कुंचल्याची ताकद काय असते, ते दाखवून देणारा जिवंत चमत्कार म्हणजे शिवसेना! देशात अव्वल दर्जाचे राजकीय व्यंगचित्रकार अनेक झाले. त्यांनी त्यांच्या रेषांमधून तत्कालीन सरकारच्या कारभारावर, समाजाच्या दांभिकतेवर भाष्य केले. हे झाले रेषांमधून बोलणारे ‘बोलके’ व्यंगचित्रकार. पण, ज्याच्या कुंचल्यातल्या रेषांनी समाजातल्या दंभावर आणि राजकारण्यांच्या कुटील नीतीवर सपासप वार केल्यासारखे फटकारे लगावले आणि सर्वसामान्य माणसांच्या मनात भयंकर चीड निर्माण केली, असे ‘कर्ते’ व्यंगचित्रकार एकच… हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे… त्यांची व्यंगचित्रं वाचकांची मनं कशी प्रक्षुब्ध करत असतील, त्यांच्या मनातले थंडगार झालेले निखारे कसे चेतवत असतील, याचं प्रखर दर्शन घडवणारं हे चित्र… धर्मराजाने द्यूतात हरलेल्या द्रौपदीचे केस हिसडणार्या दु:शासनाची आठवण करून देणारे, भरतभूला लिलावात काढणारे राजकीय दलाल (बाळासाहेबांनी वापरलेला शब्द व्यंगचित्रात आहेच) पाहूनच वाचकाच्या मनात संताप जागत असेल आणि ‘मातेसाठी गिर्हाईके शोधा’ ही तप्त शिशासारखी जाळणारी ओळ वाचल्यावर डोळ्यांत खदिरांगार पेटत असेल… शरमेनेही मन काळेठिक्कर पडत असेल… भारतमातेचा लिलाव अजूनही सुरूच आहे… निर्लज्ज दलाल आजही बोली लावत आहेत… पण मुर्दाड मनांना पेटवणारा तो कुंचला आज कुठे आहे?