□ महिला पत्रकारांची बदनामी रोखा, एडिटर्स गिल्डची सर्वोच्च न्यायालयाकडे तक्रार
■ ही तक्रार त्यांना केंद्र सरकारकडे नव्हे, सर्वोच्च न्यायालयाकडे करावीशी वाटली, यातच काय ते समजा!
□ तुम्ही भारतातच राहून देशसेवा का करत नाही? आयआयटीमध्ये भारतीय विद्यार्थ्यांइतकेच शुल्क आकारावे, अशी मागणी घेऊन गेलेल्या परदेशी भारतीय विद्यार्थ्यांना सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
■ अहो, तिथे कमी फीमध्ये, सवलती घेऊन शिकणार्या भारतीय विद्यार्थ्यांनाही परदेशीच जाण्याचे वेध लागलेले असतात, हे कसले परत यायला!
□ दंड आकारणीनंतरही मुखपट्टी लावणार्यांचे प्रमाण नगण्यच
■ भारतीयांच्या आरोग्य सवयी या विषयावर, मुखपट्टी न लावताही, हम तो भय्या चूप ही रहेंगे!
□ इंधन दरवाढीमुळे ब्रेड दोन ते पाच रुपयांनी महागला
■ ते इंधन महागलं की हे ‘इंधन’ही महागणार, भाज्या, धान्यं, कडधान्यं, मसाले, तेलं काय स्वस्त आहेत?
□ ज्यांचे नेतृत्त्व केले, त्या पोलिसांवर अविश्वास दाखवता? सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना झापले
■ नेतृत्त्व कसे केले असेल ते अविश्वासातूनच स्पष्ट होते!
□ मायावती निवडणूक लढवणार नाहीत…
■ …त्या भाजपची बी टीम म्हणून मतं फोडायचं काम करतील… वाक्य पूर्ण करा!
□ गोवा, उत्तर प्रदेशात आमदारांची भाजपला सोडचिठ्ठी, उत्तर प्रदेशात मंत्र्यांचाही टाटा
■ बोट बुडू लागली की उंदीर बाहेर पडणारच…
□ मुझफ्फरपूरवरून स्वबळावर निवडणूक लढवून दाखवा ना! – राकेश टिकैत यांचे योगी आदित्यनाथ यांना आव्हान
■ थांबा हो, आधी एक सुरक्षित मतदारसंघ शोधू द्या नीट त्यांना.
□ मुंबईत थंडीने दहा वर्षांचा विक्रम मोडला…
■ …दहा वर्षांत पहिल्यांदा खोबरेल गोठले… आणखी किती थंडी हवी?
□ लक्षणे नसतील तर कोविडची चाचणी नको- इंडियन मेडिकल कौन्सिलचे निर्देश
■ म्हणजे कोरोनाने यशस्वी माघार घ्यायला सुरुवात केली आहे तर! सुटलो!!!
□ राजकीय भूमिका घेणारे अभिनेते किरण माने यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता
■ आजच्या काळात कोणालाही ही किंमत मोजूनच पुढे जावे लागणार!
□ नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा हा चित्रपट वादाच्या भोवर्यात
■ जेवढा वाद जास्त, तेवढे प्रेक्षक खेचले जाणार सुरुवातीला तरी.
□ कोरोना लसीकरण न करून घेतलेला वर्ल्ड नं. १ टेनिसपटू नोव्हाक जोकोविक याला ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व्हिसा देण्यास ऑस्ट्रेलियाचा नकार
■ योग्य निर्णय, नियम सगळ्यांना सारखेच!
□ मुंबै बँकेवरील प्रवीण दरेकरांचे वर्चस्व संपुष्टात, महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी
■ आता ते पुन्हा ‘मजुरी’ करायला मोकळे!