निवृत्तीच्या वयातली विधवा आई आणि घटस्फोट झालेली तरुणाईच्या उंबरठ्यावरली मुलगी. या दोघीजणींचं ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चं नातं. एकाच घरात चौघाजणांना एकत्र जुळवून आणलं तर गाजत असलेल्या मालिकांमधल्या कथानकालाही आरपार करणारं नाट्य रंगभूमीवर घडू शकेल! हाच विचार नाटककाराने पक्का लेखणीत पकडून या नाटकाची सारी भट्टी जमवली आहे. अर्थात ‘अगंबाई सासुबाई’तली आसावरीची क्रेझ डोळ्यासमोर ठेवून सारा संहितेचा खेळ रचला आहे. गेली दोन एक वर्षे शंभरावरल्या एपिसोडमधून घराघरात पोहचलेल्या मालिकेचे आकर्षण महिला रसिकांना आजही आहे. नेमकं हेच इथे हेरलं गेलंय. कुठेतरी आसावरीला प्रत्यक्ष पुन्हा भेटण्याचा सुखद योगायोग जुळविण्याचा प्रयत्न या नाटकात केलेला आहे आणि तो यशस्वीही होतोय. ‘आसावरी’ ते ‘मंजू’ हा प्रवास म्हणजे ‘अग्गबाई अरेच्चा’च!
आदित्य मोडक यांची संहिता आणि नितीन पाटकर यांचं दिग्दर्शन ‘मी, स्वरा आणि ते दोघं!’ या नव्या नाटकाला लाभलेलं आहे. दोघांचं पहिलंच व्यावसायिक नाटक असलं तरी त्यातला सफाईदारपणा नजरेत भरतो. विशेषतः प्रसंगांची मांडणी उत्कंठा वाढविणारी आणि कथानक बंदिस्तपणे पुढे नेणारे आहे. नाटककार-दिग्दर्शक यांच्यात कुठेही नव्याची नवलाई नाही. एका प्रौढ विषयाकडे गंभीरपणे बघताना त्यातल्या नेमक्या जागा हेरून मिश्कीलताही आणली आहे. त्यातून नाट्य हे दोन पिढीची हलकीफुलकी प्रेमकथाच मांडते.
या नाटकाचं कथानक चौकटीबाहेरचं आहे, पण मालिकांच्या भाऊगर्दीमुळे ते आता सर्वांच्याच अंगवळणी पडलंय. मंजुषा एक आई- वय वर्षे पन्नास. विधवा.
कॉलेजच्या काळातला मित्र यश याला ती घरी बोलावते. यशची पत्नी अन्नपूर्णा हिचं निधन झालेलं आहे. तोही तसा एकटाच. दोघेही भूतकाळाला उजाळा देतात. तिची मुलगी स्वरा. तिच्या आयुष्यात यापूर्वी दोन पुरुष आलेले. त्यातल्या मंगेशशी तिचं लग्न आणि नंतर घटस्फोट झालेला. आता तिच्या ऑफिसातला कपिल हा तिला आवडू लागलाय खरा, पण ‘पुरुष सारे बदमाशच!’ हे तिच्या मनात पक्के बसलेले. यात ती निर्णय घेऊ शकत नाही. स्वराची काळजी प्रमाणाबाहेर घेणारी आई मंजू ही मुलीसाठी कपिलला निमंत्रित करते आणि दोघांनी नव्याने संसार करण्याचा बेत रचते. मंजू आणि तिचा प्रियकर यश हा एकीकडे तर दुसरीकडे मुलगी स्वरा आणि तिचा प्रेमवीर कपिल हे चौघेजण एका निर्णायक क्षणी एकाच घरात ‘लिव्ह इन’ ही संकल्पना साकार करतात. पुढलं नाट्य प्रत्यक्ष बघणं उत्तम. शेवटपर्यंत कथानक मांडल्यास रसभंग होण्याचं भय आहे.
बदलत्या सामाजिक परिस्थितीत नैतिकतेचा किंवा जगाचा विचार न करता आनंदी वैयक्तिक स्वायत्ततेतून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’कडे बघणे, काळाची गरज आहे. मुळात लग्न न करता एकत्र राहण्याची ही संकल्पना परकीय. तिला प्रतिष्ठा मिळाली आहे. पण आपल्या देशातील काही कर्मठ मंडळींना हा गुन्हा, अनैतिकता, बेकायदेशीर, व्यभिचार असा वाटतो. आजची जीवनशैली आणि परिस्थितीमुळे याची गरज निर्माण झालीय. दोन्ही परस्परविरुद्ध विचार तसेच बाजू यातील पात्रांच्या चर्चेतून येतात. तरीही हे नाट्य सुदैवाने ‘चर्चानाट्य’ होत नाही. संवादातील खटकेबाजी, भावनाप्रधान क्षण जे काहीदा हसवतात, रडवतात आणि विचार करायलाही भाग पाडतात.
मराठी रंगभूमीवर आजवर महिलांचे विविध प्रश्न मांडून त्याची उत्तरे शोधण्याचाही प्रयत्न झालाय. सई परांजपे यांच्या ‘माझा खेळ मांडू दे’ या नाटकातल्या पद्मिनीचा नवरा परस्त्रीकडे जातो, तर विजय तेंडुलकरांच्या ‘कमला’तली सरिता आणि कमला यांचे प्रश्न बंडखोरीच्या अंगाने जाणारे; जयवंत दळवींच्या ‘महासागर’मधली चंपू, तिचा भावनिक कोंडमारा, दळवींच्याच ‘दुर्गी’तला उतारवयातला पुनर्विवाह, मीना देशपांडे यांचे ‘टेस्ट ट्यूब बेबी’वरले ‘नलू सांगा कुणाची?’ ज्योती म्हापसेकरांचे ‘मुलगी झाली हो’ हे मुक्तनाट्य, प्रशांत दळवी यांचे ‘चार चौघी’, स्वरा मोकाशीचा ‘पत्त्यांचा बंगला’, शेखर ताम्हाणे यांचे ‘सविता दामोदर परांजपे’, शं. ना. नवरे यांचे ‘वर्षाव’, वसंत कानेटकरांचे ‘पंखांला ओढ पावलांची’, रत्नाकर मतकरींचे ‘दुभंग’, दळवींचे ‘पुरुष’ – अशी असंख्य नाटकं येऊन गेली आहेत. त्या त्या काळचे स्त्रियांचे ज्वलंत प्रश्न आणि नव्या आधुनिक जाणीवा मांडण्याचा प्रयत्न त्यांतून झाला. त्याच वाटेवरलं हे नवं नाटक!
या नाटकाचं प्रमुख आकर्षण म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ. उर्वरित आयुष्य मनाप्रमाणे जगण्याचा निर्णय घेणारी आणि मुलीसाठी नवा पर्याय उभा करणारी मंजू त्यांनी तपशिलांसह सहजतेनं साकार केलीय. सुयश टिळक याने दाखवलेली कपिलची घुसमट लक्षवेधी ठरते. त्याची अभिनयाची उत्तम जाण दिसते. रश्मी अनपट हिने स्वराच्या भावविश्वातला हताशपणा ठळकपणे गुंफला आहे. आणि विजय पटवर्धन यांनी यशचा भोळेपणा नेमकेपणाने उभा केला आहे. ‘हक्काचे हशे’ ते वसूल करण्यात करतात. टक्कल लपविण्यासाठी वारंवार केसांवर फिरवलेला हात आणि त्याची लकबही दाद वसूल करते. कलाकारांचे ट्युनिंग उत्तम!
दोन बेडरूम असलेला ब्लॉक नेपथ्यकार संदेश बेंद्रे यांनी देखणा उभारला आहे. त्यातून हालचालींना पुरेसा अवकाश मिळतो. शितल तळपदे यांनी प्रत्येक प्रसंगाचा तसेच बदलाचा विचार करून प्रकाशयोजना केलीय. अन्य तांत्रिक बाजू नाट्याला पूरक आहेत. त्यातून वातावरणनिर्मिती उत्तम होते.
‘लिव्ह इन’चा गंभीर विषय नाटकात मांडला असला तरीही तो प्रेक्षकांच्या गळी उतरवण्यासाठी मिश्कील सादरीकरणाची जोड दिल्याने हे नाटक बाजी मारते!
मी, स्वरा आणि ते दोघं!
लेखक – आदित्य मोडक
दिग्दर्शक – नितीश पाटणकर
संगीत – सारंग कुलकर्णी
नेपथ्य – संदेश बेंद्रे
प्रकाश – शितल तळपदे
निर्माता – चंद्रकांत लोकरे
निर्मिती संस्था – एकदंत क्रिएशन