अनिल अवचट म्हणजे अत्र्यांच्या भाषेत कुतूहल जागृत असलेलं एक मूल.. हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व… कधीही भेटलं तरी एकतर गुणगुणणं सुरू असायचं, ओरिगामीच्या साहाय्याने वस्तू बनवणं, लाकूडकाम, बासरी, तारपा वाजवणं… रिकामं, स्वस्थ बसलेलं पाहिलं नाही.. सोलापूरला दमाणी पुरस्कार कार्यक्रम… भाषणं सुरू होती.. अवचट स्टेजवर कागदाच्या कलाकृती बनवत होते.. कार्यक्रम संपेपर्यंत ३, ४ अप्रतिम वस्तू बनवल्या.. पुण्यात टिळक स्मारक मंदिरात ओरिगामी वस्तू प्रदर्शनादरम्यान कार्यशाळेत मुलांसोबत गप्पा, वस्तू बनवणे नुसता दंगा… निसर्ग, माणूस याबद्दलचं अपार कुतूहल, आस्था… लहान मुलं, निसर्ग हे आवडीचे विषय असल्याने ती निरागसता, कोवळीक स्वभावात अखेरपर्यंत शाबूत राहिली आणि हातावरचं पोट असणारे, शोषित, वंचित, संघर्षमय जीवन जगणारे हे आस्थेचा, लिखाणाचा विषय असल्यानं करुणा, कणव पण स्वभावात उतरली..
पुण्यात घरी, मुक्तांगणमध्ये खूप वेळा भेटी व्हायच्या.. कॅमेर्याबद्दल कुतूहल.. अँगल, फ्रेम, लाईटबद्दल व्हीडिओ जर्नलिस्टना विचारणार… इथं बसू का, असंच का बसू… कॅमेरामनना पण अवचट यांचं शूट म्हणजे पर्वणी… मेजवानी… बर्याच वेळा घरी त्यांची आई पण असायची.. आईचं जे काही काम सुरू असायचं किंवा विश्रांती ते डिस्टर्ब होऊ न देता शूट व्हावं याकडं कटाक्ष.. रिपोर्टर, कॅमेरामन यांची पण अगत्यपूर्ण चौकशी करणार, अनौपचारिक गप्पा मारणार… विशेषतः कुणाला लहान मूल असेल तर लहान मुलांकरता लिहिलेली पुस्तकं दाखवणं, वाचायला देणं.. आयबीएन लोकमत सुरू झाल्यावर पहिल्या काही महिन्यातच अवचटांची ग्रेट भेट (मुलाखत) पुण्यात शूट झाली. त्या दरम्यान अवचट म्हणाले… वागळे सरांना मुलाखतीतच.. निखिल कशाला रे जग जिंकायचंय तुम्हाला… (चला जग जिंकूया ही टॅग लाईन) जिंकणं म्हणजे कशावर तरी विजय वगैरे मात करणं… चला आनंदाने जगूया असं का नको… असं म्हणूया की.. सरांनी पण आर्ग्युमेंट न करता हसत हसत संवाद केला.. मुलाखतीत पण त्यांचं हे विधान तसंच ठेवलं.. अवचट सर म्हणजे विकास पत्रकारिता डेव्हलपमेंट जर्नलिझमचा मानदंड, रिपोर्ताज लिहायची स्वतःची अनोखी शैली.. निसर्ग माणूस (कष्टकरी, शोषित, वंचित) याबद्दल अपार कुतूहल, अमाप आस्था असणार्या शेवटपर्यंत आनंदाचं, निसर्गाचं, माणूसपणाचं गाणं गुणगगुणार्या निरागस बाबाला श्रद्धांजली.