□ जाहीर सभांमधून पाण्यासारखा पैसा वाहतोय- मायावती यांचा भारतीय जनता पक्षावर निशाणा
■ तरी वर भिकारी करून ठेवलेल्या जनतेकडे वर्गणीसाठी हात पसरायला तयार आहेतच!
□ नव्या वर्षात विकासाचा वेग वाढवणार- पंतप्रधान नरेंद्र मोदी
■ तुमचा विकास वाळूत जागेवर फिरणार्या चाकासारखा आहे मोदीजी, किती वेग वाढवलात तरी देश काही पुढे जाण्याची शक्यता नाही!
□ मुनगंटीवारांनी महाविकास आघाडी सरकारवर घसरताना समलिंगी लोकांसाठी अपमानास्पद विधान केले- अभिनेत्री सोनम कपूरने काढली खरडपट्टी!
■ वर वर कितीही सुधारणावादाचा आव आणला तरी मूळ संस्कार उफाळून येतातच!
□ महाविकास आघाडी घालवणे हाच आमचा संकल्प- रामदास आठवले
■ पण, तुमच्यापाशी आहे का सध्या काही विकल्प? पाण्यात गेले सारे सरकार पाडण्याचे प्रकल्प!
□ मोदी सरकारच्या उदासीनतेमुळे २३ न्यायाधिशांच्या नियुत्तäया रखडल्या
■ लोकशाहीचे सगळे स्तंभ जराजर्जर केल्याशिवाय हुकूमशाही रेटता येत नाही.
□ उणीदुणी काढण्यापेक्षा केंद्रातून निधी आणा- पवारांच्या राणेंना कानपिचक्या
■ तिथे त्यांचं स्थान सूक्ष्मातिसूक्ष्म; इथेच गमजा!
□ मुलींच्या विवाहाच्या वयाची चिकित्सा करणार्या ३१ जणांच्या समितीत फक्त एकच महिला
■ बायकांना काय कळतंय कशातलं, ही मूळ प्रवृत्ती असल्यावर लाजेकाजेखातर एक तरी ठेवली, हे पुष्कळ झालं!
□ योगी सरकारचा गुन्हेगारांवर वचक- पंतप्रधान मोदी
■ तरीच उत्तर प्रदेश हे जगातलं सगळ्यात सुरक्षित राज्य असल्याचं युनेस्को आणि नासा यांनी संयुक्तपणे जाहीर केलंय…
□ रेल्वे स्टॉलवरील मासिकं-वृत्तपत्रं-नियतकालिकांची जागा घेतली आहे खाद्यपदार्थांनी; वाचकांची गैरसोय
■ नुसतं शरीराला खाद्य मिळून उपयोग नाही, मेंदूलाही खाद्य मिळायला हवं प्रवाशांच्या.
□ गलवान खोर्यात पुन्हा चिनी झेंडा फडकला
■ थांबा जरा, मोदीजींनी डोळे लाल करायला घेतलेत… एकदा लाल डोळे करून दाखवले की लालभाईंना पळता भुई थोडी होईल… बघाच तुम्ही!
□ चीनमध्ये पुन्हा निर्बंध; अन्नधान्य, औषधे मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी
■ तिथले नागरिकही तक्रार करतात? कुठे? मग नंतर काय होतं त्यांचं?… तक्रारींचं नव्हे हो, नागरिकांचं.
□ पंतप्रधानांचा द्वेष सहन केला जाणार नाही- भाजपचा काँग्रेसला इशारा
■ त्यासाठी आधी पंतप्रधानांनी आपण सगळ्या देशाचे पंतप्रधान आहोत, एका पक्षाचे प्रचारप्रधान किंवा परिधानमंत्री नाही, हे लक्षात ठेवून वागायला हवं… बाकी कुणाचा द्वेष करू नका, हे भाजपने सांगावं म्हणजे रावणाने दुसर्याची बायको उचलून नेऊ नये, असा उपदेश केल्यासारखे आहे.
□ टीकेला कृतीतून उत्तर देतो : शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
■ मग विरोधकांना पळता भुई थोडी होते…
□ श्रीलंका दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; पर्यटन व्यवसाय कोरोनामुळे संपुष्टात आणि चीनच्या कर्जाचा वाढता डोंगर
■ वाईट बातमी, चिन्यांचे नवे ठाणे इतक्या नजदीक वसणार आणि भारताची डोकेदुखी वाढणार.