म्हणून सुमन कल्याणपूर यांचे कोणते गुण भावतात या प्रश्नाला उत्तर देताना गायिका वर्षा जोशी म्हणाल्या की, गीतरचनेचा कोणताही प्रकार सुमनताईंच्या गळ्याने सहज पेलला आहे. माझ्या वडिलांच्या पिढीने सुमनताईंची गाणी रेडियोवर ऐकलेली होती. त्यांच्या गाण्यांची सौंदर्य स्थळं हा आनंदाचा खेळ आहे. या त्यांच्या गुणवैशिष्ट्यांमुळेच त्यांच्याविषयी रसिकांच्या मनात आजही आदराचं आणि प्रेमाचं स्थान निर्माण केलं आहे. त्यांचा साधेपणा मनाला भावतो शिवाय त्या प्रसिद्धीपासून कायम दूर आहेत, ही त्यांची गुणवैशिष्ट्ये मनाला भावतात.
उच्चारांमध्ये दडलंय ‘सौंदर्य’
सुमनताईंच्या आवाजातले बारकावे, त्यांच्या गाण्यातील भावना, शब्दांचे उच्चार, शब्दांमधील चढ-उतार अशा पद्धतीने त्यांच्या मूळ गाण्यात कोणत्याही प्रकारचे बदल न करता प्रत्येक गाणं जसंच्या तसं लोकांसमोर सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. सुमनताईंच्या गाण्यांमध्ये त्यांनी केलेल्या उच्चारांमध्ये वाखाणण्याजोगे सौंदर्य आहे. शब्दातील भावना लोकांपर्यंत त्या अलगद पोहोचवतात. या कार्यक्रमाच्या सादरीकरणामुळे एक गायिका म्हणून माझं गाणं समृद्ध होत असून स्वत:मधील गायन कौशल्य विकसित करण्याची संधी या कार्यक्रमामुळे मिळाली आहे, असे त्यांना वाटते.
कार्यक्रमाचे अनोखेपण
हसरत जयपुरी, मजरुह सुलतानपुरी, सबा अफगाणी, एस. डी. बर्मन, शंकर जयकिशन, खय्याम, जानी बाबू कव्वाल, साहीर लुधियान्वी, शैलेंद्र, केदार शर्मा, स्नेहल भाटकर यांनी स्वरबद्ध केलेली ‘यूं ही दिल ने चाहा था’, ‘जो हम पे गुजरती है’, ‘चले जा चले जा चले जा जहां प्यार मिले’, ‘ना तुम हमें जानो’, ‘मेरे मेहबूब न जा’, ‘मेरे संग गा गुनगुना’, ‘हाल ए दिल उनको सुनाना था’, ‘रहे ना रहे हम’, ‘इतने बडे जहां में’ अशी काही हिंदी चित्रपटगीते (फिल्मी), तर कवी प्रदीप, सी. रामचंद्र यांची ‘सावरिया रे अपनी मीरा को’, ‘एरी मैं तो प्रेमदिवानी’ अशी काही भक्तिरसपूर्ण भजनं, तर काही कैफी आजमी, युनुस मलिक, अख्तर, शादाबजी, बाबुल, अंजुम जयपुरी यांची ‘मेरे आसुओं पे नजर न कर’, ‘ओ रे पिया मोरा जिया’, ‘एक आग सी हो दिल मे’, ‘सपने हजार’ या गझल, नॉन फिल्मी गाणी जी आजही ऐकताक्षणी हृदयाला भिडतात. यातली बरीचशी नावे तर आजच्या पिढीला माहितही नसतील. सुमन कल्याणपूर यांनी ६०-७०च्या दशकात संगीतकारांनी रचलेली विविध शैलीतली गाणी गायली आहेत. काही गाणी तर कायमस्वरुपी रसिकांच्या हृदयात विराजमान आहेत. अशी काही संस्मरणीय, सुमधुर आणि वेगवेगळ्या प्रकारची गाणी ‘दिल की आवाज है तू’ या कार्यक्रमात ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. रसिकांना हा कार्यक्रम ‘वर्षाकिरण’ या यूट्युब चॅनेलवरून दर शुक्रवारी रात्री ९.३० वाजता पाहता येईल. तसेच सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या मराठी गीतांचा आस्वादही रसिकांना याच यूट्युब चॅनेलवर याच वेळेत घेता येईल.