अठरा वर्षे विधानपरिषद सदस्य आणि सहा वर्षे विधानसभा सदस्य एवढी त्यांची प्रदीर्घ संसदीय कारकीर्द होती. रयत शिक्षण संस्थेसारख्या राज्यातल्या मोठ्या शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष होते. तरीही त्यांनी साधी राहणी सोडली नाही. आमदार असतानाही स्वतःचे कपडे स्वतः धूत होते. कर्मवीरांनी जो स्वावलंबनाचा मंत्र दिला होता, तो प्रत्यक्षात जगणारा हा माणूस होता. कर्मवीरांच्या तालमीत जी संस्कारशील पिढी निर्माण झाली, त्या पहिल्या पिढीचे एनडी पाटील हे प्रतिनिधी होते. बोले तैसा चाले… याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे एनडी पाटील होते.
– – –
१९८५ची विधानसभा निवडणूक असावी. काँग्रेस (आय) हा राज्यातला प्रमुख पक्ष होता. विरोधी पक्षाचे नेतृत्व शरद पवार यांच्याकडे होते. काँग्रेस (आय)च्या विरोधात काँग्रेस एस, शेकाप, जनता पक्ष यांची आघाडी मैदानात होती. कोल्हापूर शहर मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाकडून प्रा. एन. डी. पाटील उभे होते. शरद पवार यांच्या प्रचंड लोकप्रियतेचा तो काळ होता. १९७८मध्ये पुलोदचे मुख्यमंत्री झाल्यानंतर शरद पवार हे खर्या अर्थानं महाराष्ट्रातल्या तरुणांचे नेते बनले होते. शरद पवारांची सभा ऐकायला हजारोंची गर्दी जमायची. पवार तेव्हा पंचेचाळिशीचे होते. पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रात फिरत होते. निवडणूक आचारसंहिता असली तरी शेषनपूर्व काळ असल्यामुळे तसे प्रचारावर फारसे निर्बंध नव्हते. त्यामुळे दिवसरात्र सभांचा धडाका सुरू असायचा. प्रचाराचा तोच एकमेव प्रभावी मार्ग होता. कोल्हापूरचे वरुणतीर्थ वेसचे गांधी मैदान हे मोठ्या सभांसाठी प्रसिद्ध. इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांच्या शहराबाहेर झालेल्या सभा वगळता सगळ्या मोठ्या सभा याच मैदानावर होत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सगळ्या सभा इथेच झाल्या. आणीबाणीच्या काळातली पु. ल. देशपांडे यांची ऐतिहासिक सभाही इथंच झाली होती. या मैदानात एन. डी. पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची सभा होणार होती. सभेची वेळ सायंकाळची होती. सभा सुरू झाल्यानंतर साधारणपणे तासाभरात प्रमुख वक्त्याने येणे अपेक्षित असते. त्यानुसार प्रमुख वत्तäयाच्या आधी उमेदवाराचे भाषण सुरू होते. प्रा. एन. डी. पाटील यांचे भाषण सुरू झाले. ते बोलत राहिले. त्यावेळी काँग्रेसने वृत्तपत्रांतून `हीच वेळ आहे` अशा शीर्षकाची एक जाहिरात मोहीम राबवली होती. एनडी पाटील यांनी काँग्रेसच्या त्याच जाहिरातीचा आधार घेऊन बोलायला सुरुवात केली. एकेक मुद्दा घेऊन काँग्रेसचा पंचनामा करायचे आणि म्हणायचे, लक्षात ठेवा हीच वेळ आहे काँग्रेसला गाडायची… या सभेला यायला शरद पवार यांना एक-दोन नव्हे तर तब्बल सहा तास उशीर झाला. सायंकाळी होणार्या सभेला शरद पवार मध्यरात्रीनंतर पोहोचले. परंतु तोपर्यंत हजारोंच्या गर्दीला एनडी पाटील यांनी भाषणाने बांधून ठेवले होते. तब्बल सहा तास हजारोंचा समुदाय एनडी पाटील यांना ऐकत होता. शरद पवार यांना ऐकायला थांबला होता. विधिमंडळात एनडी पाटील यांनी केलेल्या अनेक दीर्घ भाषणांच्या आठवणी सांगितल्या जातात. परंतु इथे तर जाहीर सभेत त्यांनी सहा तास भाषण करून श्रोत्यांना बांधून ठेवले होते. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक ऐतिहासिक सभा आणि ऐतिहासिक भाषण म्हणून त्याची नोंद करायला हवी.
कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरात अर्धशतकाहून अधिक काळ एनडी पाटील नावाची मुलुखमैदान तोफ बरसत राहिली. कष्टकर्यांचा, शेतकर्यांचा आवाज बनून राहिली होती.
—-
सप्टेंबर २०१६मधली घटना आहे. मुंबईहून कोल्हापूरला गेल्यानंतर नेहमीप्रमाणं एनडी पाटील सरांच्याकडं गेलो होतो. माई (सरांच्या पत्नी सरोजताई) कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. सर बिछान्यावर झोपून होते. एका पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे हालचाली मर्यादित होत्या. काही महिन्यांपूर्वी इन्शुलीनची इंजेक्शन सुरू होती. दिवसातून तीन वेळा घ्यायला लागायची. परंतु हे रोज इंजेक्शन घेऊन त्यावर जगायचं असेल तर जगण्यात काय अर्थ नाही, असा विचार करून त्यांनी इंजेक्शन बंद करण्यासाठी इच्छाशक्ती दाखवली. त्यासाठी खाण्यावर नियंत्रण आणलं. फक्त एक वेळचे जेवण. त्यातही नाचणीची भाकरी. दोन अंडी. दुपारी ग्लासभर ताक, संध्याकाळी नाचणीची आंबिल आणि रात्री ग्लासभर दूध एवढंच. इंजेक्शन बंद झाली. दुपारी फक्त एक गोळी राहिली. इंजेक्शनचा पेशंट शक्यतो गोळीवर येत नाही, पण सरांनी ते करून दाखवलं. दहा-बारा वर्षांपासून सर एका किडनीवर होते. त्यासाठीची तपासणी ठराविक दिवसांनी असे. गेल्या दोन-अडीच वर्षांत तीन-चार मोठी आजारपणं झाली. त्या सगळ्यावर मात करून सरांचं लढणं सुरूच होतं.
सरांकडे गप्पा मारत बसलो असतानाच सातारा जिल्ह्यातून काही लोक आले. एका बँकेच्या मोठ्या समारंभाचं निमंत्रण घेऊन. आलेल्या लोकांचं चहापाणी, आगतस्वागत झाल्यावर सर त्यांना म्हणाले, आता सभा-समारंभांना जाणं मी बंद केलंय. त्यामुळे तुमच्या कार्यक्रमाला नाही येऊ शकत. समारंभ बंद केलेत. पण संघर्षाच्या ठिकाणी जातो. जिथं मी गेलो नाही तर काही फरक पडत नाही, अशा ठिकाणी नाही जात आता. पण जिथं आपल्या जाण्याशिवाय पर्याय नाही, तिथं नक्की जातो. त्यामुळं संघर्ष असेल, मोर्चा असेल तरच जातो.
या भेटीत आणखी एका वेगळ्या अनुभवाचं साक्षीदार बनता आलं.
सरांना एक फोन आला. फोनवर सरांनी नाव विचारल्यावर तिकडून त्या व्यक्तीनं ते सांगितल्यावर सर म्हणाले, कोण विजय कांबळे? ये की वर. मी घरीच आहे. माझ्या दारावर काय पोलिस पहारा बसवलेला नाही…
थोड्या वेळानं एक अंध गृहस्थ आले. सोबत त्यांची सोळा-सतरा वर्षांची मुलगी होती. मी त्यांना ओळखलं. त्यांचं नाव होतं विजय जांभळे. पूर्वी सकाळच्या कार्यालयात ते अधूनमधून येत असत. जांभळेचं सरांनी कांबळे ऐकलं असावं. या विजय जांभळेची एनडी सरांशी ओळख ना पाळख. ते सरांना आपलं गार्हाणं सांगू लागले. कौटुंबिक परिस्थिती हलाखीची आहे. बायको धुणीभांडी करते. मुलगीला आयटीआयला अॅडमिशन घेतलंय. बसच्या पाससाठी पैसे नाहीत. तुम्ही काहीतरी मदत कराल म्हणून आलोय.
सरांनी कोर्स, अॅडमिशन वगैरेची आस्थापूर्वक चौकशी केली.
अॅडमिशन घेतल्याचा काही पुरावा आहे का विचारलं. मुलीनं पिशवीतनं अॅडमिशनची पावती वगैरे दाखवली. सरांची खात्री पटली की सांगताहेत ती माहिती खरी आहे. किती पैसे लागतील वगैरे विचारून घेतलं. आपल्या एका बॅगेतून तेवढे पैसे काढून त्या गृहस्थांना दिले आणि वर थोडे सुट्टे पैसे वाटखर्चीला असूदे म्हणून दिले.
बोलता बोलता ते अंध गृहस्थ म्हणाले, ‘मी भाजपच्या ऑफिसात गेलो होतो मदत मागायला. बिंदू चौकात वरच्या बाजूला आहे तिथं. तिथं मला तुमच्याकडं जायला सांगितलं. तुम्ही मदत कराल असं तिथले लोक म्हणाले. तुमचा पत्ता आणि फोन नंबर त्यांनीच दिला.’
त्यावर सर म्हणाले, ‘हो का? भाजपवाल्यांना बरं माझ्याबद्दल एवढं प्रेम दाटून आलं ते…’
एकूण प्रकरण काय असावं, ते माझ्या लक्षात आलं.
म्हणजे हे गृहस्थ आर्थिक मदत मागण्यासाठी भाजपच्या कार्यालयात गेले. तिथं कुणीतरी त्यांची चेष्टा करण्यासाठी एनडी पाटील सरांचा पत्ता आणि फोन दिला असणार. गरिबांसाठी संघर्षाच्या बाता मारतात, बघूया खरोखरच गरजू गेल्यावर खिशात हात घालतात का ते, हेही तपासण्याचा त्यांचा हेतू असावा.
मी सरांना म्हटलं, तुमची गंमत करायला म्हणून या गृहस्थांना तुमच्याकडं कुणीतरी पाठवून दिलंय.
त्यावर सर म्हणाले, ‘ते खरं आहे. पण माझी गंमत आणि या गृहस्थांची गंमत दोन वेगवेगळ्या पातळीवरची आहे. मला काही नाही त्याचं. मी मदत देईन किंवा देणार नाही. परंतु या गृहस्थांचं वेगळं आहे. ते गरजू आहेत. अंध आहेत. अशा माणसाची चेष्टा करणं माणुसकीला धरून नाही.’
एका गरजवंताची चेष्टा करण्यातलं कारुण्य सरांनी सहजपणे उलगडून दाखवलं.
—-
राज्य सहकारी बँकेनं २९ सहकारी साखर कारखाने विकले. असाच तासगावचा तासगाव सहकारी साखर कारखानाही विकला होता. आर. आर. पाटील आणि संजय पाटील यांच्यातील राजकीय तडजोडीसाठी हा राजकीय निर्णय होता. सरांचा या कारखान्याशी तसा काहीही संबंध नाही. परंतु त्यांच्या कानावर हा विषय आला. तसं पाहायला गेलं तर तासगाव हे काही एनडी सरांचं राजकीय कार्यक्षेत्र नव्हतं किंवा तिथं त्यांचा पक्षही दखलपात्र नव्हता. तरीसुद्धा आपल्या जिल्ह्यातील एक सहकारी साखर कारखाना राजकीय तडजोडीसाठी कवडीमोल दरानं कुणाच्या तरी पदरात टाकला जातोय म्हणून सरांनी कंबर कसली. साखर आयुक्तालयापासून सहकार खात्यापर्यंत अनेक पातळ्यांवर प्रयत्न केले आणि हा कारखाना विकण्याचा डाव हाणून पाडला. वयाच्या ८८व्या वर्षी त्यांनी ही लढाई यशस्वी करून दाखवली. अशा छोट्यामोठ्या शेकडो लढाया एनडी सरांनी आयुष्यभर केल्या. सगळ्याच यशस्वी झाल्या असं नाही, परंतु त्यांच्या नैतिक ताकदीनं सत्ताधार्यांना आपल्या अनेक निर्णयांचा फेरविचार करावा लागला.
कोल्हापूर शहरातल्या टोलचा लढाही सरांनी गोविंदराव पानसरे अण्णांच्या साथीने आणि कोल्हापूरच्या जनतेच्या पाठिंब्यावर असाच नेटाने लढवला. यशस्वी करून दाखवला. कोल्हापूरचा टोल हद्दपार केला. रायगड जिल्ह्यातील रिलायन्सच्या सेझची हकालपट्टी करण्यासाठीही सरांनी निकरानं लढा दिल्याची गोष्ट फार जुनी नाही. एनरॉन प्रकल्पाच्या विरोधात त्यांनी डाव्या पक्षांच्या सहकार्याने दिलेला लढाही असाच ऐतिहासिक होता.
—-
रस्त्यावरचा संघर्ष, चळवळी ही एनडी सरांची ऊर्जा होती. कोरोनाकाळ सुरू झाला आणि सगळंच बंद झालं. एनडी सरांचं बाहेर फिरणंही बंद झालं. सतत माणसांच्या गर्दीत असलेला हा माणूस माणसांपासून तुटल्यामुळं अंथरुणावरच खिळला. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मी कोल्हापूरला गेल्यावर सरांच्या घरी गेलो. मधल्या काळात प्रकृतीत बरीच स्थित्यंतरं झाली आहेत. नव्वदी पार करून सरांनी एक्क्याण्णव गाठले होते. थकले होते आणि अंथरुणावरच असत. माणसं ओळखत नव्हते. केअर टेकर असले, तरी ती. माई सरांचं सगळं खूप आत्मीयतेनं करत असत. पुन्हा लोकांची भेटीसाठी वर्दळ सुरू झाली होती, परंतु सर कुणाला ओळखत नव्हते. सर बाहेरच्या खोलीत कॉटवर पहुडलेले. माई म्हणाल्या, भेटून घ्या. बघूया ओळखतात का. हाक मारल्यावर ओ दिली. चेहर्याकडं बघितलं, पण ओळखू शकले नाहीत.
यावेळी सरांच्या हातात पुस्तक होतं. पुस्तकाच्या मागील पृष्ठावरचा मजकूर वाचत होते. अर्थात त्यांना ते दिसत होतं का, दिसत असलं तरी वाचता येत होतं का आणि वाचता येत असलं तरी कळत होतं का असे अनेक प्रश्न माझ्या मनात उभे राहिले. पण अशा अवस्थेतही सरांनी हातातलं पुस्तक खाली ठेवलेलं नाही, हे मला महत्त्वाचं वाटलं. आयुष्यभर त्यांनी पुस्तकांना किती महत्त्व दिलं हे यावरून लक्षात आलं. सरांचं आयुष्य रस्त्यावरच्या संघर्षात गेलं. या संघर्षाला अभ्यासाची बैठक होती. म्हणूनच अनेक कठीण लढाया त्यांनी यशस्वी करून दाखवल्या.
—-
अठरा वर्षे विधानपरिषद सदस्य आणि सहा वर्षे विधानसभा सदस्य एवढी त्यांची प्रदीर्घ संसदीय कारकीर्द होती. रयत शिक्षण संस्थेसारख्या राज्यातल्या मोठ्या शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष होते. तरीही त्यांनी साधी राहणी सोडली नाही. आमदार असतानाही स्वतःचे कपडे स्वतः धूत होते. कर्मवीरांनी जो स्वावलंबनाचा मंत्र दिला होता, तो प्रत्यक्षात जगणारा हा माणूस होता. कर्मवीरांच्या तालमीत जी संस्कारशील पिढी निर्माण झाली, त्या पहिल्या पिढीचे एनडी पाटील हे प्रतिनिधी होते. बोले तैसा चाले… याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे एनडी पाटील होते. महात्मा गांधी यांच्या संदर्भात अल्बर्ट आइनस्टाईन म्हणाला होता की, असा हाडामांसाचा माणूस प्रत्यक्षात होऊन गेला यावर पुढच्या पिढ्यांचा विश्वास बसणार नाही. एनडी पाटील यांचे अनेक किस्से आजही दंतकथांसारखे वाटतात. त्यामुळं त्यांच्यासाठीही आइन्स्टाईन यांचेच शब्द उसने घेऊन म्हणावं लागेल की, असा हाडामांसाचा माणूस प्रत्यक्षात होऊन गेला यावर पुढच्या पिढ्यांचा विश्वास बसणार नाही.