तात्यासाहेब, पुलंसारखे मित्र, लेखक, निर्माते, दिग्दर्शक, नटनट्या यांच्याबरोबर ते रमत, गप्पा रंगत, नाट्यप्रवेशांचे वाचन, चर्चा होई. त्यांचे नाट्यवाचन अत्यंत प्रभावी होते. वाचता वाचता नाटकातील पात्रे ते इतक्या उत्कटपणे जिवंत करत की एकाच वाचनात अनेक व्यक्तिरेखा डोळ्यांपुढे उभ्या राहत. कलावंत हा आविष्कारातच पाहावा मग ते अमिताभ बच्चन असोत, आर. के. लक्ष्मण असोत वा वसंतराव कानेटकर. सर्वसामान्य माणसांच्या कथा-व्यथा ते इतक्या उत्कटपणे मांडतात- कधी अभिनयातून वा कधी रेषांतून किंवा शब्दांतून.
– – –
नाशिक तसं कायमच कुतूहलाचा विषय राहिलं आहे. देव, धर्म, मंदिरं सिंहस्थ, नदीनाले, पर्वतराई, लेणी आणि सांस्कृतिक वारसा यासाठी. ज्ञानपीठ विजेते तात्यासाहेब शिरवाडकर आणि वसंत कानेटकर हे साहित्यातले महामेरू नाशिकचेच. कानेटकर जरी मूळचे सातार्याजवळच्या रहिमतपूरचे असले तरी कर्मभूमी म्हणून त्यांनी नाशिकला निवडले. आद्य पिढीतील कवी गिरीश यांचे ते सुपुत्र. पुण्यामुंबईपेक्षा येथील सुंदर हवा, मोकळा, प्रसन्न, ऐसपैस परिसर अन् तात्यांसारखे मित्र त्यांना लाभले. तात्यासाहेब वयाने वडील होते, पण स्नेह घट्ट होता. दोघेही प्रतिष्ठित, यशस्वी नाटककार. साहित्यिक विचारांची देवाणघेवाण ओघानेच आली. तात्यासाहेबांचे प्रसन्न व्यक्तिमत्त्व तर कानेटकरांची अती टापटीपीची राहणी. त्यात दिसायला देखणे, गोरेपान. एक काळ असा होता की महाराष्ट्रभरातल्या अनेक थिएटर्समधून त्यांच्या पाच-पंचवीस नाटकांचे प्रयोग चालू असायचे. विषयांची विविधता, मांडणीचे तंत्र, नेटकेपण, ही त्यांची वैशिष्ट्यं.
नाटकांच्या या प्रवासात त्यांना छत्रपती शिवाजी महाराज सापडले आणि महाराजांवर त्यांनी अप्रतिम पाच सहा नाटके लिहिली. त्यातले ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हे नाटक मानवी मनाचे आंदोलने दाखवणारे ठरले. ऐतिहासिक नाटक म्हटले की भरजरी कपडे, रंगबिरंगी महाल, जडशीळ पोशाख, तलवारी, जरबेची भाषा. रायगडमध्ये हे सगळं सोडून शिवाजी महाराज, संभाजी आणि पात्रे सहज स्वाभाविक सामान्य माणसांसारखी बोलत होती. संवादांतील भावभावनांची आंदोलने प्रेक्षकांना हेलावून टाकत होती. ‘इथे ओशाळला मृत्यू’, ‘तुझा तू वाढवी राजा’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ यांसारखी नाटके शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या काळातील महाराष्ट्र उलगडून दाखवीत होती.
सत्तरच्या अलीकडे-पलीकडे मी ‘गावकरी’ दिवाळी अंकांत व्यंगचित्रे काढू लागलो. त्या काळात सगळेच लेखक मोठ्या फॉर्मात होते. साहित्यक्षेत्रातला तो बहारीचा काळ. गावकरीत गोपाळ बेळगावकर नावाचे संपादक होते. त्यांनी म्हटले, लेखकांवर रंगीत चित्रमाला काढा की.
मी विचारले, दादासाहेबांना आवडेल का?
कारण दादासाहेब पोतनीस हे अत्यंत साक्षेपी, प्रतिष्ठित संपादकांतले एक होते. बेळगावकरांनी दादांना विचारले, गावकरी दिवाळी अंकांसाठी लेखकांवर चित्रे काढावी असे सोनारांच्या मनात आहे. दादा म्हणाले, छान विषय आहे, अवश्य करा. लहानपणापासून माझे भरपूर वाचन आहे त्यावेळी चांगले वाचायलाही मिळायचे. आचार्य अत्रे, ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे, वि. आ बुवा, वसंत कानेटकर आणि दत्तो वामन पोतदार यांच्यावर मी रंगीत चित्रे काढली. प्रसिद्ध झाल्यावर त्या चित्रांनी खूप वाहवा मिळविली. त्यावर बुजुर्ग इतिहासकार दत्तो वामन पोतदार आणि गदिमा खूपच चिडले… दत्तो वामन पोतदारांना महाराष्ट्र सरकारने शिवाजी महाराजांचे ऑथेंटिक चरित्र लिहायचे काम सोपविले होते. दत्तोपंतांचा एकूणच ऐतिहासिक गोष्टींचा अभ्यास, दस्तऐवज संग्रह प्रचंड होता. दत्तो वामन तसे गोष्टीवेल्हाळ. विद्वज्जनांत त्यांची ऊठबस असे, पण लिहिण्याचा त्यांना खूप कंटाळा. परिणामी लिखाण होईच ना! त्यावर काढलेले चित्र सोबत दिले आहे. त्या अनुषंगाने प्रसिद्ध लेखक यदुनाथ थत्ते यांनी नागपूरच्या एका साहित्यिक मेळाव्यात दत्तो वामनांना विचारले की, तुमच्यावर असं असं चित्र छापून आलंय, यावर आपलं मत काय?
‘त्या व्यंगचित्रकाराला सांगा, चार रेघोट्यांचे व्यंगचित्र काढण्याइतके शिवचरित्र लिहिणे सोपे नाही,’ दत्तोपंत संतापून उद्गारले. दादासाहेब पोतनीस यांनी नमस्कार केला, तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. मी वर उल्लेख केलेली शिवाजी महाराजांवरची चारसहा नाटके कानेटकरांनी लिहिली. महाराजांच्या नाटकांच्या निमित्ताने कानेटकरांनी अनेक किल्ल्यांना अनेकदा भेटी दिल्या होत्या. (ते चित्रही सोबत देत आहे).
‘आवाज’चे संपादक मधुकर पाटकर दरवर्षी कानेटकरांची एखादी एकांकिका आवाज दिवाळी अंकात छापत. त्यासंबधी चर्चा करण्यासाठी व माझ्या चित्रमाला घेण्यासाठी (मी काढलेल्या सर्व चित्रमाला प्रथम ते पाहत, त्यातल्या हव्या त्या निवडून घेत) ते दरवर्षी नाशिकला हमखास येत. जेवणखाण माझ्याकडे असे. नंतर त्यांना माझ्या लॅम्ब्रेटा या लांबलचक स्कूटरवर बसवून कानेटकरांच्या घरी नेण्याचे काम करी. बर्याचदा बाहेरूनच परत फिरे. पण काही वेळा कानेटकर मला बोलावून घेत. पाटकरांसाठी लिहिलेल्या काही एकांकिकांवर त्यांनी नंतर नाटकेही लिहिली. दत्तो वामनांच्या व्यंगचित्रावर कानेटकरांनी मला चांगली दाद दिली. मात्र स्वतःच्या चित्रावर ते काहीही बोलले नाहीत.
त्यांच्याकडे वेळ कमी असे. ते एचपीटी कॉलेजमध्ये नोकरीला होते. व्याप वाढल्यानंतर ती सोडली. नाटके लिहिणे चालू असे. त्यामुळे अनेक नाटक निर्मात्यांची त्यांच्याकडे वर्दळ असे. त्यात चंद्रलेखाचे मोहन वाघ, धी गोवा हिंदू असोसिएशन, नाट्यसंपदाचे प्रभाकर पणशीकर आदी नेहमी असत. कॉलेजात ते इंग्रजी व मराठी शिकवीत. शेक्सपिअरची नाटके वा मराठी कविता ते अत्यंत रसाळ भाषेत साभिनय शिकवीत. इतके की इतर वर्गातील मुले, मुली, प्रोफेसर्स त्यांच्या तासाला येऊन बसत. गोरापान हसरा चेहरा, विद्वत्तेचे तेज असलेले कानेटकर कॉलेजला सुटाबुटात जात. क्वचित हाफ बुशशर्ट वापरत.
गंगेवरच्या आल्हाददायी विस्तीर्ण पटांगणात कित्येक वर्ष मोठा भाजीबाजार भरायचा. तेथे ताजा भाजीपाला मुबलक मिळे. ते विस्तीर्ण पटांगण आज बेवारस पडले आहे. बारा वर्षांनी येणार्या सिंहस्थासाठी महापालिकेने भाजीविक्रेत्यांना देशोधडीला लावले आहे. कानेटकर रोज भाजी आणायला स्कूटरवर जात. चार ठिकाणी फिरून ताजी भाजी घेत घेत विक्रेत्यांशी गप्पा मारीत. हा खूप मोठा माणूस आहे असे विक्रेत्यांना समजत असे पण नक्की ठाऊक नसे. भाजी घेताना ते भाव करीत नसत. गरीब माणसे कमावणार काय, खाणार काय, ही भावना त्यामागे असे. नाटक-कादंबरीतील अनेक पात्रे लेखकांना अशा ठिकाणीच सापडतात.
माझे एक मित्र वासुदेव दशपुत्रे सत्तावन्न अठ्ठावन्न साली त्यांच्या वर्गात होते. ते म्हणाले, त्या वेळेस कानेटकर आमचे एनसीसीचे कमांडर होते. एनसीसीसाठी लागणारे खर्चाचे पैसे कानेटकरांकडे असायचे. एकदा थोडीफार अडचण आली. पत्नीला- त्यांचे नाव सिंधूताई- म्हणाले, यातले थोडेफार पैसे मी खर्च करतोय. पगार झाला की भरून टाकू. सिंधूताईंनी निक्षून सांगितले, ‘ही सवय लावून घेऊ नका. आहे त्यात भागवायला शिकू या.’ कानेटकरांनी त्यांचं ऐकलं, कारण सिंधूताई त्यांच्या प्रत्येक नाटकाचं प्रथम वाचन ऐकायच्या, सूचना करायच्या. कानेटकरांचा मूळ कल कादंबरी लिखाणाकडे असायचा. मात्र एका कादंबरीत संवाद खूप होते. त्यावर त्या म्हणाल्या, कादंबरीपेक्षा यावर नाटक चांगले होईल. त्यांना ते पटले व पहिले नाटक जन्माला आले ते ‘वेड्याचे घर उन्हात’.
अनेकदा ते तात्यासाहेब शिरवाडकरांकडे जात, तेव्हा बरेचदा तात्यासाहेब चाहत्यांचा गराड्यात असायचे. कानेटकरांना त्याचे खूप अप्रूप वाटे. ते बोलूनही दाखवत, ‘तात्यासाहेब असा दरबार मला नाही भरवता येणार!’ कदाचित कामाचा खूप व्याप असेल, डोक्यात सतत नाटकांचे विचार. यामुळे नाशिककरांशी त्यांची फार सलगी होऊ शकली नाही. त्यांच्याबद्दल सतत आदरयुक्त भीती वाटायची. शिवाय बंगल्याच्या दाराशी अल्सेशियन कुत्रा बांधलेला असायचा. कानेटकरांनी म्हटले ‘येऊ दे पाहुण्यांना आत’ की तो आलेल्या अभ्यागतांचा नाद सोडून देई. तात्यासाहेब, पुलंसारखे मित्र, लेखक, निर्माते, दिग्दर्शक, नटनट्या यांच्याबरोबर ते रमत, गप्पा रंगत, नाट्यप्रवेशांचे वाचन, चर्चा होई. त्यांचे नाट्यवाचन अत्यंत प्रभावी होते. वाचता वाचता नाटकातील पात्रे ते इतक्या उत्कटपणे जिवंत करत की एकाच वाचनात अनेक व्यक्तिरेखा डोळ्यांपुढे उभ्या राहत. कलावंत हा आविष्कारातच पाहावा मग ते अमिताभ बच्चन असोत, आर. के. लक्ष्मण असोत वा वसंतराव कानेटकर. सर्वसामान्य माणसांच्या कथा-व्यथा ते इतक्या उत्कटपणे मांडतात- कधी अभिनयातून वा कधी रेषांतून किंवा शब्दांतून. मात्र हेच लोक सर्वसामान्यांशी बर्याचदा रिझर्व वागताना दिसतात.
तरूणपणी कानेटकर लिहित असलेल्या नाटकाचे वाचन करायला सल्ला मसलतीसाठी पुण्याला गदिमांकडे जात. गदिमा घरी नसले तर त्यांच्या पत्नी विद्याताई यांना ते वाचून दाखवीत. त्यासुद्धा स्वयंपाक करता करता आवडीने ऐकत, असं वाचल्याचं मला आठवतं. त्यांच्या साभिनय वाचनाने ज्येष्ठ नट अशोककुमार सुद्धा प्रभावित झाले होते. त्याचं असं झालं की ‘अश्रूंची झाली फुले’ या सुपरहिट नाटकावर अशोक कुमार यांनी ‘आंसू बन गये फूल’ हा हिंदी चित्रपट काढला होता. प्रोफेसर विद्यानंदांची भूमिका ते स्वत: करणार होते. ती समजून घेण्यासाठी ते स्वतः नाशिकला कानेटकरांकडे आले होते. पूर्ण नाटक, भूमिका यावर कानेटकरांनी साभिनय भाष्य केले. अशोक कुमार प्रभावित झाले व म्हणाले, ‘आप तो अच्छे अॅक्टर बन सकते थे! इस नाटक की उंचाई सिनेमा में मैं ला पाऊंगा?’ अशोक कुमारांनी साशंकपणे विचारले. एक बुजुर्ग नट नम्रपणे विचारत होते. खरे तर मोठ्या माणसांची आदबच वेगळी. हे छोटे मोठे प्रसंग वासुदेव दशपुत्रे भरभरून सांगत होते.
वासुदेवांचे अक्षर अत्यंत सुंदर. बर्याचदा ते तात्यासाहेब व कानेटकरांकडे लेखनिक म्हणून जात. छंद म्हणून. एरवी ते स्वतः एलआयसीत ऑफिसर होते. ते म्हणाले, मोहन वाघ नेहमी नव्या नाटकासाठी कानेटकरांकडे येत. तोवर त्यांच्या नाट्यसंस्थेचे नाव नक्की झालेले नव्हते. कानेटकरांच्या मुलीचे नाव चंदा होते. काही कामासाठी कानेटकरांनी तिला हाक मारली. ते नाव मोहन वाघांना क्लिक झाले व तेथेच ‘चंद्रलेखा’ संस्थेचे नामकरण झाले.
एकदा कानेटकर वासुदेवांना दोनशे रुपयांच्या नोटा हातात देत म्हणाले, अरे अमुक तमुक ब्रँडची व्हिस्की आणायचीय. संगीतकार सी. रामचंद्र संध्याकाळी येत आहेत. त्यांनी व्हिस्कीबरोबर मचिंग म्हणून शेवचिवडा, खारे दाणे आणले. साहेब चमकलेच, म्हणाले, बराच तयार दिसतोस रे… संध्याकाळी छान गाण्यांची मैफिल झाली. सी. रामचंद्र यांच्यासारखे महान संगीतकार ऐकायला मिळाले.
नाशिकच्या आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड्स वाटप उद्घाटन कार्यक्रम होता. वसंतराव अध्यक्ष तर मी प्रमुख पाहुणा होतो. अनेक कार्यक्रमांना मला बोलावण्यामागे माझ्या झटपट कार्टून प्रात्यक्षिकांची रंगत पाहण्यासाठी असे. हुकमी चित्रे पाहून लोक लोटपोट हसत. कार्यक्रम सुरू झाला. हारतुरे झाल्यावर मॅनेजरांनी मला रेखांकित शुभेच्छा द्यायला सांगितले. ईझल आणि दोन-चार मार्क्स तेथे ठेवलेले होते. पेपरात मंगळावर माणूस पाठविण्याचा बातम्या येत होत्या. तो धागा मनाशी पकडून मी बोर्डवर मंगळाचा पृष्ठभाग रेखाटला आणि तेथे एक बोर्ड काढला त्यावर लिहिले, आयसीआयसीआय बँक मंगळ ब्रँच. प्रेक्षकांनी कडकडून टाळ्या वाजवल्या. मी विचारलं, आणखी काही?
एकाने त्या बोर्डाशेजारी आणखी एक बोर्ड काढला व म्हणाला, आता चित्र पूर्ण करा. मी क्षणभर संभ्रमित झालो आणि बोर्डावर मी ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या कानेटकरांच्या गाजलेल्या नाटकाचे नाव लिहिले आणि म्हटले, बघा बघा, कानेटकर साहेबांची नाटके महाराष्ट्रातच नव्हे तर इतकी दूरवर कधीच पोचलीत. टाळ्यांचा कडकडाट झाला. कानेटकरांनी अत्यंत खुशीने मंद स्मित केलं.
१९९७-९८ दरम्यान प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी त्यांच्या व्यंगचित्रांचं प्रदर्शन नाशिकला भरविलं होतं. त्याचं उद्घाटन वसंतराव कानेटकर यांच्या हस्ते झाले. मंगेशरावांनी मला आग्रहानं बोलाविले होते. त्यावेळी मी तेंडुलकरांच्या कार्टून्सची वैशिष्ट्ये सांगितली. फिट्टम्फाट करण्यासाठी तेंडुलकर म्हणाले, ज्ञानेश सोनारांची चित्रे मोठी रोमॅन्टिक असतात. विशेषतः तरुणी. एकदा ‘जत्रा’ साप्ताहिकाचे संपादक पुरुषोत्तम बेहरे मला म्हणाले, तेंडुलकर, तुमच्या कल्पना खूपच छान असतात; पण चित्रे जरा सोनारांसारखी काढा की. त्यावर मी शांतपणे म्हणालो की, तशी चित्रे काढणे फारसे अवघड नाही. ‘जत्रा’साठी अवश्य काढीन. मात्र चित्राखाली सही सोनारांची करीन, चालेल? बेहेरे यावर काही बोलले नाही.
अध्यक्ष म्हणून कानेटकरांनी तेंडुलकरांच्या व्यंगचित्रांवर, कल्पकतेवर अत्यंत सुंदर भाषण केले. नाटक लिखाणाच्या व्यग्रतेमुळे काही चांगल्या गोष्टींचा आस्वाद घेता आला नाही. त्यात पेंटिंग्ज, व्यंगचित्रे फोटोग्राफी इत्यादिंचा समावेश आहे. मात्र संगीत मला आवडते. पेटी मी चांगली वाजवतो. स्वयंपाकही चांगला करतो. कार चालवण्यापेक्षा ती स्वच्छ व नेटकी ठेवण्याकडे माझा कल असतो. क्रिकेट व टेनिस मला आवडते. आता जरा ज्ञानेश सोनारांविषयी बोलतो. शिवाजी महाराजांवर मी पाचसहा नाटके लिहिली. त्यावर सोनारांनी एक व्यंगचित्र काढले. माझ्यावरच नाही, दत्तो वामन पोतदार, पु. ल. देशपांडे, गदिमा वगैरेंवर सुद्धा. त्या चित्राने कळत नकळत माझ्यापासून महाराजांची दुसर्यांदा सुटका केली आग्य्राच्या सुटकेनंतर. टाळ्या पडल्या. मी उभा राहून म्हणालो, माझ्या त्या साहित्यिकांच्या चित्रांवर सर्वांच्या प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. पण, कानेटकर सरांच्या प्रतिक्रियेसाठी मला सत्तावीस वर्ष थांबावे लागलेय. त्यांच्यासह सगळेच मनसोक्त हसले.
नाशिककर म्हणून मला नेहमीचे खंत जाणवली व मी अनेकदा बोललो सुद्धा आहे. एवढा चतुरस्त्र, आकाशाएवढे कर्तृत्व असणारा हा माणूस नाशिककरांना मात्र कळाला नाही. ना सरकारने त्यांच्या ‘शिवाई’ या वास्तूचे स्मारक म्हणून जतन केले, ना बाहेरच्या छोट्या मोठ्या लेखकांना मोठमोठे सन्मान देणार्या नाशिककरांनी कानेटकरांची आठवण ठेवली…