‘म्हणजे मिसेस कपूरना देखील विस्मरणाची सवय आहे बघा. त्यांच्या खूपशा खाजगी वस्तू त्या तुमच्या कपड्याच्या कपाटात विसरून गेल्यात,’ जिग्नेशच्या नजरेत नजर रोखत जयराज म्हणाला आणि जिग्नेशचा चेहरा झर्रकन पडला. मात्र पुन्हा एकदा आवेश गोळा करून तो ताडकन उभा राहिला, ‘हाऊ डेअर यू? माझ्या परवानगीशिवाय माझ्या घरात शिरून तुम्ही झडती घेतली कशी? मी तुम्हा सगळ्यांना कोर्टात खेचेन.. मी तुम्हाला…’
– – –
इन्स्पेक्टर जयराज शांतपणे त्या बेडरूमचे निरीक्षण करण्यात दंग होता. खिशातला मोबाइल वाजतोय, याचे देखील त्याला भान नव्हते.
‘सर… जयराज सर फोन वाजतोय…’ हवालदार माने ओरडले.
‘उचल की मग… का त्याला पण आता माझी परवानगी हवी तुला?’ जयराज करवदला.
‘तुमचा फोन वाजतोय हो साहेब…’
जयराजने डोक्याला हात लावला आणि फोन बाहेर काढला. अपेक्षेनुसार कमिशनर साहेबांचाच फोन होता.
‘जय.. एनी प्रोग्रेस?’
हा माणूस लग्नानंतर मूल होण्यासाठी नऊ महिने मुलांची वाट कशी बघू शकला असेल? ‘पी हळद की हो गोरी’ असली घाई असते ह्या माणसाची.
‘सर, मी तपास पथक आणि फोरेन्सिकला घेऊन आता इथे पोचलोय. थोडा वेळ द्या, मी सविस्तर रिपोर्टिंग करतो तुम्हाला. की तुम्हीच इकडे येता?’ जयराजची ही मात्रा मात्र योग्य काम करून गेली आणि ‘नो नो, तुझे काम चालू दे… तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे माझा,’ असे म्हणत साहेबांनी फोन ठेवून दिला.
फोन खिशात घातला आणि जयराज पुन्हा नव्याने बेडरूमच्या निरीक्षणात गुंग झाला. बेडच्या डाव्या बाजूला मिस्टर कपूर झोपलेले होते… अर्थात ते आता कायमचे झोपलेले होते. त्यांच्या छातीतून एक गोळी आरपार गेलेली होती आणि डोक्याच्या मागच्या भागाच्या आसपास रक्ताचे थारोळे साचलेले होते. बेडच्या उजव्या भागात मिसेस कपूर झोपलेल्या होत्या- त्यांना नुकतेच हॉस्पिटलमध्ये हालवण्यात आलेले होते. त्या वाचण्याची बरीच शक्यता दिसत होती. बेडच्या बाजूलाच एक जाड लोखंडी सळई पडलेली होती. या सळईनेच मिस्टर आणि मिसेस कपूर दोघांच्याही डोक्यात वार करण्यात आलेले होते. अस्ताव्यस्त पसरलेले सामान आणि उघडी पडलेली तिजोरी या सगळ्याचं एकदा नीट निरीक्षण करून जयराज बाहेर आला. बाहेर सोफ्यावर पस्तिशीतील एक उमदा माणूस बसलेला होता.
‘हॅलो… मी सॉलिसिटर खन्ना.. जिग्नेश खन्ना. मीच तुम्हाला फोन केला होता.’
‘ओह! नाइस टू मीट मिस्टर खन्ना, असे खरेतर या परिस्थितीत म्हणू शकत नाही म्हणा, पण असो… तुम्ही इतक्या सकाळी मिस्टर कपूरांच्या घरी?’
‘येस! अॅक्चुअली मला मिसेस कपूर यांनी आज सकाळीच बोलावले होते. त्या काही महत्त्वाच्या कागदपत्रांवर सह्या करणार होत्या; त्यामुळे त्यांनी मला सरळ नाश्त्याला घरी ये, तिकडेच सह्या देते, असे सांगितले होते.’
‘फार महत्त्वाची कागदपत्रे होती का? म्हणजे ऑफिस वर्क का इतर काही?’
‘तशी म्हटले तर महत्त्वाचीच कागदपत्रे होती. मिसेस कपूर आज त्यांची प्रॉपर्टी मिस्टर कपूरांच्या नावावर करणार होत्या.’
‘आय सी!… आणि अशी किती मोठी प्रॉपर्टी होती ती?’
‘फार काही नाही. आई वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना वाटणीत सत्तर लाखाची जमीन, दहा लाखाचे दागिने मिळाले होते. साधारण ऐंशी लाखाची होती प्रॉपर्टी आणि इतर काही शेअर्स, एफडी वगैरे धरले, तर एखाद कोटीपर्यंत आकडा जातोय.’
‘म्हणजे दुर्लक्ष करण्यासारखी रक्कम नक्की नाही!’
‘नक्कीच नाही साहेब.’
‘बरं, मला एक सांगा मिस्टर जिग्नेश, मिसेस कपूरांच्या जमिनीवर वा दागिन्यावर इतर कोणी हक्क सांगितला होता? किंवा त्या प्रॉपर्टी संदर्भात एखादा वाद?’
‘बिलकुल नाही! अत्यंत क्लिअर टायटल होते जमिनीचे. एकही कागद कमी नव्हता. दागिने तर खुद्द त्यांच्या भावाने आणि वहिनीनेच त्यांना स्वहस्ते दिले होते. मुख्य म्हणजे मिसेस कपूर यांचा भाऊ आणि वहिनी दोघेही अतिशय साधे, सज्जन लोक आहेत.’
‘इतर कोणी नातेवाईकाशी काही वाद?’
‘एक भाऊ सोडला, तर मिसेस कपूरना जवळचा एकही नातेवाईक नाही.’
‘धन्यवाद मिस्टर जिग्नेश. तुमचा नंबर आणि पत्ता देऊन ठेवा. काही काम लागले, तर तुम्हाला पुन्हा तसदी देईन.’
‘अवश्य सर! कायद्याला मदत करण्यासाठी मी कायम तयार आहे.’
जिग्नेश दारापर्यंत पोहोचलाच असेल, तोच जयराजने त्याला पुन्हा आवाज दिला.
‘मिस्टर जिग्नेश सॉरी, पण एक शेवटची चौकशी…’
‘विचारा सर…’
‘मिस्टर कपूर यांचे लिगल अॅडव्हाइजर देखील तुम्हीच आहात?
‘येस सर! मी दोघांचेही काम बघत असे, अर्थात मॅडमचे फारसे असे काम कधी नसायचेच.’
‘मिस्टर जिग्नेश, मला एक सांगा मिस्टर कपूरांची प्रॉपर्टी किती आहे? आणि ती त्यांच्या मृत्यूनंतर कोणाला मिळणार आहे?’ जयराजने खाडकन् प्रश्न टाकला आणि जिग्नेश ’आ’ वासून या धडाकेबाज इन्स्पेक्टरकडे पाहातच राहिला…
—-
‘बोला डॉ. वाळिंबे… काय म्हणतोय तुमचा रिपोर्ट?’
‘मिस्टर कपूरांना आधी गोळी मारण्यात आली आहे आणि त्यानंतर त्यांच्या डोक्यात सळई मारण्यात आली आहे. गन अगदी हृदयाला टेकवून गोळी झाडण्यात आलेली आहे.’
‘आणि हा निष्कर्ष कसा काढला तुम्ही?’
‘खुन्याने डोक्यात जर आधी म्हणजे मिस्टर कपूर जिवंत असताना सळई मारली असती, तर भरपूर प्रमाणात रक्तस्त्राव झाला असता. तो तेवढा झालेला नाही; कारण जेव्हा खुन्याने सळई मारली, तेव्हा मिस्टर कपूरांना मरून बराच वेळ झाला होता आणि ‘रिगर मॉर्टिस’ची प्रोसेस शरीरात सुरू झाली होती. त्यामुळे रक्त वाहण्याचे प्रमाण बरेच कमी झाले.’
‘तरी अंदाजे गोळी मारल्यानंतर, किती वेळाने डोक्यात सळई मारली असावी?’
‘तरी चार ते सहा तासानंतर..’
‘आणि मिस्टर कपूर यांचा खून झाला ती वेळ कोणती असावी?’
‘रात्री अकरा ते पाच या वेळेत. पण डोक्यावरची जखम, वाहिलेले रक्त यांचा अभ्यास केला, तर साधारण रात्री एकच्या सुमाराला त्यांना गोळी घालण्यात आली असावी.’
‘मिसेस कपूर?’
‘त्यांचे काय? त्या जिवंत आहेत.’
‘डॉक्टर.. त्यांच्यावरच्या हल्ल्याचे काय?’
‘ओह आय सी! नथिंग नथिंग.. त्यांच्या डोक्यावर देखील त्याच सळईने वार करण्यात आला आहे. पण तो कदाचित त्यांची उशी आणि डोके असा मारला गेल्याने, त्यांच्या डोक्याला फारशी इजा झालेली नाही, त्या फक्त भीतीने बेशुद्ध पडल्या असाव्यात.’
‘जावेदभाई एनी फिंगरप्रिंट्स?’ फोरेन्सिकटीम मधील जावेदकडे आता जयराजने मोर्चा वळवला.
‘नो.. सळईवर कोणाच्याही हाताचे ठसे मिळालेले नाहीत आणि गन तपासणीला माझ्याकडे आलेली नाही!’
‘ती अजून आम्हा पोलिसांना देखील मिळालेली नाहीये.’
—-
‘जयराज काय प्रोग्रेस?’ कमिशनर साहेबांनी पाइप पेटवत विचारले.
‘बरीच गुंतागुंत आहे सर.’
‘म्हणजे?’
‘रात्री एक वाजता मिस्टर कपूरांना गोळी झाडून त्यांचा खून करण्यात आला. पुन्हा पहाटे येऊन खुन्याने त्यांच्या डोक्यात सळई मारली. तिच सळई मग मिसेस कपूरांच्या डोक्यात मारली आणि तो पळाला.’
‘बहुदा दुसर्या वेळेला तो आला, तेव्हा मिसेस कपूर जाग्या झाल्या असतील, त्यांनी त्याला बघितले असेल. पुरावा मागे नको म्हणून..’
‘तेच तर सर! पुरावा मागे ठेवायचा नव्हता तर मग सळई का? एक तिथे दोन खून! मिसेस कपूरनादेखील गोळी का मारली नाही? मुख्य म्हणजे मिस्टर कपूर मेल्याची खात्री करायची होती किंवा त्यांना ठार मारायचेच, असाच उद्देश असेल, तर मग सरळ दोन गोळ्या छातीत का नाही मारल्या? गोळी देखील मारायची, पुन्हा काही तासांनी येऊन सळई मारायची.. ही काय भानगड आहे? बरं, गोळी मारली, तेव्हा त्या आवाजाने मिसेस कपूर जाग्या कशा झाल्या नाहीत? मधल्या वेळात त्यांना एकदाही जाग कशी आली नाही? आणि चोरी करून निसटल्यावर, चोर पुन्हा तिथे कशासाठी आला असेल?’
‘गुंता तर खरंच दिसतो आहे जयराज…’
‘सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर, बेडवरच्या चादरला फक्त मिस्टर कपूर ज्या बाजूला झोपले होते, तिकडेच सुरकुत्या पडलेल्या होत्या. म्हणजे एक तर मिसेस कपूर रात्रभर बेडवर नव्हत्या किंवा मग त्यांना बेशुद्ध पडल्यावर उचलून आणून अलगद बेडवर ठेवलेले आहे. पण घरात इतर कुठेही रक्ताचे डाग आढळले नाहीत. त्या ज्या पोझिशनमध्ये झोपल्या होत्या, त्याच पोझिशनमध्ये त्यांच्यावर सळई मारली गेली आहे हे देखील नक्की!’
‘इतर काही पुरावे?’
नो सर! मी तपासाचे काही अडाखे बांधले आहेत.. लेट्स सी..’
—-
‘मिस्टर जिग्नेश, कपूर फॅमिलीसाठी तुम्ही सर्वात जवळचे. म्हणजे घरातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी देखील तुमच्याशी चर्चा करूनच पुढे सरकत असत.’
‘येस सर! मिस्टर कपूर मला अगदी लहान भावाप्रमाणे मानायचे.’
‘ओह! पण त्यांच्या मृत्युपत्रात तुम्हाला काहीच दिलेले दिसत नाहीये.’
‘ते मला लहान भाऊ मानायचे सर… मी त्यांचा रक्ताचा लहान भाऊ नव्हतो. मिस्टर कपूर अत्यंत व्यवहारी मनुष्य होते. भावना आणि व्यवहार ह्या दोन गोष्टी ते कधीच एक करत नसत.’
‘आम्ही कपूरांच्या घराची झडती घेतली, तेव्हा आम्हाला मिस्टर कपूर यांचा लॅपटॉप मिळाला. तो आम्ही आमच्या संगणक तज्ज्ञांच्या मदतीनं उघडला आणि तपासला देखील. त्यात आम्हाला ’संजना’ नावाने आलेल्या काही ईमेल्स वाचायला मिळाल्या… आर यू ओके मिस्टर जिग्नेश?’
‘येस येस परफेक्ट..’
‘नाही तुमचा चेहरा एकदम कावराबावरा झालाय.. घामही सुटलाय एकदम. या संजना नावात काही जादू आहे का?’
‘न.. न.. नाही. कोण संजना?’
‘जिग्नेश साहेब.. अहो कायद्याचे रक्षक आपण. कायद्याशी खोटे बोलून कसे चालेल? त्याची शिक्षा तर तुम्हाला चांगली माहिती आहे..’
‘संजना ही कपूर साहेबांच्या वडिलांच्या सेक्रेटरीची राधाची मुलगी. तरूणपणी कपूर साहेब म्हणजे जयेश साहेब आणि राधाचे संबंध… पण पुढे ते त्यांनी परस्पर संमतीने थांबवले. आता १५ दिवसापूर्वीच अचानक ही संजना उगवली आणि आपण राधाची मुलगी असल्याचा दावा करू लागली.’
‘तिचा दावा खरा आहे?’
‘एक लाख टक्के खोटं आहे! जयेश साहेब कधीच बाप बनू शकत नव्हते, त्यांच्यात ती कमतरता होती. आणि हे त्यांच्या लग्नाच्या दुसर्याच वर्षी डॉक्टरी तपासणीत सिद्ध झाले होते.’
‘त्यांच्या लग्नाला किती वर्षे झाली?’
‘चार वर्षे..’
‘चार… म्हणजे साधारण तीस एकतीस वर्षाचे असताना कपूर साहेबांनी लग्न केले. जरा उशीर झाला असे नाही वाटत?’
‘त्यांचा एक मेजर अॅक्सिडेंट झाला होता. ते जवळजवळ वर्षभर ‘बेड रिडन’ होते आणि त्यानंतर एक वर्ष उपचार चालू होते.’
‘अच्छा! मला एक सांगा संजनाला तुम्ही कोण कोण प्रत्यक्षात भेटला आहात?’
‘मी आणि कपूर साहेब दोघेच. ती त्यांना पहिल्यांदा भेटायला येणार होती, त्यावेळी त्यांनी मला खास बोलावून घेतले होते.’
‘काय चर्चा झाली?’
‘तिने राधाचे आणि तिचे लहानपणीचे काही फोटो दाखवले. जुन्या आठवणी सांगितल्या. पण तिच्याकडे ठोस असा काहीच पुरावा नव्हता. राधाने लग्न देखील केले होते, पण लग्नाच्या पाच वर्षांतच तिचा नवरा अपघातात वारला.’
‘..आणि संजना ही त्या नवर्यापासून राधाला झालेली मुलगी आहे असे तुमचे मत होते?’
‘अर्थात! माझेच काय, कपूर साहेबांचे देखील तेच मत होते.’
‘इतक्या हुशार, शिकलेल्या मुलीने ‘डीएनए टेस्ट’ची मागणी नाही केली?’
‘केली ना… डॉ. लाड यांच्याकडे आम्ही ती टेस्ट देखील केली. तिथे देखील ती खोटी ठरली!’
‘आणि एवढे सगळे होऊन देखील मिस्टर कपूर तिच्याशी संपर्क ठेवून होते?’
‘हळवेपणा.. दुसरे काय? आपण राधाचे गुन्हेगार आहोत असे त्यांना आधीपासून वाटायचेच… त्याचाच परिणाम असवा.’
‘जिग्नेश साहेब, तुम्ही जरा बसा. साहेबांचा मेसेज आलाय, मी पटकन त्यांना भेटून येतो.’
‘अगदी अगदी.. टेक युवर टाइम.’
‘आलोच,’ म्हणून गेलेला जयराज तब्बल दीड तासाने हजर झाला.
‘मनापासून माफी मागतो जिग्नेश साहेब. तुमच्यासारख्या कामाच्या माणसाच खोळंबा उगाच…’
‘अरे नाही नाही. तसे काही नाही. साहेबांचे काम म्हणजे जायलाच हवे.’
‘अहो विशेष म्हणजे, हे तुमचे डॉ. लाड आमच्या साहेबांच्या ओळखीतले निघाले.’
‘काय सांगता? छान छान…’
‘आठ वर्षापूर्वी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एका बेकायदा गर्भपात केंद्राचा पर्दाफाश करण्यात आला होता, त्या गुन्ह्यात हे डॉ. लाड देखील एक संशयित होते.’
‘क.. क.. काय सांगता? आम्हाला तरी भला वाटला हो माणूस.’
‘कपूर साहेबांना डॉ. लाडचे नाव कोणी सुचवले होते?’
‘बहुदा त्यांच्या फॅमिली डॉक्टरने. मला कल्पना नाही पूर्ण.’
‘पण लाडांच्या रिपोर्टमध्ये तर ’रेफर्ड बाय मिस्टर जिग्नेश खन्ना’ असे नमूद केलंय.
‘ऑ? ते मी बरोबर गेलो म्हणून केला असेल. मी तर ओळखत पण नाही त्यांना…’
‘मिस्टर जिग्नेश, अहो, वकिलाची स्मरणशक्ती अशी कमजोर असून कशी चालेल?’
‘काय म्हणायचंय तुम्हाला?’
‘उमेदीच्या काळात, तुम्ही ज्या वकिलाकडे ज्युनिअरशिप करत होतात, ते वकील सुरेंद्र पाठक यांचा महत्त्वाचा क्लायंट म्हणजे डॉ. लाड. बरोबर ना?’
‘असेल… मला काही आठवत नाहीये आता…’
‘अरे काय हे? तुम्हाला देखील विस्मरणाची सवय आहे का?’
‘मला देखील म्हणजे?’
‘म्हणजे मिसेस कपूरना देखील विस्मरणाची सवय आहे बघा. त्यांच्या खूपशा खाजगी वस्तू त्या तुमच्या कपड्याच्या कपाटात विसरून गेल्यात,’ जिग्नेशच्या नजरेत नजर रोखत जयराज म्हणाला आणि जिग्नेशचा चेहरा झर्रकन पडला. मात्र पुन्हा एकदा आवेश गोळा करून तो ताडकन उभा राहिला, ‘हाऊ डेअर यू? माझ्या परवानगीशिवाय माझ्या घरात शिरून तुम्ही झडती घेतली कशी? मी तुम्हा सगळ्यांना कोर्टात खेचेन.. मी तुम्हाला…’
‘कोर्टात तर आम्ही तुम्हाला उभे करणार आहोत मिस्टर जिग्नेश उर्फ रहस्यमय खुनी,’ बोलता बोलता जयराजने एक कागद जिग्नेश समोर टाकला आणि तो कागद बघून जिग्नेश मटकन खालीच बसला.
‘आय कन्फेस….’ शांत सुरात जिग्नेश म्हणाला.
—-
‘वेल डन जयराज! अवघ्या ४८ तासात तू प्रकरण संपवलेस. आता निवांतपणे मला सगळे उलगडून सांगा…’
‘सर, जयेश कपूरचे लग्न तसे उशिराच झाले त्यात त्याचे शारीरिक दुखणे. लग्नानंतर तो बायकोला हवे तसे शरीरसुख देऊ शकत नव्हता. त्यामुळे त्याची चिडचिड देखील प्रचंड वाढली होती. याच काळात कामाच्या संदर्भात सतत घरी येणार्या जिग्नेशकडे मिसेस कपूर म्हणजे साधनाबाई ओढल्या गेल्या आणि ह्या प्रकरणाला सुरुवात झाली. सगळ्यात आधी जयेशला मानसिक खच्ची करण्यासाठी त्यांनी डॉ. लाडच्या मदतीने एक खोटा रिपोर्ट बनवून घेतला आणि जयेशला ’नामर्द’ सिद्ध केले. दिवस जाऊ नये ह्यासाठी साधनाने विशेष काळजी घ्यायला सुरुवात केली होतीच. आता जयेशची संपत्ती एकदा ताब्यात आली की, त्याच्या ’नामर्द’पणाचे भांडवल करत सरळ त्याला घटस्फोट द्यायचा किंवा घर सोडायचे असे दोघांनी ठरवले होते. अर्थात प्रकरण कोर्टात गेले असते आणि जयेशची चाचणी झाली असती, तर खरे काय ते समोर येण्याचा धोका होताच. त्यामुळे दोघेही योग्य संधीची वाट बघत होते. त्यातच संजनाचे प्रकरण उपटले आणि वेळ निघून जायला लागला. पुन्हा एकदा जिग्नेशने डॉ. लाडची मदत घेतली आणि संजनाला या खेळातून बाहेर केले.
जयेशने आपल्याला मृत्युपत्र करायचे आहे असे एके दिवशी जिग्नेशला सांगितले आणि दोघांचा आनंद गगनात मावेना. मात्र जयेशने मृत्युपत्रात सर्व संपत्ती संजना तोडकरच्या नावावर केली आणि या दोघा लव्हबर्डसचे चेहरे काळेठिक्कर पडले. जयेश येवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने साधना आणि जिग्नेशचे संबंध कळले असून दोघांनी लवकरात लवकर त्याच्या आयुष्यातून दूर व्हावे असे देखील सुनावले.’
‘पण जयेशला सगळे कळले कसे?’
‘डॉ. लाडने रिपोर्ट दिला असला, तरी जयेशला मात्र संजनाविषयी प्रचंड माया वाटत होती. तिला पाहिले की त्याला तरूणपणीच्या स्वत:चाच भास होत होता. शेवटी कोणालाही न सांगता त्याने सेकंड ओपिनियन म्हणून पुन्हा एकदा डॉ. बात्रांकडे टेस्ट करून घेतली. संजना त्याचीच मुलगी होती. आता जयेशला खात्री झाली की, डॉ. लाडने दोन वेळा त्याला फसवले आहे. त्याने फक्त लाखभर रुपयाचे आमिष डॉ. लाडला दाखवले आणि लाड पोपटासारखा सगळे सांगून मोकळा झाला.
आता मात्र साधना आणि जिग्नेश यांनी टोकाचे पाऊल उचलायचे ठरवले. दोघांनी मिळून कट आखला आणि त्याच रात्री स्वत:च्या गनने जिग्नेशने जयेशला गोळी घातली. त्यानंतर संशय नको, म्हणून त्यांनी जिग्नेशच्या लॅपटॉपवर साधना सगळी संपत्ती जयेशच्या नावावर करते आहे अशी कागदपत्रे बनवली. जी कधीच साईन होणार नव्हती म्हणा. पण या सगळ्यानंतर देखील पोलिस चौकशीत साधना बिथरेल असे जयेशला सारखे वाटत होते. शेवटी काळजी म्हणून पहाटेच्या सुमाराला त्याने पुन्हा तिला बेडरूममध्ये झोपवले. गॅरेजमध्ये असलेली सळई आणून तिचा एक जोरदार वार जयेशच्या डोक्यात केला आणि एक हलकासा वार साधनाच्या डोक्यात केला. त्यानंतर त्याने ती सळई तिथेच टाकली आणि चोरीचा देखावा निर्माण करून तो पळाला. पळाला खरा… पण पळत पळत थेट आपल्या जाळ्यातच आला…’