अनेक गुन्हेगारांचे फोटो मिळविण्यासाठी मला खूप पायपीट करावी लागली. पण राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजन दुबईत असूनही मला त्याचे फोटो सहज उपलब्ध झाले. राजनला माझा घरचा फोन नंबर कुणी दिला माहीत नाही. एका रात्री साडेबारा एकच्या सुमारास माझ्या घरच्या फोनची घंटी वाजली. इतक्या मध्यरात्री कुणाचा फोन म्हणून घाबरतच डोळे चोळत झोपेतून उठलो. ‘हॅलो मी नाना बोलतोय! छोटा राजन…’ ‘कोण?… ’ ‘राजेंद्र निकाळजे…’
– – –
पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेले वॉन्टेड गुन्हेगार वर्षानुवर्षे पोलिसांना कसे सापडत नाहीत किंवा सापडले तर जामीन घेऊन लगेच पळून कसे काय जातात? त्यांना कसं शक्य होते इतके दिवस तोंड लपवून बसणं? ते सातासमुद्रापलीकडे एखाद्या बेटावर राहतात की गावखेड्यात गल्लीबोळात जीव मुठीत घेऊन राहतात? एका रात्रीत किंवा दिवसाढवळ्या त्यांना विमानाने भुर्रकन उडूनही जाता येते, ते कसं काय जमतं यांना? त्यांचा ठावठिकाणा पोलिसांना मिळत नसेल, तर आपणही साध्या वेषातील पोलीस बनून त्यांना हुडकून काढू, त्यांच्याशी बोलू, त्यांचे महान विचार ऐकून घेऊ आणि त्यांचा छान फोटोही काढू अशा विचाराने मी कॅमेरा घेऊन बाहेर पडतो…
…गुन्हेगारी विश्वात टॉप टेनच्या यादीत प्रथम क्रमांकावर असलेल्या महापराक्रमी करीम लालापासून सुरुवात करू या, म्हणून लालाचा जप करत मी त्याच्या शोधार्थ बहुसंख्येने मुस्लीम वस्ती असणार्या विभागात फिरतो. तेव्हा ग्रँटरोड येथील त्याच्या घराचा पत्ता लागतो.
नॉव्हेल्टी सिनेमाशेजारील बैदा गल्लीत एका इमारतीखाली खुर्ची टाकून त्याचा बॉडीगार्ड बसलेला असतो. माझ्या प्रश्नाला तो उडवाउडवीची उत्तरे देऊन तुच्छतेने माझ्याकडे पाहतो. मला चक्क उडवून लावतो. मी काढता पाय घेतो.
लालाचा अड्डा डोंगरीत असल्याचे एकजण सांगतो. डोंगरीत पंतगविक्रेते अचूक माहिती देतात. त्या दिशेने मार्गक्रमण करत असताना एकजण दरडावणीच्या भाषेत सुनावतो, ‘करीम लाला नहीं बोलनेका! खान साब पूछो, इज्जत से बात करो.’
‘ओके, चुकलं माझं, मी यापुढे खान साहेब बोलीन.’
आता मात्र मला रस्त्याच्या वळणावर ऑफिसबाहेर लाकडी पलंगावर विराजमान झालेले खान साहेब दृष्टीस पडले. बाजूला बांधलेल्या चार बकर्यांना आंजारत गोंजारत होते. चिंताग्रस्त मुद्रा, कपाळावर आठ्या, डोळ्यावर जाड भुवया होणारी काही तरूण धट्टी कट्टी पठाणी वेषातील मंडळी.
या बकर्यांसह माझाही बकरा होणार नाही ना?
व्याजाने पैसे देण्याचा यांचा धंदा मुंबईतील प्रसिद्ध. पठाण टोळीचे हे सर्वेसर्वा. डोंगरी परिसरात भांडण तंटे झाले की कुणी पोलीस ठाण्यात वा कोर्टात जात नाहीत. दोन्ही पार्ट्या खान साहेबांकडे तक्रारी घेऊन आल्या की एका दिवसात न्यायनिवाडा. दोघांनाही समान हक्क, दोघेही खूष. लालाच्या दरबारी कुणाही गरिबावर अन्याय नाही. त्यांचा शब्द अखेरचा. त्यांचा निर्णय मान्य करावाच लागतो, नाहीतर तुमचं काही खरं नाही.
माझी नम्रतेने विचारणा- खान साहेब, लोक तुम्हाला का घाबरतात? या सत्तरीपलीकडच्या वृद्धाला लोक का भितात, मला प्रश्न पडलेला, विचारून पाहिला. तुमच्या पराक्रमाची गाथा ऐकवाल काय? मी बॅगेतून कॅमेराही आणला आहे. तुमचा फोटो काढण्यासाठी. त्यांना खूप बोलते केले. गप्पा रंगल्या, पण फोटो काढण्यास सक्त मनाई.
बेटा, तुझको चाहिये तो यहाँ हाजी मस्तान और दाऊद को भी मैं बुलाता हूं, तू यहाँ इनका इंटरव्हू ले. (त्या काळी दाऊद मुंबईत होता)
नको… इथं नको, मला त्यांच्या कर्मभूमीतच, त्यांच्या बगलबच्च्यांसह फोटोसेशन करायचे आहे, म्हटलं.
कोई बात नहीं, असं म्हणत त्यांनी उंच मोठा ग्लास भरून लस्सी मात्र पिण्याचा आग्रह केला. लस्सी संपता संपेना. लाला टॅक्सीत बसून तातडीच्या कामासाठी निघून गेले. लालाचा फोटो मिळाला नाही, पण हाजी मस्तानचा ठावठिकाणा येथून समजला.
ब्रीच कॅन्डीकडून सोफाया कॉलेजच्या दिशेने जो वर रस्ता जातो त्याच्या डावीकडे मस्तानचा बंगला. गोदीत हमालाचे काम करणारा मस्तान परदेशी वस्तूंचे स्मगलिंग करून कोट्यधीश झालेला. बंगल्यात एकटाच नोकरासह राहात होता. सारखा सिगारेट फुंकत होता. कुठलेसे इंजेक्शन स्वत:च्याच हाताने टोचून घ्यायचा आणि पुन्हा ताजातवाना होऊन गप्पा मारायचा.
कोणतीही हरकत न घेता त्याने स्वत:चा फोटो काढू दिला. बंगल्याच्या वरच्या मजल्यावर जाऊन चार पाच फुटाची दिलीप कुमारची फोटो फ्रेम घेऊन आला आणि त्या फ्रेमसोबत उभे राहून फोटो काढून घेतला. नंतर मस्तानच्या जीवनावर आलेला हिंदी चित्रपट बराच गाजला आणि चालला.
अनेक गुन्हेगारांचे फोटो मिळविण्यासाठी मला खूप पायपीट करावी लागली. पण राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजन दुबईत असूनही मला त्याचे फोटो सहज उपलब्ध झाले. राजनला माझा घरचा फोन नंबर कुणी दिला माहीत नाही. एका रात्री साडेबारा एकच्या सुमारास माझ्या घरच्या फोनची घंटी वाजली. इतक्या मध्यरात्री कुणाचा फोन म्हणून घाबरतच डोळे चोळत झोपेतून उठलो.
हॅलो मी नाना बोलतोय! छोटा राजन…
कोण?…
राजेंद्र निकाळजे…
इथे रात्रीची शांतता, पण पलीकडून बराच आवाज ऐकू येत होता. शेअर बाजारात जसा आरडाओरडा असतो तसा आवाज. यावरून मी ओळखलं की हा कुठूनतरी परदेशातून बोलत असावा. तिथे यावेळी दिवस उजाडला असणार!
बोला नाना…
काम असं होतं भाई की बातमी पेपरमध्ये द्यायची होती. तुम्ही द्याल का?
देऊ की! ती कशासंदर्भात आहे?
तो बोलू लागला… भयंकर बातमी! सनसनाटी अन् खळबळजनक! शहरात शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहू शकतो. बातमी छापण्यात मोठी रिस्क होती.
तुम्ही जे सांगितलं ते तुमच्या हस्ताक्षरात लिहून पाठवा- मी
दोन पानाची बातमी त्याने लिहून मेलने पाठवली. नाना इतकं सुंदर भाषेत लिहू शकतो याची कल्पना नव्हती. शंका आली.
तुम्हीच लिहिली कशावरून? पुन्हा पाठवा आणि त्यावर तुमची स्वाक्षरी करा.
त्याने स्वाक्षरी करून पुन्हा बातमी पाठवली.
पुन्हा शंका. ही स्वाक्षरी राजेंद्र निकाळजे यांचीच कशावरून? हा डुप्लीकेट छोटा राजन असू शकतो म्हणून मी काही दिवस दुर्लक्ष केले. नसती आफत नको.
दोन दिवसांनी पुन्हा नानाचा मध्यरात्री फोन, भाई अजून नाही आली पेपरात?
नाना तुम्हाला खरं सांगतो. तुम्ही नाना कशावरून? मी तुम्हाला कधी पाहिले नाही, तुमचा आवाज ऐकलेला नाही. तुमचे कुठे हस्ताक्षर उपलब्ध नाही, मग त्या स्वाक्षरीवर विश्वास कसा ठेवायचा?
मग काय करावं लागेल- नाना
तुमचे वेगवेगळे फोटो काढून पाठवा. दोन दिवसात नानांनी ३४ फोटो काढून अल्बम कुरियरने पाठवला. फोटोच्या पाकिटावर दुबईच्या स्टुडियोचा पत्ता होता. नानाचे सर्व फोटो आणि बातमी ‘नवशक्ती’चे वृत्त संपादक नरेंद्र बोडके यांच्याकडे दिली. ते म्हणाले हा तुला कुठे भेटला? असे परस्पर छापता येणार नाही. नानाला सांग, तू प्रेस कॉन्फरन्स घे. सर्व पत्रकारांना बोलाव आणि त्यावेळी गौप्यस्फोट कर, म्हणजे ठळकपणे छापता येईल.
मी म्हटलं साहेब, नाना हा मोस्ट वॉन्टेड आहे. पोलीस अनेक दिवस त्याच्या शोधात आहे. अशावेळी कुणी प्रेस कॉन्फरन्स घेईल काय?
बोडके साहेबांनी छापण्यास नकार दिल्यानंतर सर्व फोटो घेवून ‘सकाळ’चे विजयकुमार बांदल आणि ‘महानगर’चे रवींद्र राऊळ यांचेकडे दिली.
त्यांनी दुसर्या दिवशी पहिल्या पानावर ठळकपणे छापली. हे फोटो पाहून प्रतिस्पर्धी टोळीतील अनेक गुंडांनी माझ्याकडे नानाच्या फोटोची मागणी केली. त्यासाठी ते वाट्टेल तितके पैसे द्यायला तयार होते.
मी हात जोडले. म्हणालो पेपरातले कापून घ्या हवं तर, पण माझ्याकडे मागू नका. मी नानाशी बेईमानी केल्यासारखे होईल. माफ करा.
दाऊदचा उजवा हात म्हणून प्रसिद्ध असलेला शार्पशूटर अनिल परब एका अज्ञात ठिकाणी भेटला. फोटो देण्यासाठी त्याने खूप आढेवेढे घेतले. यालाही तोच, नानाला विचारलेला प्रश्न विचारला, तुम्ही अनिल परब कशावरून? तुम्ही इतके दिवसाढवळ्या सहज कसे भेटू शकता?
मग ओळख पटण्यासाठी त्याने केलेल्या हत्याकांडाचा तपशील वर्णन करून सांगितला. पनवेलच्या काळोखे गावात अशोक जोशी आणि चार जणांना पाठलाग करून कसे मारले ते भयनाट्य सांगितले. प्रसिद्ध बिल्डर ढोलकिया बंधूंना कुठे, कशा गोळ्या घातल्या, तेही वर्णन केले. यापुढे हिटलिस्टवर कोण आहेत त्यांची यादीही सांगितली.
बापरे! तुम्ही इतका भीमपराक्रम केला आहात म्हणून सांगता, मग पोलीस तुम्हाला पकडत कसे नाहीत?
तो म्हणाला, पकडतीलच कसे? त्यांचा एक हात चालतो, माझे दोन्ही हात चालतात, असे म्हणून त्याने दोनही हाताने पिस्तुल गरगर फिरवून दाखवली.
तुम्हाला पकडू शकत नाहीत म्हणता, मग फोटो काढू देण्यास काय हरकत आहे?
डोळ्यावर चष्मा घालून आणि तोंडावर फोन ठेवून फोटो घ्या हवं तर, असे म्हणून त्याने पोझ दिली. माझ्या क्षेत्रात मीही शार्पशूटर असल्यामुळे खटखट फोटो शूट केले.
बापट गँगचा म्होरक्या अमर नाईक याच्या फोटोसाठी त्याला भायखळा जेलमध्ये जाऊन भेटलो. जेलमधील कैदी बंदीवासात जिवाला कंटाळलेले असतात असा माझा समज. पण इथे तर अमर चक्क क्रिकेट खेळत होता. कैद्यांना ठराविक वेळीच परवानगी घेऊन भेटता येते पण आम्हाला व्हीआयपी ट्रीटमेंट.
आयुष्यात पहिल्यांदाच जेलमधील वातावरण पाहिले. अमरभाई खुशीत, बाकीचे काही चिंताग्रस्त, कोपर्यात दिवस मोजत बसलेले.
अमरने जेलरच्या घरी मला नेले व त्यांच्याशी ओळख करून दिली. अतिशय सज्जन, कुटुंबवत्सल अधिकारी. त्यांनी त्यांच्या सौभाग्यवतीशी ओळख करून दिली. निवृत्तीला झुकलेला अधिकारी अमरशी फार अदबीने बोलत होता.
त्याला अमर म्हणाला, साहेब, कसं चाललंय? टी.व्ही. मस्त ना? आणि फ्रीज आता बंद पडत नाही ना?
अमर खूप वेळ बोलत होता, पण त्याने फोटो काढू दिले नाही.
काही दिवसात अमर जामिनावर बाहेर आला आणि दुसर्या एका गुन्ह्यात इन्स्पेक्टर मधुकर झेंडे यांनी त्याला पकडून आग्रीपाडा पोलीस ठाण्याच्या पोलीस कस्टडीत बंद केला. पोलीस रेकॉर्डला त्याचे फोटो हवे होते म्हणून झेंडे साहेबांनी मला बोलावून घेतले आणि त्याच्या हातात पाटी देऊन मला फोटो काढायला सांगितले. योगायोगाने अमरचा मिळालेला हा फोटो आता अमर झाला आहे.