अरे पूर्वी बजेट ऐकतो की साहित्य संमेलनातले भाषण ऐकतो असे वाटत रहायचे. अरे काय ती शेरोशायरी, हशा-टाळ्या. बजेट सेशन आहे की शेरोशायरीचा मुशायरा आहे असे वाटत रहायचे. सबंध देश ही मैफल ऐकत रहायचा. आमच्या इथल्या साहित्य परिषदेच्या मीटिंगमध्ये तर मराठी कवितेची एकही ओळ अर्थसंकल्पात नसल्याने निषेधाचा ठराव करून तो पोस्टाने केंद्राकडे पाठवायचा असे ठरतेय. सगळा देश नीरस होत चाललाय की काय?
– – –
प्रिय तातूस,
तुला पत्र लिहून खरे तर खूपच दिवस झाले. अरे पण कळवणार तरी काय. रोज बातम्यात इतके लोक बरे झाले, इतके लोक घरी गेले, शाळा चालू होणार आणि शाळा बंद होणार अशा बातम्यांमुळे मी गोंधळूनच गेलो होतो. अरे इतकी धास्ती वाटते की फोनला पण मास्क लावावा की काय वाटते. विज्ञान इतके पुढे गेलेय की आपण ऐकतो त्या मोबाईलमधून पण म्हणे संसर्ग होऊ शकतो. आम्ही दोघांनीही लस घेतली. त्या चर्चेत १५ दिवस निघून गेले. तुमचा नंबर कसा लागला, ताप आला का, यात इतके फोन झाले की करोनाचा विषयच विसरूनच गेलो.
अरे पॉझिटिव्ह की निगेटिव्ह यामध्ये सगळा समाज विभागला गेला. मार्क्सला फक्त आहे रे नाही रे येवढेच समजले होते असं नाना म्हणत होता. नाना खूप मोठ्या लोकांच्या चुका काढतो. पण सोसायटीतच! आमचा खरे तर परदेशात जायचा विचार होता, पण त्या जोकोविचला कसं परत पाठवलं तसं आपल्याला पाठवलं तर काय करायचं? मध्यंतरी इथे ज्येष्ठ नागरिकांतर्पेâ कंटाळा आलेल्या लोकांचे एक संमेलन झाले. त्यात आपापले अनुभव सांगायचे होते, पण सगळ्यांनी कंटाळा कसा आला त्याचेच अनुभव सांगितल्याने घरी परतताना पुन्हा कंटाळाच आला.
ते जाऊदेत, नवीन काय तर बजेट येणार येणार म्हणून मी तर वाट बघत होतो. खरं तर एक महिला बजेट सादर करते याचं हिला काय कौतुक! तिचं म्हणणं घरात काय काय लागतं, अगदी उन्हाळ्यातले बेगमीचे पदार्थ काय आणि साठवणूक हे सर्व महिलांनाच चांगले समजते. पुरुषांना काय, नोकरी करायची आणि वीकएन्डला पार्ट्या करायच्या!
पण मी पण काय कमी नाही. मी पण बोललो. म्हटलं, तुम्ही स्वयंपाकघरात रमता म्हणजे उगाच नाही. तिथे सगळे खाण्याचे डबे असतात. आम्ही सगळा वेळ हॉलमध्ये बसतो, कारण तिथे सारखं वाचायला अनेक पेपर आणि पुस्तकं पण असतात. हे लागलं तिला. पण मग मला म्हणते, बाराच्या वेळेला ज्ञानच खात बसा.
असा वाद सुरू झाला की विषय कुठल्या कुठे जातो बघ. अर्थात तिचं म्हणणं बरोबरच आहे म्हणा. घरचं सगळं स्वयंपाकपाणी सांभाळून देशाचं बजेट बनवायचं म्हणजे काय खायचं काम नाही म्हणा. पक्षबिक्ष सोड, पण महिला असल्यामुळे निर्मलाताईंबद्दल हिला सॉफ्ट कॉर्नरच आहे.
पूर्वीसारखं हातात एकही कागदाचा कपटा न घेता कॉम्प्युटरवरून येवढे दीडदोन तास बजेट घडाघडा वाचून दाखवायचं म्हणजे चेष्टा नाही. एका बाजूला येवढा कागद वाचवला वगैरे सगळं ठीक आहे! पण अरे इतकी वर्ष छपाई करून बाइंडिंग करून देण्यात किती लोकांना रोजगार मिळत होता. त्या लोकांनी आता काय करायचं? ट्रान्सपोर्ट काय, हमाली काय सगळेच बेकार होत जाणार. मी असं बोललो की मला बुरसटलेला म्हणतात.
अरे पूर्वी बजेट ऐकतो की साहित्य संमेलनातले भाषण ऐकतो असे वाटत रहायचे. अरे काय ती शेरोशायरी, हशा-टाळ्या. बजेट सेशन आहे की शेरोशायरीचा मुशायरा आहे असे वाटत रहायचे. सबंध देश ही मैफल ऐकत रहायचा. आमच्या इथल्या साहित्य परिषदेच्या मीटिंगमध्ये तर मराठी कवितेची एकही ओळ अर्थसंकल्पात नसल्याने निषेधाचा ठराव करून तो पोस्टाने केंद्राकडे पाठवायचा असे ठरतेय. सगळा देश नीरस होत चाललाय की काय?
अरे तातू आपण `जन हे दिल्या-घेतल्याचे’ असे घोळत आलो, अरे या बजेटमध्ये आपल्याला काहीच मिळाले नाही, पूर्वी काही नाही तर निदान स्टेपलरच्या पिना, पेन्सिली, चपला म्हणा, सॉक्स म्हणा, काही ना काही बजेटनंतर स्वस्त व्हायचेच.
अरे, पूर्वी बजेट म्हणजे सगळी टोटल हाताने करावी लागायची. ही टोटल घेणार्यांचा एक मजलाच होता. त्यात एकम, दहम, शतम, सहस्त्र अशा वेगवेगळ्या आकड्यांची बेरीज करणारे लोक होते. एकदा तर ऐन बजेट सादर करतेवेळी टोटल चूक असल्याचे ध्यानात आले म्हणे- त्यामुळे बजेट पुढे ढकलावे लागले होते. आता कॉम्प्युटरवर आपोआप सगळी टोटल येते, त्यामुळे त्या टोटल घेणार्या लोकांवर अक्षरश: बेकारीची वेळ आलीय यावर कुणीच बोलत नाही.
अरे तातू, आपल्या गुरुजींनी मागे बजेट शिकवताना सांगितले की उत्सवासाठी गावातून सगळ्यांकडून वर्गणी कशी गोळा करतो तसं सगळ्या समाजाकडून- मग त्यात व्यापारी आले, कारखानदार आले, नोकरदार आले, इंपोर्ट एक्सपोर्टवाले आले, सगळे सगळे आले- त्यांच्याकडून वर्गणीच्या स्वरूपात पैसे गोळा करायचे. अरे नाना म्हणतो की त्याने इन्कम टॅक्सच्या रूपाने गेल्या २५ वर्षात लाखो रुपयांची मदत केलीय. मग सरकार मला काय देतंय त्या बदल्यात? अरे नाना तर असा चिडून बोलतो की इतक्या वर्षात सरकारने तुम्ही जेवलात का बाबा अशी साधी चौकशी पण केली नाही?
आता हे थोडे अतीच झाले. सरकार असं जर प्रत्येकाला जेवलात का, झोप लागली का विचारायला लागलं तर इतर कामं कोण करणार? अर्थात त्याचं म्हणणं चूक आहे अशातला भाग नाही. प्रत्येक वॉर्डमध्ये एक ऑफिस उघडून तिथे स्वयंसेवकांना नोकरी द्यायची आणि सगळ्यांच्या घरी जाऊन चौकशी करायची. ज्येष्ठ नागरिक असतील तर तुमचं काही दळण वगैरे आणायचं का, तुमच्याकडे डास वा ढेकूण झालेत का विचारायचं. अरे नुसतं विचारलं तरी माणसाला आपलं कुणीतरी आहे असं वाटत रहातं. आता या सगळ्यासाठी भरती केली तर एका क्षणात दोन कोटी लोकांना नोकर्या मिळतील, पण माझं कोण ऐकणार?
अरे कॅलेंडर आणलं की निदान साल तरी बदलतं, दिवस नवा वाटतो. इथं बजेट आलं आणि गेलं पण कोणाला काही फरकच जाणवला नाही. असो. घरची कामं वगैरे व्याप यातून वेळ काढून ताईंनी येवढं बजेट बनवलं याचंच खरं तर कौतुक वाटलं.
असो तातू, अरे परवा मी एका बँकेची जाहिरात पाहिली. त्यात इन्कम टॅक्स भरण्यासाठी लोन मिळेल असे होते. अरे नानाच्या मुलाला तर मार्चचा पगारच मिळत नाही. उलट टॅक्स भरायचाय म्हणून ऑफिसला घरून पैसे नेऊन द्यावे लागतात म्हणे. आपला तात्यांचा माधव लटपट्या आहे. तो ज्या बँकेचे कर्ज स्वस्त आहे तिथून कर्ज घेतो आणि जिथे जास्त व्याज मिळते तिथे डिपॉझिट ठेवतो. अरे एक टक्का वा अर्धा टक्का मिळाला तरी हजारो रुपये सुटतात. पण हे करायला डोकं लागतं! सर्व जगभर कार्बनचे प्रमाण वाढतंय त्यामुळे पर्यावरणाला धोका वाढतोय. त्यामुळे हल्ली ऑफिसमध्ये कार्बन कुठेही वापरत नाहीत. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव वाढतायत आणि गंमत म्हणजे गोडे तेलाचे भाव पण वाढतायत. पण मध्यंतरी गुजरात आणि तामीळनाडूत गोडे तेलाच्या खाणी सापडल्या आहेत. बघ ना, टीव्हीवर अनेक मराठी कलाकार तेलाची जाहिरातपण करतायत. पूर्वी कसं नटनट्या जवळून गेल्या की छान परफ्यूमचा सुगंध पसरायचा, अरे हल्ली कुणी नटनटी जवळून गेली तर गोडेतेलाचा वास येतो म्हणे. हे आपलं विषय निघाला म्हणून. पण तातू दिवस कठीण येत असले तरी चांगले दिवस पुढे येणारच आहेत. खरे तर असे म्हणताना माझी जीभ नेहमीच चाचरते. अरे तातू ते तमीळमध्ये सुब्रह्मण्यम भारती नावाचे कवी होऊन गेले त्यांची म्हणे एक छोटी कविता आहे.
१४ ऑगस्ट ४७ला एक रस्त्यावरचा माणूस लंगोटी घातलेला स्वप्न पहातो. उद्या आपल्याला छान लुंगी-धोती-कुडता मिळणार, आता स्वातंत्र्य येणार उद्याच्याला, असे म्हणत झोपी जातो. सकाळी उठून बघतो, तर रात्री झोपेत त्याची लंगोटीच कुणीतरी काढून नेलेली असते. असो.
अरे तातू अडीअडचणीला मला केव्हाही हाक दे. धीर सोडू नकोस. आर्थिक मदत सोडून तुला काही हवे असेल तर मध्यरात्रीदेखील मी मदतीला येईन, अरे, यालाच मैत्री म्हणतात.
कळावे, तुझा
अनंत अपराधी