चालती-बोलती माणसं अशी अचानक चालता-चालता अचानक आपल्यातून निघून जाणं, हे अलीकडच्या काळात खूप व्हायला लागलं आहे. त्यात ही माणसं जवळची, ओळखीची, ज्यांना दीर्घायुष्य लाभावे, असं वाटावं अशी माणसं.
कमाल खान हा काही आपल्या नात्यातला, मित्रपरिवारातला नव्हता. तो काही कोणी थोर नेता, विचारवंत किंवा ख्यातनाम सामाजिक कार्यकर्ताही नव्हता, पण तरीही कमाल खान हा हिंदी बातम्या बघणार्या/ऐकणार्या लाखो लोकांना प्रिय असा माणूस होता. हातात कुठल्यातरी वृत्त वाहिनीचा बूम धरून रोज शेकडो चॅनेल्सवर दिसणार्या हजारो वार्ताहरांपैकी तो एक होता, पण स्वतःच्या कर्तृत्वामुळे, स्वतःच्या विशिष्ट शैलीमुळे, अभिजात आणि रसाळ लखनवी हिंदी भाषेच्या अत्यंत अदबशीर लहेज्यामुळे तो एका अर्थाने एकमेवाद्वितीय होता.
त्याच्या अशा अचानक निघून जाण्याने एका वृत्तवाहिनेचे नव्हे तर एकूणच पत्रकारितेचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रसंगी त्याची पत्नी रुची आणि त्याच्या मुलांना सांत्वनाचे दोन शब्द पोचवण्यापलीकडे आपण करू तरी काय शकतो?
पण मला या निमित्ताने जे सांगायचे आहे ते हे की कोणत्याही पत्रकाराचे कमाल खान होणे सोपे नसते; फार फार कठीण असते.
गेल्या पंधरा-वीस वर्षांत भारतातील पत्रकारिता पार रसातळाला गेली आहे. त्यातही वृत्त वाहिन्या- मग त्या तथाकथित राष्ट्रीय असोत की प्रादेशिक- त्या तर चिखलाचे तळे झालेल्या आहेत. आता वर्तमानपत्रात हवे ते छापून आणण्यासाठी आणि वृत्त वाहिन्यांत हवे ते दाखवून घेण्यासाठी पत्रकाराचे भ्रष्ट असणे गरजेचे उरलेले नाही; संपादक ओळखीचा किंवा भ्रष्ट असणेही गरजेचे नाही. राजकीय पक्ष आणि काही कंपन्या सरळ त्या वृत्तसंस्थेच्या मालकाला किंवा व्यवस्थापनाला थेट पैसे देऊन हे काम करून घेतात. लोकांचे शिव्याशाप मात्र तुटपुंज्या पगारावर काम करणार्या पोटार्थी पत्रकारांच्या वाट्याला येतात. या पार्श्वभूमीवर द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, एनडीटीव्ही यासारखे अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील अशा वृत्तसंस्था आपली पत आणि प्रतिष्ठा टिकवून आहेत.
म्हणूनच रवीश कुमार आणि कमाल खान हे एका अर्थी भाग्यवान पत्रकार आहेत की ज्यांना त्यांच्या व्यवस्थापनामुळे उत्तम, नैतिक पत्रकारिता करता तरी येते. कमाल खान जर आज तक, इंडिया न्यूज, रिपब्लिक टीव्हीसारख्या वृत्तवाहिनीत असता तर?
पण नुसते भाग्यवान असून चालत नाही. एखाद्या पत्रकाराची कारकीर्द अनेकानेक कारणांनी उभी होत असते. कमाल खानची कारकीर्द ही त्याच्या कष्टाने, अभ्यासू वृत्तीने, सतत करत राहिलेल्या वाचनाने, नेमके संदर्भ गोळा करत राहण्याच्या व ते संदर्भ योग्यवेळी वापरण्याच्या वृत्तीमुळे आणि त्याने आपली भाषा उत्तम असावी यासाठी भाषेवर केलेल्या कष्टसाध्य संस्कारांमुळे घडली आहे. तो प्रवासात असताना त्यांच्या गाडीत खूप सारी पुस्तकं असायची जी तो सतत वाचत असायचा आणि त्यादरम्यान काही नोट्स घेऊन ठेवत असे जे त्याला नंतर उपयोगी पडायचे.
त्याला जसे उत्तम शेर पाठ होते, तश्याच उत्तम कविताही. कधी कुराणातील दाखले द्यायचा तर कधी रामचरितमानस मधल्या ओळी त्याच्या रसाळ वाणीतून श्रोत्यांपर्यंत पोचायच्या. कमाल खानने केलेले गेल्या दोन-अडीच दशकांतले अयोध्येचे वार्तांकन हा माझ्यामते श्रेष्ठ पत्रकारितेचा वस्तुपाठ होता. त्याला अयोध्येतील वीट-न-वीट ठाऊक होती. एकेक माणूस, महंत त्याच्या ओळखीचा होता. म्हणूनच त्याला तिथे वार्तांकन करताना त्याचे ‘खान’ असणे आड येत नसे!
पण हा इतिहास आहे.
योगीचे सरकार सत्तेत आल्यानंतर हे चित्र बदलले होते. हळूहळू त्याचे ‘खान’ असणे आणि त्यात तो एनडीटीव्हीचा असणे त्याच्या विरोधात जायला लागले होते. भाजपचे मुख्यमंत्री आणि मंत्री त्याला टाळू लागले होते. अलीकडे तर मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला त्याला निमंत्रितही करत नव्हते! पण तो आपले दुःख बोलून दाखवत नसे. तटस्थपणे आपले काम करत असे. अगदी काल संध्याकाळपर्यंत तो कामच करत राहिला.
मध्य प्रदेशातही अगदी असेच होत आहे. एनडीटीव्हीच्या अनुराग द्वारीला मुख्यमंत्री शिवराज चौहानही आपल्या पत्रकार परिषदेत आमंत्रित करत नाही.
या पार्श्वभूमीवर एखाद्याचे कमाल खान म्हणून घडणे नि असणे, हे काही सोपे नाही.
इतना आसां नहीं कमाल खान होना!
कमाल साहब,
इस अदना दोस्त का आखिरी सलाम कुबूल कीजिये! अलविदा!!