तसे बाजारात कमळाच्या सुगंधाचे अत्तरही मिळते, पण कमळ काही सुगंधासाठी ओळखले जात नाही आणि गुलाब किंवा इतर सुगंधी फुलांप्रमाणे त्यांचे अत्तर खास लोकप्रियही नाही. बरीचशी कमळे हल्ली त्यांच्या मुळापाशी आधीपासून असलेल्या आणि ठिकठिकाणाहून गोळा करून आणलेल्या चिखलासाठीच ओळखली जातात. हा चिखल दुर्गंधयुक्त असला तर त्यात कमळाचा सौम्य सुगंध (असल्यास) हरवूनच जात असेल.
सायकलीचा आणि सुगंधाचा तर तसा काही संबंधच नाही. पण तो गेल्या काही दिवसांत जडला आणि मग राजकारणातलं एक स्तिमित करणारे आणि (उत्तर प्रदेशाच्या मापदंडांवरही) नवा नीचांक गाठणारे नाट्य पाहायला मिळाले. उत्तर प्रदेशात या वर्षी होणार्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला आज आहेत तेवढ्या जागा मिळणे कठीण आहे, हे तिथला बच्चा बच्चा जाणतो. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शब्दकोशात ‘माघार’ या नव्या शब्दाची भर घातली आणि शेतकरी कायदे मागे घेतले. या कायद्यांचा थेट फटका शेतकरीबहुल भागात बसणार हे समजल्यावर एकीकडे हे करावे लागले आणि दुसरीकडे लखीमपूर खेरी हत्याकांडाच्या सूत्रधाराच्या बाहुबली पिताश्रींनाही हात लावता येत नाही; कारण एकदोन जागाही आता फार मोलाच्या होऊन बसणार आहेत. समाजवादी पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्या सभांना मिळणार्या जोरदार प्रतिसादाने भाजपचे धाबे दणाणले आहे. त्यामुळेच वाराणसीमध्ये दिवसभर धार्मिक इव्हेंटबाजी करून उत्तर प्रदेशातली निवडणूक ‘आपण विरुद्ध इतर’ अशी आहे, असे दाखवण्याची वेळ मोदी यांच्यावर आली. त्यांची तथाकथित प्रतिमाच सगळे तारून नेईल असे अलीकडे बाकी सगळ्या बाबतीत हतबल झालेल्या भाजपला वाटू लागले आहे.
अशात देशाची अत्तर राजधानी असलेल्या कन्नौजच्या एका अत्तराच्या व्यापार्याने (जो समाजवादी पक्षाचा विधान परिषद सदस्यही आहे) ‘समाजवादी परफ्यूम’ हे अत्तर बाजारात आणले आणि भाजपचा मस्तकशूळ उठला. या अत्तराचा सुगंध उत्तर प्रदेशात दरवळला तर तिथून आणि पाठोपाठ देशभरातून झोळी उचलून हिमालयाकडे निघण्याची वेळ आपल्यावर येईल, हे या पक्षाच्या नेत्यांच्या लक्षात आले. मग नेहमीप्रमाणे केंद्र सरकारच्या हातातले बाहुले बनलेल्या प्राप्तिकर विभागाने या व्यापार्यावर छापे टाकले. त्याच्याकडील २०० कोटी रुपयांची रोकड मोजायला आठ यंत्रेही कमी पडली, वगैरे बातम्या भाटांनी मोठ्या चवीचवीने दिल्या.
पण, त्यानंतर खरा बाँब टाकला तो अखिलेश यादव यांनी. समाजवादी अत्तर बाजारात आणणारे आमदार आहेत पुष्पराज जैन ऊर्फ पंपी जैन. प्राप्तिकर विभागाचे छापे पडले पीयूष जैन नावाच्या वेगळ्याच अत्तर उत्पादकावर. २०० कोटी सापडले ते त्याच्याकडे. अखिलेश म्हणाले की या व्यापार्याचा आणि समाजवादी पक्षाचा काहीच संबंध नाही. उलट हा व्यापारी भाजपशीच संबंधित आहे. पीयूष जैन आणि पुष्पराज जैन यांच्या नावांमध्ये घोटाळा होऊ शकतोच. दोघांची घरे कन्नौजमध्ये एकमेकांपासून अर्धा किलोमीटर अंतरात आहेत. प्राप्तिकर अधिकारी गफलतीने एका पी. जैनऐवजी दुसर्या पी. जैनकडे पोहोचले असण्याची शक्यता फारच मोठी आहे.
या शक्यतेला सगळ्यात मोठे बळ पुरवले ते भाजपच्या नेत्यांनी. समाजवादी अत्तराशी कसलाही संबंध नसलेल्या पीयूष जैन यांच्यावर छापे पडताच साक्षात पंतप्रधानांनी आणि त्यांच्याप्रमाणेच देशाच्या कारभारापेक्षा महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये अधिक व्यग्र असलेले गृहमंत्री अमित शाह यांनी कसलीही खातरजमा न करता घाईघाईने ‘समाजवादी अत्तराचा दुर्गंध, भ्रष्टाचाराचा दुर्गंध’ वगैरे त्यांच्या पदांना न शोभणार्या कोट्या करून निवडणूक सभांमध्ये टाळ्या घेतल्या. ‘राजा बोले आणि दळ हाले’ म्हणतात तसे सगळे भाजपेयी त्यांच्या सुरात सूर मिसळून फार मोठा तीर मारल्याप्रमाणे बरळू लागले. आपण समजतो तो हा नव्हेच, हे लक्षात आल्यावर ते चरकले, पण तोवर उशीर झाला होता. नंतर पुष्पराज जैन यांच्यावरही छापे टाकले गेले आणि तशीच कारवाई आखली होती, तोच क्रम होता, अशी मखलाशी प्राप्तिकर विभागाने केली. पण, उत्तर प्रदेशाची जनता दुधखुळी नाही. हे खरे असते तर पीयूष जैनांवरच्या छाप्यांनंतर उतावळेपणाने त्या छाप्यांचा संबंध समाजवादी अत्तराशी जोडला गेलाच नसता. या थेंबभर अत्तराने भाजपची जी अब्रू घालवली, ती नंतर हौदभर अत्तर व्यापार्यांवर छापे घातल्याने परत येणार नाही.
अखिलेश यादव यांना तर भाजपच्या या आततायी कारवाईने मोठे हत्यार दिले आहे. त्यांनी उत्तर प्रदेशात आता ‘इत्र का इन्किलाब’ म्हणजे अत्तर क्रांती जन्माला येणार आहे आणि तिची सुरुवात कन्नौजपासून होणार आहे, असे भाष्य केले आहे. भाजपचे नेते विद्वेषाचा दुर्गंध पसरवतात, आम्ही सर्वसमावेशकतेचा सुगंध पसरवतो. हरण्याची भीती दाटून आली की भाजप हे नेहमीचे प्रयोग करते. पण त्यात कन्नौजचे नाव बदनाम करण्याचे कारण नव्हते, असे अखिलेश म्हणाले आणि नोटबंदी, जीएसटी वगैरे जर अफाट यशस्वी झाले होते, तर २०० कोटी रुपये पीयूष जैनकडे रोकडस्वरूपात आले कसे, असाही प्रश्न त्यांनी केला.
सत्तेचा मद चढला की करायला गेलो एक आणि झाले भलतेच असे होते. समाजवादी अत्तर विरुद्ध ‘माजवादी’ अत्तर अशी ही लढाई करून घेऊन भाजपने नेमके (भल)तेच करून ठेवले आहे.