कम्युनिस्ट नेते अनेकदा ‘रेव्होल्युशन इज राउंड द कॉर्नर’ अशी घोषणा करतात. त्याची परवा आठवण आली. वाईन सुपर मार्केटमध्ये आणि कदाचित किराणा दुकानात मिळणार ही बातमी वाचली. बातमी वाचून ऐन थंडीतच थोडी ऊब आल्यासारखी वाटली. थोडीच ऊब. वाईनमध्ये असलेलं अल्कोहोलचं प्रमाण किती आणि त्या वाईनच्या आठवणीने अंगात ऊब दाटणार तरी किती. ते असो.
रीतीरिवाजानुसार विरोधी पक्षांनी तक्रार, हाकाटी, कांगावा करायला सुरुवात केली की आता अवघा महाराष्ट्र मद्यमय होणार. जणू काय वाईन दुकानात आली म्हणजे सर्वांना फुकटच मिळणार आहे आणि दुकानात जाणारे सगळे वाईन प्यायला सुरुवात करणार आहेत. इथे फुकट मिळणारी करोनावरची लस घ्यायला देखील माणसे का कू करताहेत.
विरोधी पक्षांच्या सुरात सूर मिसळून आम्ही देखील त्यांच्यासारखे व्हायचा आणि इतिहासात डोकावण्याचा प्रयत्न केला तेव्हा गंमत झाली.
गेल्या शतकात गाजलेली शरदबाबूंची कादंबरी ‘देवदास’ आठवली. या देवदासचे पारोवर प्रेम असते आणि पारोचे लग्न झाल्यावर तो दुःखी होतो. तेव्हा त्याचा मित्र चुनीबाबू त्याला चंद्रमुखीच्या कोठीवर नेतो. देवदास दारू (वाईन नाही) प्यायला सुरुवात करतो. याचा अर्थ असा की त्यावेळी बंगाल प्रेसिडेंसीमधल्या शासकांनी किराणा दुकानात वाईन ठेवायला परवानगी दिलेली नव्हती. नाहीतर चुनीबाबू देवदासला घेऊन किराणा मालाच्या दुकानात गेला असता. दुकानाची शेठाणी चंद्रमुखीने त्याला किराणा माल विकता विकता वाईन देखील विकली असती. पुढेमागे संजय लीला भन्साळीने ‘देवदास’चा रिमेक करताना चंद्रमुखी आणि पारोची किराणा दुकानातच गाठ पडलेली दाखवली असती. स्वप्नदृश्यात दुकानाच्या काउंटरवरील तराजूच्या एका पारड्यात चंद्रमुखी आणि दुसर्या पारड्यात पारो नाचताहेत– आलटूनपालटून एकेक पारडे खाली-वर होते आहे असा वाईन प्यालेल्या देवदासला भास झाला असता.
आणि आपल्या महाराष्ट्र नगरीत देखील त्यावेळी फक्त काँग्रेस जन्मली होती. इतर पक्ष जन्माला आले नव्हते. काँग्रेसचे नेतृत्व असे भाबडे की त्यांनी देखील किराणा दुकानात वाईनला परवानगी दिली नव्हती. अन्यथा आमच्या राम गणेश गडकरींच्या ‘एकच प्याला’मध्ये सुधाकर आणि तळीराम यांनी आर्य मदिरा मंडळऐवजी आर्य द्राक्षासव मंडळ स्थापन केले असते, तळीरामने सर्वांना वाईन आणि आरोग्य यांच्यातले नाते गडकरींच्या पल्लेदार भाषेत उलगडून दाखवले असते.
दादा कोंडके आपल्या ष्टाईलमध्ये म्हणाले असते,
माझ्या लाडक्या जीवा, पिरतीचा ठेवा,
वाण्याकडून आणलाय वाईनचा पव्वा
आधी मला एक चानस हवा
वाईनने मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातल्या किराणा दुकानात आधीच प्रवेश केला आहे. तिला तिथे कोणी विरोध देखील केला नाही. तिथली सरकारे महानच. पण आज तिथे गालिब वगैरेसारखे पॉवरफुल शायर उरलेले नाहीत.
गालिब आज हयात असते तर नक्की म्हणाले असते…
कहां किराणे का दुकान और कहां विरोधक
पर इतना जानते हैं, कल वो जाता था कि हम निकले
किंवा उमराव जान अदा आशाताईंच्या आवाजात म्हणाली असती–
इक सिर्फ हमी वाईन आंखों से पिलाते हैं
कहने को तो दुकान-ए-किराणे हजारो हैं.
वाईन आणि द्राक्षरस
येशू ख्रिस्ताने या पृथ्वीतलावरचे आपले सामाजिक जीवितकार्य सुरु केले आणि त्यानंतर पहिलावहिला चमत्कार केला तो अगदी अनिच्छेनेच.
हा चमत्कार होता पाण्याचे वाईनमध्ये रुपांतर करण्याचा.
बायबलमध्ये येशूने केलेल्या चमत्कारांची संख्या अगदी मोजकीच आहे. त्याच्या आईने, मदर मेरीने, सांगितल्यामुळे, तिच्या आदेशानुसार येशू आपल्या देवत्वाचे सगळ्यांना दर्शन घडवून देतो.
पिंपातील पाण्याचे चक्क वाईनमध्ये रुपांतर करुन येशू आपले आगळेवेगळे अस्तित्व स्पष्ट करतो.
बायबलमध्ये येशूच्या बालपणाविषयी फारशी माहिती मिळत नाही. येशूच्या सार्वजनिक जीवनास इस्त्राएलमधल्या काना गावच्या एका लग्नसमारंभापासून होते.
येशू आणि त्याची आई मारीया या लग्नातील वर्हाडी असतात. ऐन वेळी लग्नात पाहुण्यांना दिली जाणारी वाईन संपते आणि मदर मेरी ते आपल्या मुलाला – येशूला – कळवते.
‘पण लग्नमांडवातली वाईन संपली, यात आपला काय संबंध.? आपण तर पाहुणे ना? आणि दुसरे म्हणजे माझी वेळ अजून आली नाही,’ असे आईला सांगून येशू आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतो.
मात्र आईची इच्छा म्हणून अखेर येशू वाईनच्या त्या सर्व पिपांत पाणी भरण्यास सांगतो आणि त्या पाण्याचे वाईनमध्ये रुपांतर करतो.
वर्हाडी मंडळी भरपूर वाईन मनसोक्त पिऊन अगदी शेवटपर्यंत चांगल्याच दर्जाची वाईन दिल्याबद्दल यजमानाचे कौतुक करतात!
सुदैवाने मराठी बायबलमध्ये `वाईन’ या शब्दाचे भाषांतर सर्रासपणे `द्राक्षरस’ असे केले आहे, त्यामुळे स्थानिक ख्रिस्ती भाविकांना सांस्कृतिक धक्का बसत नाही.
दर रविवारी किंवा दररोज होणार्या कॅथोलिक मिस्साविधीत (होली मास) मध्ये धर्मगुरु ब्रेड आणि वाईनचा वापर करतात आणि पितात. सर्व जगभर हीच परंपरा आहे. येशू ख्रिस्ताच्या आपल्या शिष्यांबरोबरच्या शेवटच्या भोजनाचे (दी लास्ट सप्पर) हे स्मरण असते.
प्रार्थनाविधीत वापरल्या जाणार्या वाईनचे भाषांतर `द्राक्षरस’ ऐवजी `दारु’ या शब्दात केले असते तर काय सावळा गोंधळ झाला असता? काही लोकांच्या हातात तर अक्षरशः. स्वहस्ते धुपाटणे दिल्यासारखे झाले असते!
काना गावात झालेल्या त्या लग्नाबाबत पहिले कडवे असलेले हे लहानपणी दुसरीतिसरीत शिकलेले हे लोकगीत वा भजन मला आजही तोंडपाठ आहे. कुठल्याही गायनसंग्रहांत या भजनाचा समावेश झालेला नाही, कवी कोण असेल याचीही माहिती नाही.
किती सांगू मी,
सांगू प्रभू तुजला रे
मोठे नवल वाटते मजला ।।ध्रु।।
काना गावी लग्न होते
मारीया होती त्या लग्नाला
तिथे पाण्याचा द्राक्षरस केला रे
मोठे नवल वाटते मजला ।।१।।
लग्नाच्या जेवणाच्या, ख्रिसमस किंवा इतर आनंदी सणाच्या प्रसंगीच्या वाढदिवसाला आणि वर्धापनदिनानिमित्त जमलेल्या लोकांसाठी वाईनचे छोटेछोटे ग्लास घेऊन टोस्ट रेझ करण्याची परंपरा गोव्यात, मुंबईजवळ पालघर. जिल्ह्यातल्या वसई तालुक्यात आणि महाराष्ट्रातील अनेक शहरांतल्या ख्रिस्ती कुटुंबांत आहे. आता ही प्रथा जवळजवळ धर्माचे कुंपण ओलांडून निधर्मीय झाली आहे.
ताडीवाला रोडवरच्या अवर लेडी ऑफ पर्पेच्युल हेल्प चर्चमधे माझे लग्न साधेपणाने झाले, आईवडील, भाऊबहिणी वगैरे श्रीरामपूरहून पुण्याला पहाटे महाराष्ट्र पॅसेंजर ट्रेनने आले आणि लग्नानंतर त्याच रात्री पॅसेंजर ट्रेनने सगळेजण परतले होते.
ताडीवाला रोडच्या चर्चला लागून असलेल्या हॉटेल पंचरत्न येथे रिसेप्शन होते. तेथे असाच चारपाच धर्मगुरुंच्या हजेरीत वाईनच्या ग्लासेस हाती घेऊन टोस्ट रेझ केला गेला होता. टोस्ट स्पीच अर्थातच हातात वाईनचा ग्लास असलेल्या एका धर्मगुरुनेच दिले होते!
अलिकडेच माझ्या कुटुंबात झालेल्या लग्नात असाच प्रसंग पार पडला, वाईनच्या ग्लासेसची संख्या अनेक पटींने अधिक होती इतकाच काय तो फरक होता…
काही दशकांपूर्वी भारतात आणि महाराष्ट्रात कॅथोलिक चर्चमध्ये सांस्कृतिकरणाची लाट आली होती, त्याचा एक भाग म्हणून ॐ हा शब्द प्रार्थनेत आणि गायनांत स्विकारण्यात आला, नामजप पद्धती, कीर्तन परंपराही स्विकारण्यात आली.
याच सांस्कृतिकरणाचा भाग म्हणून मिस्सा विधीमध्ये त्याज्य असलेल्या वाईनऐवजी दुधाचा वापर करण्यात यावा असे मत एका लिबरल धर्मगुरुने मांडले होते.
त्यावर सांस्कृतिकरणाची चळवळ आता फारच वाहवत चालली हे चर्चच्या धर्माधिकार्यांनी वेळीच ओळखून उपाययोजना म्हणून लगेचच नियमांचे वेसण आवळण्यात आले होते.
`वाईन’ हा शब्द उच्चारताच मला अनेकदा बल्गेरियातल्या वाईन फॅक्टरीची आठवण येते. ऐंशीच्या दशकात या पूर्व युरोपियन देशात पत्रकारितेचा अभ्यासक्रम करताना एका शहरात वाईनच्या फॅक्टरीला भेट दिली होती.
तिथले महिला आणि पुरुष कर्मचारी आम्हा भारतीय पत्रकारांना विविध रंगांच्या आणि विविध चवींच्या वाईन्स छोट्या ग्लासांत चवी चाखण्यासाठी देत होते.
प्रत्येक वाईनचा डोळे मिटून मस्तपैकी आस्वाद घ्यायचा, त्याबरोबर चिजचा एक तुकडा जिभेत चघळायचा. प्रत्येक वाईनचा रंग आणि चवसुद्धा वेगळी.
मात्र असा आस्वाद घेण्यासाठी आणि अगदी छोट्याशा फरकाच्या चवीची पारख करण्यासाठी खास प्रशिक्षण आणि कौशल्य लागते. अशा लोकांना वाईन टेस्टर म्हणतात असे तेव्हा कळाले. अशाच प्रकारे `टी टेस्टर’सुद्धा असतात असे म्हणतात.
माझ्या नातेवाईकांपैकी अनेक महिलांना-पुरुषांना घरच्याघरी विविध फळांप्ाासून वाईन बनवण्याची कला आहे. या वाईन्सच्या चवी आणि रंगातसुद्धा खूप वैविध्यता असते. अशा घरगुती वाईन्स नातेवाईकांना प्रेमाने भेट म्हणून दिल्या जातात.
पण वाईन म्हटले की अनेकांना दचकल्यासारखे होते. असे खूप प्रसंग असतात, काही हसू येण्यासारखे आणि काही किव करण्यासारखे.
मागच्या महिन्यात मी दमणला असताना तेथून परतताना यजमानाने त्याने स्वतः संत्र्यापासून बनवलेली वाईन बळजबरीने माझ्या बॅगेत टाकली. दमण किंवा सिल्व्हासा या दादरा, नगर हवेली केंद्रशासित प्रदेशातल्या दोन्ही शहरांत गोव्यासारखीच दारु खूप स्वस्तात असते. मात्र दमण किंवा सिल्व्हासा येथून दारुची तस्करी रोखण्यासाठी बाहेरच्या राज्यांतल्या वाहनांची चेकपोस्टवर कस्सून तपासणी होत असते.
या केंद्रशासित प्रदेशातून महाराष्ट्रात जाताना काही किलोमीटरचा गुजरातचा पंधरावीस किलोमीटरचा पट्टा लागतो. गुजरातेत तर कडक दारुबंदी, म्हणजे अगदी दारु पिऊन या राज्यात प्रवेश करणार्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते असे फलक चेकपोस्टवर असतात. पुण्याला परतताना पहिल्यांदाच तो फलक मी वाचला तेव्हा माझी अक्षरशः भंबेरी उडाली होती.
त्या आप्ताचे घर सोडल्यानंतर मी आमची कार थांबवली, खिडकी उघडून साडेतीनशे मिलीलिटरच्या बाटलीतली ती वाईन रस्त्यावर ओतली आणि खिडकीची काच वर केली.
माझ्याबरोबर असलेल्या मित्राने आणि ड्रायव्हरनेही हसून ‘बरं केलं’ अशी दाद दिली आणि आमचा प्रवास पुन्हा सुरु झाला.
– कामिल पारखे
प्रॉब्लेम वाईनमध्ये नाही… तुमच्यात आहे!
सुपर मार्केटमध्ये वाईन विकायला ठेवली म्हणून काही प्रत्येक दारू न पिणारा माणूस वाईन प्यायला सुरू करणार नाही. हातभट्टी, देशी, फेनी, व्हिस्की, स्कॉच, रम, जिन, ब्रँडी, व्होडका, टकीला, श्यांपेन वगैरे वेगळ्या प्रकारची दारू पिणारे लोकही इतर सगळ्या दारू सोडून फक्त वाईन प्यायला सुरू करणार नाहीयेत.
वाईन ही आजकाल उच्चभ्रू आणि रईस (जमिनी विकून श्रीमंत झालेल्या अडाणी लोकांना वगळून) लोकांमध्ये इज्जतीने पिली जाणारी गोष्ट आहे. २००० रुपयांची वाईन पिवून कुठल्या रोजंदारीवर काम करणार्या मजुराने बायकोला मारहाण केल्याचे माझ्या तरी ऐकिवात नाही. ख्रिस्ती धर्मात वाईन हे सर्वमान्य आणि दैवी पेय आहे.
येशू ख्रिस्ताने एका लग्नात वाईन कमी पडली म्हणून पाण्याला वाईनमध्ये बदलण्याचा चमत्कार केला. आजही जगभरातल्या चर्चमध्ये प्रार्थनासभेत प्रसादासारखी बुचभर वाईन प्यायला दिली जाते. हिंदू धर्मात तर सुरा (दारू) प्राशन करणारे ते सुर (देव) असा एक समज आहे. सुपर मार्वेâटमध्ये वाईन मिळाली म्हणून महाराष्ट्रचा मद्यराष्ट्र व्हावा हे म्हणजे ग्रँट रोडला वेश्यावस्ती झाली म्हणून अख्खी मुंबई वेश्यागमन करायला लागली इतके हास्यास्पद मत आहे. तुमच्या गावात पोलीस चौकी आहे म्हणून तुम्ही कायदे, वाहतुकीचे सिग्नल मोडायचे सोडले का? एवढे सोज्वळ आहात का तुम्ही? आणि भेंडी, जर तुम्ही एवढे सोज्वळ आहात तर तुमच्यासमोर वाईन ठेवली म्हणून तुम्ही दारुडे बनणे शक्य आहे? प्रॉब्लेम दारुमध्ये नाहीये…
प्रॉब्लेम इथल्या पुरुषसत्ताक मानसिकतेत, जातीयवादी आणि कट्टर धर्माभिमानी संस्कारात आहे. हुंड्यासाठी सुनेला पेटविणार्या सासू दारू पीत नसतात आणि गावात एखाद्या दलित स्त्रीची नग्न धिंड काढताना खानदानी घरातले पुरुष आणि स्त्रिया दारू न पिता त्या कृतीला प्रेक्षक बनून मूकसंमती देतात. दारूला बदनाम करण्यापेक्षा स्वतःच्या मेंदूत भरलेला पुरुषी अहंकार, जातीय माज आणि धार्मिक विद्वेष बाजूला काढून फेका. दारू पिणार्या जिनाने विरोधक म्हणून गांधींना गोळी मारली नाही, दारू न पिणार्या नथुरामने मारली. एवढं कळलं तरी पुरेसे आहे. चिअर्स!!!
– डॉ. विनय काटे
आता गांजावरील निर्बंधही हटवावेत…
गांजा (कॅनाबीस) हा एक सनातन अंमली पदार्थ आहे. भारतात अगदी वैदिक काळापासून गांज्याचे वेगवेगळ्या रूपांत सेवन होत आले आहे.
अमेरिकेतल्या अनेक राज्यांत आणि अनेक युरोपीय देशांत गांजा विक्रीस कायदेशीर परवानगी आहे. भारतातले हिमाचल प्रदेश हे राज्यदेखील ह्याबाबतीत पुढाकार घेत आहे.
उत्तम दर्जाचा कडक माल हिमाचल प्रदेशात मिळतो. हजारो परदेशी पर्यटकांसाठी हिमाचल प्रदेशात मिळणारा गांजा आणि चरस एक प्रमुख आकर्षण आहे.
ह्या भागात अनेक आध्यात्मिक बाबांचे आश्रम आहेत. हा काही योगायोग नसावा.
सहज आठवले स्टीव जॉब्स हिमाचल प्रदेशात अनेकदा येऊन गेला आहे. झुकेरबर्गही. असो. तर गांजाच्या विक्रीवरील कायदेशीर निर्बंध हटवायला हवेत.
बम भोले!!
– चित्तरंजन भट
यांचं एकच काम… बोंबा मारणे!
वाईन सुपर मार्वेâटमध्ये मिळणार या विषयावर भाजपाने फालतुगिरी सुरु केली आहे. वाईन घेणार्यांनो सुपर मार्वेâटमध्ये वाईन मिळते म्हणून काय वाट्टेल तेवढी ढोसणार आहात का? आत्तासुद्धा वाईन मिळत आहेच ना.. फक्त वाईन शॉपमध्ये मिळते इतकंच काय ते !!
मी म्हणतो उद्या पानपट्टीवर मिळायला लागली म्हणून काय येता-जाता पिणार आहात काय?? आपण सध्या २१व्या शतकात आहोत याचं भान आहे की नाही?
अहो आर. आर. आबांनी बंद केलेले डान्स बार महाराष्ट्रद्रोही फडणवीसच्या काळात पुन्हा सुरु झाले आणि कित्येकांचे संसार पुन्हा उघड्यावर आले त्यावेळी शेण खाऊन लपून बसला होतात काय?? त्यावेळी कोणाची काळी तोंडं का बरं उचकटली नाहीत? आज उगाचच एखाद्या फालतू मुद्द्यावर चर्चा आरंभली आहे..
निवडणूक जवळ आली की काही ना काही कारणाने मुद्दाम सरकारची बदनामी करायची हेच काम सुरु आहे. आणि मविआ सरकार आल्यापासून भाजपने हे एकच कामं सुरु ठेवलंय.. फक्त बोंबा मारणे.. मुख्यमंत्र्यांची बायको झेंडा वंदनाला अशीच का उभी राहिली, तिने मानवंदना का नाही दिली, त्यांनी संविधानाचा अपमानच केला, अमुकच केलं, तमुकच केलं.. अन लगेच पाळीव म्हणणार त्याच्यावर गुन्हा दाखल करा.. अरे काय पोरकटपणा आहे हा !!
भाजपा सरकारने कोरोना काळात टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, दिवे लावा, मेणबत्त्या पेटवा, यासारखे ‘मूर्खासारखे’ संदेश जरी दिले तरी संपूर्ण मीडियाने त्यांची तोंड फाटेपर्यंत ‘मास्टरस्ट्रोक’ म्हणत भाजपा नेत्यांवर स्तुतीसुमने उधळलीच ना आणि ‘महाविकास आघाडी’ सरकारने कितीही चांगले निर्णय घेतले तरी त्याचं मीडियाला सोबत घेऊन पुन्हा तोंडं फाटेपर्यंत हे सरकार कसं चुकीचं हे जनतेला सांगतं, सरकारवर टीकाटिप्पणी करायची आणि सरकारची बदनामी करायची?? कधी राज्य सरकार केंद्राला चालवायला द्या म्हणायचं, मविआला सरकार चालवता येत नाही म्हणायचं, आजारपणात सुद्धा मुख्यमंत्री महोदयांना सतत डिवचायचं, सरकार पंधरा दिवसात जाणार, तीन महिन्यात कोसळणार, राष्ट्रपती राजवट येणार असं सांगत आपले आमदार धरून ठेवायची नामुष्की भाजपावर ओढवली असताना कशाला नसते उद्योग करायचे? विरोधी पक्ष म्हणून हेच चाललंय सध्या..
अहो वाईन काही किराणा दुकानात मिळणार नाहीये… आणि उद्या मिळाली म्हणून काही बिघडणारसुद्धा नाही.. किराणा दुकानात मिळणार्या काडेपेटीने गॅस पेटवायचं कळतं ना? काडेपेटी किराणा दुकानात मिळते म्हणून कोणी घर पेटवत नाही ना? तसंच आहे.. भाजपायड्यांनो, ठाकरे सरकारच्या सोबत चला, विरुद्ध चालायची ताकद आता तुमच्यामध्ये राहिली नाही.
भाजपने असल्या फालतू चर्चा आणि त्यांची बिन रसाची गुर्हाळ बंद करावी. भाजपाला राजकीय विरोधक म्हणून अजून खूप प्रश्न आहेत तिकडे लक्ष द्या म्हणावं..
२०१४ पासून देशाला जी पनवती लागलेली आहे ती जाता जाईना, नोकर्या गेल्यात, पगार नाहीत, काहींना पगार वेळेवर मिळत नाहीत, लोकांचे घरखर्च भागेनात, औषध आणायला पैसे राहिले नाहीत, शाळा, पुस्तकं, शिकवण्या यांचा मेळ बसेना झालाय.. त्यात महामारी, कोरोनासारखे बनवलेले आजार, लसी, लॉकडाऊन, व्यायाम शाळा बंद, उद्यान बंद, शाळा नाही, शिक्षण नाही, नोकरी नाही, मिळतंय ते आणायला पैसा नाही. मग वाईन कुठेही विकायला ठेवली म्हणून चर्चा कशाला? ज्याला प्यायचीय तो, कुठूनही आणून पिणारच आहे. अरे २६ जानेवारी, १ मे, १५ ऑगस्ट, २ ऑक्टोबर वगैरे दिवशी दारूची दुकानं बंद असली तरी ज्याला हवी तो कशीही आपली सोय करतोच ना? मग आपल्या पार्श्वभागाला कशाला आग लावून घ्यायची आणि लै आग होतेय म्हणून उगाच जनतेला त्रास द्यायचा..? शासनाला अन राज्यकर्त्यांना, समजतंय, त्यांना राज्य चालवायचंय, त्यामुळे त्यांना निर्णय घेऊ द्या. त्यांनी काहीही निर्णय घेतले तरी तुम्ही विरोधक बोंबा मारणार आणि काहीच निर्णय घेत नाहीत म्हणूनही तुम्ही बोंबाच मारणार आहात..
सुरेचा वारसा आयुर्वेदापासूनचा!
शेतकर्यांच्या उत्पादनाला चालना मिळावी यासाठी कमीत कमी १००० फूट जागा असलेल्या सुपरमार्वेâटमधे स्टॉल लावून रेड वाईन विक्रीचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय काही महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या पचनी पडलेला नाही.
मृतसंजीवनीसुरा नावाचे गुणकारी पेय तयार करण्याचे आयुर्वेदात प्रक्रियेसह वर्णिले आहे. काल्पनिक देवादिकांच्या राज्यात सोमरस तर अनादी काळापासून चालत आलेला आहे. मात्र रेड वाईनचे फायदे आयुर्वेदिक तज्ञांनीच सांगितल्यामुळे मोठी गोची झाली आहे.श्रीनिवास अमरनाथ नावाच्या उद्योजकाने आणलेला बायोव्हिस्की हाही मद्यप्रकारही आयुर्वेदाच्या कुशीतून जन्मलेला आहे.कसलेही साईड इफेक्ट नसलेली दारू म्हणून त्याचे प्रमोशनही झाले होते. .. त्याही पलीकडे मद्यावरील अबकारी कराचे प्रलोभनही आहेच. पट्टीच्या मद्यप्रेमी रसिकांना दारूच्या किमतीचे तसे फारसे पडलेलेही नसते.
महाराष्ट्र सरकार दारूड्यांसाठी काम करत आहे असा पावित्रा घेणार्या विरोधकांनी दारूपासून नवीन पिढ्यांना थोडेफार लांब ठेवण्यासाठी वापरायचे किंमतीचे हत्यार दारूच्या किंमती कमी करून बोथट केले होतेच.तरूणाईला धुळीस मिळवू शकणार्या व बंदरावर सापडलेल्या हजारो किलो ड्रग्सबाबत अळीमिळी गुपचिळी धोरण असणारे रेड वाईनच्या सुपरमार्वेâटमधील विक्रीपरवानगीचा बाऊ करत आहेत हे हास्यास्पद आहे.
– बर्नार्ड लोपेस