व्यंगचित्रकार तो दिसे कसा आननी कवी तो दिसे कसा आननी, म्हणजे कवी प्रत्यक्षात कसा दिसतो, याची उत्सुकता रसिकांना असते. ती सगळ्याच कलावंतांबद्दल असते. व्यंगचित्रकारांबद्दलही ती असणारच. पण हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे काही फक्त व्यंगचित्रकार नव्हते. मराठी माणसाच्या हिताच्या ध्येयाने झपाटून शिवसेनेसारखी संघटना उभी करणारे लढवय्ये नेते होते, फर्डे वक्तेही होते. ज्या काळात राजकीय नेते म्हणजे धोतर, कुर्ता, गांधी टोपी असा एकरंगी, रूक्ष कारभार होता, त्या काळात बाळासाहेब हे सुटाबुटापासून कुडता पायजम्यापर्यंत वेगवेगळे पोषाख करणारे, तोंडात रूबाबात चिरूट ठेवणारे, स्वत:चं एक फॅशन स्टेटमेंट असणारे एकमेव बहुरंगी, बहुढंगी नेते होते… त्यांच्या स्वत:च्या व्यंगचित्रांमध्ये ते स्वत:च कधीतरी कसे अवतरायचे, याचं झकास दर्शन घडवणारं हे व्यंगचित्र आहे… ‘मार्मिक’च्या दिवाळी अंकासाठी ‘पूर्वज हयात असते तर’ या कल्पनेवर व्यंगचित्रं काढण्यासाठी उभे बाळासाहेब आणि त्यांनी रेखाटलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र म्हणजे ‘राष्ट्रपुरुषाचा गैरवापर’ असल्याचा ठपका ठेवणारे पोलीस अधिकारी यांच्यातील नजरानजर खास पाहण्यासारखी आहे…