□ मुंबईसह राज्यात ‘इम्पोर्टेड’ थंडी, बलुचिस्तानातल्या वादळाने आपल्याकडे पारा घसरला
■ सगळी मोदीजींची कमाल! गेल्या ७० वर्षांत पडली होती का इतकी थंडी? बोला, आणखी किती थंडी पाहिजे? खरं तर या निमित्ताने जग किती जोडलेलं आहे आणि दुसर्यासाठी खणलेल्या खड्ड्यात आपणच पडण्याची किती दाट शक्यता असते, हे आपल्याकडच्या युद्धोन्मादींना कळलं तर पुष्कळ.
□ शालेय अभ्यासक्रमात संत वाङ्मयाचा समावेश करावा- वारकरी साहित्य संमेलनातील ठराव
■ स्तुत्य सूचना, पण आधी संतांची सर्वसमावेशकतेची, सहिष्णुतेची शिकवण आणि सुधारकी प्रबोधनाची परंपरा खुद्द वारकर्यांनी विसरू नये.
□ नवज्योत सिंग सिद्धूचा पंजाबच्या मंत्रिमंडळात समावेश करण्याची पाकिस्तानातून सूचना
■ सिद्धूचा पत्ता कट करण्याचा कटच म्हणायचा हा!
□ कोरोनाकाळात गरिबांचे उत्पन्न ५३ टक्क्यांनी घटले आणि श्रीमंतांचे उत्पन्न ३९ टक्क्यांनी वाढले
■ कोरोनासंकट हे कारस्थान होते की नव्हते, ते अजून स्पष्ट नाही; या काळाची असंवेदनशील हाताळणी हा मात्र गरीबांच्या विरोधातला कटच आहे, हे निश्चित!
□ उत्तराखंडच्या निवडणुकीत बंडखोरांचा भाजपला जोरदार धक्का बसणार- पाहणीतील निष्कर्ष
■ येणकेणप्रकारेण सत्ता बळकावायची हा एककलमी कार्यक्रम असलेल्या पक्षात दुसरं काय होणार?
□ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने धर्मसंसदेबरोबर संबंध नसल्याचे जाहीर केले
■ यात नवे काय झाले? ते तर भाजपबरोबरही नाते नाकारतात.
□ उत्तर प्रदेशात सर्व पक्ष मैदानात, बसपाच्या मायावती मात्र घरात
■ ईडीची बेडी, मायावंत अबला कशी तोडी?
□ लांब पल्ल्याच्या रेल्वेत मोठ्याने बडबड करून, मोबाइलवर गाणी लावून लोकांची झोपमोड करणार्यांवर कारवाई केली जाणार
■ उत्तम निर्णय. लोकल ट्रेन आणि बेस्ट, टीएमटी वगैरेंच्या बसमध्येही इयरफोन न लावता मोबाइलवर गाणी ऐकणार्यांना, सिनेमे पाहणार्यांना असाच चाप लागला पाहिजे. डफ्फर लोक!
□ देशात गुलामगिरीचे वातावरण तयार करायचे म्हणजे हिंदुत्व नव्हे – मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती
■ स्वेच्छेने मेंदू गहाण ठेवलेल्या भक्तमंडळींचा अपवाद वगळता बाकीच्यांना हळुहळू हा फरक लक्षात यायला लागला आहे उद्धवजी!
□ भारतीय जनता पक्ष निवडणूक हरणार हे लक्षात आलं की केंद्रीय तपासयंत्रणा मागे लागतात- अरविंद केजरीवाल
■ सत्ताधार्यांच्या तालावर किती नाचायचे, हे तपासयंत्रणांनी ठरवायला हवे- सत्ताधारी बदलत असतात, स्वायत्तता कायमची गमावावी लागेल.
□ केंद्र सरकारने सावधपणे खर्च करावा : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची सूचना
■ आधी सांगितलं असतं तर शाही विमान, शाही निवासस्थान, शाही गाडी, शाही राहणीमान आणि शाही संसदभवनाचा अनावश्यक घाट हा खर्च कमी झाला असता कदाचित!
□ स्वातंत्र्यानंतरच्या चुका आम्ही सुधारत आहोत – पंतप्रधान नरेंद्र मोदी
■ आणि नव्या, भविष्यात १०० वर्षांत सुधारता येणार नाहीत, अशा नव्या घोडचुका करत आहात, त्याचं काय?
□ सोशल मीडियाचा अतिवापर मेंदूसाठी घातक : सर्वेक्षणाचा निष्कर्ष
■ यासाठी सर्वेक्षणाची गरज काय होती? आयटी सेलच्या भजनी लागलेल्या आणि फॉरवर्ड फॉरवर्ड खेळणार्यांकडे पाहिल्यावर कळतंच की हे!