माझा मानलेला परममित्र पोक्या सकाळीच एक आश्चर्यकारक बातमी घेऊन आला. ती ऐकून मी चाटच झालो. कारण पोक्याकडून कधीच मी अशा बातमीची अपेक्षा केली नव्हती. सध्या पौष महिना आहे ना? या महिन्यात म्हणे लग्नबिग्न करत नाहीत असे म्हणतात, या त्याच्या दोन वाक्यांनी मी उडालोच. मी म्हटले, या महिन्यात मर्डर वगैरे करत नाहीत ना असे काहीतरी तू म्हणशील, पण तू चक्क आपल्या नेहमीच्या चौकटीत न बसणारा प्रश्न विचारलास, त्यामुळे मला भूकंपासारखाच धक्का बसलाय. तुझ्या डोक्यात लग्नाचा वगैरे विचार नाही ना? पण एक लक्षात ठेव, आपल्या धंद्यात कोणीही शक्यतो लग्नाच्या भानगडीत पडत नाहीत. त्याची गरजच नसते. आपले कधी काय होईल हे ब्रह्मदेवाचा बाप तरी सांगू शकेल का? उगाच एखाद्या चांगल्या मुलीचे आयुष्य का बरबाद करायचे? संसार-बिंसार या गोष्टी आपल्यासारख्याच्या कक्षेत येत नाहीत. नस्ते लचांड असते ते. लग्नानंतर जी सुखं मिळतात ती लग्न न करताही आजपर्यंत आपण मिळवत आलोच ना? त्याशिवाय आपण आपल्या मर्जीने जगतोय! करोडोची संपत्ती असूनही वस्तीतल्या पत्र्याच्या चाळीत राहतोय. एका प्रमुख पक्षाच्या आश्रयाने समाजकार्याच्या नावाने आपले धंदे व्यवस्थित चालू आहेत. सगळे टरकून असतात आपल्याला. शिवाय दिल्लीशी क्लोज सर्कीट आहे ते वेगळेच. एवढी सगळी सुखे पायाशी लोळण घेत असताना तुला लग्न करण्याची दुर्बुध्दी का बरे सुचली वत्सा?
– नाही रे. कंटाळा आलाय या सगळ्याचा. कुठेतरी थांबावे असे वाटतेय.
– मग थांब ना. त्यासाठी लग्न हा उपाय नाही. पण लक्षात ठेव, थांबला तो संपला. उद्या तूही माझ्यापेक्षा मोठा कोणी झालास तर म्हणू शकतोस, मैं शादीशुदा नहीं, लेकिन ब्रह्मचारी भी नही हूं। पण तू ऐकणार नाहीस. तरीही पौष महिन्यातच लग्न करण्याचा झटका का आला? आमच्यात तर लग्नाचा विषयही काढत नाहीत, मग लग्न करण्याची गोष्टच सोडा.
– पण माझ्या मनासारखी मुलगी मिळाली तर!
– तू कुणाच्या किंवा कोणी तुझ्या प्रेमात बिमात पडली आहे का?
– नाही रे. आता तुला खरं सांगतो. गेल्या आठवड्यात पेपरात वधु-वर सूचक कॉलममध्ये एका मुलीची जाहिरात पाहिली आणि ती माझ्यासाठीच आहे, हे माझ्या मनाने पक्के केले.
– अरे गाढवा, ती जाहिरात तरी काय होती?
– सांगतो, वधूची जाहिरात जशी असते, तशीच होती. वय अमुक अमुक, वर्ण निमगोरा, उंची पाच फूट तीन इंच. शिक्षण केटरिंगचा डिप्लोमा… पण मला तिच्या अपेक्षा आवडल्या. त्या अशा- वर निर्व्यसनी नको, सर्व प्रकारच्या मद्यसेवनाची आवड हवी, नॉनव्हेज, पार्ट्यांची आवड आवश्यक. शिक्षणाची अट नाही. आठवी पास चालेल. घरी रोज बाहेरून जेवण मागवणारा हवा. मित्र-मैत्रिणींची आवड हवी. पोलिसांमध्ये, राजकारण्यांमध्ये वट हवी. नवरेशाही गाजवणारा नसावा. डान्स येत असल्यास उत्तम. जेल रिटर्न असल्यास प्राधान्य. गेम करण्यात हुशार असावा. मला धाडसी माणसे आवडतात, त्यामुळे तोही तसाच `भाई’ असल्यास अग्रक्रमाने विचार. साध्या झोपडीत राहणारा असला तरी चालेल. लग्नाचा वायफळ खर्च नको. लग्न कोर्ट मॅरेज पद्धतीने करण्याची तयारी हवी. फक्त माझ्यावर मनापासून प्रेम करणारा हवा. मी स्त्रीमुक्तीवादी नसून पुरुष मुक्तीवादी आहे. त्याशिवाय बोल्ड अॅन्ड ब्युटिफुल आहे. पतीच्या सुखात माझे सुख मानणारी आहे. मी भावी पतीला त्याच्या इच्छेप्रमाणे वागू देईन. ही जाहिरात वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण मला काही वेगळे करून दाखवायचे आहे. पतीला त्याला साजेसा योग्य सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून द्यायची आहे. म्हणूनच योग्य वराच्या शोधात आहे…
जाहिरात वाचून टोक्याही (म्हणजे मीच) हडबडला. त्यालाही ती जाहिरात आणि धाडसी पोरगी आवडली. मलाही आता लग्नाचा विचार करावासा वाटू लागला, अशा लाटेचे तरंग त्याच्या मनातही लहरून गेले. क्षणभर तो अवाक झाला. मग मात्र पोक्यासारख्या मित्रासाठी एवढा त्याग करावाच लागेल, हे त्याच्या मनाने पक्के केले आणि पोक्याला घट्ट मिठी मारत मी ओरडलो, पोक्या तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं। एवढी सोशल पत्नी पोक्याला मिळणार याचा मला मनापासून आनंद झाला. मी पोक्याला म्हणालो, पोक्या, अरे आजपर्यंत तू मला एवढी मदत केली आहेस की तुझ्यासाठी कसलाही त्याग करण्यास मी तयार आहे. लग्न रजिस्टर्ड करूयाच पण नंतर आपल्या राजकारणी मित्रांपासून गुंड मित्रांपर्यंत सर्वांना मला ग्रॅण्ड पार्टी द्यायची आहे. आपल्या दोघांची प्रतिष्ठा किती मोठी आहे, हे तुझ्या भावी वधूला कळले पाहिजे ना! मी तर लग्नात तुम्हा वधुवरांची एका आलिशान पॅलेसमध्ये कायमची रवानगी करणार आहे. एक हेलिकॉप्टर तुमच्या दिमतीला असेल. फक्त तू आता तुझा होकार आणि अटी मान्य असल्याचे कळव. तोपर्यंत पौष संपेल आणि तुमचा लग्नसोहळाही पार पडेल.
माझ्या या प्रेमाने पोक्याही भारावला. `भाई हो तो ऐसा’ असे उद्गार त्याच्या तोंडून मनापासून बाहेर पडले. शेवटी मुलीकडून होकार आला आणि आम्हा दोघांचा आनंद वस्तीत मावेना. मग मुलीला पाहण्याचा, कांदेपोहे हादडण्याचा कार्यक्रम झाला. पोक्याने तिचे पाकळी हे लग्नानंतरचे नावही नक्की केले. कधी एकदा लग्न होते, असे पोक्याला झाले होते. पोक्या तिच्यावर कविता करू लागला होता. दोघे चौपाटीवर जाऊन भावी संसाराची स्वप्ने रंगवू लागले.
शेवटी गप्पा मारताना मी पोक्याला म्हणालो, आपल्या दोघांच्या गँगमध्ये तिसरा मेंबर वाढणार आता… पोक्या मनापासून खदखदून हसला.